एक पुस्तक लिहिण्यासाठी हजार पुस्तक वाचावी लागतात.
वाचत राहा, लिहीत राहा
जगण्याचा आनंद घेत राहा
- नासा येवतीकर, स्तंभलेखक
शाळा आणि शिक्षक ई बुक वरील प्रतिक्रिया
नमस्कार
आपण प्रकाशित केलेले श्री ना सा येवतीकर यांचे. 'शाळा आणि शिक्षक ' हे ई पुस्तक वाचण्यात आले. आपले आणि लेखक यांचे अभिनंदन....
अतिशय उत्कृष्ट अशी रचना आपण केलेली आहे.
माझ्या शुभेच्छा कम प्रस्तावनेस स्थान दिल्याबद्दल आपले ऋण व्यक्त करतो. धन्यवाद
- नागेश सू. शेवाळकर,
सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा जेष्ठ साहित्यिक, पुणे.
आदरणीय येवतीकर सर,
सर आपली शिक्षण क्षेत्रातील तळमळ आपणाला स्वस्थ बसू देत नाही.. आपल्या मधील नाविन्यतेचा खूप चांगला प्रयत्न म्हणजे हे ई बुक शाळा आणि शिक्षक...
मान्यवरांच्या शुभेच्छा मध्येच आपले आणि आपल्या कार्याचे मोठेपण दिसून येते.... सचित्र असलेले हे ई बुक शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरेलच यात काही शंका नाही. शाळेच्या परिपाठासाठी अत्यंत मार्गदर्शक असलेले फ्रेश मॉर्निंग बुलेटिन हे सदर आपण सुरु करुन आधीच सर्व महाराष्टातील सामान्य शिक्षकांचे मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे...आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग भरारीसाठी तसेच शाळा आणि शिक्षक या पुस्तकासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा..
- ज्ञानेश्वर माठे
खूपच सुंदर लेखन... संग्राह्य अंक. ....ई बुकचा नाविन्यपूर्ण आणि अनोखा प्रयोग आपण सादर करून साहित्य क्षेत्रातील यशस्वी प्रयोग राबवित आहात. आपल्या लेखणीला सलाम... आणि खूप खूप शुभेच्छा
- विनायक हिरवे, प्राथमिक शिक्षक, कोल्हापूर
पुस्तक- परिचय
*शाळेतील विविध बाबींवर प्रकाश टाकणारे ई बुक*
*" शाळा आणि शिक्षक "*
शिक्षक होणे हे सर्वांचे काम नाही. शिक्षकांची निवड करतांना नुसते डीएड, बिपीएड, बीएड इ. असून चालत नाही तर मुळात शिक्षणाची आवड ही असली पाहिजे. निरंतर वाचन, मनन आणि चिंतनाची आवड असली पाहिजे. शिक्षण पेशा हा व्यवसाय नसून ते मातीला योग्य प्रकारे वळण देऊन चांगल्या, सुंदर, सुबक व अप्रतिम असे व्यक्तीमत्व घडविण्याचे एक साधन आहे. हे आपण सर्वांनीच समजून घेतले पाहिजेत. शिक्षणाचा बाजार मांडून सरकारने फार मोठी चुक केलेली आहे . काॅपी म्हणजे कलंक या सदरात लेखक नासा येवतीकरांनी काॅपी करण्याने अभ्यासू मुलांवर व शिक्षणावर कसा दुष्परिणाम होतो हे समजावून सांगितलेले आहे. शिक्षक आनंदी तर मुले आनंदी. हे सत्य असले तरी आनंद हा माणसांच्या प्रवृत्तीवर अवलंबून असतो. यासाठी शिक्षकाचे स्वास्थ्य हा सुध्दा महत्वाचा भाग आहे. मुलांचे व शिक्षकांचे स्वास्थ्य चांगले रहाण्यासाठी शरीराला व्यायाम हा दररोजचा असला पाहिजे. याकडे सरकारने व शिक्षकवर्गांनी पुर्णतः पाठ फिरविलेली आहे. याचा वाईट परिणाम मुलांच्या आरोग्यावर, स्वास्थावर व पर्यायाने शिक्षणावर होतो आहे. आॅनलाईन कामात गुरफटलेला शिक्षक ही कल्पनाच चुकीची आहे. शिक्षकाचे काम मुलांवर चांगले संस्कार करणे, मुलांचे स्वास्थ्य घडविणे आणि देशासाठी स्वयंपूर्ण असे नागरिक घडविणे हे आहे. आॅनलाईन कामावर पुर्णतः बहिष्कार हवा. कारण रेकार्ड ठेवणे हे कारकूनाचे काम आहे न की शिक्षकांचे हे सरकारने समजून घेतले पाहिजे. मोबाईल डिजीटल शाळा ही काळाची गरज आहे. डिजीटल शाळा याचा अर्थ नविनतम तंत्रज्ञान प्रणाली व्यवहारात आणून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानात भर घालणे होय. यासाठी तरूण शिक्षकांची टीम तयार करून त्यांचे मार्फत डिजीटल तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार केला गेला पाहिजे. याचा अर्थ जुने ते सर्व टाकावू असा होत नाही. दोन्हीचा समन्वय आवश्यक आहे. राष्ट्रगीत, राष्ट्रभक्ती ही अंतःकरणातून निर्माण झाली पाहिजे न की बळजबरीने. यासाठी नासा येवतीकर सर म्हणतात तसे प्रत्येक सरकारी कार्यक्रमात, शाळा, महाविद्यालय व सरकारी कार्यालयात राष्ट्रगीताचा मान हा राखला गेलाच पाहिजे. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली राष्ट्रगीताचा अपमान होता कामा नये. कारण प्रथम राष्ट्र अंतीम राष्ट्र हेच ख-या नागरिकाचे लक्षण ठरते आहे. यात व्यक्तीगत स्वार्थ आड येता कामा नये.
नासा येवतीकरांचे लेखन हे विस्तृत असून सर्व विविधांगी विषयावर नेहमी लेखणी ही चालत असते. ही कौतुकास्पद बाब ठरते आहे. नासा सरासारख्या लोकशिक्षकाची समाजाला खरी गरज आहे, विशेषतः ग्रामीण भागाला. शाळेशी निगडित प्रत्येक घटकांनी आणि प्रत्येक शिक्षकांनी नासा येवतीकर लिखित शाळा आणि शिक्षक हे ई बुक आवर्जून एकदा तरी वाचावे. हे ई बुक nagorao26@gmail.com येथे विनंती पाठविल्यास विनामूल्य उपलब्ध होईल. लिखाण असेच चालू रहावे हीच सदिच्छा !
