Monday, 26 March 2018

सैनिक


सैनिक : देशाचा संरक्षक

देशाची संपूर्ण सुरक्षा ही त्या देशातील सैनिकांवर अवलंबून असते. देशाची सुरक्षा करण्यासाठी सैनिक मंडळी डोळ्यात तेल घालून काम करीत असतात. अत्यंत कठीण आणि अवघड परिस्थितीच्या वेळी सैनिकांची खरी परीक्षा असते. जेंव्हा सर्व नागरिक गाढ झोपेत असतात तेंव्हा सैनिक जागरण करीत असतात. त्यांच्या सतर्कतेमुळे देशात कोणताही शत्रू प्रवेश करू शकत नाही. जम्मू काश्मीर आणि चीनच्या सीमेजवळ अनेक वेळा सैनिकांना शत्रूशी चार हात करावे लागते. या धुमश्चक्रीमध्ये भारतीय जवान शहीद होतात. भारताच्या रक्षणासाठी जीव गेला तरी बेहत्तर अशी महत्वाकांक्षा ज्यांच्या मनात निर्माण होते तेच सैनिक होऊ शकतात. एक वेळ सैनिकांच्या संख्येवर लक्ष दिल्यास आपणास दिसून येईल की पंजाब राज्यातील बहुतांश युवक सैनिकांमध्ये सहभागी होतात. सहसा असे म्हटले जाते की, देशाचा सैनिक हा आपल्या बाजूच्या घरातला असावा असे वाटते. आपल्या घरातील मुलगा हा चांगल्या नोकरीला लागावा, भरपूर पैसा कमवावे असे वाटते मात्र सैनिकांमध्ये जावा असे कोणत्याच पालकांना किंवा युवकांना वाटत नाही. त्याचे काय कारण असू शकते ? आपण ज्या देशात राहतो त्या देशाविषयी आपल्या मनात देशप्रेम किंवा देशभक्ती नसणे किंवा कमी असणे खरोखरच देशाच्या प्रगतीसाठी घातक आहे. प्रत्येकाच्या मनात देशप्रेम किंवा देशभक्ती जागे करण्यासाठी शालेय जीवनापासून काही उपाय करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन दिवसापुरते आपले देशप्रेम किंवा देशभक्ती उचंबळून येण्या ऐवजी रोज आपल्या मनात देशाविषयी तळमळ असणे आवश्यक आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीच्या काळात स्वातंत्र्य मिळवायचे आहे म्हणून जो तो आपले देशप्रेम किंवा देशभक्ती टिकवून होते. त्या पारतंत्र्याच्या काळात वंदे मातरम किंवा जय हिंद म्हटले तर इंग्रज सरकार त्यांना गोळ्या झाडत होते. तरी सुद्धा शिरीषकुमार सारखा शालेय विद्यार्थी जय हिंद किंवा वंदे मातरम म्हणून गोळ्या झेलतो. आज आपणास लोकशाही देशात जय हिंद किंवा वंदे मातरम वरून लोकं राजकारण करतात. आपण ज्या देशात राहतो त्या देशाचे गुणगान करायचे नसेल किंवा करणे उचित वाटत नसेल तर त्या देशात राहायचे तरी कशाला ? असा एक प्रश्न स्वतःला विचारून पाहावे. क्षणोक्षणी प्रत्येक भारतीयांच्या मनात देशाविषयी अभिमान जागृती करण्यासाठी शाळेतून विशेष प्रयत्न व्हायालाच व्हावे. देशाप्रेमावर आधारित एक चित्रपट दरमहा शाळेत दाखवायला हवे. ज्यातून मुलांच्या मनात नकळत देशप्रेम किंवा देशभक्ती जागे करता येऊ शकेल. स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक।दिनी नुसते झेंडावंदन करण्यापेक्षा त्या दिवशी दिवसभर काही कार्यक्रम आयोजित करता येतील काय याकडे लक्ष द्यावे. यादिवशी झेंडावंदन साठी शाळेतील मुले, शिक्षक, सरकारी कर्मचारी आणि पदाधिकारी व काही तुरळक नागरिक उपस्थित राहतात. गावातील सर्वांच्या सर्व नागरिक या कार्यक्रमास उपस्थिती राहायला पाहिजे पण तसे दिसत नाही. हे चित्र बदलायला पाहिजे. निदान या दिवशी तरी आपल्या मनातील देशप्रेम किंवा देशभक्ती लोकांना दाखवू या. शाळेत NCC किंवा MCC सारख्या उपक्रमात सर्व मुलां-मुलींना सहभागी करून घ्यायला पाहिजे. त्याशिवाय त्यांच्या मनात देशाविषयीची भावना जागृत होणार नाही. देश माझ्यासाठी आहे की मी देशासाठी हे पहिले ठरवायला पाहिजे. म्हणूनच भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम म्हणतात की, देशासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे काय ? नक्कीच आपण सर्वांनी यावर एक वेळा तरी विचार करायला हवे. देशात दोन व्यक्ती आपल्या सर्वासाठी महान आहेत एक म्हणजे किसान आणि दुसरा जवान. किसान आपणास अन्न पुरवठा करतो तर जवान आपली सुरक्षा करतो. म्हणूनच भारताचे दुसरे पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांनी देशाला जय जवान जय किसान हा नारा दिला. दोघांचे देखील सन्मान करणे गरजेचे आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत आहे तर दुसरीकडे घुसखोरी करणारे आतंकवादी दररोज आपल्या आपल्या सैनिकांना मारत आहेत. त्यामुळे या दोन्ही महत्वाच्या व्यक्तीचे घर-संसार वाऱ्यावर येत आहे. म्हणून यासाठी सैनिक कल्याण निधीला आपण सर्वतोपरी मदत करायला हवे. कारण या पैशातून सरकार त्यांचे वाऱ्यावर येत असलेल्या संसाराला कुठे आधार देऊ शकतात. जे आपल्या मुलांना सैनिकांत पाठवू शकत नाहीत त्यांनी निदान या निधीमध्ये सढळ हाताने, गुप्तपणे आर्थिक मदत देत राहावे, म्हणजेच त्या शहीद सैनिकांना खरी श्रद्धांजली ठरेल. रोजच आपण जवान शहीद झाल्याची बातमी वाचतो आणि सोडून देतो. काही क्षणासाठी अरेरे ! असे उद्गार काढतोत आणि आपल्या कामाला लागतो. पण ज्यांच्या घरावर हे संकट कोसळले असेल त्या घराची काय स्थिती असेल. वास्तविक पाहता ते घरावर तुळशीपत्र ठेवूनच सैनिकांत दाखल होतात. जिवंत परत येण्याची खात्री त्यांना पण नसते. म्हणून आपण देखील त्याच्या दुःखात सहभागी होण्यासाठी दरमहा काही रक्कम बाजूला काढत जावे आणि त्या निधीत गोळा करावी. त्याच बरोबर युद्धाच्या प्रसंगी सैनिकांना रक्ताची फार गरज भासते म्हणून वर्षातून एकदा प्रत्येकाने रक्तदान करावे म्हणजे सैनिकांची ही गरज तात्काळ पूर्ण होईल. काही वेळा सैनिकांना मानवी शरीराची गरज भासते मात्र ते पूर्ण होऊ शकत नाही. पण आपण देहदान करण्याचा संकल्प करून आपले अवयव दान केल्यास अनेक सैनिकांना युद्धाच्या प्रसंगी निकामी झालेले अवयव परत प्रत्यारोपण होऊ शकते. हे कार्य देखील आपली खरी देशप्रेम किंवा देशभक्ती दाखवून देण्यास मदतगार ठरू शकेल असे वाटते. 

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

1 comment:

  1. खरोखरच सुंदर सुंदर लेख लिहिला आहे.आपल्यादेशाबद्दल प्रेम बालवयातच रुजवले पाहिजे.

    ReplyDelete

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...