Friday, 22 March 2024

पुस्तक परीक्षण - मोबाईल माझा गुरू ( Mobile majha Guru )

मनोरंजनातून मूल्यशिक्षण देणारा - मोबाईल माझा गुरू बाल कथासंग्रह
राज्यशासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त हिंगोली जिल्ह्यातील एक आदर्श शिक्षक व्यक्तिमत्त्व म्हणजे सेवानिवृत्त मुख्याध्यापक नागेश सु. शेवाळकर. शालेय जीवनासोबत आपले संपूर्ण जीवन त्यांनी साहित्य निर्मिती करण्यासाठी व्यतीत केले आहे म्हणूनच त्यांच्या हातून एकापेक्षा एक सरस अश्या पुस्तकांची निर्मिती झाली आहे. आजपर्यंत त्यांची 30 हुन अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून 10 च्यावर कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या श्यामच्या छान छान गोष्टी या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आणि प्रत्येक शाळेत पोहोचविले आहे. साठी बुद्धी नाठी असे म्हणतात परंतु लेखकांनी साठी पार केल्यानंतर ही त्यांची लिहिण्याची उर्मी आणि धमक अजूनही कायम आहे. आपल्या जीवनात आलेल्या अनेक सुखदुःखाचे प्रसंग, चढ-उतार या सर्व अनुभवाच्या बळावर ते आपले साहित्य लेखन करतात म्हणून तर वाचकांच्या गळी सहज उतरते. अवघड आणि क्लिष्ट वाटणारे शब्द शक्यतो टाळून सहज सोपी भाषा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच आबालापासून वृद्धांपर्यंत सर्वांना त्यांचे साहित्य मनापासून आवडतात. लहान व किशोरवयीन मुलांची वाचनाची भूक भागवावी या उद्देशाने आजरा येथील मासिक ऋग्वेद रिलीफ फंड चैतन्य सृजन सेवा संस्थाने नागेश शेवाळकर लिखित " मोबाईल माझा गुरू " नावाचे बालकथासंग्रह नुकतेच प्रकाशित केले आहे. 
यातील सर्वच कथा मुलांना त्यांच्या भावविश्वात नेऊन नकळत काही ना काही शिकवण देऊन जातात. पहिली कथा वाचायला घेतली की सर्व कथा वाचन करेपर्यंत वाचक पुस्तक सोडत नाही असे कथानक या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. वाचकांची अचूक नाडी ओळखण्यात लेखक वाकबगार आहेत म्हणून आई, बाबा, आजी, आजोबा, शाळा, घर, खेळ, आईस्क्रीम आणि विशेष करून मोबाईल या सर्व बाबी आणि जीवनात घडणाऱ्या अनेक बारीकसारीक गोष्टीचे निरीक्षण करून त्याच बाबीवर प्रकाश टाकणाऱ्या कथा या संग्रहात लिहिल्या आहेत. या बालकथासंग्रहात एकूण अकरा कथा आहेत.
एकविसाव्या शतकातील महान क्रांती म्हणजे मोबाईल होय. घरात जेवढे सदस्य आहेत तेवढे मोबाईल आजच्या घडीला घरात उपलब्ध आहेत. एक काळ असा होता की फक्त श्रीमंत लोकांच्या घरात टेलिफोन बघायला मिळायचं. दूरच्या व्यक्तीचे बोलणे कसे ऐकायला येते ? या गोष्टीची अनेकांना आश्चर्य वाटायचे. पण काळ बदलला, आजच्या संगणकाच्या युगात मोबाईल ही एक मूलभूत गरज बनली आहे. मोबाईल जेवढे गरजेचे आणि आवश्यक बनले तेवढेच त्रासदायक देखील बनले आहे. घरातील लहान बालकांसाठी पूर्वी खेळण्यासाठी विविध खेळणी देत असत त्याची जागा आता मोबाईलने घेतलं आहे. घरातील लहान बालके मोबाईल शिवाय जेवण करत नाहीत ही प्रत्त्येक घरातील आई-बाबांची मुख्य समस्या बनली आहे. अश्या घटना लेखकांच्या घरातच नाही तर सर्वत्र आढळून येते. हीच कथाबीज वापरून हट्टी रितेश ही कथा रंगतदार बनविली आहे. रितेशचे आजोबा जेवण करतांना त्याचा मोबाईल पाहण्याची सवय कशी घालवतात हे वाचण्यायोग्य आहे.
