Tuesday, 26 February 2019

जागतिक मराठी राजभाषा दिवस

जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त

मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व

10-15 वर्षापूर्वी शहरापुरते मर्यादित असलेल्या इंग्रजी शाळा पाहता पाहता छोट्या छोट्या गावात देखील सुरु झाले. इंग्रजी शाळेचे पेव आत्ता खेडोपाड्यात देखील पसरले आहे. त्याचा सर्वात जास्त परिणाम सरकारी मराठी शाळेवर झाला. कारण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांना हे इंग्रजी शाळांचे मंडळी पळवून नेत आहेत. पालकांची ईच्छा नसेल तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवून त्यांच्या मुलांना मोफत दप्तर, वह्या, पुस्तके, आणि येण्या-जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून पालकाना आकर्षित करण्याचे काम केल्या जात आहे. याउलट सरकारी शाळेत सर्व काही सुविधा शासन अगदी मोफतपणे पुरवठा करते तरी सुद्धा ग्रामीण भागातील पालकाचे या इंग्रजी शाळेकडील लक्ष अजुनही कमी झाले नाही.
दुरुन डोंगर साजरे या म्हणीनुसार इंग्रजी शाळा पालकाना आकर्षित करतात. मात्र त्यांचे आकर्षण फार काळ टिकत नाही. विविध कारणामुळे एक-दोन वर्षात ही मुले पुन्हा सरकारी शाळेत प्रवेश घेतात. काही पालकाना या शाळेचा खर्च झेपत नाही. त्यांच्या शाळेचा गणवेष, लागणाऱ्या वह्या आणि इतर खर्च, त्याच सोबत न झेपावणारा अभ्यास या सर्व बाबीला कंटाळून पालक आपल्या मुलांना जवळच्या शाळेत प्रवेश देतात. इंग्रजी शाळेतील अभ्यास मुलांना समजण्यास अवघड जाते. घरात बोलली जाणारी भाषा एक शाळेत बोलली जाणारी भाषा दुसरीच त्यामुळे मुले गोंधळुन जातात. त्या मुलांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी होते. दोन वर्ष इंग्रजी शाळेत शिकलेली मुले जेंव्हा मराठीत प्रवेश घेतात, तेंव्हा ते गोंधळुन जातात. त्यांच्यासाठी सेमी हा एक उत्तम पर्याय आहे. पालकानी आपल्या मुलांची क्षमता लक्षात घेऊन त्यास प्रवेश द्यायला हवे. काही मुले खुप हुशार असतात. काही ही सांगितले की ते लगेच स्विकार करतात आणि त्यात प्रगती देखील करतात. ज्याप्रकारे हाताची पाचही बोटे सारखी नसतात. अगदी त्या प्रमाणे प्रत्येक मूल हा वेगळा असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती प्रमाणे. शेजाऱ्यांचा मुलगा ज्या शाळेत जातो त्याच शाळेत आपला ही मुलगा जावा असा विचार करणे साफ चुकीचे आहे. जे पालक आपल्या पाल्यांच्या भविष्याची काळजी करतात ते विचारपूर्वक पाऊल उचलतात. म्हणून तर त्यांचे पाल्य जीवनात यशस्वी होतात. जीवनात इंग्रजी फाडफाड बोलता आले की यश मिळते हे साफ चुकीचा समज आहे. जे की समाजात प्रत्येक घरात पोहोचले आहे. घरातील मूल रेन रेन कम अगेन म्हणाले की आई वडिलांची छाती भरून येते. लेकरु इंग्रजी गाणे म्हणत आहे म्हणून कौतुक करतात. पण खरोखर त्याचा अर्थ त्याला कळतो काय ? तर उत्तर नाही असे येते. मिसने ते गीत ज्या हावभावयुक्त पद्धतीने शिकविले त्यांच हावभावाने मूल गाणे म्हणते. अर्थात त्याचा अर्थ त्याला माहित नसतो. याउलट मराठीत म्हणजे मातृभाषेतील येरे येरे पावसा म्हणताना त्यास हावभाव पाठ करण्याची गरज नसते. त्या ओळीतील प्रत्येक शब्दाचा अर्थ माहित असतो आणि हावभाव करताना ते त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येते. असेच काही अनुभव इतर विषयाच्या बाबतीत घडत असते म्हणून मुलांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून म्हणजे मराठीत होणे मुलांच्या प्रगती साठी आवश्यक आहे. एखाद्या विषयाचा गाभा किंवा मुळ संकल्पना कळाली तर त्याचे अभ्यास करून कोणत्याही भाषेत व्यक्त करता येते. पण मुळ संकल्पनाच कळाली नाही तर पोपटपंची