नागोराव सा. येवतीकर

Friday, 16 February 2024

छत्रपती शिवाजी महाराज ( Chatrpati Shivaji Maharaj )

शिवजयंती निमित्ताने प्रासंगिक लेख

महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान :- छत्रपती शिवाजी महाराज

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, सर्वांचे स्फूर्तिस्थान आणि रयतेचा जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नाही असा एक ही व्यक्ती राज्यात शोधून ही सापडणार नाही. आपल्या राज्यातच नाहीतर देशातील अनेक राज्यात व जगातील काही देशांत शिवाजी महाराजांचे कार्य अनेकांना स्फूर्ती व प्रेरणा देत असते. शिवाजी महाराजांकडे इतर साम्राज्यांच्या तुलनेत छोटी पण सुसज्ज आणि शिस्तबद्ध अशी फौज होती. या फौजेमध्ये मुख्यत्वे मराठा आणि कुणबी जातीचे मावळे समाविष्ट होते. शिवाजी महाराज जाणून होते की मुघलांच्या प्रचंड दारुगोळा व तोफखान्यांनी सज्ज असलेल्या फौजेला पारंपारिक युद्धपद्धतीने हरवणे कठीण होते. त्यामुळे महाराजांनी आपली स्वतःची अशी युद्धनीती विकसित केली, ज्यास ' गनिमी कावा' म्हणून ओळखले जाते. आजूबाजूच्या भौगोलिक प्रदेशाची माहिती आणि येथील दऱ्याखोऱ्यांचे सखोल ज्ञान यावर वेगवान फौज आणि शत्रूला अनपेक्षित हल्ले अशा पद्धतींचा वापर शिवरायांनी केला. ही युद्धनीती अतिशय यशस्वी ठरली. मुघलांच्या मोठमोठ्या फौजा शिवरायांच्या छोटेखानी फौजांसमोर निष्प्रभ ठरल्या. शिवाजी महाराजांच्या गनिमी कावाचा अनेक इतिहास संशोधक आजही अभ्यास करतात, यावरून शिवरायांची युद्धनीतीचे महत्व अधोरेखित होते.
पारतंत्र्याच्या काळात स्वतःचे राज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहणे आणि पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास नेणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. पण शिवाजी महाराजांनी सवंगडी असलेल्या मावळ्यांना सोबत घेऊन श्री चे राज्य निर्माण केले आणि इतिहास घडविला. एक आदर्श राजा कसा असतो ? आज्ञाधारक पुत्र कसा असावा ? रयतेचा जाणता राजामध्ये कोणते गुण असावेत ? याचे उत्तम उदाहरण म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राकडे पाहतो. सोळाव्या शतकात होऊन गेलेले राजे शिवाजीचे कार्य आज एकविसाव्या शतकात देखील तेवढेच प्रेरक आणि मार्गदर्शक ठरतात. त्यांनी आपल्या जीवनात अनेक चढ-उतार पाहिले, सुखदुःखाचा अनुभव घेतला, जवळच्या व्यक्तीचा विरह सहन केला, अनेक लढाया त्यांनी आपल्या बुद्धीचातुर्य व सहकार्याने जिंकले आहेत.