मिलिंद मधुकरराव गड्डमवार,
' मधु कुंज ' आसिफाबाद रोड,शिवाजीनगर वार्ड क्र. ९
तह- राजुरा जिल्हा-चंद्रपूर(म. रा.) पिन कोड- ४४२ ९०५
भ्र.क्र. ९५११२१५२००
“शाळा आणि शिक्षक” पुस्तकाबद्दल माझे अभिप्राय
एस. एम. रचावाड, मु. पो.पाळज
ता. भोकर जि. नांदेड
पूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर या पुस्तकाबद्दल माझे अभिप्राय व या पुस्तकातील काही बाबी जे की माझा मनावर प्रभावित केले त्यांचा थोडक्यात आढावा मी लिखित स्वरूपात मा़ंडत आहे.
टिप:
माझा या लिखाणात चुका व विसंगती आढळून आल्यास क्षमस्व !
माझे काही विचार आपल्या विचारांशी जुळत नसल्यास ते माझे वैयक्तिक मत समजावे, याबद्दल क्षमस्व.
मला आपली “शाळा आणि शिक्षक” E-Book वाचण्यास उपलब्ध करुन दिल्याबद्दल व माझे अभिप्राय मांडण्यास अनुमती दिल्याबद्दल आपणांस खूप खूप धन्यवाद.
आदरणीय,
ना.सा सर आपल्या लिखाणाने मी खूप प्रभावित झालो. आपल्या लिखाणातून मला तूमची विद्यार्थाप्रती, समाजाप्रती असलेली निष्ठा, प्रेम, तळमळ, धडपड व सामाजिक बांधिलकी याची प्रचीती मला वेळोवळी दिसून आली. तुमच्या प्रत्येक लिखाणातून काहीना काही संदेश वाचकांना मिळत असतो, व ते शैक्षणिक सुधारणा बाबतीत असो वा सामाजिक जागृती असो आणि राष्ट्रभक्ती पर असो. तुमचे लिखाण म्हणजे वाचकांसाठी विचारांचा एक खजिनाच असतो, वाचक वाचनात एवढे मग्न होतात की वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही. तुमच्या या कर्तृत्वाला माझा सलाम. तुमच्या या लिखाणाच्या कार्यातून भविष्यात असेच सामाजिक जागृती, सामाजिक बांधिलकी व शैक्षणिक सुधारण्याचे कार्य घडत राहो त्याचबरोबर वाचकांना आदर्श शिक्षक, आदर्श विद्यार्थी व आदर्श व्यक्तिमत्व कसे घडवता येईल व ते कसे टिकवून ठेवता येईल यासाठी असेच सदैव प्रेरणा वाचकांना मिळो. तुमच्या या कार्यास खूप खूप शुभेच्छा.
तुमचे हे कार्य व धडपड पाहून मला कधीकधी प्रश्न पडतो की आजकाल किती शिक्षक व सरकारी कर्मचारी आपली जबाबदारी अगदी कर्तव्यदक्षरित्या व प्रामाणिकपणे पार पाडतात ? अगदी फार कमी. आज प्रत्येकजण एवढा स्वार्थ बनत चालला आहे की अगोदर स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची सुधारणा लवकरात लवकर कशी होईल त्यासाठी भ्रष्ट मार्गाने आपली जबाबदारी विसरून कमीत कमी वेळेत पैसा कमवून मोठा कसा होता येईल हेच पाहत आहे. त्यामुळे पैसा, संपत्ती व वैयक्तिक स्वार्थ हेच सर्वश्रेष्ठ मानणारे हे मनुष्य मानवता, नीतिमत्ता व सामाजिक बांधिलकी या नीती तत्त्वापासून दुरावत चाललेला आहे. आणि पूर्णपणे असंवेदनशील बनत चालला आहे. परिणामी नात्यानात्यांमधील विश्वास, शिष्यांचा गुरुप्रती असलेला विश्वास, आई-वडिलांचा(वृद्ध) मुलाप्रती असलेला विश्वास, लोकांचा लोकांवरती असलेला विश्वास, विद्यार्थ्यांचा/ समाजाचा शिक्षणावरती असलेला विश्वास आणि समाजाचा सरकारवरती असलेला विश्वास हळूहळू कमी होत असताना दिसून येते. प्रत्येकाने जर पैसा, संपत्ती हेच सर्वश्रेष्ठ न मानता नीतिमत्ता, मानता व सामाजिक बांधिलकी याची जाण ठेवून आपापल्या क्षेत्रात अगदी प्रामाणिकपणे, कर्तव्यदक्षतेने काम केल्यास स्वतःला पैसा बरोबर आनंद व समाधान प्राप्त होऊन जीवन अधिक सुखी व आनंदी होईल. परिणामी स्वहित बरोबरच समाज आणि देशाचे हित व कल्याण होईल. आणि भारत एक विश्वसनीय राष्ट्र निर्माण होऊन सुजलाम-सुफलाम बनेल.
आपल्या “शाळा आणि शिक्षक” या पुस्तकातील खालील बाबी जे की मला खूप आवडले व माझ्या मनावर खूप प्रभावित केले त्यांचा थोडक्यात आढावा व त्यावर माझे काही वैयक्तिक मत या ठिकाणी मांडत आहे.
१) कॉपी करणे करणे म्हणजे एक कलंक :
खरोखरच कॉपी करणे म्हणजे एक कलंक व स्वतःच्या प्रगतीच्या मार्गातला अडथळा होय. नकला मारून पुढे जाणे म्हणजे लोकांना आपली प्रगती वाटते परंतु ही प्रगती तात्पुरत्या स्वरुपाची असते. दीर्घकाळासाठी भविष्यात ही प्रगती अधोगती असते. तेच जर व्यक्ती स्वतःच्या मेहनतीने, जिद्दीने नकला न मारता पुढे गेलेला असेल तर त्याचा आत्मविश्वास प्रचंड असते. त्याचे निर्णयक्षमता भक्कम असते. व तोच स्पर्धेत टिकू शकतो व आपले भविष्य उज्ज्वल बनवू शकतो.
