Friday, 25 May 2018

जसे चारित्र्य तसे जीवन

जसे चारित्र्य तसे जीवन

पावित्र्य म्हणजे पवित्रता, शुद्धता व सच्चरित्र. मनुष्याची सर्वात श्रेष्ठ संपत्ती म्हणजे त्याची उत्तम चारित्र्य होईल असे स्माईल्स यांनी म्हटले आहे. भारताच्या संपूर्ण इतिहासाचे सिंहावलोकन केल्यास भारतीय संस्कृतीत या पावित्र्याचे व चारित्र्याचे किती महत्व आहे हे समजून येते. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना आराध्य देवदेवतांची पूजा करणे ही आपल्या मनाची शुद्धता आहे. घराची वास्तुशांती असो किंवा नवीन व्यवसायाचा प्रारंभ त्यात देवतांना स्मरण केल्याशिवाय ते कार्य पूर्ण होत नाही, अशी आपल्या मनाची धारणा असते. भारतीय संस्कृतीत हिंदू धर्माची व्यक्ती स्नान केल्याशिवाय मंदिरात पाऊल टाकत नाही. यात तनाची म्हणजे शरीराची पवित्रता दिसून येते. त्याशिवाय मंदिरात प्रवेश केलेल्या व्यक्तीच्या मनात शंकेची पाल चुकचुकत असते, अस्वस्थता वाटते. कारण स्नान न केल्यामुळे तो स्वतःला अपवित्र समजतो. याचप्रमाणे व्यक्ती मग ती स्त्री असो वा पुरुष तिचे वर्तन सुद्धा शुद्ध व पवित्र असायलाच पाहिजे, त्याच सच्चरित्र म्हणतात. प्रसिद्ध विचारवंत एनन म्हणतात की, जेव्हा मनुष्याकडील धन नष्ठ होते, तेव्हा त्याचे वास्तविक काहीच नष्ट होत नाही. जेव्हा मनुष्याची चारित्र्य बिघडते, तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ठ होत असते. चारित्र्याच्या बाबतीत पुरुषांपेक्षा स्त्रियांना फारच जपून राहावे लागते. श्रीरामाच्या पत्नीला पवित्रता सिद्ध करून दाखविण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. परंतु आज कालच्या स्त्रियांना अशी दिव्य परीक्षा देणे अशक्य आहे. त्यासाठी स्त्रियांनी फारच काळजीपूर्वक वागावे लागते. समाज त्यांना अपवित्र म्हणणार नाही असे वर्तन ठेवावे लागते. उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता आणि वर्तनावरून शील समजते असे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले आहे. भारतात सध्या पाश्चिमात्य संस्कृतीची घुसखोरी वाढीस लागली आहे. भारतात असलेली प्राचीन व पवित्र संस्कृती हळूहळू लोप पावते की काय ? अशी शंका मनात येत आहे. सुंदर चारित्र्य ही सर्व कलांमध्ये सुंदर कला आहे. ही विचारधारा आजच्या युगातील व्यक्ती विसरत चालल्या आहेत. एकीकडे शहरी भागातून ही पवित्रता व चारित्र्य हद्दपार होत असताना ग्रामीण भागात ते आजही जपली जात आहे. ज्या भागातून संस्कृतीचा उगम झाला या भागात तरी नष्ट होऊ नये एवढे तरी प्रयत्न करायलाच पाहिजे. फेडरिक सॅडरिस यांनी म्हटल्याप्रमाणे तुमच्या जीवनावर तुमच्या चारित्र्याचे शासन चालत असते, जसे चारित्र्य तसे जीवन.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...