शहाजी भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या पोटी पुणे  जिल्ह्यातील  जुन्नर  शहराजवळील वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी एका तेजस्वी बाळाचा जन्म झाला. शिवनेरी किल्ल्यात जन्म झाला म्हणून त्या बाळाचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती. शहाजी महाराजांना नेहमी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जावे लागत असे त्यामुळे त्यांनी राजमाता जिजाऊ आणि बाळ शिवाजी यांची राहण्याची व्यवस्था पुण्यात केली. राजमाता जिजाऊ यांच्या सान्निध्यात चंद्रकलेप्रमाणे बाळ शिवाजी मोठे होत होते. राजमाता जिजाऊ ह्या एक धाडसी आणि स्वाभिमानी स्त्री होती. त्यामुळे त्यांनी बाळ शिवाजीला लहानपणापासून साहसी व धाडसी लोकांच्या कथा व गोष्टी सांगत असत. प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले शिवाजी महाराजांच्या त्या आद्यगुरू मानल्या जातात. हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात. मुलांना संस्कारी व धाडसी करायचे असेल तर प्रत्येक स्त्रियांनी राजमाता जिजाऊ यांचे जीवन चरित्र डोळ्यासमोर ठेवायला हवे. लहान मुलांना आई जसे शिकवेल तसे ते मूल घडत राहते. म्हणून जीवनात येणारे सुख, दुःख, सोपे, अवघड, कठीण प्रसंगाचे अनुभव लहान मुलांना द्यायला हवे. पण आजकालच्या माता स्वतः अनेक कष्ट व दुःख सहन करतात पण आपल्या लेकराला काडीचा त्रास होऊ देत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये त्या विषयीच्या जाणिवा निर्माण होत नाहीत. माता जिजाऊ यांनी आपले स्वतःचे एक राज्य असावे अशी मनोमन इच्छा होती, तशी ती आपली इच्छा त्यांनी शिवाजी महाराजांकडे व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी बाळ शिवाजीला घोड्यावर बसणे, तलवार चालविणे यासारख्या युद्धकला शिकविल्या. आपल्यापेक्षा मोठ्या लोकांसोबत कसे वागावे ? महिलांसोबत आपले वर्तन कसे असावे ? जीवनातल्या सूक्ष्म घटनांचा त्यांच्या बालमनावर संस्कार केले. याच विचारातून शिवाजी महाराजांनी आपल्या बाळ सवंगड्यासह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. खरोखरच तो किती धाडसी निर्णय होता. आपल्या मावळ्यांच्या सहकार्याने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून घेतला. पुढील दोन वर्षात शिवरायांनी पुण्याजवळील अनेक महत्त्वाचे किल्ले ताब्यात घेतले. तसं बघायला गेलं तर शत्रू पक्षात कितीतरी सैनिक होते आणि त्यामानाने राजे शिवाजी यांच्याकडे फार तुल्यबळ सैन्य. पण शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे सैन्य यांच्यात जो आत्मविश्वास आणि धमक होती ती शंभर सैनिकाला पुरून उरणारी होती. म्हणूनच त्यांनी अनेक किल्ले जिंकू शकले. त्यांच्या मावळ्यांच्या यादीत सारेच शूर आणि वीर होते. त्यापैकी काही शूर वीर मावळ्यांचा सेनापतीचा उल्लेख केल्याशिवाय शिवाजी महाराजांचे कार्य पूर्णत्वास गेल्यासारखे वाटत नाही.
शिवाजी महाराज यांच्या शूर वीर मावळ्यांच्या यादीत प्रथम नाव स्मरते ते म्हणजे तानाजी मालुसरे यांचे. 

