Saturday, 31 March 2018

बालपणीचे संस्कार भाग 21

मौनम् सर्वार्थ साधनम्

मुलांनो, शाळेत एक मिनिट तरी मौन बसण्याची सूचना आपणाला मिळत असते. काही ठिकाणी परिपाठ संपल्यानंतर सर्वांना मौनधारणेत बसण्याची सूचना दिली जाते तर काही ठिकाणी शाळा सुटताना मौनधारणेत बसण्याची सूचना दिली जाते. आपणाला सर्वांना प्रश्न पडतो की, मौन धारण केल्यामुळे काय होते ? प्रसिद्ध तत्त्वज्ञ कार्लाईल म्हणतात की, मौन म्हणजे असे तत्त्व आहे की ज्यात महान गोष्टी एकाच वेळी निर्माण होतात व शेवटी त्या जीवनाच्या प्रकाशात संपूर्ण व भव्य बनून साकार होतात. शाळेत शिकताना आपले तोंड जेवढे बंद राहिल तेवढीच आपली बुद्धिमत्ता वाढीस लागते. जर शिक्षकाने आपणाला प्रश्न विचारला असेल तरच तोंड उघडावे, अन्यथा ते बंद ठेवणे सोयीस्कर असते. शाळेतील मित्रांसोबत किती वेळ बोलावे ? याचे नियंत्रण आपल्याकडे नसेल तर आपण बऱ्याच गोष्टी शिकण्यापासून वंचित राहण्याची जास्त शक्यता असते. नको त्या विषयावर वारंवार बोलत राहिल्यामुळे आपले लक्ष मुख्य विषयाकडे राहत नाही. एवढेच नाही, तर कधी कधी बोलण्यावरूनच वाद किंवा भांडणे वाढतात. त्यामुळे बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलणे केव्हाही चांगले. यावर रवींद्रनाथ टागोरांनी फार छान उपदेश केला आहे. ते म्हणतात की, ज्याप्रमाणे पक्ष्यांचे आश्रयस्थान घरटे असते, त्याप्रमाणे आपल्या वाणीचे म्हणजे बोलण्याचे आश्रयस्थान मौन असते. आपणाला जेव्हा जेव्हा राग येतो तेव्हा तेव्हा आपण काहीबाही बरगळतो म्हणजे बोलतो. रागाच्या भरात बोलला असेल, असे म्हटले जाते. मात्र त्यामुळे आपलेच नुकसान होण्याची शक्‍यता सर्वाधिक असते. काही तत्त्वज्ञानी लोक म्हणतात की, राग आल्यानंतर एक ते शंभर अंकाची गिणती करावी. तर काहीजण म्हणतात की, एक ग्लासभर पाणी प्यावे तोपर्यंत राग निवळतो. अर्थात क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम उपाय दुसरा नाही, असे जे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितले आहे ते खरेच आहे. मौन धारण केल्यामुळे आपणाला लक्ष केंद्रित करण्याची सवय लागते. चिंतन व मनन करण्यासाठीसुद्धा मौन उपयोगी पडते. आपल्यापुढील व्यक्ती कितीही रागात बोलत असेल आणि आपण त्यास विरोध न करता मौन स्वरूपात ऐकून घेतले तर वाद वाढणार नाही तर शमेल. म्हणूनच संस्कृतमधे म्हटले जाते मौनम् सर्वार्थ साधनम्.

नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...