Friday, 22 March 2024

पुस्तक परीक्षण - आपली सूर्यमाला ( Apli Suryamala )

जिज्ञासा मुलांसाठी विज्ञानकथा आपली सूर्यमाला
सकाळी सकाळी पूर्व दिशेला उगवणारा सूर्य आपल्या दिवसाची सुरुवात करतो आणि पश्चिमेला मावळल्यावर आपला दिवस संपतो. अगदी लहानपणापासून आपल्या मनात या सुर्याविषयी मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. सूर्य कसा उगवतो आणि मावळतो ? सूर्य मावळल्यावर कोठे जातो. जिज्ञासा जागृत करणारे असे प्रश्न लहान मुले मोठ्यांना नेहमीच विचारत असतात. कधी कधी त्या बालबोध मनाला समाधानकारक उत्तर मिळते तर कधी मिळत नाही. सूर्य आणि त्याचा परिवार याची खूप छान अशी माहिती लेखक प्रा. देवबा शिवाजी पाटील यांनी 'आपली सूर्यमाला' ह्या छोट्याशा पुस्तकातून केली आहे. लेखक सेवानिवृत्त प्राध्यापक असून त्यांच्या नावे भरपूर साहित्य संपदा प्रकाशित आहेत. त्यात विज्ञान विषयी आभाळाचे गुपीत, नभ नवलाई, आकाशगंगा ही काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले असून त्या संग्रहास पुरस्कार देखील मिळाले आहेत. पाठ्यपुस्तक मंडळाने देखील त्यांच्या कवितेची दखल घेतली असून खार ही कविता अमराठी शाळेच्या दुसऱ्या वर्गाच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. जेष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड संपादित बालकुमार कथा व कविता कोश यामध्ये देखील त्यांच्या कथा व कविताचा समावेश झाला आहे. आकाशवाणी जळगाव रेडिओ केंद्रावरून त्यांचे कवितावाचन प्रसारित झाले आहेत. 
सूर्याची निर्मिती कशी झाली ? ग्रह-उपग्रह, लघुग्रह कसे निर्माण झाले ? ग्रहांचे प्रकार किती आहेत ? ते सूर्याभोवती आपापल्या कक्षेतच कसे फिरतात ? ते गोलाकारच का दिसतात ? प्रत्येक ग्रहाची वैशिष्ट्ये, ते सूर्याच्या प्रचंड उष्णतेने जळत का नाहीत ? ते आकाशात केव्हा व कसे दिसतात ? ते तसेच का दिसतात ? गुरुत्वाकर्षण म्हणजे काय ? सूर्य कसा प्रकाशतो ? ग्रहांना स्वतःचा प्रकाश का नसतो ? तरीही शुक्र ग्रह चमकताना का दिसतो ? ग्रहांवर वातावरण का नाही ? आपल्या पृथ्वीवरच सजीव का निर्माण झाले ? ग्रहांवरही ग्रहणे होतात का ? तारा कसा तुटतो ? उल्का कशा बनतात ? धूमकेतू कसे तयार होतात ? शेवटी आपल्या सूर्यमालेचा शेवट कसा होणार ? अशा अनेक कुतूहलपूर्ण प्रश्नांविषयीची वैज्ञानिकांनी प्रसिद्ध केलेली माहिती आकलनसुलभ भाषेत वर्णिली आहे. लहान मुलांच्या वयानुसार व त्यांच्या आकलनक्षमता लक्षात घेऊन सूर्यमालेविषयी वैज्ञानिक माहिती सोप्या भाषेत लिहिली आहे. रंगीत आकर्षक चित्रांमुळे ही माहिती अजून वाचनीय ठरते. शालेय जीवनात मुलांना विज्ञान हा विषय नकोसा वाटतो. त्यामुळे विज्ञाना पासून अनेक मुले दूर पळतात. पण तेच विज्ञान विषय शिकविताना कथा व कवितेच्या माध्यमातून सांगितले गेले तर विद्यार्थ्यांना समजायला सोपे होईल आणि मुलांमध्ये अभिरुची निर्माण होईल असा लेखकाला विश्वास वाटतो. विज्ञानाच्या क्लीष्ट भाषेच्या गुंतवळ्यात न अडकता साध्या, सरळ, रंजक, आणि सोप्या भाषेत संपूर्ण माहिती तुमच्याप्रमाणेच, हुशार व जिज्ञासू मुलामुलींनी वर्गामध्ये त्यांच्या सरांना विचारलेल्या विविध प्रश्नांतून व सरांनी त्यांना दिलेल्या समर्पक उत्तरांमधून प्रवाही, रंजक व संवादी भाषेत मांडली आहे. भाषा साधी व सरळ असल्याने ही वैज्ञानिक माहिती समजण्यास एकदम सुलभ आहे. असे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे हे विज्ञानदायक छोटेसे पुस्तक जिज्ञासू मुलामुलींसाठी खूप खूप उपयोगी तर आहेच पण सुजाण व अभ्यासू शिक्षकांसाठी देखील ते अत्यंत उपयोगी आहे. प्रत्येकांनी संग्रही ठेवावे असे हे सुंदर व उपयुक्त असे पुस्तक आहे. पुढील लेखनासाठी हार्दीक शुभेच्छा ....! तसेच सर्व वाचकांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .......!

पुस्तकाचे नाव :- आपली सूर्यमाला
लेखकाचे नाव :- प्रा. देवबा शिवाजी पाटील, 9420795307
प्रकाशक :- दिलीपराज प्रकाशन, पुणे
एकूण पृष्ठ :- 56
किंमत :- 170 ₹

पुस्तक परिचय - नासा येवतीकर, मुख्याध्यापक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...