Friday, 25 May 2018

जागरूक पालकच खरे मालक

जागरूक पालकच खरे मालक

मनुष्याच्या जीवन विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. शिक्षणामुळे मनुष्य सुसंस्कारी, सदाचारी आणि शीलवान बनतो. शिक्षणामुळे त्याला जीवन जगण्याची एक नवी दृष्टी मिळते. ज्याच्या आधारावर तो स्वतःचा विकास तर करतोच शिवाय आपल्या कुटुंबाचा पर्यायाने गावाचा विकास साधतो. गावाच्या विकासातून राज्याचा विकास होतो आणि म्हणजे देशाचा विकास होऊ शकतो. म्हणूनच असे म्हटले जाते की, शाळेतून देश घडविला जातो. उद्याच्या देशाचा प्रमुख आधारस्तंभ आज शाळेत घडत असताना दिसत आहे. मनुष्याच्या मूलभूत गरजा आजपर्यंत फक्त तीनच समजल्या जायचे पण त्यात आता आरोग्य आणि शिक्षण याचासुद्धा समावेश झाला आहे. या शिक्षणाच्या बाबतीत आचार्य विनोबा भावे म्हणतात की यशस्वी शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे. मग आज शाळेतून यशस्वी शिक्षण दिल्या जात आहे का ? असा प्रश्न प्रत्येकांना पडणे सहाजिक आहे. समाजातील प्रत्येक घटकाचे या प्राथमिक शिक्षणावर लक्ष आहे. प्राथमिक शिक्षणाचा सध्याचा दर्जा खूपच खालावलेला आहे. सरकारी शाळांची गुणवत्ता समाधानकारक नाही यासारखी ओरड प्रसिद्धी माध्यमातून ऐकायला मिळत आहे. यात काही अंशी तथ्य सुद्धा असेल यात शंका नाही. मात्र या परिस्थितीला कोणता घटक जबाबदार आहे ? शिक्षक, पालक, विद्यार्थी की प्रशासन
शहरी भागातील शिक्षणापेक्षा ग्रामीण भागातील शिक्षणाची स्थिती फारच भयानक आहे. यास विद्यार्थ्याच्या सभोवती असलेले वातावरण, पालकांची आर्थिक स्थिती आणि शिक्षणाच्या सोयीसुविधा यासारखे अनेक बाबी कारणीभूत असतात. यात सर्वात महत्वाचे म्हणजे पालक वर्ग. वास्तविक पाहता शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यासोबत त्यास शिकविणारे शिक्षक जेवढे जबाबदार आहेत त्याच्याच तुलनेत त्यांचे पालक सुद्धा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत कारणीभूत घटक आहेत. शाळेतील शिक्षक मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी विविध उपक्रम राबवत जीवाचे रान करतांना, विद्यार्थ्यांच्या घरात मात्र दूषित वातावरण असेल तर पालथ्या घागरीवर पाणी नव्हे का ? ज्या ठिकाणी शिक्षक व पालक यांच्यात विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत संवाद घडून येतो त्याच ठिकाणी आपणाला विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि प्रगती आढळून येते. आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयी शहरी भागातील पालक जेवढे जागरूक असतात तेवढे ग्रामीण भागातील पालक दिसून येत नाहीत. पालकांची आपल्या पाल्यांच्या शिक्षणाबाबतची उदासीनता संपल्याशिवाय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत अजिबात वाढ दिसणार नाही.
वयाची सहा वर्षे पूर्ण झाली की प्रत्येक जण आपल्या पाल्यांना पहिल्या वर्गात प्रवेश देण्यासाठी गर्दी करतात. प्रवेश प्रक्रिया करताना पालकांनी शाळेत यावे, ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावे, पहिल्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षक मंडळी सोबत आपल्या पाल्याविषयी चर्चा करावी, पाल्याचे सर्व गुणवैशिष्ट्ये सांगावे अशी कमीत कमी अपेक्षा असते. मात्र ग्रामीण भागात असे होत नाही तर यापेक्षा वेगळे चित्र बघायला मिळते. जानेवारी महिन्यात शिक्षकाकडून एक सर्वे केल्या जाते ज्याद्वारे गावात प्रवेश पात्र मुले सापडतात. त्यांची यादी शाळा सुरू होण्यापूर्वी अंगणवाडी शिक्षिकेच्या मदतीने पूर्ण केली जाते. पात्र मुले शंभर टक्के प्रवेश देणे शाळांना बंधनकारक असते त्यानुसार प्रवेश पात्र यादीतील सर्वच मुलांना पहिल्या वर्गात प्रवेश