Friday, 22 March 2024

पुस्तक परीक्षण ओंजळ ( Reveiw of Book Onjal )


मानवी मनाचा ठाव घेणारा ओंजळ काव्यसंग्रह

कवयित्री श्रीमती आरती डिंगोरे यांचा पुण्याच्या वैशाली प्रकाशन द्वारे प्रकाशित पहिलावहिला ओंजळ नावाचे काव्यपुष्प नुकतेच वाचण्यात आले. संग्रहाचे मुखपृष्ठ पाहताक्षणी पुस्तक वाचण्यास प्रेरित करते. कवयित्री आपल्या मनोगतात म्हणते, 'ओंजळी'त आपली सुखदुःख सामावतात. मनाच्या तळाशी दडलेले भावभावनांचे कल्लोळ 'ओंजळी'त सहज पेलता येतात. अहो! अवघे ब्रम्हांड ह्या 'ओंजळी'त सामावलेले असते; म्हणूनच तर आपण सकाळी उठल्यावर हातांचे दर्शन घेतो. दातृत्वाचे रूप म्हणजे 'ओंजळ'. आरतीनंतर परमेश्वराचा आशीर्वाद 'ओंजळी'तूनच घेता येतो. सकाळची सुरुवात दिनकराला 'ओंजळी'ने अर्घ्य देऊनच होते. माणसाच्या अनेक कृतींशी, भावनांशी 'ओंजळी'चं घट्ट नातं असतं. 'ओंजळ' म्हणजे समर्पणाच्या भावनांचं द्योतक. स्वीकारायला 'ओंजळ' लागते तसेच द्यायलाही 'ओंजळ'च लागते. अशी ही 'ओंजळ' कधीच रिती राहू नये, मुक्तहस्ते देण्याकरिता पुन्हा पुन्हा भरत रहावी अशी सदिच्छा व्यक्त करतात. त्यांच्या या भावनेतूनच वाचक एक एक कविता वाचण्यास सुरुवात करतो आणि मंत्रमुग्ध होऊन रचना वाचत राहतो. माझ्या वाचण्यात आलेला हा पहिला काव्यसंग्रह आहे,  ज्याची प्रस्तावना स्वतःच्या आईने लिहिले आहे. आपल्या लेकीला आशीर्वाद देताना सौ. भारती वाटारे यांनी कवयित्रीचे मन सांगून जातात. परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या विचारांच्या सानिध्यात वाढलेली कवयित्री खूप हळव्या मनाची आणि संघर्षाला न घाबरता समानता करणारी सबला महिला आहे. आपल्या कवितेतून त्या माणसाला माणसाची ओळख करून देण्याचा प्रयत्न करते. प्रसिद्ध साहित्यिका रेखाताई भंडारे यांनी या काव्यपुष्पाला ब्लर्ब देऊन कावयित्रीला नवी उभारी देण्याचे काम केले आहे. 
कावयित्रीला मूळात लहानपणापासून कवितेची आवड होती. अनेक सण, समारंभ किंवा उत्सवात त्यांचा आणि कवितेचा पावलोपावली संबंध आलेला आहे. त्यातूनच त्यांच्या कविता जन्माला आल्या आहेत असे वाटते. म्हणूनच ते कविता या रचनेत म्हणतात, 

जीवनातील प्रीत म्हणजे कविता
जगण्यातील गीत म्हणजे कविता

या काव्यपुष्पामध्ये पाऊस या विषयावर अनेक कविता वाचण्यास मिळतील. श्रावणातला पाऊस असो वा महापूर असलेला पाऊस त्यांना आलेल्या अनुभवावर आधारित रचना मन वेधून घेतात जसे श्रावणसरी मध्ये त्या म्हणतात

येता श्रावणाच्या सरी
सुवासिनी सजतात
राऊळांत जाऊनिया
महादेवा पूजतात

आणि तोच पाऊस जेव्हा महापूर होऊन येतो त्यावेळी काय होते ? गंगामाई या कवितेत महापूरामुळे लोकांची काय अवस्था झाली ? याचे वर्णन अस्वस्थ करणारे आहे. 

होत्याचं नव्हतं केलं
संसार सारा वाहून नेला
शब्दही झाले निःशब्द
डोळ्यात आसवे देऊन गेला. 

दिवस आणि रात्र हे निसर्गचक्र आहे. प्रत्येकांच्या जीवनात रोजची सकाळ एक नवचैतन्य आणत असतो. कालची घटना विसरून मनुष्य नव्या उमेदीने व नव्या ऊर्जेने कामाला लागतो. सकाळ या कवितेत कवयित्री अप्रतिम वर्णन करताना म्हणते,

लाभलेसे नवचैतन्य सृष्टीला
अवघी मरगळ लयास गेली
दशदिशांतूनी तरंग आनंदाचे
दृष्टी सर्जनाची ती लाभली ....

