Tuesday, 22 May 2018

लोभाचे फळ

*लोभाचे फळ*

मुलांनो, आपणाला सोन्याचे अंडे देणार्‍या एका कोंबडीची गोष्ट माहीत असेलच. एका माणसाजवळ सोन्याचे अंडे देणारी एक कोंबडी होती. ती रोज नित्यनेमाने सकाळी सोन्याचे अंडे देत होती. त्यामुळे त्या माणसाचे दारिद्र्य दूर झाले आणि तो चैनीत व ऐषोआरामात दिवस घालवीत होता. मात्र तो समाधानी नव्हता. त्याच्या मनात लालसा निर्माण झाली. लवकर श्रीमंत व्हावे ह्या लोभापायी त्याने विचार केला की रोज एक सोन्याचे अंडे घेण्यापेक्षा कोंबडीला कापून तिच्या पोटातील सर्वच्या सर्व सोन्याची अंडी एकदाच मिळवावी आणि खूप श्रीमंत व्हावे. म्हणून त्यांने ती कोंबडी कापली. तेव्हा त्याच्या हाती काहीच लागले नाही. उलट रोजचे अंडीसुद्धा कोंबडीसोबत संपले. हे असे का झाले ? अति लोभामुळे झाले. वेदव्यास ऋषी म्हणतात की, पाण्याने तुडुंब भरलेली नदी समुद्रास मिळते तरी त्याचे समाधान कधीच होत नाही. तेंव्हा आपणाजवळ जे काही उपलब्ध असेल तर त्याच उपलब्धतेवर समाधानी असणे अत्यावश्यक आहे. जेव्हा केव्हा आपण एकाचे दोन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा आपल्या मनात लोभ निर्माण होतो. त्यासाठी शेख सादिक यांनी सांगितले वचन नेहमी लक्षात ठेवावे. ते म्हणतात की, मनुष्य जर लोभाला धुडकावून लावेल तर सम्राटापेक्षाही उच्च दर्जा त्याला प्राप्त होईल. समाधानी मनुष्यच समाजात ताठ मान करून वावरत असतो. आजपर्यंत जे कोणी महात्मा किंवा महान व्यक्ती होऊन गेले त्यांच्या जीवनात लोभाला शून्य महत्त्व होते. ते जर लोभाच्या आहारी गेले असते तर समाजात ते ताठ मानेने राहू शकले नसते. जीवन जगत असताना पदोपदी आपणाला लोभ निर्माण होतील असे प्रसंग घडतात. लॉटरी लागेल म्हणून मनुष्य रोज शंभर रुपयांचे तिकीट खरेदी करतो. झटपट श्रीमंत व्हावे म्हणून आपली कमाई लॉटरीच्या तिकिटात खर्च करणारा लवकरच कंगाल बनतो. म्हणून अश्या मोठमोठ्या स्वप्न दाखविणाऱ्या बाबीकडे दुर्लक्ष केलेले केंव्हाही बरे. फुकटच्या गुलाबजामुन पेक्षा कष्टाची चटणी भाकर केंव्हाही गोड लागते. अनेक वेळा आपणास लोभाचे आमिष दाखविल्या जाते. मात्र वेळीच आपण सावध होणे गरजेचे आहे. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खावू नये या अर्थाची म्हण सुद्धा आपणाला लोभापासून वाचून राहा असे सांगते. संस्कृत सुभाषितांमध्ये म्हटले आहे की लोभी माणसाला कोणी मित्र असत नाही किंवा कोणी गुरूही असत नाही. कारण तो सदानकदा एकटा जीव सदाशिव प्रमाणे एकलकोंडा बनतो आणि त्याच्या मनाला सदोदित लोभांचे विचार चालू असतात. दिलदार मनुष्य अंतिम क्षणापर्यंत आनंदी जीवन जगू शकतो तर कंजूष अर्थात लोभी मनुष्य शेवटपर्यंत दुःखी असतो असे कैसे बिनइल खतीम यांनी सांगून ठेवले आहे. त्यास्तव नेहमी आनंदी राहण्यासाठी समाधानी राहायला शिकावे व लोभापासून शक्यतो दूरच राहावे. कारण लोभाचे फळ आज नाहीतर उद्या दुःखातच परिवर्तित होणार आहे याची जाणीव ठेवावी.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...