दिला जातो. प्रवेश देताना मुलांसोबत पालक येतातच याची खात्री नसते. अंगणवाडीतून सरळ शाळेत यांना दाखल केल्या जाते. यानंतर पालकांना शाळेत बोलावून घेऊन बाकीच्या क्रिया सोपस्करपणे पार पाडल्या जातात. मुलांच्या पहिल्या वर्गापासूनच पालक दुर्लक्ष करतात. ज्या पालकांना आपल्या पाल्यांची काळजी असते असे पालक शाळेत येऊन आपल्या पाल्यांची नावे शाळेत दाखल करतात. परंतु अशा पालकांची संख्या फारच कमी आहे. याठिकाणी शिक्षकांनी आपल्या कल्पकतेतून एखादा उपक्रम राबविला तर पालक शाळेत नक्की येऊ शकतात. प्रवेश पात्र यादीवरील पालकांची सभा पहिल्याच दिवशी शाळेत आयोजन करून त्यांचं स्वागत केलं, पाल्यांच्या पुढील शिक्षणाविषयी त्यांच्यात जागरूकता निर्माण होण्याबाबत मार्गदर्शन केल्यास त्याचे दूरगामी परिणाम नक्कीच बघायला मिळतात. असे नियोजन फार कमी  शाळेत दिसून येते. त्यामुळेच पालक वर्ग शाळेपासून दुरावल्या जात आहेत. काही पालक आपल्या पाल्यांशी शिक्षकांसोबत नेहमी चर्चा करतात आणि त्यांच्याशी संपर्कात राहतात ते अर्थातच चांगली प्रगती करतात. परंतु अशा पालकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतके कमी आहे. पहिले दोन चार वर्षे अजिबात लक्ष न देणाऱ्या पालकांचे डोळे खूप उशिरा उघडतात. ज्यावेळी पाल्य पाचव्या वर्गात जातो आणि त्याला लिहिता-वाचता येत नाही, साधे गणित जमत नाही हे लक्ष्यात येते अशा वेळी मात्र याचे खापर शिक्षकांच्या डोक्यावर फोडून मोकळे होतात. ग्रामीण भागात असेही पालक आढळून येतात की, त्यांना स्वतःचे पाल्य कोणत्या वर्गात शिकत आहे ? याचे सुद्धा ज्ञान नसते, अश्या पालकांकडून कसली अपेक्षा ठेवणार ?
इमारतीचा पाया मजबूत असेल तर इमारत चांगल्या प्रकारे उभी राहते. त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षण म्हणजे पाया आहे. ते जर पक्के असेल तर त्याचे पुढील शिक्षण सुद्धा चांगले व गुणवत्तापूर्ण होईल. परंतु याच वर्गाकडे नेमके दुर्लक्ष केल्या जाते आणि सुरू होतो अप्रगत विद्यार्थ्याचा गाडा. विद्यार्थी अप्रगत राहण्यामागे शिक्षक कारणीभूत असतीलही कदाचित. कारण आजच्या शाळेची परिस्थिती लक्षात घेता शिक्षकाकडे असलेल्या अतिरिक्त कामाचा बोजा आणि शिक्षक कमतरता यामुळे शाळेत  शिक्षकांचे विद्यार्थ्याकडे लक्ष नाही आणि घरात पालकाचे लक्ष नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होत चालले आहे. यासाठी एका शिक्षकाच्या डोक्यावर खापर फोडून ही समस्या सुटणार नाही. त्यासाठी पालक दक्ष असणे, सावध असणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षक आणि पालक यांच्यात नेहमी संवाद होत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे जे की आज घडताना दिसत नाही.
एकीकडे पालकांना शाळेत जाण्यास वेळ मिळत नाही तर दुसरीकडे शिक्षक मंडळी पालकांना शाळेत बोलावत नाहीत, त्यांना घाबरतात. एखादा पालक शाळेत आला की शिक्षकांच्या उरात धडकी भरते. कारण आज पालक शाळेत येत आहेत ते फक्त शिक्षकांच्या तक्रारीसाठी. शाळेत काय चालू आहे ? यांच्याशी त्यांचे काही देणे-घेणे नाही. शाळेतल्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी व्हायचे नाही, शाळेला कसल्याही प्रकारची  मदत करायची नाही अशा नकारात्मक भूमिकेत आज पालक वर्ग गेलेला आहे. काही शाळा यास अपवाद आहेत. या भावनेतून शिक्षक आणि पालक यांच्यात संवाद कमी झाले आहेत. शाळेला अनुदान भरपूर येते आणि शिक्षकांचा पगार काही कमी नाही असा समज पालकांनी करून घेतला आणि त्यातून मग संवाद होण्याऐवजी वाद निर्माण होऊ लागले. