खास करून हिवाळा ऋतूमध्ये अनेक फळे खाण्यासाठी उपलब्ध होतात जसे जांभ आणि बोरं. ही दोन्ही फळं खाल्याने सर्दी आणि खोकला होण्याचा धोका असतो म्हणून पालक वर्ग मुलांना हे फळं खान्यापासून मज्जाव करतात. तरी देखील मुलं चोरी चोरी चुपके चुपके खातातच. सायंकाळच्या वेळेला जेंव्हा शिंक येते त्यावेळी आई बरोबर ओळखते आणि बोरं किंवा जांभ खाल्लं का ? म्हणून जोरात बोलते. लहान मुलांना खास करून आवडणारे फळ म्हणजे बोरं. जंगलातील हा रानमेवा. झिझिफस मॉरीटिएना नावाच्या जातकुळातील हे फळ असून ते भारतात बोर नावाने प्रचलित आहे. याशिवाय ते ‘जुजुबी’, ‘चायनीज डेट्स’ किंवा ‘चायनीज अॅपल’ या नावांनीही ओळखलं जातं. तसं पाहिलं तर गावालगत बोराचे अनेक झाडं असतात. ज्या झाडांची बोरं आंबट असतात त्या झाडाकडे सहसा कोणी फिरकत नाही. मात्र ज्या झाडांची बोरं गोड असतात त्या झाडाजवळ अनेक मुलं गोळा होत असतात. काही जणांच्या मालकीची देखील ही झाडं असतात त्यामुळे ते या झाडांची रखवाली करतात. ग्रामीण भागात वृद्ध मंडळी सहसा या झाडांची रखवाली करताना दिसून येतात. काही मंडळी टोपल्यात ती बोरं जमा करतात आणि गावात विक्री करतात. शाळेतील लहान मुले ही त्यांची खास गिऱ्हाईक होत. अनेक वेळा शाळेत मुले बोरं खातात आणि बोराच्या वर्गात टाकतात त्यामुळे शिक्षक मुलांवर खूप रागावतात. ते कितीही रागावले तरी मुलांचा बोरं खाण्याचा सिलसिला काही बंद होत नाही. बोरं विशिष्ट उग्र वासामुळे पटकन लक्षात येते. याचा उपयोग लोणचं टाकण्यासाठी सुद्धा केला जातो. ज्या ऋतूत जी फळं येतात ती फळं खाल्याने त्याचा वर्षभर फायदा होतो असे आयुर्वेद सांगते. म्हणून ही फळं खायलाच हवी. गोड बोरं, आंबट बोरं आणि खारका बोरं असे काही बोराचे प्रकार आहेत. काही बोरं म्हातारी बोरं म्हणून देखील ओळखले जातात. कच्चे बोरं हिरव्या रंगाचे तर पिकलेले बोरं तपकिरी रंगात दिसून येतात. सहसा हिरव्या रंगाच्या बोरात किडे असत नाहीत मात्र पिकलेल्या बोरात किडे असण्याची शक्यता असते म्हणून ती बोरं बघून खावं लागते. बोरं हे खास करून मुलांपेक्षा मुलींना खूप आवडते. बोरीवरून काही गावांचे नाव देखील वाचायला मिळते. तर काही म्हणी आणि वाक्प्रचार देखील आहेत. ज्या गावच्या बाभळी, त्याच गावच्या बोरी. सध्या संकरित बोरं जे की जांभासारखे मोठे आहेत. त्यात गावरान बोराची चव नक्कीच मिळत नाही. हिवाळ्यात येणारी ही बोरं काही कुटुंबाची रोजगार ठरत असते. म्हणून कोणाच्या डोक्यावर बोराची टोपली दिसत असेल तर नक्की त्या बोराची चव चाखून बघायलाच हवी. जी मजा गावरान बोरं खाऊन मिळते ती मजा त्या संकरित बोरात नक्कीच मिळणार नाही. आज ही बोरं बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सुटणार हे मात्र नक्की.
बोरं खाण्याचे अनेक फायदे आहेत.
कर्करोगासारख्या आजारापासून शरीराचं संरक्षण करण्याचं काम करतं. कर्करोगाला प्रतिकार करणा-या पेशी वाढवण्याचं काम करतं.
यात भरपूर प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व असल्यामुळे ते अँटिऑक्सिडंट म्हणूनही काम करतं.
ताण हलका करण्याची क्षमतादेखील या फळात आहे.
सर्दी किंवा शीतज्वरापासून बचाव होण्यास मदत होते. एक चमचा बोराचा रस आणि काळी मिरी यांचं सेवन केल्यास सर्दीपासून संरक्षण होतं.
अतिसार, थकवा तसंच भूक न लागणे आदी विकारांवरही हे अतिशय गुणकारी आहे.
बोर खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते.
त्वचा कोरडी होणे, काळवंडणे याचबरोबर सुरकुत्या येणे यासारखे विकार कमी करण्यास मदत करतं. त्वचेचं तारुण्य टिकवण्याची क्षमता यात आहे.
अस्थमा आणि मधुमेहाचा त्रास असल्यांनी बोरं आवर्जून खावी. रक्तातील साखर नियंत्रित राखण्याचं काम बोर करतं.
वजन कमी करण्यासही हे मदत करते.
‘अ’ जीवनसत्त्व असल्यामुळे नियमित बोर खाल्ल्यास पचनशक्ती सुधारते.
कॅल्शिअम आणि फॉफ्सरसचं प्रमाण अधिक असल्यामुळे हाडं आणि दातांच्या मजबुतीसाठी हे उत्तम आहे.
- नासा येवतीकर
No comments:
Post a Comment