सोशल मिडीया: जरा जपून वापरा
सोशल मीडियामधील फेसबुक, ट्विटर, लिंकदिन, व्हाट्सएप्प, टेलीग्राम यासारख्या माध्यमाचा सध्या सर्वत्र फार मोठ्या प्रमाणात वापर चालू आहे. संगणक युगातील क्रांतीने खुप दुरवरच्या व्यक्तीला जवळ आणले आहे असे जरी वाटत असले तरी, याच माध्यमाने जवळच्या माणसाला दूर केले आहे, हे ही तेवढेच सत्य आहे. यात आज प्रत्येकजण सर्वात जास्त फेसबुक आणि व्हाट्सएप्प वापरणारे झाले आहेत. नुकतेच वाचण्यात आलेल्या बातमीनुसार फेसबुक वापर करणाऱ्याची संख्या लवकरच दोन अब्ज होणार आहे. यावरून सोशल मीडिया मध्ये फेसबुकचे महत्त्व किती जास्त आहे हे कळून येईल. यापूर्वी लोकं आपला मोबाईल क्रमांक द्या असे म्हणत त्या ऐवजी आज व्हाट्सएप्प क्रमांक द्या असे बोलू लागली. व्हाट्सएप्पने आपणास भरपूर काही उपलब्ध करून दिले आहे. व्हाट्सएप्पमुळे आपणास विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. आपले म्हणणे हजारो लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे एक चांगले माध्यम सर्वाना मिळाले आहे. त्यामुळे जो तो आज मार्गदर्शक, समुपदेशक, पत्रकार, वार्ताहर, छायाचित्रकार, संपादक आणि शिक्षक अश्या विविध भूमिकेतून काम करताना दिसून येत आहे. विविध जातीच्या, धर्माच्या समान व्यवसायाच्या आणि समविचारी लोकांचे समूह तयार होऊ लागले आणि मग सुरु झाल्या चावडी वरील गप्पा. जसे आपण सर्व मित्र - मित्र भेटल्यावर गप्पा मारतो तश्या गप्पा किंवा संवाद येथे वाचायला किंवा पाहायला मिळू लागले. एखाद्याने काही विचार व्यक्त केले की, त्याला काही ना काही उत्तर देण्याची प्रथा चालू झाली.
मित्रांचे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याचे तर ते एक हक्काचे व्यासपीठ बनले. शुभेच्छा आणि अभिनंदनामुळे व्हाट्सएप्प पूर्ण भरून जात आहे. यातून काही चांगले घेता येईल काय ? याचा कधीही विचार केला जात नाही. म्हणून कसलाही विचार न करता पोस्ट करणाऱ्या लोकांकडून इतराना त्रास होत आहे. आपणाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणजे स्वैराचार नव्हे, आपण आपली मते जरूर मांडावीत परंतु त्याचा त्रास कुणाला होणार नाही यांची काळजी देखील घेणे आवश्यक आहे. चार चौघात आपली प्रतिमा कशी आहे ? आपले व्यक्तिमत्व कसे आहे ? आपला स्वाभाव कसा आहे ? आपली विचारधारा कशी आहे ? या सर्व बाबीची माहिती आपण केलेल्या पोस्ट मधून इतरांना कळते. सोशल मिडियात काही बाबी पोस्ट करण्यापूर्वी हजार वेळा विचार करणे आवश्यक आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला असे करता येणार नाही. जसे धनुष्यातून बाण, तोंडातुन शब्द, आणि गेलेली वेळ परत येत नाही तसे सोशल मिडियात केलेली कोणतीही पोस्ट ही परत घेता येत नाही. याची सुरुवात जरी करमणुक किंवा मनोरंजन म्हणून झाले असले तरी, ती आज सर्वांसाठी आवश्यक बाब बनली आहे. सरकारी कार्यालयात देखील याचा वापर वाढू लागला आहे. पाच वर्षापूर्वी शाळेत मोबाइल वापर करण्यास बंदी होती तर आज मात्र अगदी सर्रास पाणे शाळेत मोबाइलचा वापर शालेय उपक्रम राबविताना करता येतो. अधिकारी आणि कर्मचाऱ्याना आपला संदेश एकमेकाजवळ पोहोचते करण्यासाठी व्हाट्सएप चा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. वेगवेगळ्या समूहाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, साहित्यिक या सर्व प्रकारच्या कार्याना गती मिळत आहे. तशी ही आपल्या सर्वासाठी आनंदाची बातमी आहे. मात्र समूहा मध्ये वावरत असताना किंवा पोस्ट करताना प्रत्येकानी थोडी काळजी घेतली तर सोशल मीडिया सर्वासाठी वरदान ठरू शकते. त्यासाठी काही बाबीची काळजी घ्यावी लागते.
