आयर्न लेडी प्रियदर्शनी
प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी नेहरू कुटुंबात अलाहाबाद येथे झाला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांचे वडील होते तर कमला नेहरू ही आई. त्या नेहरू दाम्पत्याच्या एकुलत्या एक कन्या होत्या. आई कमला नेहरू यांच्यासोबत अलाहाबादमधील आनंद भवन येथे इंदिरा मोठ्या झाल्या. त्यांचे बालपण एकाकी आणि दुःखात गेले कारण वडील जवाहरलाल नेहरू हे राजकीय चळवळीत सक्रिय सहभागी असल्याने अनेकदा दूर असायचे किंवा तुरुंगात तर असायचे. तर त्यांची आई नेहमी आजाराने अंथरुणाला खिळलेली होती ; पुढे त्यांचा क्षयरोगामुळे लवकर मृत्यू झाला. इंदिरा यांचा नेहरुंशी मर्यादित संपर्क होता, तोही बहुतेक वेळा पत्रांद्वारे असायचा. इंदिराजींना मुख्यतः घरीच शिक्षक शिकवायला येत होते आणि १९३४ मध्ये मॅट्रिक होईपर्यंत त्या अधूनमधून शाळेत जात होत्या. त्या आणि आई कमला या दोघी रामकृष्ण मिशनच्या बेलूर मठ मुख्यालयात राहायला गेल्या, जिथे स्वामी रंगनाथनंद हे इंदिरा यांचे पालक होते. त्या शांतिनिकेतन येथील विश्व भारती येथे शिकण्यासाठी गेल्या, जे पुढे १९५१ मध्ये विश्वभारती विद्यापीठ बनले. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या मुलाखतीदरम्यान इंदिरा यांचे नाव प्रियदर्शनी ठेवले. संस्कृतमध्ये याचा अर्थ "सर्वकाही दयाळूपणे पाहणारी" असा होतो, आणि पुढे त्या इंदिरा प्रियदर्शिनी नेहरू म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
ब्रिटनमधील त्यांच्या वास्तव्यादरम्यान, इंदिरा गांधी वारंवार त्यांचे भावी पती फिरोज गांधी यांना अनेकदा भेटत असत. त्यांना त्या अलाहाबादमधून ओळखत होत्या आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते शिकत होते. त्यांचा विवाह अलाहाबाद येेेथे धर्म रितीरिवाजांनुसार पार पडला, जरी फिरोज हे गुजरातच्या पारशी कुटुंबातील होते. त्यांना राजीव गांधी आणि संजय गांधी ही दोन मुले होती.
इंदिरांचे आजोबा मोतीलाल नेहरू व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते. भारताच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते. इंदिरा गांधींचे बालपण आपल्या घराच्या स्वातंत्र्यलढ्याच्या संस्कारांतच झाले. पुढे त्यांनी लहान मुलामुलींची वानरसेना चळवळ सुरू केली. निदर्शने, मोर्चे काढणे, बंदी घातलेल्या गोष्टींची वाहतूक करणे वगैरे गोष्टी ही सेना करीत असे.
१९५९ मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीत भाग घेतला आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. यात इंदिराजीं यांनी माहिती व नभोवाणीमंत्री हे पद सांभाळले. १९६५ चे भारत-पाक युद्ध या दरम्यान त्या श्रीनगरच्या आसपास सुट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा दिल्ली येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.पाकचे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हियत संघात ताशकंद येथे पाकिस्तानचे आयुबखान आणि लालबहादुर शास्त्री यात शांति समझोता झाला. पण त्यानंतर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धाच सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणातून इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. ३५५ विरुद्ध १६९ मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. पंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द संस्मरणीय अशी ठरली. जुलै १९६९ मध्ये त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. सन १९६५ व १९७१ मध्ये भारत-पाक युद्ध, आणि त्यानंतर १९७५ मधील आणीबाणी असे अनेक प्रसंग त्यांच्या कारकिर्दीत घडल्या आहेत. धाडसी निर्णय घेण्यात त्या प्रसिद्ध होत्या. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी, इंदिरा गांधींचे दोन शीख अंगरक्षक, सतवंत सिंग आणि बेअंत सिंग यांनी सफदरजंग रोड, नवी दिल्ली येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या बागेत कथितपणे ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला म्हणून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्यात त्या जागेवरच मृत्युमुखी पडल्या. भारत देशाला प्रगतीपथावर नेणाऱ्या अश्या धाडसी आयर्न लेडीचा स्वतःच्या अंगरक्षकानीच विश्वासघात केला.
प्रियदर्शनी आयर्न लेडी श्रीमती इंदिरा गांधी यांना विनम्र अभिवादन ..... !
सौजन्य :- इंटरनेट
संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769
No comments:
Post a Comment