करून इतर भाषेत व्यक्त करता येत नाही. मातृभाषेतून शिकल्या ने वाचनाची आवड निर्माण होऊन उत्तम ज्ञान, संशोधक वृत्ती, व उच्च अभिरूची संपन्न व्यक्तिमत्व तयार होते. आकलन शक्तिस भरपूर चालना मिळते. तसेच स्वयंअध्ययन करण्यास मदत मिळते. सभोवती मराठीचे वातावरण असल्यामुळे पाठांतर करण्याची गरज भासत नाही. तसेच मराठीत जे बोलले तसेच लिहिल्या जाते मात्र इंग्रजी बोलणे वेगळे आणि लिहिणे वेगळे असते त्यामुळे मुले गोंधळून जातात. त्यांना शब्दार्थ पाठ केल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याच मुळे इंग्रजी शाळेत शिकणारी मुले नेहमी घोकंपट्टी करताना दिसून येतात. कधी कधी काही पाठ झाले नाही तर वैतागतात, निराश होतात तर काही मुले व्यसनाधीन बनतात. इंग्रजी शाळेतील बहुतांश शिक्षक प्रशिक्षित व तज्ञ नसतात, हा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यांना तूटपुंजा पगार असतो जे की वेळेवर देखील मिळत नाही त्यामुळे ते खाजगी शिकवणी घेण्याकडे वळतात त्याचा खर्च वेगळाच. काही इंग्रजी शाळा यास अपवाद असतील मात्र ते हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच.
विस्मृती ही माणसाला मिळालेली एक देणगी आहे. ती चांगली आहे आणि वाईट देखील. चांगली एवढेसाठी की काही दुःखद गोष्टी विसरून गेलोत तर माणूस जिवंत राहू शकतो. जीवनातील प्रत्येक गोष्ट जर स्मृतीत राहिले असते तर माणूस नक्कीच पागल झाला असता. म्हणून विस्मृती चांगली बाब आहे. मात्र जे की स्मृतीत रहावे म्हणून शालेय जीवनात पाठांतर करतो ते मात्र काही काळ उलटल्यानंतर विसरून जातो हे आपल्यासाठी वाईट बाब आहे. पोपटपंची केलेल्या गोष्टी चिरकाल लक्षात राहत नाही मात्र समजून घेतलेल्या अनेक गोष्टी नेहमीसाठी लक्षात राहते. म्हणून मातृभाषेतील शिक्षण आवश्यक आहे. कारण मातृभाषेतील शिक्षणासाठी पोपटपंची करण्याची गरज राहत नाही. समजून घेऊन अभ्यास करू शकतात. घरातील इतर मंडळी देखील अभ्यासात मदत करू शकतात. काही चुकले असेल तर मार्गदर्शन करू शकतात. मात्र इंग्रजी शाळेतील मुलांच्या बाबतीत उलट घडते. मुलांना शाळा आणि ट्यूशन याच गोष्टीवर अवलंबून रहावे लागते. सहसा ग्रामीण भागातील पालकाना इंग्रजी वाचता येत नाही तर ते मुलांना काय सांगू शकतील. तुझ्या गुरुजींना विचार असे उत्तर आपल्या मुलांना द्यावे लागते. येथूनच मग पालकाचा संवाद कमी होतो. मुले इंग्रजी भाषा खाडखाड बोलतील मात्र मातृभाषेत शिक्षण घेतलेल्या मुलासारखे आपले स्वतः चे मनोगत व्यक्त करू शकणार नाहीत. त्यांना अनेक अडचणी येऊ शकतात. यास शंभरातून एखादा अपवाद असू शकतो. येेत्या काही दिवसात शाळा प्रवेशाचे कार्य चालू होणार आहे. एकदा प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली तर पालकाना नंतर काही करता येत नाही म्हणून पालकानी आपल्या पाल्याना कोठे प्रवेश द्यावा ? इंग्रजी शाळेत की मातृभाषेतील शाळेत याविषयी पालकांचे आजच प्रबोधन होणे आवश्यक आहे. हातातून गेलेली वेळ कधीच परत येत नाही. त्यामुळे पालकानी आपल्या मुलांविषयी डोळसपणे विचार करून निर्णय घ्यावे. अन्यथा आपल्या मुलांचे आयुष्य बरबाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऐकावे जनाचे करावे मनाचे या उक्तीनुसार काम केल्यास आपणास पश्चाताप होणार नाही. पालकानी मातृभाषेचे महत्त्व प्रथम जाणून घ्यावे मगच आपल्या मुलास जेथे योग्य वाटेल तेथे प्रवेश द्यावे. आज मराठी भाषेचे प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज म्हणजे वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणून आजच्या दिवशी संकल्प करू या की आपल्या मुलांना मराठी भाषेतील शाळेतून शिक्षण द्यावे, अशी प्रत्येक पालकांना विनंती

नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
  nagorao26@gmal.com
( लेखक उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत. )

Sunday, 24 February 2019

सर सलामत तो ......

सर सलामत तो ........

सकाळी सकाळी गावाला जात असताना, गाडीच्या समोर काही रानडुक्कर पळत आल्यामुळे आमच्या एका मित्रांच्या दुचाकी गाडीचा अपघात झाला आणि त्यात डोक्याला खूप मार लागल्यामुळे त्यास दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं. डोक्याला मार लागून रक्तस्त्राव झाल्यामुळे तो बराच वेळ बेशुद्ध अवस्थेत होता पण डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे तो वाचला आणि हळूहळू त्याच्या तब्येतीत सुधारणा देखील झाली. आम्ही सर्व मित्र त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून देवाकडे प्रार्थना करीत होतो आणि देवाने आमचं ऐकलं. पण याच वेळी अजून एक चर्चा प्रकर्षाने झाली ती म्हणजे गाडी चालवताना हेल्मेट वापरण्याची. आज आमच्या मित्राने गाडी चालवताना हेल्मेट वापरलं असतं तर कदाचित एवढा मोठा प्रसंग त्याच्यावर आला नसता. हिंदीत एक म्हण आहे सर सलामत तो पगडी पचास, त्यानुसार गाडी चालवताना आपल्या डोक्यावर हेल्मेट असेल तर यदाकदाचित अपघात झालाच तर डोक्याला मार लागत नाही. उपचाराच्या खर्चापेक्षा काळजीसाठी लागणारा खर्च खूप कमी असतो. आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे डोकं. कारण त्या डोक्यात मेंदू सुरक्षित असतो. अपघातात त्या मेंदूला काही दुखापत झाली तर मनुष्याच्या जीवनाला धोका संभवतो. अपघातामध्ये शरीरातला कोणताही भाग, हाताला किंवा पायाला किती ही दुखापत झाली तरी त्याचे तेवढं नुकसान होणार नाही, किंवा ते विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करून मिळविता येऊ शकते. मात्र डोक्याला मार लागून डोक्यात रक्तस्त्राव होणे हे अत्यंत धोकादायक आहे. यात प्रसंगी जीव सुद्धा जाण्याची शक्यता असते. म्हणून डोक्याला मार लागणार नाही याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अपघात कधी ही वेळ, काळ सांगून येत नाही. आजकाल दुचाकी चालविणाऱ्यामध्ये मुली आणि महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महिला कर्मचारी साधारणपणे वीस किमीचा प्रवास दुचाकीने करत आहेत. मात्र ते देखील हेल्मेटचा वापर फार कमी करतांना दिसून येतात. आपल्या जीवनाची काळजी आपण न करता सरकार करीत असते. सरकारने नवीन गाडी खरेदी करतांना दोन हेल्मेट खरेदी करण्याची शक्ती केली होती. त्याशिवाय गाडीचा परवाना आर टी ओ ऑफिस मधून मिळत नव्हता. हा एक चांगला निर्णय आहे पण आपणास ते सरकार नाहक भुर्दंड टाकत आहे असे वाटते. केंव्हाही पहा चांगल्या गोष्टीला प्रथमतः विरोधच होते, जेव्हा त्याचे महत्व कळते त्यावेळी मात्र प्रत्येकजण त्याची प्रशंसा करत बसतात. सरकार आपल्या सुरक्षेसाठी हेल्मेटसक्तीचा कायदा करते आणि आपण त्याला विरोध करतो. हेल्मेटसक्ती नको म्हणताना एक वेळ विचार देखील करत नाही की हे कोणासाठी फायद्याचे आहे. आपल्या सुरक्षेसाठी खूपच महत्वाचे आहे. एवढंच नाही तर हेल्मेटमुळे गाडीवर डोळ्याला आणि कानाला वारा लागत नाही तसेच ऊन, थंडी, पाऊस या गोष्टीपासून देखील संरक्षण मिळते. शहरात तर ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की, त्यापासून वाचण्यासाठी हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे. तोंडाला रुमाल बांधण्यापेक्षा हेल्मेट केंव्हा ही चांगले. आजकाल कॉलेजमध्ये जाणारी मुले बेफामपणे गाडी चालवितात. त्यांच्या अश्या गाडी चालविण्यामुळे त्यांचे तर नुकसान होतेच शिवाय हकनाक दुसऱ्याचे देखील अपघात होतात. त्यामुळे घरातील पालकांनी थोडी काळजी घ्यावी आणि लहान मुलांना गाडी चालविण्यास देऊ नये, दिल्यास सोबत हेल्मेट देखील द्यावे जेणेकरून त्यांना गाडी चालवताना अपघात झाल्यास दुखापत होणार नाही. आपले जीवन आपल्या कुटुंबासाठी अत्यंत महत्वाचे आहे याची एकदा मनात आठवण ठेवावी. तेंव्हा हेल्मेटसक्ती ही आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे याचे महत्व जाणून घेऊन सर्वांनी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर नियमित करून सुरक्षित प्रवास करू या.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...