आपली पोस्ट करण्यापूर्वी समुहाचे नाव आणि त्यांचे कार्ये लक्षात घ्यावे लागेल. समूह संयोजकाशी थोडी फार ओळख असेल तरच समुहात थांबावे किंवा त्यांच्याशी संपर्क करून समूहाची माहिती करून घ्यावी. समुहात सर्व जाती धर्माचे लोक राहतात त्यामुळे समाजात तेढ निर्माण होईल असे पोस्ट करू नये. शक्यतो आपले स्वतः चे काय म्हणणे आहे ते पोस्ट करावे दूसरीकडील माहिती कॉपी -पेस्ट करणे टाळावे. छोट्या चित्रातून फार मोठा संदेश देता येतो. त्यामुळे ही चित्र वापरताना खुप काळजी घ्यावी लागते. अन्यथा या चित्रामुळे न बोलता देखील काही अनर्थ होऊ शकतो. शुभ सकाळ, शुभ सायंकाळ, शुभ रात्री, या सारखे पोस्ट समूहावर शक्यतो टाळावे. त्यामुळे समुहातील सर्व लोकांना होणारा त्रास वाचू शकतो. वाढदिवस किंवा अभिनंदनाच्या शुभेच्छा समूहाऐवजी वैयक्तिक दिल्यास दोघात असलेली आत्मियता वाढिस लागते. आज व्हाट्सएप घरातील सर्वचजण पाहतात त्यामुळे अश्लील चित्रे किंवा वीडियो पोस्ट करुच नये. त्याचा सर्वात ज्यास्त धोका जसे तुम्हाला असतो त्याहुन जास्त धोका समोरच्या व्यक्तीला असतो. काही व्यक्तिना तर त्यांच्या मोबाईल मध्ये काय काय डाउनलोड झाले आहे ? याची देखील माहिती नसते. आपोआप डाउनलोड झाल्यामुळे असे अनेक प्रकार घडतात. समुहातील सर्वांशी सभ्यतेची वर्तणुक ठेवावी, खास करून महिलाशी संवाद करताना काळजी घ्यावी. समुहात शक्यतो वादविवाद टाळावे. साहित्याची चोरी करणे व्हाट्सएपमुळे खुप सोपे झाले आहे. दुसऱ्याचे साहित्य आपल्या नावाने प्रसिध्द करणाऱ्या महाभाग लोकांची संख्या येथे खुप वाढिस लागली आहे. मात्र अश्या प्रकारामुळे आपली समुहात पत कमी होते. त्याच सोबत लोकांचा आपल्या वरील विश्वास देखील कमी होतो. हे लक्षात घ्यावे. त्यामुळे मुळ कवी वा लेखकांच्या नावासह साहित्य पोस्ट करावे. आपले स्वतः चे साहित्य असेल तरच आपल्या नावासह पोस्ट केल्यास आपले नाव खरोखरच दूरपर्यंत पोहोचेल. दिवसातील काही ठराविक वेळ व्हाट्सएपसाठी द्यावे. इतर वेळी व्हाट्सएपपासून दूर राहणे केव्हाही चांगले. अन्यथा या रोगाची लागण झाली म्हणून समजा. हा रोग एकप्रकारे कैंसर सारखाच आहे जो दिवसेंदिवस नाही तर तासागणिक वाढतच राहतो. व्हाट्सएपमुळे काही कुटुंबात तणाव वाढले असल्याच्या बातम्या जेव्हा वाचनात येतात तेंव्हा वाटते की व्हाट्सएपच्या अति वापर करण्याचा कदाचित हा परिणाम असू शकतो. म्हणून मित्रांनो व्हाट्सएपसारख्या भुतापासून चार हात दूर राहण्याचा प्रयत्न करू या.
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
No comments:
Post a Comment