Friday, 8 December 2017

जनसेवेतच ईश्वराचीही सेवा

जनसेवेतच ईश्वराचीही सेवा

माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करताना दिसून येतात. सुखाचा वेळी कशाचीही आठवण न करता खा, प्या, मजा करा अशी माणसे दुःखाच्या वेळी, कठीण समयी देवाचे स्मरण करतात. वर्षातून कमीतकमी एकदा तरी आपल्या कुलदैवताच्या दर्शनाला जाण्याची प्रत्येकाला आवश्यकता भासते. याशिवाय इतरही प्रसिद्ध क्षेत्रांना भेटी देण्याचे नियोजन प्रत्येक जण करीत असतो. त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात सगळीकडेच देव-देवतांच्या निवासस्थानी यात्रा व जत्रा यांच्या निमित्ताने भाविक भक्तांचा महापूर ओसंडलेला दिसतो. विशेषतः जत्रा पाहूनच अनेक जण दर्शन सोहळ्याचा बेत ठरवितात असे वाटते. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या लोकसंख्येमुळे यात्रेच्या ठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे. अशा गर्दीच्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही वर्षापूर्वी मांढरदेवीच्या यात्रेत भाविकांच्या चेंगराचेंगरी अनेकांना आपला जीव गमवावे लागले होते. त्यास्तव अमुक यात्रेच्या वेळीच देवाचे दर्शन घेतल्यास ईश्वर प्राप्ती होते का ? गर्दीतल्या प्रचंड भाविकांकडे पाहून पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर नाही असेच येते. म्हणूनच यात्रा वगळून इतर वेळी दर्शन घेतले तर बिघडते कुठे ? गर्दीत अगदी पाच-सहा तास ताटकळत उभे राहून दर्शन घेतल्याने ईश्वर प्राप्ती तर होणारच नाही शिवाय वृद्ध व बालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो, हे वेगळेच. माणसात देव शोधणारा संत म्हणजे संत गाडगेबाबा म्हणतात की, देव दगडात नाही, त्याची पुजा करू नका. देव माणसात आहे, म्हणून त्यांची सेवा करा. कारण जनसेवेतच ईश्वराचीही सेवा दडलेली आहे. म्हणून देवळात, मंदिरात गर्दी करण्यापेक्षा समाजातील दीन-दुबळ्या, रंजले-गांजले असहाय-अनाथ लोकांची सेवा करावी. ईश्वराच्या देवदर्शनासाठी दूरवर गेल्याने जो आनंद मिळत नाही, तो आनंद गरजू, गरीब लोकांना मदतीचा हात देऊन सेवा केल्यास नक्कीच मिळू शकते. अनेक महात्म्यांनी जनसेवेतच ईश्वरसेवा मानून कार्य केले म्हणूनच ते महान बनले. आपणही त्या तत्त्वाचा अवलंब करून ईश्वराचा मागे न धावता जनसेवा करीत राहावे, असे वाटते

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

2 comments:

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...