Sunday, 27 November 2022

एका वोटची शक्ती ( power of one vote )

एका वोटची शक्ती


ज्या ज्या वेळी आपण मतदार म्हणून निवडणुकीला तोंड द्यावे लागते त्या त्यावेळी आपल्या समोर एकच प्रश्न पडतो की, मतदार म्हणून मी काय करावे ? कोणत्या व्यक्तीला किंवा कोणत्या पक्षाला मतदान करावे ? आपण एक जागरूक मतदार असाल तर नक्कीच या प्रश्नाचे निराकरण स्वतःच्या मनाशी विचारून नक्की करू शकता. त्यासाठी स्वतः मतदार यांनी सर्वप्रथम कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. छोट्या छोट्या आमिषाचा स्विकार करू नये. खाण्या-पिण्याच्या पार्टीला हजेरी लावू नये. बहुतांश वेळा निवडणुकीच्या काळात हे चित्र हमखास बघायला मिळते. शे-पाचशे रुपयांच्या लालसेपोटी आपण आपले अमूल्य असे वोट वाया घालवतो. सुज्ञ मतदार म्हणून आपण सर्वांनी मतदानाला जाण्यापूर्वी सर्व पक्ष, पॅनल व त्यांचे उमेदवार यांची एकदा तरी चाचपणी करावी. ज्या पक्षाची किंवा पॅनलची विचारधारा चांगली आहे, त्याचा नेता विचारी आणि दूरदृष्टी असलेला नेता असेल, त्यात काम करणारी मंडळी चांगली, अभ्यासू आणि विश्वासू आहेत, अश्याची निवड करून त्यांना मतदान करण्यात आपले खरे हित लपलेले आहे. हा माझा जवळचा, तो माझा मित्र, सखा, नातलग, सोयरा असे नातेसंबंध जोडून मतदान करणे कोणत्याही मतदाराला भविष्यात धोक्याचे ठरू शकते. मतदान करतांना जेव्हा आपणाला अनेक उमेदवार निवडायचे असते त्यावेळी एक इकडे आणि एक तिकडे मतदान करून आपण स्वतः संकटात सापडत असतो. असे केल्याने येणारी सत्ता ही कोणा एकट्याची येत नाही. संमिश्र सत्ता असलेल्या शासनाची प्रगती कशी होते हे आजपर्यंत आपण पाहत आलोत आणि अनुभवत आलो आहोत. म्हणून मतदान करायचे असेल तर पॅनल टू पॅनल मतदान करावे. यात आपलेच हित आहे, हे सर्वप्रथम आपण जाणून घ्यावे. आपण ज्या पॅनल किंवा पक्षात काम करता त्यातील व्यक्ती स्वार्थी, मतलबी व अविश्वासू आहेत हे माहीत असून देखील आपण त्यांच्या इच्छेखातर त्यांनाच मतदान करत असाल तर सरळ सरळ ते आपल्याच पायावर आपणच दगड टाकल्यासारखे होईल. फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे व्यक्ती आपली भेट घेते आणि पुढील पाच वर्षे आपणाला साधे विचारत देखील नाही अश्या व्यक्तीपासून दूर राहिलेले बरे. संकट काळात जो मदत करतो तो खरा मित्र आणि संकटाच्या वेळी जो आपल्या पाठीशी उभा राहतो तोच खरा पक्ष किंवा पॅनल हे लक्षात असू द्यावे. माझ्या एका मतदानाने काय फरक पडणार आहे ? हा विचार आपल्या मनातून काढून टाकून योग्य उमेदवारांना आपले मत करावे. मतदानाला जातांना आपल्या जवळ आपली ओळख पटविणारे निवडणूक ओळखपत्र, आधारकार्ड, वाहन परवाना यापैकी कोणताही एक पुरावा जवळ ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा ऐनवेळी आपली पंचायत होऊ शकते. आपल्या भारतीय राज्यघटनेने आपल्या मतदानाला गोपनीयता दिलेली आहे. म्हणून कोणाच्या दबावाखाली किंवा कुणी दाखविलेल्या प्रलोभनाला बळी न पडता जरा सद्सद्विविवेक बुद्धी जागृत करून मतदान करू या, आपले अमूल्य वोट असेच वाया जाणार नाही याची काळजी घेऊ या. निवडणुकीत एका - एका मतदानाला किंमत असते याचे भान ठेवू या आणि स्वतःची प्रगती साधू या. शेवटी मतदार बंधू भगिनींना एवढंच सांगावे वाटते,

*मतदान करतांना विचार करा जरा नीट*
*एका-एका मताने मिळे विजयाची शीट*


- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

( प्रस्तुत लेखात व्हायरल होत असताना काहीजण बदल करू शकतात. अश्या वेळी वाचकांना काही शंका येत असेल तर मूळ लेख वाचण्यासाठी माझ्या nasayeotikar या blog ला अवश्य भेट द्यावे. धन्यवाद .....! )

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...