Saturday, 23 March 2024

पुस्तक परिचय - सोनेरी भोपळा (Soneri Bhopala )

*सोनेरी भोपळ्यात चिंटुचा सैर*
पुण्याच्या अरिहंत पब्लिकेशन प्रकाशित आणि 
व्यंकटेश काटकर लिखित कादंबरी सोनेरी भोपळा हाती घेतल्याबरोबर संपल्याशिवाय खाली ठेवावे वाटत नाही. पुस्तकाचे नाव वाचल्यापासून या पुस्तकात काय दडलंय याविषयी मनात कुतूहल निर्माण होते. पुस्तकाचा रंग सुद्धा सोनेरी वाटतो असा आहे आणि त्यावरील एका परीचे चित्र ती मुलाला काहीतरी बोलत आहे आणि बाजूला सोनेरी रंगातील भोपळा विस्मयपणे दोघांना पाहत आहे. आजूबाजूला हिरवेगार जंगल आहे, यातून वाचकांच्या मनात उत्सुकता निर्माण करण्यात कोल्हापूरचे मुखपृष्ठकार राज बकरे नक्की यशस्वी होतील. म्हणून वाचक लगेच वाचण्यात सुरुवात करेल यात शंका नाही.
           पुस्तक उत्सुकतेने वाचनास सुरु केले कि पहिल्या पानापासून वाचक वर्ग वाचण्यात गुंग होतो. वाचतांना सर्व सोनेरी वाचून डोळे सुद्धा सोनेरीमय होऊन जाते. जसे सूर्याचा सोनेरी रंगाचा प्रकाश, सोनेरी बेट, सोनेरी रंगाची सोनेरी झोपडी, म्हातारीचा रंग सोनेरी, केस सोनेरी लांबसडक, अंगात सोनेरी रंगाची चोळी, दोन्ही हातांना सोनेरी चार-चार बांगडया, सोनेरी रंगाची वाकडी काठी, सोनेरी विळा, असे सर्व सोनेरी-सोनेरी वाचन करतांना सोनेरी भोपळा कसा येतो ?  आणि केव्हा येतो ? याची उत्सुकता वाचकांना लागून राहते अन वाचन ही चालूच राहते.
किशोर वयातील मुलांना त्यांच्या स्वभावानुसार काल्पनिक जगाविषयी प्रचंड आकर्षण असते. कल्पना विश्वात वावरतांना ती स्वप्ने पूर्ण करता येतील काय? याचाही विचार करीत असतात. अपेक्षेप्रमाणे त्या सोनेरी बेटावर तीन परी उतरतात आणि त्यांचे नाव अर्थातच सोनपरीपासून सुरु होते, तिला संपूर्ण कथानक मध्ये मुख्य भूमिकेत ठेवण्यात आले. यावरून लेखकांना एक संदेश द्यायचा असेल कदाचित आपले विचार चांगले असतील तर आपल्या मतांना व विचारांना किंमत मिळते अन्यथा नाही. कहाणी पुढे-पुढे चालत राहते. परी या सोनेरी बेटावर राहू इच्छितात मात्र सोना आजीला त्यांना तेथून पाठवून द्यायचे असते. मग तेथे या पुस्तकाचा मुख्य नायक 'सोनेरी भोपळा' प्रवेश करतो. तेथील गमती-जमती खरंच वाचनीय आहेत. "अय्या कित्ती मोठ्ठा हा भोपळा...!" असे त्या परीचे बोल वाचन करीत असतांना अगदी लहानपणी ऐकलेली 'एवढा मोठा भोपळा' ही  कवितेतील कथा सहज आठवून जाते. अगदी त्याचबरोबर या कथानकमध्ये सुध्दा असे काहीतरी आहे असे वाटायला लागते. सोना आजी मंतर टाकून परींना भोपळ्यात बसविते आणि त्यांचा प्रवास सुरु होतो तसा वाचकांच्या भुवया उंचावल्या जातात.