यासंदर्भात माझं स्वतःच एक उदाहरण या ठिकाणी सांगतो. आमच्या वेळेस दहावी-बारावीला खूप नकला चलायचे. गावाकडील बरेच विद्यार्थी धर्माबाद अर्जापूरला बारावीला ॲडमिशन घेण्यासाठी जायचे व तेथे बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन डी.एड लागले जायचे. माझं सुद्धा तेच स्वप्न होतं म्हणून मी सुद्धा धर्माबादला बारावी सायन्सला ॲडमिशन घेतलो. बारावी परीक्षेच्या वेळेस तेव्हा दोन सेंटर असायचे एक एलबीएस महाविद्यालय व दुसरी जिजामाता शाळा. माझा परिक्षा सेंटर जिजामाता शाळेवर आला होता. हेडगार्ड म्हणून कॉमर्स विभागाचे जगनमोहन सर खूप कडक स्वभावाचे होते. नकला चालूच दिले नाहीत. माझ्यासोबत जिजामाता शाळेत परिक्षा दिलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे डीएड स्वप्न धुळीस मिळाले. मी ७५ टक्के ची अपेक्षा केली असता केवळ मला ६३ टक्केच मिळाले. तेच माझासोबतचे काही मित्र एलबीएस महाविद्यालयात आलेली ७५ ते ८० टक्के घेऊन डीएड गेलेत. त्यावेळेस पहिल्यांदाच मी नशिबाला दोष देत खूप निराश झालो होतो. खूप काही आपण गमावलं व आपलं शैक्षणिक करिअर संपलं असं वाटलं माझ्या त्या कोमल मनाला. अशा निराश अवस्थेत मी डि.बी कॉलेज भोकर येथे ॲडमिशन घेतलो. डि.बी कॉलेज मध्ये बी.ए च्या प्रथम वर्षापासून माझ्या जीवनाला एक नवीन कलाटणी मिळाली होती. चांगले अनुभवी प्राध्यापक व त्यांचे मार्गदर्शन आणि शिकवण, Strict Examination पद्धती,स्वतःची मेहनत व जिद्द या बळावर माझा आत्मविश्वास भक्कम होत गेली. डि.बी कॉलेज हे माझ्या जडणघडणीत फार मोलाचा वाटा आहे तर पुणे विद्यापीठ माझा सर्वांगीण विकास व यशात फार मोठा वाटा आहे.
माझ्या जीवनात जे काही यश-अपयश, जय-पराजय व वाईट प्रसंग आलेत ते चांगल्यासाठीच आलेत असे मला आज वाटते. त्यातून मला खूप काही शिकायला भेटले व माझे मन खूप खंबीर व जिद्दी बनले. आज मी जे यश संपादन केले त्याचे श्रेय हे मला भूतकाळात अपयशातून मिळालेल्या प्रेरणा यांस जातो.
२) आयुष्यातील महत्त्वपूर्ण वळण:
आयुष्यातील महत्त्वपूर्ण वळण हे व्यक्तीच्या जीवनातील यशाच्या वाटेत फार मोलाचे आहे. जसे एकादा कारागीर एकादी वस्तू तयार करताना जसा आकार तो देत असतो तशी ती वस्तू आकार घेऊन बनत असते तसेच विद्यार्थी भविष्यात कसा आकार घेतो व कसा घडतो हे सुद्धा त्याला वेळोवेळी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती मिळालेल्या महत्त्वपूर्ण वळणावरच अवलंबून असते. हे वळण त्याला आई-वडील, शिक्षक, मित्र, सभोवतालचे वातावरण यांच्याकडून मिळालेल्या संस्कार, आचार-विचार व शिक्षण यावर अवलंबून असते.
३) सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा विकास:
सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये अवगत असलेले क्रीडा कौशल्य, कला कौशल्य दिसून येते. पण हे काही काळाकरता म्हणजे प्रजासत्ताक दिन सारख्या सोहळ्यानिमित्त मात्र ठरते. त्यानंतर त्यांना कोणीच प्रोत्साहन करीत नाही. शिक्षक व पालक जर खरोखरच विद्यार्थ्यांच्या अंगी लपलेले हे कला कौशल्य व क्रीडा कौशल्य गुण ओळखून व त्या गुणांना वाव देऊन प्रोत्साहित करीत राहिले तर विद्यार्थी कमीत कमी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पर्यंत मजल मारू शकतात व आपली कर्तत्व सिद्ध करून दाखवतात. मी माझे असे काय मित्र पाहिले आहे की जे कलागुण संपन्न व क्रीडा गुण संपन्न असताना देखील प्रोत्साहन व मार्गदर्शन अभावी ते मागे राहिलेत. म्हणून शिक्षक, प्राध्यापक व पालक यांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. खरोखरच एखाद्या विद्यार्थ्यांच्या अंगी तसे अवगत गुण असतील तर त्याला वाव देऊन त्याला पुढे जाण्यास प्रोत्साहीत करावे अन्यथा टॅलेंट नष्ट पावते व सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा म्हणावं तेवढा विकास होणार नाही.
४) लोकसहभागातून शाळा विकास:
आपण म्हटल्याप्रमाणे शाळेच्या विकास कार्यात जेवढी शिक्षकमंडळी, विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग असणं आवश्यक आहे तेवढीच गावातील लोकांचा सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे. या विकासकार्यात या सर्वांचा सुरेख संगम असेल तरच शाळा नुसती शाळा नसून एक विश्वासाचं केंद्र निर्माण होईल. आणि चांगले प्रतिभावंत, गुणी व यशस्वी विद्यार्थी घडतील.
ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की शाळेच्या विकासात गावातील लोकांचा सहभाग हा निष्क्रिय असतो. काही शाळांमध्ये तर कित्येक वर्षानुवर्षे अपुरे शिक्षक, अपुऱ्या पायाभूत सुविधा ह्या समस्या प्रकर्षाने दिसून येतात. ही परिस्थिती असताना गावातील प्रतिष्ठित लोकं, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक याबाबतीत काहीच हालचाल व लक्ष करीत नाहीत. तसेच ही गावकरी मंडळी शाळेच्या संबंधित वेगवेगळ्या उपक्रमात देखील भाग घेत नाहीत. या सर्व गोष्टींस कारणीभूत आहे त्यांची मानसिकता, त्यांना वाटते “ठेविले अनंते तैसेची रहावे”. यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होते.