घरातील मुलं मोबाईलचा वापर फक्त खेळांसाठीच करतात असा आपला समज असतो. कारण जास्तीत जास्त मुलं मोबाईलवर गेमच खेळत असतात. पण आसावरी सारखी एखादी समजूतदार मुलगी असू शकते जी की आपल्या आईच्या मोबाईलचा वापर करून तिच्या आईचा आणि आत्या यांच्यात असलेला अबोला दूर करते ? त्या दोघांमध्ये असलेला अबोला संपविण्यासाठी आसावरी कोणती युक्ती वापरते हे नक्कीच वाचनीय आहे.
आपणाला जे कोणी ज्ञान देतात, माहिती देतात, प्रश्नांची उत्तरे देतात ते एकप्रकारे गुरूच असतात. संत, ऋषी आणि परमेश्वर यांना आपण गुरूच्या सर्वोच्च स्थानी ठेवतो व त्यांची पूजा अर्चा करत असतो. घरातील लहान मुलं आपल्या आईला आणि आजीला घरात पूजा करतांना पाहत असतात आणि त्यांच्या मनात नाना प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. मोठ्यांना परमेश्वर हेच गुरू वाटतात तर लहान मुलं मोबाईलला आपला गुरू मानतात. प्रेरणा ही अशीच हुशार व चुणचुणीत मुलगी मोबाईलला गुरू मानते आणि त्याची पूजा कशी करते ? ही एक भन्नाट कल्पना मोबाईल माझा गुरू या कथेतून वाचायला मिळेल.
आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे सर्वात जास्त नुकसान कोणाचे होत असेल तर ते आहे लहान मुलांचे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरातील मुलांना आई-बाबा यांच्यासह आजी-आजोबा यांचा प्रेम आणि सहवास लाभत होता. ज्यामुळे त्यांच्यावर मूल्य संस्कार होत होते. परंतु आजच्या पिढी या गोष्टीपासून दुरावल्या गेली आहेत. जास्वंदी नावाची मुलगी खूप नशीबवान आहे कारण तिला या काळात देखील आजी-आजोबांचे प्रेम मिळते, त्यांच्यासोबत तिला राहायला मिळते. पण तिचा मित्र केदारला मात्र तसा प्रेम मिळत नाही तेव्हा जास्वंदी कोणती युक्ती करते ? ज्यामुळे केदारला आजोबाचा सहवास लाभतो हे सर्वांनी वाचण्याजोगे आहे. लहान मुलांचे आणि आजी-आजोबांचे एक वेगळे नाते असते. ते आई-बाबांनी तोडून पाप पदरात घेऊ नये असा छानसा संदेश यातून मिळतो. या पुस्तकातील अत्यंत मोलाची आणि मार्मिक अशी कथा आहे, असे मला वाटते.
जेष्ठ साहित्यिक आदरणीय मंगेश पाडगावकर यांची सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ? ही कविता ऐकली नाही असा एक ही बालक शोधून सापडणार नाही. त्या कवितेवर एखादी कथा होऊ शकते म्हणजे किती भन्नाट असेल. जमाडी जम्मत ... गमाडी गम्मत ... भंबेरी भूम्म ही एक मजेशीर कथानक आहे.
घरात पाहुणे आले की, सर्वात जास्त आनंद कोणाला होतो माहीत आहे का ? तर लहान मुलांना. लहान मुलांच्या चेहऱ्यावर निरागस हास्य यावेळी आपणाला पाहायला मिळतो. लेखकांनी आरोही नावाची कथा लिहितांना खूप सूक्ष्म निरीक्षण करून रंजकता निर्माण केले आहे. मुलांच्या डोक्यात कधी कोणती कल्पना तयार होईल सांगता येत नाही. फक्त त्यांना व्यक्त करण्याची संधी द्यायला हवी. पण घरात नेमकं उलटे घडत असते, आपण लहान मुलांच्या बोलण्याकडे किंवा त्यांच्या कल्पनेकडे सर्रास दुर्लक्ष करून आपले ते खरे करतो. आरोहीची कथा वाचल्यावर आई-बाबांनी कसे वागायला पाहिजे याची दिशा नक्की मिळेल.
