Saturday, 31 March 2018

आराम हराम है

आराम हराम है

मुलांनो खुप काम किंवा अभ्यास केल्यानंतर थकवा येतो आणि थकवा घालविण्यासाठी आपण आपल्या मनाला कोणत्या तरी विरंगुळ्यात टाकतो, लगेच मन प्रसन्न होते. जे काहीच काम करीत नाहीत त्यांना थकवा कसा येईल ? थकवा आलाच नाही तर विरंगुळ्याचा प्रश्नच नसतो. काम न करणाऱ्या माणसाला आळशी म्हटले जाते. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, असे गौतम बुध्दांनी म्हटले आहे. त्यास्तव नेहमी कामात व्यस्त रहावे व त्यास परममित्र करावे. प्रसिध्द विचारवंत रस्किन म्हणतो की, परिश्रमातून, कष्टातून आनंद निर्माण होत असतो, क्रोधातून किंवा आळसातून नव्हे. सतत कामात राहिल्याने मनुष्या चे जीवन सुखी बनते. कधीकधी आपणास शाळेला जाण्याचा, अभ्यास करण्याचा कंटाळा येतो. म्हणजे थोडक्यात आपण त्या बाबतीत आळस करतो आणि तसा आळस केला की त्या दिवशीचा सर्व भार दुसऱ्या दिवसावर येऊन पडतो. मग आपले काम दुप्पटीने वाढते. म्हणूनच संत कबीर म्हणतात की," कल करे सो आज कर और आज करे सो अब " त्यांचे काव्य ध्यानीमनी ठेवल्यास आपल्या मनात कधीच आळस येणार नाही. आळस घालविण्यासाठी आपल्याकडे विरंगुळ्याची भरपूर साधने उपलब्ध आहेत. त्याचा यथायोग्य वापर करता येणे महत्वाचे आहे. गोष्टीचे पुस्तक वाचणे, शब्दकोडी सोडविणे, चित्रे रंगविणे, मित्रांसोबत खेळणे, व गप्पा मारणे, इत्यादी क्रियाद्वारे आपण आपला आळस घालवू शकतो. मात्र मुख्य काम बाजूला ठेवून विरंगुळ्याचेच काम करीत बसलो तर ते डोईजड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केला की, तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा असे कोकिवल यांनी म्हटले आहे.त्यामुळे ' दे रे हरी पलंगावरी ' अशी अवस्था आपली कधीच होणार नाही, याची काळजी घ्यावी. सतत कामात व्यस्त राहिल्यामुळे आपणाला नवनवीन कामे, कल्पना सुचतात. नविन गोष्टी कळत राहतात आणि प्रगती होत राहते. आळस केला तर मात्र जेथे आहोत त्यापेक्षाही अधोगतीला जातो. वाहत्या नदीचे पाणी स्वच्छ, निर्मळ व छान वाटते, तर साचलेले किंवा थांबलेले पाणी अस्वच्छ आणि घाण वाटते तसेच त्या पाण्याची दुर्गंधी देखील येते. नित्य कामात राहणे म्हणजे नदीच्या वाहत्या पाण्यासारखे आहे, तर आळस म्हणजे साचलेले पाणी होय. त्यामुळेच आपण मुलांनी पंडीत जवाहरलाल नेहरू म्हणजेच आपल्या मुलांचे चाचा नेहरू यांचे ' आराम हराम है ' हे वाक्य नेहमी लक्षात ठेवावे.

- नागोराव सा. येवतीकर
  प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...