Friday, 25 May 2018

शिक्षणाचा काय फायदा ?

शिक्षणाचा काय फायदा ?

शिक्षणाने मानवी जीवनाचा विकास होतो म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तीला निसर्गतः दोन डोळे लाभतात मात्र शिक्षण हा प्रत्येक मनुष्याचा तिसरा डोळा आहे. दोन डोळे फक्त बघायचे काम करतात तर तिसरा डोळा बघितलेले समजून घेतो म्हणून ते सर्व कायमचे स्मरणात राहते. आपणास चांगल्या प्रकारचा तिसरा डोळा मिळावा यासाठी लहानपणापासून शिक्षणाचे धडे मिळविण्याचा प्रयत्न केल्या जातो. शिक्षण क्षेत्रात आज चालू असलेल्या घडामोडीकडे लक्ष दिल्यास एक बाब प्रकर्षाने जाणवते की, या ठिकाणी जे शिक्षणाचे धडे दिले जात आहेत हे फक्त पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित आहे. त्याचा प्रत्यक्ष जीवनात व्यवहार करताना काडीमात्र उपयोग होणार नाही. येथे फक्त मुला-मुलांमध्ये स्पर्धा पाहिली जाते. पुस्तकी किडा तयार केल्या जात आहे. त्यामुळे सन 2020 मध्ये भारत महासत्ता बनण्याची जे स्वप्ने पाहत आहेत ती कदाचित सत्यात उतरणारच नाही असे वाटते. शालेय अभ्यासक्रमातून मुलांना त्यांच्यावर संस्कार टाकणारे आणि त्यांच्यात सर्वधर्मसमभाव वृत्ती जोपासावी या वृत्तीने आराखडा तयार केला जातो. मात्र शाळा पातळीवर खरोखरच या विचारांची अंमलबजावणी पूर्ण होते का ? अंमलबजावणी होत नसल्यास काय समस्या आहे ? याचा मागोवा घेऊन शिक्षण प्रणालीत सुधारणा घडवून आणणे गरजेचे आहे.
आजही कित्येक लोक असे समजतात की शिकलो म्हणजे नोकरी मिळायलाच हवे. कारण आजचे शिक्षण फक्त नोकरी मिळवण्यासाठी दिले जात असल्याचा अनुभव अनेक ठिकाणी दिसून येतो. कोणतीही शासकीय नोकरी मिळवायची असेल तर स्पर्धा परीक्षा घेतली जाते आणि त्या परीक्षेत पुस्तकातीलच प्रश्न विचारले जातात. वर्ग-1 किंवा वर्ग 2 या पदाच्या भरती सुद्धा त्यांच्या बौद्धिक कसोटी वरूनच ठरवले जातात. त्यामुळे या पुस्तकी ज्ञानाला अधिकचे महत्त्व प्राप्त झालेले आहे. शिक्षणाने त्याच्या बुद्धिमत्तेचा वरचेवर विकास होतो. त्याची बौद्धिक क्षमता वाढते, तो विकसित होत राहतो. स्वतःसोबत कुटुंबाचा विकास करतो. पर्यायाने समाजाचा व देशाचा विकास होतो. मात्र समाजात असे काही प्रसंग किंवा अनुभव बघायला मिळतात की, या शिक्षणाचा फायदा ती व्यक्ती स्वतःला तर देत नाही शिवाय कुटुंबाला, समाजाला आणि देशालाही देत नाही तेंव्हा प्रश्न पडतो की, या शिक्षणाचा काय फायदा ?
समाजात आज आपणास शिकलेल्या लोकांमध्येसुद्धा अंधश्रद्धा असलेले दिसून येतात. वास्तविक पाहता शिक्षणाने समाजातील अंधश्रद्धा समूळ नष्ट व्हायला पाहिजे मात्र तसे झाले नाही. कारण अंधश्रद्धा नष्ट करू पाहणारे शिक्षण त्यांना मिळालेच नाही. मुलांचे घरातील शिक्षण आणि शाळेतील शिक्षण यात फरक असायला पाहिजे. पण तसे सध्यातरी चित्र कुठेही दिसत नाही. परमेश्वर सर्वत्र व्यापून आहे किंवा जो निर्माता आहे तो सृष्टीच्या चराचरात आहे असे शिक्षणातून समजल्यानंतर सुद्धा शिकलेली मंडळी देव-देवतांच्या नावाने यात्रा करीत फिरत राहिले तर खरोखरच आपण घेतलेल्या शिक्षणाचा फायदा काय ? असा प्रश्न पडतो. ही माझी कुणावर वैयक्तिक टीका नाही मात्र यामुळे खरोखरच आपण काय मिळवितो ? पूजा, विधी, अर्चना या कार्यक्रमात महिलांचा जरा जास्तच भर असतो. वास्तविक पाहता शिक्षणाचा खरा परिणाम महिला वर्गावर होणे अत्यंत महत्त्वाचे आहेत. महिलांच्या डोक्यातील अंधश्रद्धेचे भूत जर खाली उतरले तर अर्ध्याहून अधिक समाज सुधारणा होऊ शकते. शिक्षणाने डोळस दृष्टी मिळायला हवे मात्र सध्या तसे चित्र समाजात दिसत नाही म्हणूनच प्रश्न पडतो की या शिक्षणाचा नेमका फायदा काय आहे ? प्रत्येक पालकांना आपले मूल शिकून डॉक्टर, इंजिनीअर व्हावे, त्याला भरमसाठ पगार असलेली नोकरी