परीक्षार्थ्यांना शुभेच्छा संदेश
आज आपण आयुष्याच्या एका विशिष्ट वळणावर आहोत. म्हणून आज आपण आपली ध्येय आणि त्यासाठीचे नियोजन करणे आवश्यक आहे. आपण जर नियोजन न करता जर काम करू लागलो तर त्यात यश मिळेल कदाचित परंतु ते यश जीवन सुधारण्यासाठी काही कामास येणार नाही. म्हणून येथे आपण जसे वळण घ्याल तसे आपले जीवन वळणार आहे आणि आपण वळण घ्यायचे नाही असे ठरविले तर आपण यश मिळवू शकणार नाही. शिक्षण हे असे एक माध्यम आहे ज्यामुळे आपल्या आयुष्याला अनेक वळण घेता येऊ शकतात. महात्मा फुले असो वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव प्रत्येकजण का घेतात ? याचा आपण कधी विचार केला आहे काय ? महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे नुसते म्हटले नाही तर त्यांनी पुण्यातील भिडेच्या वाड्यात मुलीसाठी पहिली शाळा काढली. सर्वाना सक्तीचे आणि मोफत शिक्षण मिळावे असे हंटर कमिशन समोर आपले मत मांडले. लोकांच्या शिक्षणासाठी अनेक हालअपेष्टा सहन केल्या. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी सुध्दा मुलींच्या शिक्षणासाठी अनेक त्रास सहन केले. म्हणून आज शिक्षणाच्या बाबतीत सोनियाचा दिवस आपण पाहत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा संघर्ष करा असा मोलाचा संदेश जनतेला दिला. महात्मा गांधीजी हे जीवन शिक्षणावर भर देत असत. भारतात सर्वच जण शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले. कारण भारत देशाला प्रगती पथावर न्यायचे असेल तर देशातील सर्व लोकांनी शिकलेच पाहिजे. म्हणून आज प्रत्येकजण त्यांचे स्मरण करतात. कारण त्यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी दिवसरात्र वाचन, चिंतन, मनन आणि लेखन करून लोकांच्या हृदयात स्थान मिळविले. रात्रदिवस पुस्तकाचे वाचन करणे, त्यावर चिंतन करणे, आणि लोकांचा, समाजाचा पर्यायाने देशाचा विकास व्हावा यासाठी लेखन करणे असे फार मोठे कार्य त्यांनी केले. आपणाला देखील जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर वाचन, चिंतन आणि लेखन या तीन गोष्टीवर जास्त भर दिला पाहिजे. वरील तीन गोष्टी जीवनात मिळवायाचे असेल तर त्यासाठी आपल्या जवळ हवी कठोर मेहनत करण्याची तयारी आणि अविरत काम करण्याची ईच्छा. याशिवाय आपण काहीच मिळवू शकत नाही. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे. म्युनसिपाल्टीच्या दिव्याच्या उजेडात त्यांनी आपला अभ्यास केला. ग्रंथालयातील वेळ वाचविण्यासाठी आणि जास्तीचा वेळ वाचन करता यावे म्हणून ग्रंथपालाचे डोळे चुकवून ग्रंथालयामध्ये पाव खायचे पण पुस्तक वाचायचे. वाचाल तर वाचाल या उक्तीची ओळख त्यांच्या जीवन चरित्रातून दिसून येते. आठरा तास अभ्यास करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती म्हणूनच ते भारताची राज्यघटना रात्रंदिवस कष्ट करून लिहू शकले. त्याच गोष्टीचा आदर्श घेऊन विद्यार्थीनी कष्ट घेतले पाहिजे.
दहावी आणि बारावीच्या वर्गात प्रवेश केले की, प्रत्येकजण जागे होतात आणि मन लावून अभ्यास करण्याचा संकल्प करतात. परंतु दहावी आणि बारावी वर्गाचे वर्ष अत्यंत महत्वाचे आहे म्हणून रात्रंदिवस अभ्यास केल्याने खरोखर यश मिळते काय ? तर याचे उत्तर नाही असे मिळेल. त्यासाठी आपल्या अभ्यासात सातत्यपणा असणे आवश्यक आणि अत्यंत महत्वाचे आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटल्याप्रमाणे
आधी कष्ट मग फळ । कष्टेविना सर्व निष्फळ ।।
सर्वात पहिल्यांदा मेहनत म्हणजे अभ्यास करावे त्यात नक्की फळ मिळेल. दे रे हरी पलंगावरीची वृत्ती आपण सोडून द्यायला हवे. कष्ट केल्यावर यश मिळणारच जर यदा कदाचित तेथे यश मिळाले नाही तर नाऊमेद न होता पुन्हा जोमाने काम करावे. सचिन तेंडुलकर जेव्हा शून्यावर बाद होत असे ते ही पहिल्याच चेंडूवर तेंव्हा ते स्वतः आत्मपरिक्षण करून सरावावर भर देत असत आणि त्यापुढील सामन्यात शतक ठोकत असत. असेच काही काम आपणास ही करायचे आहे. नाऊमेद व्ह्ययचे नाही, खचून जायचे नाही, भविष्यात अनेक संकटाना तोंड द्यायचे आहे, त्याची ही पूर्व तयारी समजून कार्य करावे.
आज आपणाला उशीर झाला आहे असे मुळीच समजू नका. कल करे सो आज कर आज करे सो अब या संत कबीर यांच्या दोहयानुसार आजपासून अभ्यासाला सुरु करू या. जे पूर्वीपासून अभ्यास करीतच होते ते थोड्या जोमाने कामाला लागा. परिक्षेच्या काळात स्वतःच्या तबीयतची काळजी घेणे आवश्यक आहे. तबीयतची काळजी घेतली नाही तर वर्षभर केलेल्या अभ्यासाच्या मेहनतीवर पाणी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षा तोंडावर असताना जास्त काळजी, चिंता, किंवा अस्वस्थ न होता हसत-खेळत रहावे. कुटुंबातील सर्वांशी वार्तालाप करावे. मन प्रसन्न ठेवल्याने आपल्या बुद्धिमत्तेची कार्यक्षमता वाढू शकते आणि गांगारुन किंवा गोंधळून गेल्यामुळे विस्मृतीत जातो. मग प्रश्नाचे उत्तर सोपे आणि माहित असून देखील लिहिता येत नाही. परिक्षेच्या दिवसात अनेक विद्यार्थ्याना याचा अनुभव येतो. मनाची घालमेल आणि भीती घालविण्यासाठी मन प्रसन्न ठेवणे हाच एकमेव उपाय आहे. परिक्षेच्या काळापुरतेच नाही तर जीवनात सुद्धा या वागण्याचा फायदा होतो. शालेय जीवनातल्या प्रत्येक बाबीचा परिणाम आपणास जीवनात बघायला मिळतो. त्यासाठी काही चांगल्या गोष्टी आणि बाबी जसे की वाचनाचा नियमित सराव आवश्यक आहे. तेंव्हा सर्व विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी हार्दीक शुभेच्छा.
नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
No comments:
Post a Comment