*कथा - प्रामाणिक वसंता*
*- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद*
प्रामाणिकपणा मुळे वसंताचे क्लेक्टरकडून कौतुक आणि पन्नास हजार रूपयाचे पारितोषिक आजच्या सर्वच पेपर मध्ये ही बातमी झळकली. खरोखरच वसंताने कामच असे केले होते म्हणून स्वतः कलेक्टर साहेबांनी त्याचे कौतुक केले. वसंता एक ऑटो ड्रायव्हर. गरीब मात्र प्रामाणिक. त्याने कधी ही पैश्याची हाव केली नाही. ऑटो चालविताना वाहतुकीचे नियम तोडला नाही की कोठे छोटा अपघात देखील केला नाही. प्रवाश्यासोबत नेहमी प्रेमळ वागत असतो. वयोवृध्द व्यक्तिना कमी पैश्यात त्यांच्या इच्छित स्थळी सोडत असे. एक-दोन रूपयासाठी त्याने प्रवाश्यासोबत कधी घासाघीस केली नाही. प्रवाशी हेच आपले दैवत असे तो समजायचा. सकाळी आठ वाजता घरा बाहेर पडायचा आणि सायंकाळी बरोबर सहा वाजले की ऑटो आपल्या घरी त्याच्या नियमित जागेवर लावून उर्वरित वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवित असे, असा त्याचा रोजचा नित्यक्रम. त्याचे कुटुंब म्हणजे बायको रकमा, मोठी मुलगी स्वरुपा आणि मुलगा दीपक, छोटा परिवार सुखी परिवार असा. ही दोन्ही मुले घराजवळील सरकारी शाळेत शिकत होती. तसे वसंता सुद्धा सरकारी शाळेतून दहावी पास झालेला होता. त्याची घरची परिस्थिती खुप हलाखीची होती. वसंताचे वडील शेतमजुरी करीत असे. स्वतः ची शेतीबाडी काही ही नव्हते. गावात राहून आपल्याने शेती किंवा शेतमजुरी करणे शक्य नाही म्हणून लग्न झाल्या झाल्या शहरात येऊन ऑटो चालविण्याचा निर्णय घेतला. सध्या त्याला बऱ्यापैकी पैसे मिळू लागले होते. त्याची पत्नी रकमा आजुबाजुच्या घरात मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावित असे. त्यांना एक छोटेसे घर होते. घर कसले ती तर एक झोपडीच होती. पण तरी ही ते चौघेजण त्या झोपडीमध्ये सुखी व समाधानी होते. तर अश्या छोट्याश्या झोपडीतील एका गरीब ऑटो ड्रायव्हर वसंताचे नाव पेपरमध्ये वाचताना बायको रकमा, स्वरूपा आणि दीपक यांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला परंतु शेजारी-पाजारी लोकांना ही वसंताचा खुप अभिमान वाटत होता. त्याला त्याच्या प्रामाणिकपणाचे आज फळ मिळाले असे जो तो बोलू लागला आणि वसंताला ही मनोमन खुप आनंद झाला.
त्या दिवशी रोजच्या प्रमाणे सकाळी आठ वाजता घराबाहेर पडून दिवसभर ऑटो चालवून सायंकाळी सहा वाजता आपल्या नियमित जागेवर ऑटो लावली. त्यानंतर एकदा वाकून ऑटोमध्ये सर्वत्र नजर फिरविली असता, मागील शीटच्या पाठीमागे मोकळ्या जागेत त्याला एक पिशवी नजरेस पडली. कोण्या तरी प्रवाश्याने ती पिशवी मागे ठेवली होती आणि उतरत असताना विसरून गेले होतेे. वसंताच्या डोळ्यासमोर दिवसभरातील प्रवाशी तरळले मात्र पिशवी कोणाची असेल ? याचा काही शोध लागला नाही. लगेच वसंताने ती ऑटोमधली पिशवी उचलली आणि घरात नेली. ती पिशवी कुणाची असेल ? त्या पिशवीत काय असेल ? या प्रश्नाने वंसंताचे डोके काही चालत नव्हते. पिशवीत आहे तरी काय हे पहावे म्हणून पिशवी उघडून पाहिली असता त्यात दोन-चार साड्या, लहान मुलांचे एक-दोन ड्रेस आणि एक छोटी पिशवी दिसून आली. यावरून वंसंताने अंदाज बांधला की कोण्या तरी महिलेने आपल्या ऑटोमध्ये विसरली असावी. त्या छोट्या पिशवीमध्ये काय असेल या उत्सुकतेने ती पिशवी उघडली, त्या बरोबर वंसंताचे डोळे चमकुन गेले. छोट्या पिशवीत साधारणपणे पैसे असतील असा वंसंताचा अंदाज होता पण त्यात निघाले सोन्याचे दागिने. वंसंताच्या काळजाचे ठोके वाढले होते. जवळपास दहा-बारा तोळे वजन असलेल्या सोन्याचे दागिने होते. वंसंताने एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने यापूर्वी एकदाही पाहिले नव्हते. त्यामुळे त्याला काळजी वाटू लागली. काय करावे हे त्याला काही सूचत नव्हते. तेवढ्यात तेथे रकमा आली. वंसंताच्या हातात दागिने पाहून ती खुप खुश झाली. पण वंसंताने जेंव्हा हे दागिने आपले नसून ते ऑटो मध्ये कुणी तरी पिशवी विसरली होती आणि त्या पिशवीमध्ये आढळले असे सांगल्यावर ती खुपच नाराज झाली. ज्याचे दागिने आहेत त्यांना परत करणे आपले कर्तव्य आहे असे वंसंताने आपल्या बायकोला समजावून सांगितले. यावर रकमा नाराजीच्या सुरात म्हणाली की, ती पिशवी कुणाची आहे ? त्याचा आत्ता नाही-पत्ता नाही. मग देणार कुणाला ? देवाने आपणाला भेट म्हणून दिली आहे. घरात आलेल्या लक्ष्मीला असे बाहेर करू नका. असे खुप बोलली पण वंसंताचे मन काही मानत नव्हते.