मिळावी, त्यास सुखी जीवन जगता यावे यासाठी त्याला शिक्षण दिल्या जाते. शिक्षण घेऊन डॉक्टर झालेला व्यक्ती आपल्या ज्ञानाचा वापर लोकांची लुबाडणूक किंवा पिळवणूक करण्यासाठी करीत असेल तर त्याला मिळालेले शिक्षण काय कामाचे ? हे एक उदाहरण आहे पण असे प्रत्येक क्षेत्राच्या बाबतीत घडत असताना दिसून येते. शिक्षणाने त्याला सर्व काही दिले मात्र त्याच्या बुद्धिमत्तेत काही विकास झाला नाही. याउलट शिक्षण न घेतलेला अडाणी माणसाजवळ जेवढी माणुसकी दिसते तेवढी माणुसकी शिकलेल्या लोकांजवळ नसते हा आजवरचा अनुभव सांगतो. यावरून आपण असे म्हणू शकतो की यापेक्षा न शिकलेला बरा. शिकून-सवरून मोठा झालेला व्यक्ती आपले गाव आणि माणसे गावातच मागे सोडून शहरात रहायला जातो. मात्र आपला भूतकाळ विसरून तो शहरात वावरताना कोणालाच ओळख देत नसेल किंवा दाखवत नसेल तर लोकं त्याच्या शिक्षणावर बोलणारच, नाही का ? शिक्षणाने लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याऐवजी अंधश्रद्धा पसरविणाऱ्या लोकांची खूप कीव येते.
शिक्षणाने माणसाच्या जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत मिळते. एखाद्या घटनेमागची कारणमीमांसा शिक्षणामुळे शोधू शकतो. मात्र आज समाजात पसरलेली अंधश्रद्धा पाहिली की या शिकलेल्या लोकांची कीव यायला होते. एखादे दोन चाकी, तीन चाकी किंवा चारचाकी वाहन खरेदी केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा काय केल्या जाते ? एखाद्या मंदिरासमोर त्या वाहनास उभी केल्या जाते. पौराहितकडून त्याची पूजा केली जाते आणि त्यानंतर त्या गाडीला लिंबू-मिरची,काळे केस असे सर्व एकत्र करून वाहनास बांधल्या जातो. असे केल्यामुळे काय होते ? असे जर कुणाला विचारलले तर प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे येते. गाडीचा अपघात होऊ नये यासाठी एवढा सारा खटाटोप केला जातो सरासरी असे उत्तर ऐकायला मिळते. तेव्हा प्रश्न असा पडतो की सध्याचे अपघात वाचण्यात किंवा पाहण्यात येत आहेत त्यांनी वरील क्रिया न केल्यामुळे झाले असतील काय ? या क्रियांनी अपघात वाचविता आले असते तर रस्त्यावर एवढे मोठे अपघात दिसले नसते. त्यामुळे लिंबू मिरची गाडीला बांधण्यापेक्षा वाहनाची वेळोवेळी काळजी घ्या ते तुमची काळजी घेईल हे लक्षात घ्यावे. सुशिक्षित लोकांमध्ये हा प्रकार पाहून त्यांच्या शिक्षणाची कीव आल्याशिवाय राहत नाही. निवडणुकीच्या काळात एक प्रसंग अनुभवास आले. मतदान प्रक्रियेत नव्यानेच ईव्हीएम मशीनने प्रवेश केला होता. या मशीन बाबत जेवढी उत्सुकता मतदारात आणि उमेदवारांमध्ये होती तेवढीच उत्सुकता निवडणूक मतदान अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा होती. म्हणूनच एका ठिकाणी सर्वप्रथम मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारास या अधिकाऱ्यांनी पूजाविधीच्या तयारीसह येण्यास सांगितले. त्यानुसार स्वतः उमेदवार असलेला व्यक्ती पहिला मतदार म्हणून तेथे आला. त्याने ईव्हीएम मशीनची यथोचित पूजाअर्चा केली. दैव चांगले त्याने नारळ त्या ईव्हीएम मशीनवर फोडले नाही, बाहेर पडले तेवढे बरे केले. उमेदवार आणि अधिकारी दोघांना हायसे वाटले. माझाच विजय व्हावं असे उमेदवारास तर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावे या आशेत अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया सोपस्कारपणे पार पाडली. अशा प्रसंगातून आपणाला काय वाटते ? शिकलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपली बुद्धिमत्ता जागी ठेवून पुढील पाऊल उचलल्यास शिक्षणाचा खरा फायदा होतो. अन्यथा पालथ्या घागरीवर पाणीच.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

1 comment:

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...