तानाजी यांच्या घरी त्यांच्या मुलाच्या लग्नाची जोरदार तयारी चालू होती. त्याचवेळी कोंढाणा किल्ल्यावर स्वारी करण्याची वेळ आली. त्यावेळी तानाजी यांनी आधी लगीन कोंढण्याचे मग रायबाचे असे सगळ्यांना सांगून लढाईसाठी निघून गेले. कोंढण्यावर शत्रूशी चार हात करतांना तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्याची बातमी महाराजांच्या कानावर गेले त्यावेळी महाराज निःशब्द झाले. त्यांच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडले ते म्हणजे ' गड आला पण सिंह गेला.' तानाजी मालुसरे यांच्यासारखे अनेक मावळ्यांची महाराजवर खूप निष्ठा आणि प्रेम होते म्हणून तर आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी स्वराज्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले. महाराजांचे जीव वाचले पाहिजे म्हणून स्वतःचे जीव अर्पण करणाऱ्याच्या यादीत बाजीप्रभू देशपांडे यांचे स्मरण करणे अगत्याचे ठरते. 

लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे असे म्हणून पन्हाळगडावरून विशालगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घोडखिंडीत बाजीप्रभू यांनी शत्रूला रोखून धरले. जोपर्यंत महाराज गडावर सुखरूप पोहोचत नाहीत तोपर्यंत त्यांनी शत्रूशी चार हात केले. महाराज गडावर पोहोचल्याची तोफ ऐकल्यावरच त्यांनी आपला जीव सोडला. किती ती निष्ठा ! असे जिवाभावाचे मावळे मिळविणे हे खरंच भाग्याची गोष्ट आहे. अफजलखान यांच्या वधाच्या वेळी महाराजांचे अंगरक्षक जिवा महाल तात्काळ धावून गेला म्हणूनच म्हटले जाते होता जीवा म्हणून वाचला शिवा. अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे इस्लामी पद्धतीने अंत्यसंस्कार करून त्याची एक कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली. यावरून शिवाजी महाराजांची आपल्या शत्रूबद्दल असलेला आदर लक्षात येते. शिवाजी महाराजांच्या जीवनात असे अनेक प्रसंग आले ज्यात त्यांच्या मावळ्यांनी आपले जीव अर्पण करून महाराजांचे जीव वाचविले. अनेक शत्रू राज्यांना त्यांनी सळो की पळो करून सोडले. लाखाचा पोशिंदा जगाला पाहिजे असे सर्वांची मनोकामना असायची आणि त्याच विचारातून प्रत्येकजण स्वयंस्फूर्तीने कामाला लागत होते. महाराजांच्या सैन्यात सर्व जाती-धर्माचे व विविध पंथाच्या लोकांचा समावेश होता. सर्वधर्मसमभाव या वृत्तीने महाराजांचे सैनिक कार्य करत असत. राज्यातल्या प्रत्येक व्यक्ती विषयी महाराजांच्या मनात प्रचंड आस्था होती. कोणत्याही व्यक्तीची पिळवणूक होऊ नये, झाडांची कत्तल करू नका, शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान करू नका, स्त्रियांचा सन्मान करा अश्या प्रकारचे आदेश ते आपल्या सैन्याला देत असत यावरून महाराजांची दृष्टी आपल्या लक्षात येऊ शकते. शिवाजी महाराजांनी राज्यकारभारासाठी आठ मंत्री असलेले अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती. हे मंत्री राजांना राज्यकारभारविषयक कामाविषयी सल्ले देत असे. राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. शहाजीराजे व जिजाबाई यांची मुद्रा पारशी भाषेत होती, पण शिवाजी महाराजांनी राजमुद्रेसाठी संस्कृत भाषेचा वापर केला. शिवाजी महाराज दिसायला लहान मूर्ती जरी असली तरी त्यांची कीर्ती खूप महान होती. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा सर्वत्र शिवजयंती म्हणून साजरा केला जातो. १६८०च्या एप्रिल महिन्यात वयाच्या ५० व्या वर्षी शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी प्रणाम !

- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
मु. येवती पो. येताळा
ता. धर्माबाद जि. नांदेड
पिन - 431809
मोबाईल क्रमांक - 9423625769
Mail ID - nagorao.yeotikar@gmail.com

Wednesday, 14 February 2024

पुस्तक परिचय - कुलदीपक कथासंग्रह ( Kuldipak )