वंसंता प्राथमिक शाळेत शिकत असताना एक घटना घडली. जोशी सर परिपाठमधून रोज काही ना काही चांगल्या गोष्टी सांगत असत. आज सुध्दा सरांनी सांगितले की, रस्त्यावर किंवा कुठे ही काही सापडले तर ते आपल्या आई-बाबाकडे द्यावे. शाळेत एखादी वस्तू किंवा काही सापडले तर ते शाळेच्या मुख्याध्यापकाकडे किंवा आपल्या वर्गशिक्षकाकडे द्यावे. त्यामुळे आपल्या वरील अनर्थ टळतात. सापडलेल्या वस्तू वर आपला काही एक हक्क नसतो. मात्र तीच वस्तू आपणास संकटात नेऊ शकते. आपल्यावर चोरीचा आळ आणु शकते. म्हणून लगेच ती वस्तू मोठ्या व्यक्तीकडे किंवा जबाबदार व्यक्तीकडे सुपुर्त करावे म्हणजे मानसिक समाधान मिळेल. जोशी सरांचे बोलणे वंसंता मन लावून ऐकत होता. एके दिवशी शाळेच्या मैदानात असलेल्या हापश्यावर पाणी पिण्यासाठी गेला असता, तेथे हापश्यावर त्याला एक कंपासपेटी दिसून आली. कुणी तरी पाणी पिताना कंपासपेटी हापश्यावर ठेवली आणि तेथेच विसरली होती. वसंताने ती कंपासपेटी सरळ मुख्याध्यापकाकडे जमा केली. दुसऱ्या दिवशी परिपाठ मध्ये मुख्याध्यापकानी सर्व मुलासमोर वसंताचे जाहीर कौतुक करून कंपासपेटी ज्याची होती त्याला परत केली.
आज यानिमित्ताने वसंताला परत एकदा जोशी सरांचेे जी वस्तू सापडली ती वस्तू आपली नसते ही शिकवण लक्षात आली. तसा तो जागेवरुन ताडकन उठला, पिशवी भरली आणि घराबाहेर आला. आपली ऑटो बाहेर काढली आणि सरळ पोलिस स्टेशन दिशेने जाऊ लागला. जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये वसंताने ती सापडलेली पिशवी जमा केली. तेंव्हा कुठे वसंताला समाधान वाटले. पोलिसांनी वसंताचे नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक लिहून घेतल्यानंतर ती पिशवी आपल्या पोलिस स्टेशन मध्ये जमा केली आणि त्याची माहिती इतर पोलिस स्टेशनला कळविले. दोन-चार दिवसानंतर एक महिला दागिन्याची चौकशी करीत करीत त्या पोलिस स्टेशनमध्ये आली तेंव्हा तिचे दागिने परत मिळालेले पाहून खुप अत्यानंद झाला. ही पिशवी येथे कशी आली ? याची चौकशी केली असता, तिला वसंताची माहिती तिला मिळाली. वसंताचे आभार व्यक्त करावे म्हणून तिने वसंताचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक मिळविला. हां हां म्हणता ही बातमी शहरात सर्वदूर पसरली. तशी कलेक्टर साहेबांच्या कानावर देखील ही बातमी पोहोचली. तसे कलेक्टर साहेबांनी वसंताचे जाहीर कौतुक करण्याचे ठरविले. कारण समाजात अश्या प्रामाणिक लोकांची संख्या खुप कमी कमी होत चालले आहे. सामाजिक विकासासाठी आज प्रामाणिक लोकांची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून कलेक्टर साहेबांनी वसंताचे नुसते जाहीर कौतुकच केले नाही तर पारितोषिक म्हणून पन्नास हजार रुपयाचे इनाम ही दिले. शालेय जीवनात शिकलेल्या प्रामाणिकपणा मुल्याचे फळ आज मिळाले असल्याचा आनंद वसंताच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता
*🎁🎁🎁 समाप्त 🎁🎁🎁*
( या कथेतील सर्व नावे काल्पनिक असून, याचा प्रत्यक्ष काही संबंध नाही. यदा कदाचित तसा काही संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावे. )
No comments:
Post a Comment