Saturday, 31 March 2018

बालपणीचे संस्कार भाग 02

विजेची बचत म्हणजे वीज निर्मिती

मुलांनो, अभ्यास करता करता लाईट गेली तर आपण हिरमुसले होतो आणि वीज मंडळाच्या नावाने बोटे मोडतो. विजेचा तुटवडा झाला की आपणास लोडशेडिंगला तोंड द्यावे लागते. त्यास्तव विजेची बचत करण्याची सवय करून घेणे ही आजच्या काळाची खरी गरज बनली आहे. भर उन्हाळ्यात जेव्हा आपणाला विजेची गरज भासते नेमके त्याच वेळेस वीज गायब होते. भविष्यात यापेक्षाही भीषण संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. वीजनिर्मिती करणे आपल्या हातात नाही मात्र विजेची बचत करून आपण एक प्रकारे वीजनिर्मितीच करीत असतो ना ! मग कशी करता येईल वीज बचत ? सर्वात पहिल्यांदा अत्यंत महत्त्वाचे म्हणजे तासनतास टीव्ही समोर बसून राहू नये. आपण जेवढा वेळ टीव्ही पाहू तेवढीच वीज संपून जाईल. आपण लाईट बिल कितीही येवो पैसे भरू शकतो, मात्र त्याच पैशाने बाजारातून वीज खरेदी करता येत नाही, हे लक्षात असू द्यावे. त्यामुळे टीवीवरील ठरवून ठेवलेले कार्यक्रम तेवढेच पाहून लगेच टी व्ही बंद करावे. टीव्ही बंद करताना रिमोटने बंद करण्याच्या ऐवजी स्वीच ऑफ करावा. अन्यथा त्यात विद्युतप्रवाह चालूच असतो. त्यामुळे वीज बचत करण्याची आपली संकल्पना अपूर्ण राहते. दिवाबत्ती लावून रात्रीच्या वेळी अभ्यास करण्याची सवय मोडीत काढून पहाटे किंवा सायंकाळी स्वच्छ सूर्यप्रकाशात अभ्यास करण्याची सवय लावून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्या डोळ्यांना तर त्रास होणारच नाही शिवाय विजेची बचतही होईल. दिवसा विनाकारण दिवा जाळू नये. आवश्यक तेथे त्याचा वापर करावा. पंख्याचा वापर सुद्धा गरजेनुसार करावा. फ्रीजचा दरवाजा वारंवार उघडझाप करू नये त्यामुळे बरीच वीज खर्च होते. वेगवेगळ्या खोल्यांतून अभ्यास करण्यापेक्षा सर्वांनी एकाच खोलीत एकाच दिव्याखाली अभ्यास केल्यास सुद्धा ही विजेची बचत होईल. दिवसातून एक युनिट, महिन्यातून तीस तर वर्षातून 365 युनिटची बचत आपण छोट्या छोट्या प्रसंगातील सवयीमुळे करू शकतो. या सवयीचा फायदा आपणाला भविष्यात नक्कीच होईल. ही बचत पैशाच्या बचतीप्रमाणे डोळ्यांना दिसत नाही, पण ती जाणवते.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक 
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...