हे बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकांनी आपली मानसिकता बदलायला हवी. आजचा विद्यार्थी हे उद्याचे देशाचे भावी आधारस्तंभ होय याची जाणीव प्रत्येकांना असायला हवी. शासनाने सुद्धा शाळेच्या विकासात लोकांचा सहभाग जास्तीत जास्त कसे वाढवता येईल यांकरिता वेगवेगळे उपक्रम राबवून जनजागृती घडवून आणले तर अधिक चांगले होईल.
५) लिहीण्याला पर्याय नाही:
लोकांच्या मानसिक, आर्थिक व सामाजिक स्थितीत बदल घडवून आणायचे तर 'कलम व लिखाण’ यांची ताकद व महत्त्वाची भूमिका याबद्दल आपण मांडलेले विचार हे क्रांतिकारी, प्रभावकारक आणि मनाला खूप स्पर्श करणारे आहेत.
तुमच्या पुस्तकात उल्लेखीत केलेले शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते युसुफजई यांचे संदर्भ व त्यांचे वाक्य “मला पुस्तक व पेन द्या मी जगात क्रांती घडवून आणीन” हे ह्रदयाला स्पर्श करणारे क्रांतीकारी विचार आहेत. यावरून मला पेनच्या ताकदीची कल्पना माझा डोक्यात आली.
या पेनच्या सामर्थाबद्दल मला इंग्रजीतले एक म्हण आठवत, “The pen is mightier than the sword” याचा अर्थ “पेन तलवारपेक्षा अधिक शक्तिशाली आहे”.
६) शाळेला भिंती:
शाळेला संरक्षण भिंत असले तर शाळेतील सुरक्षितता बऱ्याच प्रमाणात टिकून राहते. तसेच विद्यार्थी सुरक्षितपणे ज्ञानार्जन करू शकतात. शाळेची सुरक्षितता राखणे ही सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. नुसत्या भिंती असून चालत नाही तर शिक्षक, मुख्याध्यापक व गावातील लोकांचा शाळाप्रती असलेली मानसिकता बदलायला हवी. शाळा विषयी आपुलकी व माझी शाळा ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे. तरच शाळेचा परिसर व शांततेला भंग पोहोचू शकत नाही व शाळा खरोखरच सुरक्षित आहे आणि मुलं सुरक्षितपणे ज्ञानार्जन करू शकतात असं म्हणता येईल.
७)एकच ध्यास ; वाचण्यास विकास:
विद्यार्थ्यांचे भवितव्य हे त्यांनी विद्यार्थी जीवनात कमावलेल्या ज्ञानार्जनावर अवलंबून असते. हे ज्ञानार्जन त्यांनी वाचन,चिंतन व सराव यातून प्राप्त करीत असतो.
शालेय पुस्तकांच्या अभ्यासासोबत अवांतर वाचनाचे सवय किती महत्वाचे असते याबद्दल आपले विचार खूप परिणामकारक व प्रभावी आहेत. खरंच व्यक्ती अवांतर वाचन केल्यामुळे त्याला व्यवहार ज्ञान व वेगवेगळ्या थोर व्यक्तींचे अनुभव शिकायला भेटते. या अनुभवातूनच व्यक्ती घडत असतो.
अलीकडे मुबाईल व टीव्ही या मिडीयाच्या प्रभावामुळे वरचेवर वाचन व वाचक मंडळी कमी होताना दिसून येते. यामुळे मुलं निर्बुद्ध , अविचारी व अकार्यक्षम बनत चालला आहे. ज्यांच्या घरी मुलांना जेवढ्या जास्त luxurious (चैनीच्या) सुविधा मिळतात तेथे मुलं अभ्यासात आळशी व अकार्यक्षम बनताना दिसून येतात. याउलट जेथे सुविधांचा अभाव व गरिबी असते त्यांची मुलं अधिक होतकरू, हुशार निघतात. व ते जीवनात यशस्वी होतात. कारण त्यांना पर्याय नसतो. आपली जिद्द, मेहनत, धडपड व सराव या बळावर ते पुढे जात यश प्राप्त करतात. जर व्यक्ती परिस्थितीने कितीही गरीब असले तरी जर मनात प्रकट महत्वकांक्षा, जिद्द, मेहनत करण्याची वृत्ती असेल तर तो कितीही प्रतिकूल परिस्थितीत देखील आपला मार्ग शोधत असतो. म्हणूनच म्हणतात ना “गरज ही शोधाची जननी आहे” म्हणून. समाजात असे अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर दिसून येतात की, गरीब घरचे मुलं देखील आता चांगल्या मोठमोठ्या पदावर पोहोचत आहेत व जीवनात यश प्राप्त करत आहेत, याउलट श्रीमंतांची मुलं ज्यांच्या येथे सुविधांचा वर्षाव असतो व त्यांना कोणत्याही बाबतीत काहीच कमतरता नसते अशी मुलं रस्त्यावर फिरताना दिसतात. म्हणून मुलांना जमेल तेवढे कमीत कमी luxurious(चैनीच्या) सुविधा व फाजील लाड करावे. सध्याच्या काळात यशस्वी होण्यासाठी short cut मार्ग कुठेच नाहीये, म्हणून त्यांना मेहनत व परिस्थतीची जाणीव करुन द्यायला हवे. त्यांना नुसत्या यशस्वी झालेल्या व्यक्तीचे जीवनचरित्र वाचण्यास देण्याऐवजी जर अपयशातून व शून्यातून वर येऊन यशस्वी झालेल्या व्यक्तीचे जीवनचरित्र वाचण्यास दिल्यास व त्यांचा आदर्श घालून दिल्यास बराच फरक पडू शकतो व ते प्रेरणादायी ठरते.
८) मुलांच्या प्रगतीसाठी:
मुलांचे प्रगती व यश त्यांना मिळालेल्या योग्य वेळच्या योग्य मार्गदर्शनांवर अवलंबून असते. आपण पाहतो की ग्रामीण भागातील मुलं बऱ्याच वेळेस confused असतात की दहावी-बारावी नंतर काय करायच ? आपली क्षमता व कौशल्यानुसार क्षेत्र निवड न केल्यामुळे नंतर ते भविष्यात पश्चात्ताप करीत बसतात. तेव्हा सगळी वेळ निघून गेलेली असते. म्हणून पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांची क्षमता व आवड ओळखून त्यांना वेळीच प्रोत्साहित केले तर तशी परिस्थिती उद्भवणार नाही. प्रत्येक वर्षी शाळेत दहावी - बारावी नंतर करिअर संदर्भात मार्गदर्शन व Seminar चे आयोजन करावेत.