जीवनातील नैतिक मूल्ये सांगणारा कथासंग्रह कुलदीप

नासा येवतीकर हे धर्माबाद येथील कन्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. त्यांनी यापूर्वी काव्यांगण या नवोपक्रमात शाळेच्या फळ्यावर वेगवेगळ्या कवींच्या ' रोज एक कविता ' हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी राबवला होता. हा उपक्रम मुलांमध्ये  कवितेची आवड निर्माण करणारा आहे. आमचे भावी वाचक, भावी साहित्यिक ,भावी रसिक हे  आजचे बालवाचक आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये कथा, कवितांची गोडी निर्माण करणे अत्यावश्यक आहे, असे त्यांचे मत आहे.
ना.सा. येवतीकर हे स्वतः स्तंभलेखक असून बर्‍याच वर्तमानपत्रात त्यांचे लेखन प्रकाशित होत असते. त्यांचा शिक्षणक्षेत्र लेखनावर विशेष भर आहे.
लाॅकडाऊनच्या काळात त्यांनी सोशल मीडियाद्वारे अनेक उपक्रम राबवलेत. कथालेखन, पत्रलेखन, कवितालेखन, ऑडिओ वगैरे वगैरे ! यामुळे बर्‍याच नवोदितांना साहित्य क्षेत्रात लेखन करण्याची संधी मिळाली. आज ना. सा.येवतीकर हे साहित्यिकांच्या यादीत सामावले आहेत. त्यांचे कुलदीपक हे नववे ई पुस्तक आहे. यापूर्वी त्यांचे वैचारिक लेखसंग्रह संवेदना, जागृती, मी एक शिक्षक, शाळा आणि शिक्षक, रोज सोनियाचा दिनू, हिंदू सण, हरवलेले डोळे कथासंग्रह आणि सारीपाट कवितासंग्रह असे एकूण आठ ई बुक प्रकाशित झाले आहेत.
लेखक  'शब्द हीच संपत्ती 'मानणारे आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचे म्हणजे
मी होतो एक साधा माणूस
आज नासा कवी बनलो
शब्दाने दिली खूप संपत्ती
हेच साऱ्यांना सांगत गेलो.
शिक्षक आणि लेखक ही भूमिका एकमेकांना पूरक असते. लेखनामुळे, सकारात्मक विचारशक्ती वृद्धिंगत दृष्टीकोन बदलतो, विस्तारित होतो. कल्पनेचा उपयोग, शब्दांचा उपयोग शिकवण्यात होतो.
ई -साहित्य हे सुप्रसिद्ध प्रकाशन असून त्यांचे काम अफाट आहे. आमच्याकरिता ई -साहित्य प्रकाशन नेहमी प्रेरणा देणारी आहे.
कुलदीपक पुस्तकातील प्रत्येक कथा ही नीतीमूल्य जपणारी, मदत करायला शिकविणारी, संस्कारी सुस्वभावी आदर्श अशी आहे .
'रमेशचे शौर्य'  कथेत रमेश पोहण्याची कला शिकल्यामुळे आपल्या दोन मित्रांना पूरातून वाचवतो. शौर्य आणि धैर्याकरिता त्याला पुरस्कार मिळतो. नामा अनाथ असला तरी विनयशील, दयाळू, कष्टाळू स्वभावामुळे गावातील लोकांची मन जिंकून घेतो. त्यामुळे बिनविरोध सरपंच होतो.
'सर्कस ' या कथेत लहान मुलांच्या आवडत्या सर्कसमधील गमती जमती खूपच सुंदररित्या मांडल्या आहेत. ही कथा वाचतांना लहानपणीच्या अनेक आठवणींना उजाळा मिळतो.
'फेसबुक फ्रेंड ' या कथेमध्ये फेसबुकवर मित्र ऑनलाईन कसे फसतात ? याची कहाणी मांडली आहे. माणसाला भुलवून टाकणाऱ्या अनेक जाहिराती सध्या फेसबुकवर बघायला मिळतात. त्यापासून सावध राहण्याचा सल्ला या कथेतून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसून येतो. सैन्यात वीर मरण झालेल्या एका शहिदांच्या कुटुंबाची कहाणी 'व्यर्थ न हो बलिदान ' या कथेत आहे. माझ्यासोबत आई असते असे म्हणण्यापेक्षा मी आई सोबत राहतो हे सांगणारी कथा म्हणजे 'आईचे घर ' आहे. कुठलीही वस्तू  चोरीला गेल्यानंतर त्याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली तरी ती वस्तू सहजासहजी आपल्याला मिळत नाही, त्यासाठी काय खटाटोप करावा लागतो याचा अनुभव 'सायकल गेली चोरीला ' या कथेत विषद केला आहे. 'रेल्वेतील शाळेत' रेल्वेत काही बाही विक्री करणाऱ्या मुलांना गुरुजी शाळेचा लळा कसा लावतात हे वाचनीय आहे. 'गावाची आठवण' मध्ये गावाचे सुंदर चित्रण आहे. मित्राने संकटकाळात मदत केली तर त्याची परतफेड मित्र कसा करतो हे 'परत फेड ' ही कथा सांगते .
'ब्लू व्हेल 'कथेत मोबाईल वरील गेम खेळून स्वतः चे जीवन संपवितो ही भयानकता सांगितली आहे. 'कुलदीपक '..मुलगाच पाहिजे म्हणून हट्ट करणाऱ्या सासूबाईची ही मुखपृष्ठ कथा  अत्यंत वाचनीय आहे. आनंदाची मैत्री, टोकाचे पाऊल, गोष्ट एका आंबेगावाची, भिजवणारा पाऊस, पाच रुपये अशा छान छान कथा यात आहेत.
त्यांनी या कथासंग्रहमध्ये भ्रष्टाचार, मोबाईलवरील खेळांच्या दुष्परिणामावर वाचकांना सजग केले असून मातेची जबाबदारी,
बालकामगारांच्या शिक्षणावर प्रकाश टाकलाय.
या पुस्तकातील कथांमधून जीवनातील नैतिक मूल्ये, चारित्र्य, सद्गुण, सकारात्मकता हे संस्कार मोती सहज मिळतात. एकूणच या कथासंग्रहातील सर्वच कथा ह्या मुलांसाठी संस्कारक्षम असून सर्वच वयोगटातील वाचकांसाठी वाचनीय कथा असून वाचल्यावर मानसिक समाधान देणारे आहे. या 'कुलदीपक' नंतर  'कुलज्योती ' नावाचे पुस्तक सरांनी प्रकाशित करावे असे मी सुचवते आणि पुढील लेखनास शुभेच्छा देते.

