मनातील भावनांचा ' गाठीभेटी ' सांगणारा काव्यसंग्रह
शाबासकीची एक थाप अनेक काम यशस्वीपणे करून दाखवते. म्हणूनच शाळेतील शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या केलेल्या कामाचे कौतुक करून त्यांना शाबासकीची थाप देतात. त्या प्रेरणेतून विद्यार्थी घडत असतात. साहित्याच्या क्षेत्रात देखील कोणी जाणकार साहित्यिक गुरू नवोदित कवीला शाबासकीची थाप दिल्यावर चांगला कवी घडतो याचे प्रत्यय कवी प्रल्हाद घोरबांड यांचा गाठीभेटी कवितासंग्रह वाचतांना जाणवते. त्यांचा हा पहिला वहिला कवितासंग्रह असून नांदेड येथील प्रसिद्ध कवी जगदीश कदम यांनी प्रस्तावना देऊन त्यांना एक प्रकारे प्रेरणा दिली आहे तर प्रसिद्ध साहित्यिक देविदास फुलारी यांनी त्यांच्या काव्यसंग्रहाची पाठराखण केली आहे. कवी प्रल्हाद घोरबांड हे गणिताचे शिक्षक असून देखील त्यांची मराठी भाषेतील शब्दसंपत्ती वाखाणण्याजोगी आहे. त्यांचे आजोबा वारकरी संप्रदायाचे असल्याने त्यांच्यावर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या विचारांचा पगडा दिसून येतो. या काव्यसंग्रहात अनेक काव्यातून पांडुरंग भेटीला येतो. म्हणून तर एकच वाट या कवितेतून कवी म्हणतो,
"तुकोबांची गाथा
वाचा ज्ञानेश्वरी
अविट हा धर्म
जिवना उद्धारी"
आपल्या जीवनाचा खरोखरच उद्धार करायचं असेल तर संत तुकाराम महाराज यांची गाथा आणि संत ज्ञानेश्वर यांची ज्ञानेश्वरी यांचे नित्यनेमाने पारायण करणे आवश्यक आहे. कवी स्वतः पांडुरंगाचे परम भक्त असल्यामुळे त्यांना जीवनात जे आनंद मिळाले ते वाचकांना सांगतात. आपल्या पांडुरंग या कवितेत कवी म्हणतो,
"भक्ती भावाने भजता
नाही आनंदाला तोटा
दूर करतो व्यथा, पांडुरंग....."
सध्या समाजात जे काही घडत आहे ते खूपच अन्यायकारक आणि क्लेशदायक आहे. हे कवी स्वतः आपल्या डोळ्याने पाहतो आहे, त्याचे दुःख आणि मनातील शल्य आपल्या काव्यातून व्यक्त केले आहे. आई आपल्या बाळाला नऊ महिने नऊ दिवस स्वतःच्या पोटात वाढविते, तिला जन्म देते, लहानाचे मोठे करते पण तेच मूल मोठे झाल्यावर स्वतःच्या आईला विसरून कित्येक महिने भेट घेत नाही. गहिवर या कवितेतून कवी आपले दुःख व्यक्त करतांना म्हणतो की,
"मायेचा गहिवर
कंठ आला दाटून
लेक नाही आला
महिने झाले भेटून"
आई ही कधीच कुमाता होऊ शकत नाही. मूल जरी आई बाबांना विसरले असेल तरी ते त्यांना विसरू शकत नाही आणि रागात येऊन शाप देखील देऊ शकत नाहीत, ते देताता तर फक्त आशीर्वाद. म्हणूनच कवी आपल्या ममता या कवितेतून लेकरांना आशीर्वाद देताना म्हणतो की,
"प्रेमाच्या परतफेडीची
केली नाही आशा
सुखाने राहा बाळा
जरी आमची दशा"
आई-बाबा आणि मूल या फारच नाजूक विषयाला कवींनी आपल्या काव्याच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. कवींचा आवडता विषय म्हणजे कविता. मनातील भाव शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होणारे एक माध्यम म्हणजे कविता. याविषयी कविता या काव्यातून कवी म्हणतो,
"कविता ह्या कविताच असतात