लहान मुलांचे आवडते खाद्य म्हणजे आईस्क्रीम. बागेत फिरायला जाऊ द्या किंवा बाहेर कुठे फिरायला त्यांची एकच मागणी असते ती आईस्क्रीमची, याच विषयावर लेखकांनी वेगळ्या धाटणीची कथा लिहिली आहे. 
शाळेत राबविले जाणारे उपक्रम किंवा प्रकल्प हे मुलांच्या अंगातील सुप्त गुणांना विकसित करत असतो. काही पालक शाळेच्या या उपक्रमाला नको ते नाव ठेवतात तर अक्षयचे आई-बाबा मात्र त्याच्या प्रकल्पात मदत करतात आणि अक्षय शाळेचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी ठरतो. विद्यार्थ्यांच्या मनात पशु-पक्षी यांच्याविषयी संवेदना निर्माण करण्यासाठी शाळेने आयोजित केलेला प्रकल्प अक्षयच्या अंगी वेगवेगळ्या भावनांचे आविष्कार दाखवितो, हे या कथेतून पाहायला मिळते. 
बंद करा ! बंद करा ! ही कथा घरातील प्रत्येक आई-बाबा आणि वरीष्ठ लोकांसाठी उद्बोधक आहे. मुलांना मोबाईल वापरू नका म्हणणारे मोठे व्यक्ती त्याच्याच समोर मोबाईलचा अति वापर करू लागले तर मुलांच्या मनात काय राग निर्माण होतो हे या कथेतून सांगण्याचा प्रयत्न लेखकांनी केला आहे. घरातील लहान मुलं घरातील रोजच्या ओळखीच्या व्यक्तीजवळ सहजपणे जातात तर अनोळखी व्यक्तीजवळ लवकर जात नाहीत. याच बाबीवर अभीची आबी ही कथा रंजकपणे मांडली आहे. ही कथा वाचतांना आपण बालविश्वात रममाण होऊन जातो. 
कोणत्याही बालकांचे पहिले गुरू आई-बाबा होत. त्यानंतरचे गुरू म्हणजे शिक्षक. पण घरात असलेले एक सेवानिवृत्त शिक्षक जे की सिद्धीचे आजोबा होते. तेच तिच्यासाठी एक आदर्श शिक्षक होते. शाळेत तिने शिक्षक दिनाच्या दिवशी केलेलं भाषण आणि तिला मिळालेला पुरस्कार हे आजोबा दिन या शेवटच्या कथेत अत्यंत हृदयस्पर्शी असे लिहिले आहे. ही कथा वाचतांना वाचकांचे डोळे पाणवल्या शिवाय राहत नाही. 
आपल्या घरातील लहान व किशोरवयीन मुलांनी हे पुस्तक नक्की वाचायलाच पाहिजे अशी आहे. प्रत्येक गोष्ट मुलांच्या मनाला नक्की स्पर्श करतो, हे पुस्तक वाचल्याशिवाय कळणार नाही. या पुस्तकातून पालकांना देखील अनेक गोष्टी शिकायला मिळतात. म्हणून पहिल्यांदा प्रत्येक आई-बाबांनी हे पुस्तक वाचावे आणि आपल्या मुलांना वाचण्यासाठी द्यावे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी इतर कोणती महागडी भेटवस्तू देण्यापेक्षा असे संस्कारक्षम पुस्तक भेट देणे योग्य राहील, असे वाटते. मासिक ऋग्वेद चिलड्रन रिलीफ फंड, आजरा यांचे विशेष अभिनंदन करावेसे वाटते की अल्प दरात हे उत्तम पुस्तक उपलब्ध करून दिले आहे. हे पुस्तक पोस्टाने मागविण्यासाठी 9423277069 व 9423279163 या मोबाईल क्रमांकावर अवश्य संपर्क करावे. जेष्ठ साहित्यिक नागेश सु. शेवाळकर यांच्या हातून भविष्यात अजून उत्तमोत्तम साहित्य निर्माण होऊन आम्हा वाचकांना अजून साहित्य वाचण्यास मिळो हीच मनस्वी सदिच्छा ...!

पुस्तकाचे नाव :- मोबाईल माझा गुरू
लेखकाचे नाव :- नागेश सु. शेवाळकर
प्रकाशन :- मासिक ऋग्वेद चिलड्रन रिलीफ फंड, आजरा
एकूण पृष्ठ :- 72
किंमत :- 10 रु. 

पुस्तक परिचय
- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक तथा विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद, 9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...