पुस्तकाचे नाव - कुलदीपक कथासंग्रह
लेखकाचे नाव :- नासा येवतीकर, 9423625769
प्रकाशन दिनांक :- 19 फेब्रुवारी 2021
प्रकाशक :- ई साहित्य प्रकाशन
किंमत :- विनामूल्य लिंक http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/kuldeepak_nasa_yeotikar.pdf
पृष्ठे :- 119


पुस्तक परिचय
मीना खोंड, हैद्राबाद, 7799564212

Tuesday, 13 February 2024

मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांचे विद्यार्थ्यांना पत्र ( CM Letter to Student )

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान अंतर्गत पत्र


एकनाथ संभाजी शिंदे
मुख्यमंत्री महाराष्ट्र

मंत्रालय
मुंबई ४०० ०३२


प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

नव्या दिशेचे, नव्या उषेचे गीत सूर हे गाती,
या मंगल देशाचे आहे, भविष्य अपुल्या हाती'

आपल्या देशाला अनेक महापुरुषांचा महान वारसा लाभला आहे. शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, बुद्धिवंतांनी, विचारवंतांनी आपला देश घडवला आहे. विविध प्रयोगशील व्यक्तिमत्त्वांनी रुजवलेल्या संशोधनाच्या बीजाचा वटवृक्ष झालेला आपल्याला आज पाहायला मिळतो आहे. 'चांद्रयान-३' मोहिमेच्या यशाने भारताचे नाव आता अंतराळावरही सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. या ऐतिहासिक घटनेचे आपण साक्षीदार आहोत, ही आपल्या सर्वांसाठी भाग्याची गोष्ट आहे. अंतराळ विज्ञानाकडे अभ्यासात्मक तसेच व्यवसायात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची वेळ आली आहे, हे दर्शवणारी ही घटना आहे, जनसामान्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांचे जगणे सुखकर करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरणे महत्त्वाचे आहे.
आपल्या भारत देशाचे, आपल्या महाराष्ट्र राज्याचे भविष्य तुमच्या हाती आहे आणि त्याची तयारी तुम्हाला वर्तमानातच करावी लागणार आहे. शेतीपासून माहिती तंत्रज्ञानापर्यंत प्रत्येक क्षेत्राचा विज्ञानाच्या आधारे विचार करून भविष्याचा वेध घ्यायला हवा. त्यासाठीच सर्वप्रथम शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घ्यायला हवे. महाराष्ट्रातील तुम्हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यावर आम्ही सदैव भर दिला असून विविध शैक्षणिक सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविण्यावर भर देण्यात आला आहे. यात प्रामुख्याने 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या स्पर्धात्मक अभियानाचा समावेश आहे. या अभियानांतर्गत चाकोरीबाहेरील विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळा परस्परांशी स्पर्धा करतील व त्या माध्यमातून विद्याथ्यांच्या सर्वागीण विकासास चालना मिळेल. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी व त्यायोगे साहित्याप्रती त्यांच्या अभिरुचीत व सामान्य ज्ञानात वाढ व्हावी, यासाठी 'महावाचन महोत्सव' हा उपक्रम राबविला जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयक कामाची आवड निर्माण व्हावी तसेच लागवडीचे तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात करावे यासाठी 'माझी शाळा, माझी परसबाग' हा अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे. सार्वजनिक स्वच्छता व त्या माध्यमातून चांगले आरोग्य जोपासता यावे यासाठी 'स्वच्छता मॉनिटर-टप्पा २' हे अभियान राबविण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांत राज्यातील सर्व शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन मी या प्रसंगी करीत आहे.
राज्यातील सर्व शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 'एक राज्य, एक गणवेश' योजना राबवित आहोत, गणवेशासोबत सर्व भुलामुलींना बूट आणि पायमोज्यांची जोडीही देण्यात येत आहे. तुमच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तकांनाच वह्यांची पाने जोडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तुमच्या शरीरस्वास्थ्यासाठी शालेय पोषण आहारात सुधारणा करण्यात येत असून त्याद्वारे राज्याच्या विविध भागांतील प्रादेशिक आहाराच्या आवडीनिवडी आणि सवयी विचारात घेऊन त्यानुसार पोषण आहाराची आखणी केली जात आहे. प्रत्येक शाळेत तुम्हा विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या सहभागातून परसबाग विकसित करून त्यातील भाज्या व फळभाज्यांचा समावेश तुमच्या आहारात