परी भोपळ्यात बसून आकाशातून विहार करताना पर्यावरणाचे सुंदर वर्णन करण्यात आले, असे वाटते की आपण जंगलातून फिरत आहोत. कथानकाच्या मध्यात चिंटुचा प्रवेश होतो आणि कथा अजून मजेशीर वळण घेते. शाळा आणि तेथील परिसर, शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांचे नाते हे वर्णन वाचनीय आहे. लेखक स्वत: शिक्षक असल्यामुळे या क्षेत्रातील बरीच बारीकसारीक गोष्टी विचारात घेतले आहेत. लहान मुलांना एखादी अनपेक्षित वस्तू भेटल्यावर मुलांना कसे वाटते ? याचे उत्तम चित्रण करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. शाळेची वेळ संपल्यावर मुले जर घरी आले नाहीत तर प्रत्येक आई-बाबाला आपल्या लेकरांची काळजी वाटते. ती चिंटू विषयी त्यांच्या आई-बाबांची काळजी वाचन करताना प्रसंग मनाला नक्की भावतो, नव्हे, डोळ्यातून अश्रू गळतात. चिंटु आणि परी यांची भेट होणे आणि ते संपूर्ण धरती पाहण्यासाठी भोपळ्यात बसून भ्रमण करणे खरोखरच वाचनीय आहे. चिंटू आपल्या घरी काही ही न सांगता परी सोबत जातो तेंव्हा त्यांच्या आई-बाबांची काय अवस्था होते ? शाळेतील मुख्याध्यापक कसे चिंताग्रस्त होतात ? वर्गशिक्षक स्वतःला कसे कोसतात ? चिंटु चे मित्र-मैत्रिणी चिंटू शिवाय कश्याप्रकारे राहतात ? चिंटू परत घरी येतो काय ? घरी आल्यावर काय काय घडते ? या सर्व प्रश्नांची उकल होण्यासाठी सोनेरी भोपळा हे पुस्तक वाचावेच लागेल. कथानक अगदी सुंदर प्रकारे सरकवत नेले आहे. पुढे काय ? याची उत्सुकता मनाला लागून राहते आणि पुस्तक कधी संपले हेच कळत नाही. यात आलेले गीत 
' जंतर मंतर तू रे वाटोळा 
असा तू आमचा सोनेरी भोपळा
छान छान दिसतोस सोन्याचा गोळा
वाटतोस आम्हाला भोळा रे भोळा
आमच्यापुढे तू छोटाच छोटा
कामा मध्ये तर दिसतोस मोठा
नको करूस आत्ता फाजिल लाड
आम्हाला घेऊन लांब सैर काढ
म्हणू नकोस तू इथेच थांब 
घेऊन जा आम्हाला लांबच लांब
खूपच मजेशीर आहे. हे गीत वाचत असताना चल रे भोपळ्या टुणुक टुणुक या गीताची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. या पुस्तकात निसर्गातील विविध रंगाच्या पक्षी, प्राणी, आणि इतर बरेच काही अनाकलनीय गोष्टी भेटतात. 
कथानकाच्या शेवटी सोनपरीने चिंटूला दिलेला उपदेश किशोरवयीन मुलांसाठी फारच उदबोधक आहे. सदैव खरे बोल, चांगले काम कर, दीन दुबळ्याची सेवा कर, आई-वडिलांची सेवा कर, मित्र-मैत्रिणीला अंतर देऊ नकोस, एवढं केलस तर परमेश्वर तुला काही कमी करणार नाही. असा हा संदेश किशोर मुलांसाठी दिलेला आहे, ज्याची आज खरीच आवश्यकता आहे. सोनेरी भोपळा पुस्तक खरोखरच सोन्यासारखे आहे. विशेष म्हणजे या कादंबरीला पाठराखण जेष्ठ साहित्यिक आदरणीय देवीदास फुलारी सरांनी केल्यामुळे कादंबरीला पूर्ण रुप प्राप्त झाले. प्रत्येकानी एक वेळ जरूर वाचावे अशी कथानक एखाद्या टीव्हीवरील मालिके प्रमाणे बहरत जाते. या पुस्तकात एकूण पृष्ठे असून त्याची किंमत 125 रू आहे. त्यांच्या लेखनीतून असेच उत्तमोत्तम साहित्य तयार होवो हीच शुभकामना आणि हार्दीक शुभेच्छा

पुस्तक परिचय -
                  नागोराव सा. येवतीकर
                    स्तंभलेखक
                    9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...