लोभ म्हणजे अधोगती
माणसाच्या जीवनात सर्वात जास्त घातक म्हणजे लोभ. ज्याच्या जीवनात लोभ, लालसा आणि स्वार्थ भाव असते त्यांचे जीवन कधी ना कधी धोक्यात येते. याच लालसे मुळे अनेकांना फसवणुकीसारख्या प्रकाराला तोंड द्यावे लागते. निरक्षर किंवा अडाणी माणसे नाही तर शिकलेले व्यक्ती देखील अति लोभा मुळे वेगवेगळ्या प्रकरणात गुंतले जातात आणि त्यांची निव्वळ फसवणूक होते. एका भामट्याने कर्मचाऱ्यांस दीड लाख रूपयाला फसविले अश्या आशयच्या बातम्या वाचण्यात येते तेंव्हा हसावे की रडावे हेच कळत नाही. पण लोभापायी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. यांचे असंख्य उदाहरण आपण नेहमीच्या जीवन व्यवहारात पाहत असतो. काही माणसे सुख समृद्धीमध्ये असून देखील जास्त पैश्याच्या लोभामुळ लाच घेण्याचे प्रकार करत असतो. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करणे आवश्यक आहे मात्र ते तसे करत नाहीत. काही राजकारणी आणि पैसेवाले मंडळी त्यांना अनेक प्रकारची आमिष दाखवितात आणि ते त्या आमिषाला बळी पडतात. असे अनेक ठिकाणी घडते. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या मनात लोभ नावाची क्रियाच निर्माण होऊ देऊ नये. हे महत्वाचे आहे. आपणाला लॉटरी लागावी असे वाटणे म्हणजे एकप्रकारे लोभच आहे. काही काम न करता पैसा प्राप्त करण्याची ईच्छा म्हणजे लोभ होय. अभ्यास न करता आपण परीक्षेत पास व्हावे अशी कामना म्हणजे लोभ होय. स्वप्नरंजनात जगून दे रे हरी पलंगावरी ही वृत्ती लोभ निर्माण करत असते. लोभ नष्ट करायचे असेल तर जीवनात नेहमी कष्ट करत राहावे. आयते खाण्याची सवय आपणाला आळशी बनविते आणि आळशी लोकांची कधीही प्रगती होत नसते. सध्या संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. चीनच्या वूहान शहरातून आलेल्या या सूक्ष्म विषाणूमुळे जगात वीस लाखाच्या वर लोकं प्रभावित झाले आहेत तर लाखाहून जास्त लोकांचा यात बळी गेलंय. यास जगाने महामारी म्हणून घोषित केले आहे. या विषाणूने भारतात देखील आपला प्रभाव दाखविला असून गेल्या वीस पंचवीस दिवसापासून संपूर्ण भारतात लॉकडाऊन घोषित करण्यात आले असून माणसाच्या संचारावर देखील बंदी टाकण्यात आली आहे. अश्या प्रतिकूल काळात लोकांना जीवानावश्यक वस्तू मिळाव्यात म्हणून काही दुकानाना सकाळच्या वेळी विक्री करण्याची परवानगी मिळाली. सध्याची परिस्थिती पाहून या लोकांनी सहानुभूती दाखवायला हवी पण तसे होतांना दिसत नाही. एकीकडे देशातील व राज्यातील अनेक मंडळी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीला मदत देत आहेत तर इकडे हे दुकानातील विक्रेते दामदुप्पट भावाने मालाची विक्री करतांना दिसत आहेत. मिळालेल्या संधीचा फायदा घेण्याचा लोभ यांच्या मनात निर्माण झाला आहे म्हणून तर ते असे वागत आहेत. पण यांनी खरंच असं वागायला हवं का ? असा प्रश्न देखील कधी कधी मनात येते.
कष्ट करून घाम गाळून जे पैसे मिळतात, त्यातून मिळवलेलं मिरची भाकरीचे जेवण देखील रुचकर आणि स्वादिष्ट असते. कोणत्याच गोष्टीची काळजी नसल्यामुळे झोप देखील छान लागते. याऊलट लोभामध्ये पैसे कमावलेले व्यक्ती समोर पंचपक्वान्न असून देखील पोट भरत नाही आणि त्यामुळे रात्रीला झोप देखील लागत नाही. गैरव्यवहारातून कमावलेला पैसा कधी ही समाधान मिळवून देत नाही. म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिकणे आवश्यक आहे. अति लोभाने आजपर्यंत कोणाची प्रगती झाली नाही, हे नेहमी लक्षात असू द्यावे.
- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा, धर्माबाद
9423625769