आज माणसांची लोंढे शहरात वाहत असले तरी प्रत्येकाला आपल्या बालपणीचे गाव आठवत राहते. गावाजवळ असलेले डोंगर, नदी, शेती या सर्व गोष्टी आठवणीत येत असतात. कवयित्री गाव माझे या कवितेतून ग्रामीण भागातील गावाचे यथार्थ असे वर्णन केले आहे, जी रचना वाचतांना प्रत्येकांना आपल्या गावाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. गावातील घराचे वर्णन करताना कवयित्री म्हणतात,

चार घराच्या दाटीत
घर माझे ते कौलारू
दारी तुळस हासरी
उभे स्वागतास तरु

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे आईच्या बाबतीत म्हटल्या जाते. फुलात फुल जाईचे अन् जगात प्रेम आईचे असे ही बोलल्या जाते. आई वर अनेक मंडळींनी कविता लिहून आईचे प्रेम व्यक्त केले आहे. आईचे आपल्या लेकरांवर खूप प्रेम असते याचे सुंदर वर्णन करताना कवयित्री आई कवितेत म्हणते,

आई नेहमीच वेडी असते,
हृदयी तिच्या ममतेची बेडी असते ...

प्रेम याविषयी कविता न करणारा व्यक्ती शोधून ही सापडत नाही. प्रेम या अडीच अक्षरांच्या शब्दामध्ये प्रचंड शक्ती आहे. प्रेम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक प्रियकर आणि प्रेयसी एवढंच चित्र उभे राहते. याशिवाय अन्य ठिकाणी देखील आपणांस प्रेम दिसून येते पण त्यासाठी कवितेची दृष्टी लाभली तर कशी रचना तयार होते हे प्रेम कविता वाचतांना लक्षात येईल. खरंच आहे की, प्रेमात पडल्यावर कविता सुचते त्या प्रेमाचे वेगवेगळे प्रसंग सांगताना सृष्टीतल्या प्रत्येक बाबीवर प्रेम करण्यास सांगताना त्या म्हणतात,

प्रेम विशाल आकाशावर, क्षमाशील या धरेवर
हिरव्यागार कुरणावर, विशुद्ध वाहणाऱ्या निर्झरावर .....

साहित्यिकांनी आपल्या लेखणीने असे साहित्य निर्माण करावे ज्यामुळे समाज सुधारणा होण्यास मदत मिळावी. कोणालाही न घाबरता सत्य परिस्थिती मांडण्याची ताकद फक्त लेखणीत आहे. म्हणूनच परखड या कवितेतून सर्व साहित्यिकांना कवयित्री आवाहन करतांना म्हणतात, 

करुनिया तलवार लेखणीस धार द्यावी
भय मनी न ठेवता परखड वापरावी

बेकार या कवितेतून अनेक बेकार बेरोजगार युवकांना प्रेरणा दिली आहे. देवबाप्पा आणि चांदोमामा ह्या बालकविता देखील वाचनीय आहेत. कळी उमलताना ही कविता वाचतांना कवयित्रीचे मन वाचायला मिळते. स्त्री आणि मासिक पाळी हा विषय एवढ्या सुरेख पद्धतीने मांडला आहे की, या काव्यपुष्पातील ही सर्वात सुंदर रचना आहे. कवितेतील शेवटच्या चार ओळीवरून कवितेचा गर्भित अर्थ स्पष्ट होते.

अचानक तिने मला भेटायचे नाकारले
जाताना मात्र सृजनतेचे गुपित सांगितले ....

या काव्यपुष्पामध्ये विविध विषयांवरील पंचाक्षरी, अष्टाक्षरी, अभंग, ओव्या, भारुड, हायकू असे विविध प्रकारचे काव्य लेखन केलेलं आहे. कवयित्री नाशिक जिल्ह्यातील असल्याने आपल्या नाशिक जिल्ह्याची महती सांगायला देखील त्या विसरल्या नाहीत. 
एकूणच ओंजळ काव्यपुष्पातील सर्वच रचना खूपच सुंदर, लयबद्ध आणि अनुभवातील प्रसंग मांडणाऱ्या आहेत. पुस्तकाचे शीर्षक असलेली कविता ओंजळ मध्ये कवयित्रीने जी इच्छा व्यक्त केली,

कधी न व्हावी रिती ओंजळ
द्यावा एकचि आशिष मज
तव चरणांवर नित समर्पित
जाणून घेण्यास्तव रे तुज ....

म्हणूनच म्हणावे वाटते कवयित्रीची ओंजळ सदा भरून राहावी आणि इतरांना त्या ओंजळीतून उत्तम रचना वाचण्यास मिळावे हीच सदिच्छा आणि पुढील काव्य लेखनास हार्दीक शुभेच्छा ....!

काव्यसंग्रह - ओंजळ
कवयित्री - आरती डिंगोरे, नाशिक
भ्रमणध्वनी - 9404687729
प्रकाशक - वैशाली प्रकाशन, पुणे
मूल्य - 150 ₹  पृष्ठ - 120

पुस्तक परिचय - नासा येवतीकर, स्तंभलेखक
धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...