आपण सांगितल्याप्रमाणे जर पालक स्वतःच्या मुलांच्या शिक्षण व करिअर बाबतीत जागरूक असेल तर त्यांची मुले नक्कीच हुशार व होतकरू निघतात हे वास्तव आहे. पण ग्रामीण भागात बहुतांश पालक या बाबतीत शून्य असतात. त्यांच मत असं बनलेलं असतं की शिकून कोणाला नोकऱ्या लागणार आहेत, ही नकारात्मक भावना मनात पक्की भरलेली असते. पण शिक्षण हे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे साधन आहे याची त्याला काहीच जाणीव नसते. काही पालक तर आपल्या मुलांना सर्रासपणे शेतीच्या कामात राबवून घेतात. त्यामुळे मुलांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होऊन link तुटत असते. मुलगा अर्ध्यावर शिक्षण सोडून गेले तरी त्यांना काहीच काळजी नसते. म्हणून ही परिस्थिती बदलायची असेल तर गावातील शिक्षक, सुशिक्षित पालक व यशस्वी व्यक्ती यांनी मिळून सामूहिकतेने गावात शिक्षणविषयक जागृती निर्माण करायला हवी. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यात सामंजस (Mutual understanding) असायला हवे. शिक्षक आपले व्यक्तिमत्त्व, आचार-विचार हे आदर्श ठेवायला हवे. कारण बहुतांश वेळेस विद्यार्थी शिक्षकांचे गुण जसेच्या तसे अनुकरण व आचरणात आणीत असतात.
९) राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती:
आपण मांडलेले “राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती” याविषयी विचार खूप प्रेरणादायी आहेत. सध्याच्या या धावपळीच्या युगातील परिस्थिती पाहता या विषयी अधिक जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. ही राष्ट्रभक्ती टिकवून ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. तसेच व्यक्ती राष्ट्रभक्ती असल्याचा केवळ दिखावा न करता ते अंतकरणात व आचरणात आणली पाहिजे. देशातील प्रत्येक ठिकाणची सार्वजनिक सरकारी मालमत्ता ही माझी आहे ही भावना ठेवून त्यास कसल्याही प्रकारचे नुकसान पोहोचणार नाही याची सर्वांनी काळजी हवी. देशातील जनतेवर, जवानांवर(सैनिक), साधनसामुग्रीवरती, भूभागावरती सदैव प्रेम बाळगायला हवीत. राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज चे मान-सन्मान राखायला हवी. प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात न चुकता राष्ट्रगीत गायले जावेत. तरच खरी राष्ट्रभक्ती निर्माण होईल.
१०) शिक्षक आनंदी तर मुले आनंदी:
आपण सांगितल्याप्रमाणे शिक्षकांना जर त्यांच्या सोयीनुसार शाळा मिळाली तर त्यांचे अध्यापन देखील चांगले होऊ शकते हे बर्याच प्रमाणात खरे आहे. पण अल्ली ग्रामीण भागातल्या शाळेतील काही शिक्षकांकडे पाहता अशी परिस्थिती दिसून येते की, त्यांना शाळा अगदी घराजवळ असेल तर त्या संधीचा ते गैरवापर करतात. उदा. जसे की ते घराकडची कामे, शेती व इतर व्यवसाय बघत शाळा करतात. त्यामुळे वाचन व शाळेतील उपस्थिती कमी होऊन आपल्या शिकवणीतून म्हणावा तेवढा पूर्ण न्याय ते विद्यार्थ्यांना देऊ शकत नाहीत. तेच जर अशा शिक्षकांना घरापासून दूरवर असलेल्या गावी बदली झाल्यास त्यांना शाळा शिवाय दुसरीकडे लक्ष केंद्रित करणे शक्य होत नाही.
११) वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने:
याबाबतीत आपण सांगितलेले विचार मला खूप आवडले. खरंच, ज्ञान मिळवण्याचे “वाचन” हे एक उत्तम साधन आहे. ज्याचे वाचन, चिंतन अधिक त्यांचे विचार, आत्मविश्वास व निर्णयक्षमता अधिक प्रभावी. असे असले तरी, किती वाचले यापेक्षा काय व कसे (किती आत्मसात केले) हे महत्त्वाचे. सध्याची परिस्थिती पाहता असे दिसून येते की, व्यक्ती या सोशल मीडियाला addict होऊन जास्तीत जास्त वेळ त्यावर तो करत आहे. या वाढत्या प्रभावामुळे वाचन, वाचक मंडळी, दर्जात्मक लिखाण फार कमी होत चाललेला आहे. हे सोशल मीडियाचे फार मोठे दुष्परिणाम व शोकांतिका आहे.
अध्यापन प्रक्रिया जर पूर्णपणे ऑनलाईन झाल्यास शालेय व महाविद्यालयीन जीवनाला अतिशय खराब दिवस येतील असे मला वाटते. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी उलट आळशी, अकार्यक्षम बनतील.
सध्या शाळेतील ऑनलाइन संबंधित भेडसावणारी समस्या पाहता या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने प्रत्येक शाळेत प्रशिक्षित संगणक शिक्षक पूर्णवेळ तत्त्वावर नेमावा. असे केल्याने तो शाळेला पूर्णवेळ देऊन अधिक मन लावून काम करेल.
सध्याची देशाची परिस्थिती पाहता ‘लोकसंख्या’ ही जलद गतीने वाढत असताना दिसून येते. ही लोकसंख्या वाढ म्हणजे देशाच्या विकासातील फार मोठी समस्या व त्रासदायक आहे. देशाची मर्यादित भूभाग क्षेत्र, मर्यादित साधनसामग्री, मर्यादित विकासाची साधने लक्षात घेता लोकसंख्या वाढीला वेळीच नियंत्रणात आणणे ही काळाची गरज आहे. व ती सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
- एस. एम. रचावाड, मु. पो.पाळज
ता. भोकर जि. नांदेड
माझे फेसबुक मित्र नाशिकचे वैभव तुपे यांनी माझ्या ई बुक चे केलेले परीक्षण आपल्यासमोर ठेवत आहे.
