बैलांचा सण : पोळा
चित्र : विनायक काकुळते, नाशिक
भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. येथील 75 टक्के लोक ग्रामीण भागात, खेड्यात राहतात. ग्रामीण भागात शेतीशिवाय अन्य दुसरा काही व्यवसाय सध्या तरी अस्तित्वात नाही. शेती म्हटले की त्याच्यासोबत बैलाचा संबंध येणारच. बैलाशिवाय शेती करणे फारच अशक्य आहे ( आधुनिक यंत्रामुळे सध्या बैलांची संख्या कमी होत आहे ही बाब वेगळी ) प्रत्येक शेतकऱ्याकडे निदान एक बैलजोडी असतेच असते आणि त्याच बैलाच्या ताकदीवर तो शेतातील सर्व कामे करून घेतो. शेताची नांगरणी, वखरणी, पेरणी किंवा शेतातून घराकडे मालाची ने-आण करण्यासाठी या बैलांचा वापर केला जातो. पूर्वी दळणवळणाची सुविधा एवढी विकसीत झाली नव्हती तेव्हा शहरात जाण्या-येण्यासाठी बैलगाडीतून प्रवास करावा लागायचा. सायकल नावाची वस्तू फारच कमी जणांच्या घरी बघायला मिळत असे. पूर्वीच्या काळी लग्नकार्यात नवरदेव सायकलसाठी रुसून बसला आहे असे आपण आज ऐकलं तर हसायला येते. याच बैलगाडीला 80 ते 90 च्या दशकात खूप मोठा दर्जा होता. एवढेच काय लग्नकार्याला जाणाऱ्या वऱ्हाडींना सुद्धा याच बैलगाडीचा आधार घ्यावा लागत असे. दवाखाना असो वा कोणाच्या सोयरीकीला जाणे असो प्रत्येकजण या बैलगाडीचा वापर करीत होते. आज तो काळ राहिला नाही. बैलांचा वापर आत्ता शेतीच्या कामापुरतेच मर्यादित राहिलेले आहे. प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडणार्या या बैलाचा सण म्हणजे पोळा. श्रावण महिन्यातील अमावास्येला पोळा हा सण साजरा केला जातो. प्रत्येक शेतकरी या सणाची आतुरतेने वाट पाहतात. आपल्या बैलाविषयी असलेले प्रेम, माया, जिव्हाळा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदात दिसून येते. आपल्या पोटच्या लेकरासारखे ते बैलाची निगा राखतात, काळजी घेतात आणि पोळ्याला ते सारे प्रेम पाहायला मिळते. तसे पाहिले तर पोळा सणांची चाहूल श्रावण महिना प्रारंभ झाला की या सणांचे वेध सुरू होतात.
श्रावण महिन्याविषयी प्रसिद्ध बालकवी एका कवितेत म्हटले आहे की, " श्रावणमासी, हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे." या महिन्यात पावसाचे सरासरी प्रमाण जास्त असते. पावसामुळे सर्वत्र हिरवीगार सृष्टी दिसते. जणू असे वाटते की निसर्गाने हिरवा शालू नेसला आहे. या महिन्यात सणांची नुसती रेलचेल असते. सर्वप्रथम येथे ती नागपंचमी. मुक्या प्राण्यांवर प्रेम करा आणि त्यांना आपले समजा असा संदेश यातून दिला जातो. त्यानंतर पौर्णिमेला येतो रक्षाबंधनाचा सण. भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाची महती सांगणारा सण संपल्यानंतर महिन्याच्या शेवटी येणारा सण म्हणजे पोळा. श्रावण महिना प्रारंभ झाला की शेतकरी रोज सकाळी आपल्या बैलांना स्वच्छ पाण्याने धुतात आणि त्यांना चारापाणी करून शेताकडे नेतात. पूर्वी खूप पाऊस पडायचा. नद्या, नाले, तलाव तुडुंब भरलेले असायचे. म्हणून शेतकरी तलाव किंवा नदीवर बैलांना धुण्यास घेऊन जात असत. पण आज तेवढा पाऊसच नाही. तलाव किंवा नदी सोडा साध्या खड्ड्यात पाणी दिसत नाही त्यामुळे बैलांना आज फक्त घरीच बादलीभर पाण्याने धुण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
पोळा सणाची खरी सुरुवात आदल्या दिवशी होते त्यास खांदे मळणी असे म्हणतात. याच दिवसापासून बैलांना काम लावले जात नाही. बैलाच्या खांद्याला तूप किंवा लोणी लावून चोळले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी बैलांना स्वच्छ धुतले जाते आणि त्यानंतर त्यांची शिंगे रंगविली जातात. कपाळावर भिंगे लावतात. अंगावर झूल घालतात. गोंडे बांधतात आणि त्यास जंगलात चरवण्यास घेऊन जातात. गावातील मानकरी यांच्या हस्ते सायंकाळी पाच बैलांची पूजा केली जाते आणि पोळा फुटतो. तेथून शेतकरी आपले बैल घेऊन गावभर फिरत घरी येतात. गृहलक्ष्मी त्या बैलांची पूजा करते, मंत्र म्हटले जातात आणि बैलाला पुरणाचा नैवेद्य खाण्यास दिला जातो. आपल्या मित्रांना व नातलगांना पुरणपोळीचे मेजवानी देतात. वर्षभर बैलांनी आपल्या शेतात केलेल्या कष्टाचे कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे आपला हा पोळा होय.
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक व प्राथमिक शिक्षक
9423625769
स्तंभलेखक व प्राथमिक शिक्षक
9423625769
No comments:
Post a Comment