जीवनातील नैतिक मूल्ये सांगणारा कथासंग्रह कुलदीपक
नासा येवतीकर हे धर्माबाद येथील कन्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. त्यांनी यापूर्वी काव्यांगण या नवोपक्रमात शाळेच्या फळ्यावर वेगवेगळ्या कवींच्या ' रोज एक कविता ' हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी राबवला होता. हा उपक्रम मुलांमध्ये कवितेची आवड निर्माण करणारा आहे. आमचे भावी वाचक, भावी साहित्यिक ,भावी रसिक हे आजचे बालवाचक आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये कथा, कवितांची गोडी निर्माण करणे अत्यावश्यक आहे, असे त्यांचे मत आहे.
ना.सा. येवतीकर हे स्वतः स्तंभलेखक असून बर्याच वर्तमानपत्रात त्यांचे लेखन प्रकाशित होत असते. त्यांचा शिक्षणक्षेत्र लेखनावर विशेष भर आहे.
लाॅकडाऊनच्या काळात त्यांनी सोशल मीडियाद्वारे अनेक उपक्रम राबवलेत. कथालेखन, पत्रलेखन, कवितालेखन, ऑडिओ वगैरे वगैरे ! यामुळे बर्याच नवोदितांना साहित्य क्षेत्रात लेखन करण्याची संधी मिळाली. आज ना. सा.येवतीकर हे साहित्यिकांच्या यादीत सामावले आहेत. त्यांचे कुलदीपक हे नववे ई पुस्तक आहे. यापूर्वी त्यांचे वैचारिक लेखसंग्रह संवेदना, जागृती, मी एक शिक्षक, शाळा आणि शिक्षक, रोज सोनियाचा दिनू, हिंदू सण, हरवलेले डोळे कथासंग्रह आणि सारीपाट कवितासंग्रह असे एकूण आठ ई बुक प्रकाशित झाले आहेत.
लेखक 'शब्द हीच संपत्ती 'मानणारे आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचे म्हणजे
मी होतो एक साधा माणूस
आज नासा कवी बनलो
शब्दाने दिली खूप संपत्ती
हेच साऱ्यांना सांगत गेलो.
शिक्षक आणि लेखक ही भूमिका एकमेकांना पूरक असते. लेखनामुळे, सकारात्मक विचारशक्ती वृद्धिंगत दृष्टीकोन बदलतो, विस्तारित होतो. कल्पनेचा उपयोग, शब्दांचा उपयोग शिकवण्यात होतो.
ई -साहित्य हे सुप्रसिद्ध प्रकाशन असून त्यांचे काम अफाट आहे. आमच्याकरिता ई -साहित्य प्रकाशन नेहमी प्रेरणा देणारी आहे.
कुलदीपक पुस्तकातील प्रत्येक कथा ही नीतीमूल्य जपणारी, मदत करायला शिकविणारी, संस्कारी सुस्वभावी आदर्श अशी आहे .
'रमेशचे शौर्य' कथेत रमेश पोहण्याची कला शिकल्यामुळे आपल्या दोन मित्रांना पूरातून वाचवतो. शौर्य आणि धैर्याकरिता त्याला पुरस्कार मिळतो. नामा अनाथ असला तरी विनयशील, दयाळू, कष्टाळू स्वभावामुळे गावातील लोकांची मन जिंकून घेतो. त्यामुळे बिनविरोध सरपंच होतो.
'सर्कस ' या कथेत लहान मुलांच्या आवडत्या सर्कसमधील गमती जमती खूपच सुंदररित्या मांडल्या आहेत. ही कथा वाचतांना लहानपणीच्या अनेक आठवणींना उजाळा मिळतो.
'फेसबुक फ्रेंड ' या कथेमध्ये फेसबुकवर मित्र ऑनलाईन कसे फसतात ? याची कहाणी मांडली आहे. माणसाला भुलवून टाकणाऱ्या अनेक जाहिराती सध्या फेसबुकवर बघायला मिळतात. त्यापासून सावध राहण्याचा सल्ला या कथेतून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसून येतो. सैन्यात वीर मरण झालेल्या एका शहिदांच्या कुटुंबाची कहाणी 'व्यर्थ न हो बलिदान ' या कथेत आहे. माझ्यासोबत आई असते असे म्हणण्यापेक्षा मी आई सोबत राहतो हे सांगणारी कथा म्हणजे 'आईचे घर ' आहे. कुठलीही वस्तू चोरीला गेल्यानंतर त्याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली तरी ती वस्तू सहजासहजी आपल्याला मिळत नाही, त्यासाठी काय खटाटोप करावा लागतो याचा अनुभव 'सायकल गेली चोरीला ' या कथेत विषद केला आहे. 'रेल्वेतील शाळेत' रेल्वेत काही बाही विक्री करणाऱ्या मुलांना गुरुजी शाळेचा लळा कसा लावतात हे वाचनीय आहे. 'गावाची आठवण' मध्ये गावाचे सुंदर चित्रण आहे. मित्राने संकटकाळात मदत केली तर त्याची परतफेड मित्र कसा करतो हे 'परत फेड ' ही कथा सांगते .
'ब्लू व्हेल 'कथेत मोबाईल वरील गेम खेळून स्वतः चे जीवन संपवितो ही भयानकता सांगितली आहे. 'कुलदीपक '..मुलगाच पाहिजे म्हणून हट्ट करणाऱ्या सासूबाईची ही मुखपृष्ठ कथा अत्यंत वाचनीय आहे. आनंदाची मैत्री, टोकाचे पाऊल, गोष्ट एका आंबेगावाची, भिजवणारा पाऊस, पाच रुपये अशा छान छान कथा यात आहेत.
त्यांनी या कथासंग्रहमध्ये भ्रष्टाचार, मोबाईलवरील खेळांच्या दुष्परिणामावर वाचकांना सजग केले असून मातेची जबाबदारी,
बालकामगारांच्या शिक्षणावर प्रकाश टाकलाय.
या पुस्तकातील कथांमधून जीवनातील नैतिक मूल्ये, चारित्र्य, सद्गुण, सकारात्मकता हे संस्कार मोती सहज मिळतात. एकूणच या कथासंग्रहातील सर्वच कथा ह्या मुलांसाठी संस्कारक्षम असून सर्वच वयोगटातील वाचकांसाठी वाचनीय कथा असून वाचल्यावर मानसिक समाधान देणारे आहे. या 'कुलदीपक' नंतर 'कुलज्योती ' नावाचे पुस्तक सरांनी प्रकाशित करावे असे मी सुचवते आणि पुढील लेखनास शुभेच्छा देते.
पुस्तकाचे नाव - कुलदीपक कथासंग्रह
लेखकाचे नाव :- नासा येवतीकर, 9423625769
प्रकाशन दिनांक :- 19 फेब्रुवारी 2021
प्रकाशक :- ई साहित्य प्रकाशन
किंमत :- विनामूल्य लिंक http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/kuldeepak_nasa_yeotikar.pdf
पृष्ठे :- 119
पुस्तक परिचय
मीना खोंड, हैद्राबाद, 7799564212
No comments:
Post a Comment