पुस्तकाचे नाव : मी एक शिक्षक
लेखक : ना. सा. येवतीकर (प्राथमिक शिक्षक)
प्रकाशक : ई-साहित्य प्रतिष्ठान
शिक्षण क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या एकूणच बऱ्यावाईट घडामोडींमुळे चांगल्या शिक्षकांची जी काही घुसमट होतेय, ती घुसमट या पुस्तकातून लेखकाने नेमकेपणाने व्यक्त केली आहे. 'काय काम असते शिक्षकांना?' या प्रश्नाचे उत्तर म्हणजे हे पुस्तक आहे. महाराष्ट्राच्या तळागाळात अगदी प्रतिकूल परिस्थितीही ज्ञानदानाचे पवित्र काम प्रामाणिकपणे करणाऱ्या शिक्षक बांधवांमधील बहुसंख्य शिक्षक आज तणावाखाली काम करत आहेत. अगदी शिक्षक म्हटले की लोकांना हसू येते, विनोद सुचतात इतकी शिक्षकांची अवस्था वाईट झाली आहे.
खरं तर मुलांना शिकवणे, चांगले संस्कार देणे हे शिक्षकांचे मुख्य काम! पण त्यासाठी शिक्षकांना वेळच मिळतांना दिसत नसल्याची परिस्थिती यंत्रणेने निर्माण करून ठेवली आहे. विशेषतः जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांची अवस्था तर फारच वाईट झाली आहे. त्यात पुन्हा आणखी नव्याने वाहू लागलेल्या 'डिजिटल' वाऱ्याची भर आता पडली आहे. संगणकाच्या युगात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणे उपयुक्त असले तरी गुरुजींसाठी मात्र ही दुहेरी डोकेदुखी ठरू पाहतेय. खरं तर तंत्रज्ञानाचा वापर कमी वेळात जास्त काम व्हावे यासाठी अपेक्षित आहे, पण या डिजिटल आणि ऑनलाईनच्या नादात गुरुजींची कामे कमी होतांना दिसत नाहीत, उलट कामासाठी लागणार वेळ कमी होण्याऐवजी वाढलाय. कामाचा व्याप वाढलाय आणि त्यामुळे तणाव सुद्धा प्रचंड वाढलाय! अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर अमरावतीच्या विजय नकाशे सरांचे देता येईल. चिखलदऱ्यासारख्या अति-अतिदुर्गम भागात चांगले काम करणाऱ्या नकाशे सरांच्या शाळेला पंचायत राज समितीने भेट दिली, त्यावेळी हिशोबात तीस किलो तांदूळ कमी आढळला होता. ही गोष्ट तशी क्षुल्लक वाटत असली तरी नकाशेंना याच कारणावरून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आणि तो तणाव सहन न होऊन त्यांनी शाळेतच आत्महत्या केली. हे फक्त उदाहरण आहे. अशा अजूनही काही शिक्षक बांधवांनी यंत्रणेच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारलाय! कुठे हिशोबात तांदूळ कमी भरला म्हणून, कुठे शाळेचे बांधकाम नीट झाले नाही म्हणून तर कुठे बांधकामाचा हिशोब नीट जुळत नाही म्हणून! शिक्षक आत्महत्यांची अशी कितीतरी कारणे देता येतील, पण यातला एकही उदाहरणात शिक्षकांनी चांगले शिकवले नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली आणि म्हणून आत्महत्या झाली असे कुठेही दिसत नाही. सगळीच कारणे खरं तर 'नॉन-टिचिंग' या सदरात मोडणारी! अशा अशैक्षणिक कारणांमुळे शिक्षकांना आत्महत्या करावी लागत असेल तर तो यंत्रणेचा तो पराभव नाही का? निवडणूक आणि जनगणना याव्यतिरिक्त कुठलीही अशैक्षणिक कामे शिक्षकांना दिली जात नाहीत असा दावा प्रशासन करत असले तरी तो सपशेल चुकीचा आहे. खरं तर खिळ्यापासून विळ्यापर्यंत आणि अगदी झाडुपासून पोषण आहारातल्या लाडूपर्यंत सगळी कामे हाकत गुरुजी कधीच वैतागून गेलाय!
संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेवर काम करणारा प्रत्येक शिक्षक सध्या यातल्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तणावाखाली आहे. उघड कुणी बोलत नसल्यामुळे सगळे आलबेल असल्याची वरकरणी बतावणी सध्या बेमालूमपणे सुरु आहे. मात्र प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीतले एकूणच शैक्षणिक वातावरण सध्या प्रचंड प्रदूषित आहे एवढे नक्की! असे असले तरी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांमुळे शाळा मात्र आजही विनातक्रार व्यवस्थित सुरु आहेत. शिक्षकांचे एकूणच काम आणि त्यासाठी चाललेली शिक्षकांची प्रामाणिक धडपड यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न येवतीकर यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे. प्राथमिक शिक्षण क्षेत्रात सध्या काम करणाऱ्या आणि या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या प्रत्येकाने, विशेषतः तरुण वर्गाने किमान एकदा तरी जरूर वाचावे असे हे पुस्तक 'ई साहित्य'च्या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
- वैभव तुपे, नाशिक
नासा येवतीकर लिखित ई बुक
*शाळा आणि शिक्षक*
https://drive.google.com/file/d/1jTECtl3fiFmh-vO_ZJldspQj7kOHW0Vm/view?usp=drivesdk
वरील लिंकवर किंवा खालील pdf मध्ये अगदी मोफत वाचन करता येईल आणि download देखील करता येईल.
*पुस्तक परिचय*
*'' हिंदू सणांची परिपूर्ण माहिती देणारे पुस्तक "*
नासा येवतीकर सर यांचे आठवे पुस्तक 'हिंदू सण' वर आधारित ई प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित आज होत आहे. यापूर्वी त्यांचे प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक मी एक शिक्षक, जागृती, शाळा आणि शिक्षक, संवेदना, रोज सोनियांचा दिनू हे वैचारिक, सारिपाट कवितासंग्रह आणि हरवलेले डोळे कथासंग्रह ई बुकच्या स्वरूपात प्रसिद्ध झाले आहेत. आज वटपौर्णिमा या सणानिमित्ताने नासा येवतीकर यांचे आठवे ई बुक हिंदू सण प्रकाशित होत आहे.
