*शाळेत टाचण काढण्यापासून सूट हवी काय ?*
कोणतेही कार्यक्रम म्हटले की नियोजन आलेच, नियोजनाशिवाय कोणतेही कार्यक्रम यशस्वी होत नाही. असेच काही शाळेच्या बाबतीत घडत असते. शाळेतील वर्षभरामधील दिवस व्यवस्थितरित्या पूर्ण करण्यासाठी वार्षिक नियोजन करावे लागते. त्याच धर्तीवर मासिक नियोजन करता येऊ शकते. मासिक नियोजनामधून मग दैनिक अद्यापनाचे नियोजन करणे शक्य होते, त्यास दैनिक टाचण असे म्हणतात. शाळेत येणारा प्रत्येक अधिकारी किंवा पदाधिकारी सर्वप्रथम शिक्षकांचे टाचण पाहत असतो. टाचण म्हणजे दूसरे तिसरे काही नसून एकप्रकारे रोज अद्यापन करण्याचे नियोजन आहे. मुलांना आज काय शिकवायचे आहे याचा थोडक्यात शिक्षकाना ओळख असावी म्हणून टाचण काढले जाते. काही जणाची मागणी आहे की शासनाने शिक्षकांची टाचण काढण्यापासून मुक्ती द्यावी अशी मागणी केल्याचे वृत्त वाचण्यात आले. खरोखरच टाचण काढणे जर बंद झाले तर शिक्षक मुलांना योग्य प्रकारे शिकवू शकेल काय ? आज आपण मुलांना काय शिकवलो ? याबाबत शिक्षक बांधवाकडे लेखी पुरावा काय राहील ? बरे टाचण काढण्यासाठी वेळ तरी किती लागतो ? याचा जर विचार केला तर साधारणपणे 10 मिनीटात आपले टाचण पूर्ण होते. आपल्याकडे 10 मिनीट वेळ नसेल काय ? तो वेळ ही वाचवावे आणि विद्यार्थ्याना समर्पित करावे ही भावना खुपच वरच्या लेवलची आहे. एवढा विचार करणारे शिक्षक टाचण काढण्यापासून पळ काढत नाही. तसेच अधिकारी आणि पदाधिकारी मंडळीनी एखाद्या दिवशी टाचण काढली नाही म्हणून लगेच शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारु नये. शिक्षा केल्याने सुधारणा होत नाहीत तर चूका सुधारण्याची संधी दिल्यास अमुलाग्र बदल होऊ शकतो.
पण शिक्षकांनी टाचण काढण्यापासून सवलत मागणे म्हणजे पळवाट आहे असे वाटते. कारण यात फक्त टाचण एवढीच बाब समाविष्ट नसून घटक नियोजन, मासिक नियोजन, आणि वार्षिक नियोजन या बाबी देखील समाविष्ट होतात. म्हणजे एका अर्थाने ह्यापासून सुध्दा सूट द्यावी अशी मागणी असू शकते. मग शिक्षक मंडळीनी काय करावे. निवडणुका आणि जनगणना तसेच इतर अशैक्षणिक कामे करीत रहावे काय ? म्हणून शिक्षक मंडळीचे नेतृत्व करणाऱ्या मंडळीनी टाचण काढण्यामधून सूट मागण्यापेक्षा इतर समस्याकडे लक्ष देऊन त्यातून शिक्षकांची सुटका करावी. जसे सध्या चालू असलेली ऑनलाइन कामे बंद करण्याची मागणी करावी, ते सोइस्कर होईल. शालार्थच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार बंद करण्याची मागणी करावी. आज नावाला पेपरलेस आणि ऑनलाइन पगार चालू आहे मात्र वेतन वेळेवर होत नाही तसेच पूर्वी पेक्षा जास्त कागद वेतनासाठी सादर करावे लागत आहे. *याहीपेक्षा जास्त कहर म्हणजे पुरवणी वेतन काढण्यासाठी तालुका आणि जिल्हा कार्यालय ऑनलाइन विभाग कर्मचारी शिक्षक मंडळीकडून काही ही कारण सांगून पैसे उकळतात* हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी दिल्यासारखे आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे यावर कोणी पुढे येऊन बोलत नाही. आज ऑनलाइन विभागवर काम करणारे सर्वच सरकारी आणि कंत्राटी कर्मचारी मजेत आहेत तर बाकी सर्व सजा भोगत असल्यासारखे राहत आहेत. शालेय पोषण आहाराची रोजची उपस्थितीची माहिती ऑनलाइन करताना जो त्रास होत आहे त्याबद्दल कुणी बोलताना दिसत नाही. महिना भरात शिल्लक राहिलेली उपस्थिती केंद्रप्रमुख किंवा गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनवरुन ऑनलाइन भरण्यासाठी पैश्याची मागणी केली जात असल्याची चर्चा मुख्याध्यापक मंडळी खाजगी स्वरुपात करतात. यावर काही उपाय केल्या जात नाही. एखाद्या केंद्रातील किंवा गटातील रोजची विद्यार्थी उपस्थिती अपूर्ण असल्यास त्यास केंद्रप्रमुख किंवा गटशिक्षणाधिकारी यांना जबाबदार धरून प्रक्रिया पुढे नेल्यास या स्तरावर होणारी पैशाची मागणी थांबेल. अन्यथा याचा त्रास अजून वाढतच राहणार, यात शंकाच नाही. राज्यातल्या सर्वच्या सर्व शाळा डिजिटल करण्यात यावे आणि तसे त्या अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेयर शासनानी प्रत्येक शाळेला इनस्टॉल करून देण्याची मागणी करावी. अजून शाळा स्तरावर शिक्षकाना काय समस्या आहेत ? हे एकदा आवाहन करून शिक्षक मंडळीना विचारावे. म्हणजे नक्की कळून येईल काय टाचण काढणे ही शिक्षकांसाठी फार मोठी समस्या नाही, त्याहीपेक्षा भयंकर मोठमोठ्या समस्या आहेत. त्याची सोडवणूक करता आली तर राज्यातील तमाम शिक्षक बांधव आपले उपकार विसरु शकणार नाहीत.
- नागोराव सा. येवतीकर
No comments:
Post a Comment