करण्याची योजना आखली आहे. तुमच्या आरोग्याची तपासणी करून पोषण आहारात सुधारणा करण्यासाठी आम्ही भारतीय बालरोगतज्ज्ञांच्या असोसिएशनसोबत करार केला आहे. विद्यार्थिनीच्या शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शासनातर्फे सॅनिटरी नॅपकिन पुरवणारी मशीन लावण्यात येत आहेत जेणेकरून मुलीना सॅनिटरी नॅपकिन निःसंकोच उपलब्ध व्हावेत.
तुम्हा सर्वांना नोकरीच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून HCL, TISS या संस्थांबरोबर आपल्या सरकारने करार केला आहे. पूर्वी इयत्ता आठवीपासून दिले जाणारे व्यावसायिक शिक्षण आता इयत्ता सहावीपासून सुरू होत आहे. व्यावसायिक शिक्षणाच्या अद्ययावत प्रशिक्षणाद्वारे तुमच्यापैकी सुयोग्य विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्या देशाशी करार करण्यात येत आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आसपासच्या परिसरातील उच्च शिक्षणाच्या आणि नोकरीच्या कक्षा विचारात घेऊन त्या दृष्टीने मनोवैज्ञानिक चाचण्या घेऊन तुमचे आणि तुमच्या पालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे. सर्व शाळांमध्ये Digital Library, English Language Lab, STEM Lab, Robotic Lab, इत्यादी उभारून त्याद्वारे तुम्हाला २१ व्या शतकातील शिक्षणाच्या अद्ययावत संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
राज्यातील काही शाळांची सद्यस्थिती आणि शासनाच्या अनुदानाच्या मर्यादा विचारात घेऊन 'दत्तक शाळा योजना' राबविण्यात येत आहे, जेणेकरून त्या शाळांमध्ये चांगल्या भौतिक सुविधा पुरवता येतील.
मित्रांनो, या राज्याचे, देशाचे भविष्य तुमच्या हाती आहे. तुमचे यश हे उद्याच्या सक्षम महाराष्ट्राचा पाया असेल. त्यासाठी तुम्ही सर्वांनी कला, क्रीडा, ज्ञान, विज्ञान अशा विविध क्षेत्रांत पारंगत व्हायला हवे. 'शासन आपल्या दारी' सारख्या अभिनव उपक्रमाची तुम्हाला तुमचे भविष्य घडविण्यात साथ मिळणार आहे. सध्या महाराष्ट्रातील कोट्यावधी नागरिकांना याचा लाभ होत आहे. तुमच्या स्वप्नांना वेग देण्यासाठी सायकल, पुस्तके, गणवेश यांसह अनेक वस्तु, साधने आपण उपलब्ध करून देत आहोत. तुमचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठीच हा सर्व खटाटोप सुरू आहे.
शासन, समाज हे जसे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध स्तरांवरून प्रयत्न करताहेत, तसाच विचार तुम्हीही अगदी छोट्या गोष्टींपासून करू शकता. तुमचे घर, परिसर, गाव स्वच्छ राहावे हे जसे तुम्हाला वाटते, तसेच तुमची शाळा सुंदर करण्यासाठी रोज थोडा वेळ द्या. त्यातून आरोग्यदायी आणि सुदृढ समाज घडू शकेल. तुम्हीच हा बदल घडवू शकता. हा बदल स्वतःपासून सुरू करावा लागतो, असे मला वाटते. या बदलातून तुम्ही प्रगत महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकाल. यात तुमचा सहभाग तुम्ही नक्कीच नोंदवाल, अशी मी अपेक्षा बाळगतो.
या प्रसंगी सर्व पालकांना व शाळांच्या माजी विद्यार्थ्यांना मी असे आवाहन करीत आहे की, त्यांनी आपल्या शाळेप्रती उत्तरदायित्वाच्या भावनेतून त्या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी यथाशक्ती आपले योगदान  द्यावे.

*जय हिंद, जय महाराष्ट्र !*