मुलांना हसवणारा कवितासंग्रह ' हसरे तारे '
उपक्रमशील शिक्षिका व कवयित्री शुभांगी पवार यांची हसरे तारे हा कवितासंग्रह म्हणजे लहान मुलांसाठी एक छानशी मेजवानी आहे. कवयित्री शुभांगी पवार ह्या कंदी पेढा या टोपणनावाने ओळखल्या जातात. सातारा जिल्ह्यातील खंडोबाची बेघरवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ते शिक्षण सेवक म्हणून काम केले आहे. रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून त्यांचे भाषण प्रसारित झाले असून पुणेरी आवाज रेडिओ 107.8 FM केंद्रावरून कविता व चारोळ्या प्रसारित झाल्या आहेत. त्यांना ट्रॅकिंग करण्याचा देखील छंद असून मिशन कळसुबाई 2019 या ट्रॅकिंग मध्ये सहभाग घेऊन ते यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल औरंगाबादच्या ड्रीम अडव्हेंचर्स संस्थेने त्यांचा सन्मान ही केला आहे. बहर, शिवारातील कविता अश्या अनेक प्रातिनिधिक कविता संग्रहात त्यांच्या कविता प्रकाशित झाले असून दिवाळी अंक, मासिके, साप्ताहिके आणि दैनिकांत नियमित कविता प्रसिद्ध होत असतात.
हसरे तारे हा त्यांचा द्वितीय काव्यसंग्रह असून या कवितासंग्रहात एकूण 28 बालकवितांचा समावेश करण्यात आला असून सर्वच कविता बालकांच्या विश्वाशी निगडित असल्याने मुलांना वाचन करताना आनंद मिळणारे आहेत. या काव्यसंग्रहाला मुंबईच्या संजीवनी राजगुरू यांची प्रस्तावना लाभली आहे. कवयित्री स्वतः प्राथमिक शाळेत शिक्षिका असल्याने चिमुकल्या मुलांशी दररोज संबंध येतो, त्याच अनुभवाच्या बळावर त्यांनी सुंदर काव्यरचना केल्या आहेत. सोशल मीडियातील व्हाट्सअप्पमुळे अनेक नवोदित मंडळी कविता करत आहेत ही खरोखरच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. स्वतः कवयित्री ह्या श्री देवराव चव्हाण व सौ. रंजना लसणे यांच्या बालजगत व्हाट्सअप्प समूहात सक्रिय सहभागी होऊन ज्या बालकविता लिहिल्या त्याचेच एक कवितासंग्रह हसरे तारे प्रकाशित केले आहे. हे वाचून पहिल्यांदा आनंद झाला. सोशल मीडियाचा चांगला वापर केल्याबद्दल समूह संयोजक आणि कवयित्री यांचे अभिनंदन करावेसे वाटते.
कविता करणे तसे सोपे वाटते पण प्रत्यक्षात कविता करताना शब्दच सुचत नसेल तर मनासारखी कविता तयार होत नाही. त्यातल्या त्यात बालकविता करणे त्याहून ही कठीण गोष्ट आहे. मात्र शुभांगी पवार यांच्या कविता वाचतांना सोपी वाटायला लागते. प्रत्येक घरात एक खोडकर बाळ असतोच त्याचे वर्णन खोडकर खंडू या कवितेत वाचण्यास मिळते. शाळेला सुट्टी असल्यावर मुले कोणकोणती मज्जा करतात हे सुट्टीतील मौज या कवितेतून समर्पक शब्द वापरून व्यक्त केले आहे.
सुट्टीतील मौज करायला
तयार झाले छोटे
भातुकलीचा डाव मांडला
केले जेवण खोटे
या ओळी वाचून बालपण आठवल्याशिवाय राहत नाही. निसर्गात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर कवयित्रीने आपल्या मनातील बालभावना कवितेच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. प्रत्येकाने आईला घरकामात मदत करावे असा चांगला संदेश कामातला आनंद या कवितेतून दिला आहे. लहान मुलांना बाहुलीसंगे खेळायला खूप आवडते. बाहुली या कवितेतून सारे चित्र त्यांनी स्पष्ट केले आहे. बैलाचा सण पोळा विषयीची कविता खूप सुंदर वाटली.
सुंदर - चंदर भारी दोघे
पाहायला त्यांना गाव उभे
हिवाळा आला की कानटोपीची आठवण येते आणि आजी आपल्या नातवासाठी कानटोप तयार करते. याचा छानसा अनुभव कानटोपी कवितेतून मिळतो. पुस्तकाचे शीर्षक असलेली हसरे तारे या कवितेत कवयित्रीने मुलांची तुलना आकाशात चमकणाऱ्या ताऱ्याशी आणि देवासाठी राखून ठेवलेल्या सुंदर फुलांशी केले आहे. दीपावली निमित्ताने घराघरात अनेक पदार्थ तयार केले जातात. त्यात आवडीचा पदार्थ म्हणजे चकली, याविषयी कवयित्रीने खूप छान रचना केली आहे. ती वाचतांना तोंडात पाणी आल्याशिवाय राहत नाही. साऊ माझ्या कवितेत सावित्रीबाई फुले यांची आठवण काढतात. पाऊस आला ही कविता लयबद्ध आहे, त्यास तालीत वाचन केल्यास खूप मजा येईल. अननस दिसायला कसा असतो ? याची माहिती अननस रस या काव्यातून मिळते. लहान मुलांचा आवडता देव म्हणजे गणपती बाप्पा. बालगणेश या कवितेत बाप्पा गणेशला लवकर येण्याची विनंती करत आहे. लहान मुलांना दुकानातील कुरकुरे खूप आवडतात. नको मला कुरकुरे या कवितेत मुलांनी कुरकुरे व वेफर्स खाऊ नये असा छान संदेश दिलेला आहे. माझी आनंददायी शाळा ही कविता म्हणजे कवयित्रीची शाळाच जणू या कवितेतून स्पष्ट होते.
धीटूकला ससा, जादुई पेन, गमतीदार गणित असे सुंदर काव्य यात समाविष्ट आहेत. एकूणच सर्वच कविता लयबद्ध आणि वाचनीय आहेत. वाशीमच्या अजिंक्य प्रकाशनने ही पुस्तिका प्रकाशित केली असून यात एकूण 60 पृष्ठ आहेत आणि याची किमंत फक्त 75 ₹ आहे. अरविंद मनवर यांनी सुंदर मुखपृष्ठ तयार केले असून अक्षर जुळवणी देखील उत्तम आहे. काही काही ठिकाणी अनुस्वार द्यायचे राहून गेले आहेत त्यामुळे शब्दांचे वाचन वेगळे होते. पुढील प्रकाशनात ह्या चूका टाळण्याकडे लक्ष द्यावे. शुंभागी विलास पवार उर्फ कंदी पेढा यांना त्यांच्या पुढील साहित्य लेखनास मनस्वी शुभेच्छा ...!
पुस्तक परिचय
नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769
No comments:
Post a Comment