एकच ध्यास , हिंदू सणाचा प्रचार, प्रसार 'हिंदु सण' हे छान व आकर्षक पुस्तक आहे. यात हिंदू धर्मातील सणाची निवड करण्यात आली. मुखपृष्ठ देखील छान असून यात दिवाळीला आपण आपल्या घरी रांगोळी टाकतो ती आहे यात पेटते दिवे आहे; या रांगोळीची रंगसंगती छान आहे. या पुस्तकात एकूण एकोणवीस लेख वाचन करयला मिळेल. प्रत्येक सणाची माहिती व तो सण कसा साजरा करावा, आपण सर्वजण पारंपरिक पध्दती ने सण साजरे करतो. सद्याची नवीन पिढी हिंदू सण विसरत चालले आहे, पण हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे. यात लिहिलेली माहीती कंटाळवाणी वाटणार नाही याची दक्षता लेखक नासा येवतीकर यांनी घेतली आहे. मला आवडलेल्या काही उल्लेखनीय लेखाची माहिती देण्याचा प्रयत्न करतो,
वटपौर्णिमा या सणाविषयी यात अश्वपती नावाचा राजा होता आणि त्याची मुलगी सावित्री याने अंध राजाचा मुलगा सत्यवान राजकुमार सोबत लग्न करण्याचे ठरवले. त्याचे राज्य नव्हते ते जंगलात राहत होते आणि सत्यवान हा एक वर्ष जगेल अशी शाश्वती होती तर हे सावित्रीने खर ठरू दिले नाही, पवनपुत्र हनुमान याच्या विविध हालचालीची माहिती दिले आहे, आणखी एक लेख जो गुरूची महती सांगणारा लेख पण समाविष्ट आहे. चित्रकार श्री विनायक काकूळते यांनी आपल्या हातानी फलक लेखन केलेली जिवंतपणा असलेली चित्र यात घेण्यात आली आहे. नासा सरांनी ही संपूर्ण माहिती आपल्या अनुभवातून व काही इंटरनेटचा वापर करून केली असे मनोगतामध्ये व्यक्त केलेले आढळून आले. प्रत्येक वाचकाने आवर्जून वाचण्यासारखे आहे. या लेख संग्रहातील अनेक लेख नवीन आहे. विद्यार्थी, पालक, वाचक यांना संदर्भ म्हणून हे ई बुक नक्की उपयोगी पडेल.
हे पुस्तक शाळेत, घरी, मित्रांना शाळेतील मुलांसाठी व एखाद्याला काही कार्यक्रमानिमित्ताने भेट देण्यासारखे हे आहे. सदर पुस्तक pdf स्वरूपात मोफत पाठविल्या जाईल. अधिक माहिती आणि पुस्तक मागविण्यासाठी नासा येवतीकर यांच्या 9423625769 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावे. "हिंदू सण" हे पुस्तक आपल्या वाचतांना आपणांस आनंद मिळेल अशी मला खात्री आहे. नासा येवतीकर सरांच्या आगामी लेखनास अनंत शुभेच्छा !!!
पुस्तकाचे नाव - हिंदू सण
लेखक- नासा येवतीकर (विषय शिक्षक)
प्रकाशन- ई साहित्य प्रतिष्ठान
चित्रकार - विनायक काकुळते सिन्नर
शब्दांकन
श्री.सुंदरसिंग साबळे ( स. शि.)
जि.प. व. प्रा.शाळा सिलेगाव
ता. गोरेगाव, जि. गोंदिया
मो.क्र. :- 9545254856
पुस्तक परिचय
विविध विषयांना स्पर्श करणारा काव्यसंग्रह - सारीपाट
शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे कवी नासा येवतीकर यांनी "सारीपाट" या शीर्षकाखाली वेगवेगळ्या विषयांवर आपल्या भावना काव्य रुपाने व्यक्त केले आहेत. ठाणे येथील ई-साहित्य प्रतिष्ठान या प्रकाशनाने हा ई काव्यसंग्रह 01 मे म्हणजे महाराष्ट्र दिनी प्रसिद्ध केला आहे. मुखपृष्ठावर आपल्या देशातील प्राचीन खेळ सारीपाट यांचे चित्र रेखाटले आहे.
नासा येवतीकर यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह असुन यापूर्वी वैचारिक मी एक शिक्षक, जागृती, शाळा आणि शिक्षक, संवेदना, कथासंग्रह हरवलेले डोळे असे एकूण पाच ई बुक प्रकाशित केले आहेत. शालेय जीवन जगत असताना त्यांना लिखाणात रुची निर्माण होऊन साहित्याची गोडी लागली. त्यांचा हा कविता लिखाण करण्याचा छंद पुढे कवितासंग्रहाच्या माध्यमातून प्रकाशित केले आहेत. सारीपाट या कवितासंग्रहात एकुण ९० कविता असून ग्रामीण जीवन, शाळा, तंत्रज्ञान, व्यसनमुक्ती, सण-उत्सव, पर्यावरण संवर्धन, नीतीमूल्य, मतदान, संस्कृती व संस्कार या विषयावर आधारित आहेत.
यावरुन कवी मनाचे सखोल निरीक्षण व अभ्यासाचे दर्शन आपल्याला होते. कवितेची भाषा शैली सहज सोपी व सुलभ अशी असून वाचकांना सहज अर्थबोध होणारी असल्यामुळे सारीपाट वाचताना आनंद मिळतोच पण काही कवितेतील प्रत्येक वाक्यात आपणच असल्याचा भास निर्माण करुन देते.
ई - साहित्य प्रतिष्ठानचे सुनील सामंत व अरुण देशपांडे यांनी कवीबद्दल प्रस्तावनेतून यथार्थ वर्णन केले आहे. प्रसिद्ध बालसाहित्यिक व कवी अरुण वि. देशपांडे यांची प्रस्तावना लाभली आहे.
शेतात राबणारा शेतकरी राजा व त्यास साथ देणारा बळीराजा (बैल) भर पावसात व उन्हात राबत असतो. शेतकऱ्याला मदत करतो. काबाडकष्ठाने शेती फुलवितो व आपण आनंदाने खात असतो. पोळा या कवितेत ते म्हणतात
वर्षभरात राबून राबून
बळीराजाला देतो साथ
शेतात काम करून
देतो मदतीचा हात....
कुटुंबातील संवाद संपुष्टात येत आहेत. संवादातून भावना जडल्या जातात व मैत्रीने, सलोख्याने, प्रेमाने जिव्हाळा तयार होतोय. कुटुंबाच्या मदतीने पाल्यावर चांगले संस्कार केले जातात. यातून कुटुंब संवर्धन करण्यासाठी त्यांनी संदेश दिला आहे.
