मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त लेख
मराठवाड्याचा विकास
इंग्रजाच्या जुलमी गुलामगिरीतुन दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. परंतु हैद्राबाद संस्थान मधील लोकाना स्वातंत्र्य मिळाले नव्हते. हैद्राबाद संस्थान चे निजाम राजे यांनी आपला प्रांत स्वतंत्र भारतात समाविष्ट करण्यास तयार नव्हते. त्या राज्याच्या सैनिकांना रझाकर असे म्हटले जाई. रझाकरचे सैनिक प्रान्तातिल हिंदू लोकांवर अनेक प्रकारचे अत्याचार व जुलुम करीत असत. दिवसेंदिवस त्यांचा छळ वाढत चालले असताना समजातून सुद्धा त्याला मोठा विरोध मिळू लागला. हैद्राबाद मुक्ती संग्राम चळवळीचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले. त्यांना गावोगावी अनेक लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. याच कालावधीत या रजाकार सैनिकांनी गोविंदराव पानसरे यांचा नांदेड़ जिल्ह्यातील अर्जापुर येथे खून केला . त्याचे पडसाद समजातून फार मोठ्या प्रमाणावर पडले. भारताचे पोलादी पुरुष असलेले सरदार वल्लभभाई पटेल हे त्यावेळी भारताचे गृहमंत्री होते. लोकांचा जनक्षोभ आणि पटेलांची कणखर वृत्ती यामुळे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर तब्बल एक वर्ष एक महिना दोन दिवस उलटल्यानंतर म्हणजेच 17 सप्टेंबर 1948 रोजी हैद्राबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलिनीकरण करण्यात आले. यात संपूर्ण मराठवाडा विभाग सुध्दा सामिल झाला. अर्थातच इंग्रजांनी दीडशे वर्षात जेवढा अत्याचार किंवा जुलुम केला नाही त्यापेक्षा किती तरी जास्त त्रास या कालावधीत लोकांना सहन करावा लागला हे सत्य सांगतानाही लोकांच्या अंगावर आजही काटा उभा राहतो.
भाषावार प्रांतरचनेनुसार दिनांक 01 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. मराठवाडा विभाग जो पूर्वी हैद्राबाद मध्ये होता तो महाराष्ट्राला जोडण्यात आला. पूर्वीपासूनच मराठवाडा विभाग मागासलेला होता. महाराष्ट्राला जोडताना या विभागाकडे लक्ष दिले जाईल असे वाटले होते परंतु प्रत्येक वेळी मराठवाडा विभागास नुसती पानेच पुसली गेली. मराठवाड्या मधल्या कोणत्याच प्रश्नाला विशेष दर्जा दिला गेला नाही. राज्यातील सर्व विभागाचा अभ्यास केला तर ही बाब प्रकर्षाने दिसून येते की मराठवाडा अजून किती मागासलेला आहे. मराठवाड्यातील लोकांना प्रत्येक वेळी भांडण करून किंवा वाद करूनच विकास पदरात पाडून घ्यावा लागतो. त्याशिवाय मराठवाड्याला आजपर्यन्त काहीच मिळाले नाही. अजूनही विभागाची तीच स्थिती आहे. गेल्या तीन वर्षापासून मराठवाडा विभागात पाऊसपाणी वेळेवर पडला नाही त्यामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची लक्षणीय संख्या मराठवाड्यातीलच आहे. शेतकरी आत्महत्या का करीत आहेत ? याचा जराही शोध न लावता भलतीच उपाययोजना केली जात आहे. शेतकऱ्यांना वाचवायचे असेल तर त्यांच्या शेती सिंचन क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही. राज्यातील इतर विभागातील शेती पाहिले की मराठवाड्यातील शेतकऱ्यांना स्वतः विषयी घृणा निर्माण होते आणि आत्मचिंतनातुन त्यांच्या मनात क्लेष निर्माण होतो.
सर्वाना समानतेची वागणूक असायला पाहिजे असे घटनेत नमूद केले आहे मात्र इथे सरळ सरळ सापत्न वागणूक दिली जाते. लोकांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, आणि शेती याकडे दुर्लक्ष केल्या जाते. धरण उशाला अन कोरड घशाला अशी स्थिती मराठवाडातील जनतेची झाली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात येथील जनतेला भीषण पाणी टंचाई ला सामोरे जावे लागते. गेल्या वर्षी तर लातूर जिल्ह्यसाठी रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा जर काढला तर शासनाचे करोडो रुपये वाचामराठवाडा तील रस्ते हा तर नेहमीच आणि चवीने चर्चिला जाणारा विषय आहे. या विभागातील जिल्हा ते जिल्हा आणि तालुका ते जिल्हाचे रस्ते नीट नाहीत तेथे खेड्यातुन तालुक्याला जोडणारे रस्ते तर सांगता सोय नाही. रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्यातून रस्ता हेच समजत नाही. खड्यामुळे गाडीचे आयुष्य तर कमी होतेच शिवाय प्रवासी लोकांना सुद्धा त्याचा शारीरिक त्रास सहन करावा लागतो. दळणवळण व्यवस्थित होत नाही, त्यामुळे खेड्याचा विकास खुंटतो. रोजगार निर्मिती होत नाही. लोकांच्या हाताला काम मिळत नाही. ते बेरोजगार होतात आणि कुटुंबाच्या कुटूंब , गावाच्या गाव स्थलांतरित होतात. मराठवाडा ज्या प्रांतातुन वेगळा झाला त्या प्रांताकडे जर पाहिले तर वाटते की आपण त्याच प्रांतात राहिलो असतो तर किती बरे झाले असते ? निदान आपला तरी विकास झाला असता
मराठवाडा विभागाच्या विकासासाठी पुन्हा एकदा सर्व लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही शिकवण लक्षात घेऊन एकत्र येऊन लढा निर्माण करणे आवश्यक आहे असे वाटते. हैद्राबाद मुक्तिसंग्राम हा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन झाला आहे पण अजूनही मराठवाड्या मधील जनता खितपत पडली आहे हे सत्य आणि जळजळीत वास्तव आज डोळ्यासमोर दिसत आहे. यावर राजकीय लोकांनी एकत्र येऊन विचार करणे अपेक्षित आहे. एवढेच या दिवसाच्या निमित्ताने व्यक्त करावेसे वाटते.
- नागोराव सा. येवतीकर,
मु. येवती ता. धर्माबाद मराठवाडा
09423625769