शब्दांच्या त्या सविताच असतात
शब्दात भाव, दगडात देव
शोधणाऱ्यालाच दिसत असतात"
कवितासंग्रहाचे शीर्षक असलेली कविता गाठीभेटीमध्ये कवीचे मन कसे असते ? हे सांगितले आहे. नुकतीच तयार केलेली कविता कोणाला तरी ऐकवावी असे प्रत्येक कवीला वाटत असते. याच भावनेतून कवी सुंदर रचना तयार करत असतात. कवी म्हणतो,
"कवी धावतो श्रोत्यांच्या मागे
एखादीच कविता ऐकविण्यासाठी
जसे नामदेव धावले घेऊन
हातात तुपाची वाटी"
शेती, शेतकरी, पाऊस, हिवाळा, उन्हाळा, निसर्ग याविषयी देखील उत्तमोत्तम काव्य या संग्रहात वाचण्यास मिळतात. कवी गोपालक आहे म्हणून गाय विषयी कविता काव्यसंग्रहात असणे अपेक्षित आहेच. काव्यसंग्रहातील पहिलीच कविता प्रसन्न मध्ये ते म्हणतात की,
"घरात घरात देशी गाय
सात्विक मिळेल अन्न
गायी वाचली तर पर्यावरण वाचेल
सगळे राहू प्रसन्न"
याविषयावर अन्य काव्य देखील वाचनीय आहेत. कवी स्वतः गुरुजी असल्याने त्यांनी गुरुजी या कवितेतून गुरुची महती विशद करतांना म्हणतात की,
जीवनाला दिशा देऊन
तेच दाखवतात वाट
गुरुजींच्या मार्गदर्शनाविना
चढता येत नाही ज्ञानाचा घाट
देशातील गलिच्छ राजकारण, भ्रष्टाचार आणि वाढत चाललेले अत्याचार यावर देखील आपल्या काव्यातून प्रहार केले आहेत. महात्मा गांधीजीनी दांडी यात्रा करून मीठ मिळवून दिले पण सध्याच्या काळासाठी दंड देणारी यात्रा भरविणे आवश्यक आहे असे ते आपल्या काव्यातून व्यक्त करतात.
एकूणच या काव्यसंग्रहात एकापेक्षा एक सरस आणि उद्धबोधन करणारे विविध विषयांवरील एकूण एक्याऐंशी काव्य आहेत. सहज आणि सोपी भाषा असल्यामुळे वाचक काव्य वाचतांना समरस होऊन जातो. वारकरी चळवळीतील संत आणि रामायण-महाभारतातील संदर्भ घेऊन केलेले अनेक रूपकात्मक काव्य वाचतांना मन विभोर होऊन जाते. जरी कवी प्रल्हाद घोरबांड यांचा हा पहिलाच कवितासंग्रह असला तरी गेल्या तीन दशकापासून संग्रह करून ठेवलेल्या त्यांच्या मनातील भावनाच्या गाठीभेटी या संग्रहातून वाचण्यास मिळतात. संतोष घोंगडे यांनी काव्यसंग्रहाला साजेशीर असे मुखपृष्ठ तयार केले आहे. भगवा पताका, पांडुरंगाचा गंध, दोन पाऊल, पांढरे ढग आणि दोन पिंपळाचे पान ज्यात एक हिरवेगार आहे तर दुसरे वाळलेले. यातून कवींच्या मनातील अनेक भावना मुखपृष्ठावरील चित्राच्या माध्यमातून व्यक्त होतात. या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग गोशाळेतील गाईंच्या चा-यासाठी केला जाणार आहे, हे विशेष उल्लेखनीय बाब आहे. म्हणून वाचक प्रेमीं या पुस्तकाचे नक्कीच स्वागत करतील, अशी आशा ठेवू या. पुढील काव्यलेखनास कवींना मनस्वी शुभेच्छा.
पुस्तकाचे नाव :- गाठीभेटी
कवीचे नाव :- कवी प्रल्हाद विश्वनाथराव घोरबांड
प्रकाशकाचे नाव :- संजय सुरनर, संगत प्रकाशन, नांदेड
एकूण पृष्ठे :- 96
किंमत :- 150 ₹ फक्त
पुस्तक परिचय :- नासा येवतीकर, स्तंभलेखक तथा विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद, ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
No comments:
Post a Comment