हल्ली होतच नाही
प्रेमाचा संवाद कुटुंबात
सगळेच व्यस्त आहेत
आपाआपल्या कामात....
आराधना करणारे आपले हात, याच हाताने देवाप्रमाणे आपल्या आईवडिलांची निस्वार्थ सेवा करा. देव देवालयात नसून आपल्या कर्म कार्यात आहे. पंढरपूर काशी हे आपल्या घरातील वयोवृद्ध आई-वडीलच आहेत. यांचीच सेवा मनोभावे करावे हे आपल्या काव्यातून सांगतात
आई-बाबाची मनोभावे सेवा
हाच आपला खरा धर्म आहे
निस्वार्थ भावनेने केलेले काम
हेच आपले खरेखुरे कर्म आहे....
या हिरवळीवर आनंदाने पक्षी गाणी गातात. निळे आकाश, शीतल गारवा, फुलांचा दरवळणारा सुगंध, हिरवे हिरवे वृक्ष अशा प्रकारे निसर्गाचं वर्णन केले आहे.
वर निळे आकाश
खाली निळे पाणी
काठावरती झाडे
पक्षी गातात गाणी....
लालपरी कवितेत ते म्हणतात,
गावोगावी जाऊन भेटणारी
सर्वांची आवडती लाडकी
बघता बघता पहा लालपरी
झाली एकाहत्तर वर्षांची....
अनेकांना सवलती देणारी ही लालपरी ( बस) आपणास प्रत्येक ऋतुंमध्ये सुखरूप नेऊन पोहचविते. याच्या ७१ व्या वाढदिवस साजरा होत असतांना, ते काव्यातून शुभेच्छा देतात. वाड्यावस्तीतून, खेड्यापाड्यातून, दरीखोऱ्यातून सुखरूप प्रवासी नेणारी, वेळेवर शाळेत विद्यार्थ्यांना पोहचविणारी या लालपरीला चांगले दिवस यावेत अशी प्रार्थना व्यक्त केली आहे.
दि.४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिनानिमित्त या दिनाचे महत्त्व आपल्या कवीतेतून सांगतात.
तंबाखू खाल्याने वाटते
थोडी वेळेची मजा
सुखी संसाराला मग
आजीवन मिळते सजा....
सुखी संसाराची राखरांगोळी या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होत आहे. परिसरात थुंकणे, सिगारेट ओढत बसणे हे चुकीचे आहे. यामुळे इतरांना आजार जडला आहे. तंबाखू चोळू नका जीवनाला चुना लाऊ नका. हा जन्म पुन्हा येणार नाही. असे ते आपल्या काव्यातून सांगतात.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी
ज्यांनी दिली प्राणाची आहुती
भगतसिंग सुखदेव राजगुरू
यांच्या विचाराने झाली क्रांती....
आपल्या मातृभूमीच्या रक्षणार्थ ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले. त्यांना विसरून चालणार नाही. थोर क्रांतिकारक यांना वंदन करून यांची यशोगाथा पुढील पिढीला स्मरणात ठेवण्यासाठी यांचे स्वातंत्र्य दिनी वंदन करावे. कवी या कवितेत शुरविरांचे स्वातंत्र्याविषयी असलेले धडपड, त्याग याचे वर्णन केले आहे.
तोच खरा शिक्षक या कवितेत
मुलांच्या हृदयात जाऊन
त्यांच्या संवेदना जाणून
घेऊन जो शिकतो
तोच खरा शिक्षक....
मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जो प्रयत्नशील असतो. संवेदना जाणुन घेतो, योग्य दिशा प्राप्त करून देतो. मुलांच्या भावनांचा सखोल विचार करून ज्ञानार्जनाचे पवित्र कार्य करणाराच खरा शिक्षक होय. त्यांच्या या ज्ञानरुपी कार्याला ते काव्यातून वंदन करतात.
पुस्तक हे ज्ञानाचे भांडार आहे. पुस्तकाशी मैत्री करावे, प्रेम करावे, यातील ज्ञानातूनच आपले स्वप्न साकार होतात. आपल्या ज्ञानाची कक्षा रुंदावते. पुस्तकासाठी घरात एक ग्रंथालय असावा. ही कल्पना कवी या कवितेतून मांडले आहे.
पुस्तक म्हणजे ज्ञानाचा झरा
पुस्तक म्हणजे मित्र खरा....
वरुण राजाला उद्देशून शेतकऱ्यांची व्यथा या कवितेत कवीने मांडली आहे.
विश्वास तुझ्यावर ठेवून
केलो फार मोठी चूक
पश्र्चाताप करतो आता
मिळत नाही बघ सुख....
पाऊसाच्या विश्वासावरच शेतकरी काबाडकष्ट करीत असतो. दुष्काळ पडला तेव्हा आपला शेतकरी जगूच शकत नाही. कर्जबाजारी होऊन आत्महत्या करुन घेतो.
पुस्तकाचे नाव सारीपाट हे त्यांच्या या काव्यातून व्यक्त होते.
जीवन हे सारीपाट आहे
त्यात सुख आणि दुःख आहे
जीवनात सर्वस्व हवे हवे
दुखःचा ससेमिरा नको आहे...
जीवन म्हणजे दुःखाचे डोंगर आहे. यातून सुखाचा क्षणांचा शोध घेता आलं पाहिजे. दु:खाशिवाय सुखाचे महत्व कळणार नाही. जीवन म्हणजे एक सारीपाट आहे. ज्यात अनेक प्रसंग अनुभवास येतात. त्या सर्व भावना त्यांनी कवितेच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.
अशा प्रकारे कवी नासा येवतीकर यांच्या कविता आपल्या मनाला कधी अस्वस्थ करतात तर कधी आनंद देतात तर कधी आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतात. यातील प्रत्येक कविता ही हृदयस्पर्शी असून कवीमनाचा हळवेपणा, संवेदनशीलपणा या काव्यसंग्रहातून प्रतिबिंबित होतो. त्या दृष्टीने या कविता खूपच वाचनीय आहेत. नासा येवतीकर यांच्या या पहिल्याच काव्यसंग्रहास खूप खूप शुभेच्छा !
पुस्तकाचे नाव :- सारीपाट काव्यसंग्रह
कवीचे नाव :- नासा येवतीकर, 9423625769
प्रकाशन :- ई साहित्य प्रतिष्ठान, ठाणे
महादेव शरणप्पा खळुरे
८७९६६६५५५५
No comments:
Post a Comment