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी शिक्षकांना जी पत, प्रतिष्ठा, मानसन्मान हे जे काही मिळत होते ते आज नसल्यामध्ये जमा आहे. पूर्वी गावातील लोकं गुरुजींना आदराने नमस्कार करीत होते तर आज गुरुजी मंडळींनाच गावातील लोकांना दबावाखाली नमस्कार करावा लागतो ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. आमच्या पाल्यांना अजिबात शिक्षा करायची नाही, त्यांना काही बोलायचे नाही, कोणतेच काम सांगायचे नाही अशी स्थिती आज निर्माण झालेली आहे. पूर्वी पालक आपल्या पाल्यांना जास्त लाड, प्रेम, लोभ न करता शिक्षणासाठी पाठवत असे. आपली तक्रार घरातील आई-वडिलांपर्यंत गेल्यास आपलं काही खैर नाही असे त्या पाल्यांना वाटायचे. आज मात्र हे चित्र पार बदलून गेले आहे. गुरुजी आमच्या पोराला का मारलं अशी म्हणणारी पालक जेव्हा शाळेत येऊन शिक्षकांना सर्व विद्यार्थ्यांसमोर प्रश्न विचारतात तेव्हा शाळेतील मुलांचे मनोबल वाढते तर त्याच वेळी शिक्षकांची खच्चीकरण होते याचा पालक जरादेखील विचार करीत नाही.
पालकांनी आपल्या पाल्याविषयी चौकशी किंवा विचारपूस शिक्षकांसोबत खाजगीमध्ये करावी ती खरी पालकांची काळजी समजल्या जाते. पण तसे होताना दिसत नाही. काही पालक शाळेत येतात फक्त मुलांची सुट्टी मागण्यासाठी. आज शेतात बैल चारविण्यास कोणी नाही त्याला आज सुट्टी द्या, भावंडाना  सांभाळण्यास कोणी नाही तिला सुट्टी द्या असे बोलणारे पालक त्यांच्या शिक्षणाविषयी विचारण्यास कधीच तयार नसतो. पालक शाळेत येऊन एकच दिवशी सुट्टी मागतात परंतु मुलं त्याचा गैरफायदा घेतात आणि अधूनमधून शाळेला दांडी मारतात. मुले अप्रगत असण्यामागे मुलांची अनियमितपणा किंवा अनुपस्थिती हे एक मोठे कारण आहे. मात्र त्यास कोणीही समजून घेण्यास तयार नाहीत.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षक आणि पालक यांच्यात दर आठवडा नाही तर नाही निदान पंधरा दिवसातून एकदा तरी भेटीगाठी होणे गरजेचे आहे. त्या प्रकारच्या पालक सभेचे नियोजन शाळांनी करणे आवश्यक आहे. कधीकधी पालक शाळेपर्यंत पोहोचू शकत नाहीत तेव्हा शिक्षकाने विविध माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या आईदेखील शाळेत कश्या येतील याचे नियोजन करावे. विविध सणांच्या माध्यमातून हळदीकुंकू सारख्या उपक्रमाद्वारे त्यांच्याशी चर्चा केल्यास शिक्षक पालक यांच्यात प्रेम वृद्धिंगत होईल. शाळा आणि गाव यांच्यातील प्रेमळ वातावरणाचा अनुकूल परिणाम शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर होते. म्हणून म्हटले जाते की गावाला शाळेचा आधार असावा आणि शाळेला गावाचा आधार, एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ या म्हणीप्रमाणे कार्य होणे आवश्यक आहे. पालक आणि शिक्षक मंडळीशी भांडण, वादविवाद करण्यापेक्षा त्यांच्याशी आपुलकी, प्रेम आणि मायेने वागले आणि बोलले पाहिजे. यामुळे शाळेचा सर्वच बाबतीत विकास साधणे सोपे होईल. ग्रामीण भागात आज याच गोष्टीची कमतरता आहे म्हणूनच प्रगत महाराष्ट्र सारखा उपक्रमदेखील असफल ठरताना दिसत आहे. आपल्या पाल्यांच्या शिक्षणाविषयी जागे असलेले पालकच खऱ्या अर्थाने त्याचे मालक ठरतात हे मात्र खरे आहे.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

1 comment:

  1. नमस्कार सर,
    आजचा आपला "जागरुक पालक हेच खरे मालक "हा लेख खर्या अर्थाने शिक्षण प्रक्रियेत मूळ अडथळा असणार्या समस्येवर प्रकाश टाकणारा आहे.पालकांची उदासीनता ही गंभीर बाब आहे.त्यासाठी शिक्षक-विद्यार्थी-पालक सुसंवाद हाच पर्याय हे आपण अगदी आस्थेन मांडलत.कोणाही एका घटकाला दोष न देता आपण शिक्षण प्रकियेतील सर्वच घटकांना आपण योग्य ती जाणीव करुन दिली आहे.सर हा लेख आम्हाला मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल.

    ReplyDelete

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...