Tuesday, 27 March 2018

दुर्दैवी शेतकरी

* शेतीप्रधान देशांतील दुर्दैवी शेतकरी *

आज काही कामानिमित्त शहराच्या मोंढ्यात जाणे झाले. कामास थोडा अवकाश होता म्हणून इकडेतिकडे नजर फिरवली. वास्तविक पाहता सकाळचे अकरा ही वाजले नव्हते पण दुपार झाल्याची जाणिव होत होती. दुकानाचे मालक जे की " सावकार " या नावानेच ओळखले जातात ते नुकतेच आपल्या मऊशार मुलायम गादीवर विराजमान झाले होते. दुकानाचा कारकून जो पूर्ण लिखापढी हिशेब सांभाळतो ज्यास सर्वजण मुनिम या नावाने हाक मारतात ते आपल्या नाकावरचा चष्मा डोळ्यापुढे आणण्याचा प्रयत्न करीत लिहिण्यात गुंग होते. उन्हाचा तडका वाढत चालला होता तसा वरच्या पंखांचा वारा गरम फेकत होता. या मोंढ्यातला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे येथे काम करणारे बाया, माणसे मजूरदार ज्यांना याठिकाणी हमाल या नावाने पुकारल्या जाते, ते दुकानात प्रवेश केल्या केल्या आपल्या कामास गपगुमानपणे सुरुवात केली. हे मजूरदार कोणाला काही बोलत नव्हते, फक्त काम करण्यावरच त्याचा पूर्ण लक्ष होते. कोणी गोणी उचलत होते आणि ढकल गाड्यांवर टाकीत होते. बाया बाहेरच्या बाजूला झाडलोट करून सर्व धान्य एकत्र करण्यात गुंग होती. बाजूलाच झाडांच्या सावलीत दोन माणसे रिकामे पोते झटकून साफ करीत असताना चांगले पोते एका बाजूला आणि थोडेसे खराब पोते एका बाजूला करीत होते. चांगल्या पोत्याचा गाठ बांधून बाजूला ठेवण्यात येत होती आणि छिद्र असलेल्या पोत्याला टाके सुध्दा मारण्यात येऊन त्यांचे वेगळे गाठी तयार होत होते. हे करताना त्यांच्यात अजिबात बातचीत होत नव्हती . अगदी शांतपणे जो तो आपले काम करण्यात व्यस्त होता. हे चित्र रोजचे होते. यांत काही बदल होणार नाही. पूर्वी बैलगाड्यामधून शेतकरी आपला माल आणित असत मात्र आज येथे ना बैल दिसत होते ना बैलगाड्या. सध्या टेंपो, ऑटो आणि इतर गाड्यामधून माल आणल्या जात होते आणि तेथील हमाल सर्व माल उतरवून मध्ये ठेवत होते. हमाल लोकांची माल उतरवण्याचे बाबतीत पूर्वीच बोलणे झालेले असते त्यामूळे कसल्याच प्रकारची झिगझिग याठिकाणी दिसत नव्हती. हे चित्र मनाला दिलासा देऊन गेला परंतु या उठाठेवची किंमत मात्र शेतकऱ्यांना मोजावे लागते हे समजल्यावर खूपच दुःख वाटले. कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असते मात्र याठिकाणी त्यांना सर्वच जण लुबाडतात आणि त्यांना नागवुन सोडतात असे आमच्या एका शेतकरी चळवळीतील मित्राकडून कळल्यावर थोडं अस्वस्थ वाटलं आणि शून्य मनाने विचार करीत असताना बाजूला असलेल्या वर्तमानपत्रावरील " बँकेचे कर्ज व नापिकीला कंटाळून नांदेड जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या " व आदिवासी शेतकरी कुटुंबातील तिघे जणाची आत्महत्या अश्या दोन बातम्या वाचण्यात आल्या आणि मन सुन्न झाले. डोक्यावर असलेल्या कर्जापायी कुटुंबातील सर्वच सदस्यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली असे त्या वृतांत म्हटले होते.
शेतकऱ्यांच्या होत आत्महत्या असलेल्या बातम्या आज रोजच प्रकाशित होत आहेत. गेल्या दोन तीन वर्षापासून पाऊसपाणी योग्य न पडल्यामुळे शेतकरी शेतात टाकलेली मुद्द्ल सुध्दा काढू शकला नाही. एकीकडे आसमानी संकट तर दुसरीकडे सुलतानी. प्रशासन सुध्दा आपल्या कागदपत्रावर आधारित काम करताना शेतकऱ्यांच्या काळजात घुसून न पाहिल्यामुळे हे आत्महत्या सत्र काही केल्या थांबता थांबत नाहीत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करून हे प्रश्न नक्कीच सुटणार नाही. यांसाठी खरी गरज शेतकऱ्यांना जेंव्हा गरज असते तेंव्हाच त्यांना मदत करण्याची. पण तसे होत नाही आणि त्याचा फायदा ही सावकार मंडळी उचलतात. सावकार कर्ज देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनावर डोळा ठेवतात आणि अव्वाच्या सव्वा दरात शेतकऱ्यांकडून माल घेतला जातो. निरक्षर व अडाणी असलेला शेतकरी नकळत या सावकाराकडून छळल्या जातो. हे कुठे तरी थांबायला पाहिजे आणि सरकारने शेतकऱ्यांना सुगीच्या काळात मदतीचा हात दिल्यास ते नक्कीच या संकटातून सावरतील.
शेतकरी वर्षभर शेतात राब राब राबतो आणि आपल्या कष्टाची सर्व उत्पादने या सिमेंटच्या जंगलातील गोडाउन मध्ये आणून टाकतो. शेतकऱ्यांकडून विकत घेतलेला माल सावकार मंडळी जास्त भावात विकून थोड्याच दिवसांत श्रीमंत होतात. म्हणजे काम करून उत्पादन तयार करणारा जगाचा पोशिंदा दरवर्षी याच पध्दतीने लुबाडल्या जातो. शेतकऱ्यांच्या शेतात जेंव्हा माल असतो तेंव्हा त्याच्या मालास काहीच किंमत नसते आणि सावकारकडे साठा असेल तर तोच माल तिप्पट किंवा चौपट भावाने विक्री केल्या जाते. उत्पादकालाच या देशांत एका आण्याची किंमत दिली जात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. जर याच शेतकऱ्यांने उद्या शेती कसायाची नाही असा निर्धार करून राहिले, शेतातून काही उत्पन्न निघाले नाही तर खरंच आपण सर्व जगू शकतो का ? याचं कुणीतरी एकदा तरी विचार केलाय का ? जे या बाबींचा विचार करतील तेच शेतकऱ्यांकडे सहानभूतीपूर्वक पाहतील.
वास्तविक पाहता अन्नधान्य उत्पादनात भारत पाहिल्या क्रमांकावर आहे. मात्र योग्य प्रकारचे शेतकऱ्यांचे नियोजन आणि प्रशासनाच्या ढिसाळ धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागले आहेत, याच विचारांच्या तंद्रीत मोंढ्याच्या बाहेर पडलो. शेतीप्रधान देशांत शेती आणि शेतकऱ्यांच्या विषयी जोपर्यंत विचार होणार नाही तोपर्यंत देशाचा विकास अशक्य आहे असे वाटते. 

- ना . सा . येवतीकर, धर्माबाद

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...