एकदा तरी अनुभववी शिक्षणाची वारी
सन 2015 च्या शैक्षणिक वर्षात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाला सुरुवात झाली. शालेय शिक्षण विभागामार्फत गेल्या चार वर्षात अनेक उपक्रम राबविण्यात आले. राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे, प्रगत झाले पाहिजे या उद्देश्याने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात कालानुरूप परिवर्तन घडविण्याचे काम केले जात आहे. शिक्षक मंडळीकडून शिक्षणात नवनवीन प्रयोग होत आहेत. गावागावातील सरकारी शाळा कात टाकत आहेत. चौदाव्या वित्त आयोगाच्या आणि लोकसहभागाच्या माध्यमातून शाळांच्या भिंती बोलक्या होत आहेत. त्याचा अध्ययन-अध्यापनामध्ये प्रभावी वापर होत आहे. राज्यातील प्रत्येक शिक्षक ज्ञानरचनावादी पद्धतीने मुलांना शिकविण्याचा प्रयत्न करीत आहे. आजच्या शैक्षणिक पद्धतीत शिक्षक नवनवीन प्रयोग करीत आहेत, त्यांचे हे नाविन्यपूर्ण प्रयोग जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून आगळ्यावेगळ्या अनोख्या शिक्षणाची वारी तयार करण्यात आली. याचे प्रदर्शन गेली तीन वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी यशस्वीपणे आयोजित करण्यात आली.
शिक्षणाची वारीचे यंदा चौथे वर्ष असून गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण हे यावर्षीच्या शिक्षणाच्या वारीचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याच अनुषंगाने यावर्षी 50 स्टॉल धारकाची निवड करण्यात आली असून सर्वात पहिला टप्पा मुंबई येथे दिनांक 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत या वारीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यात सामाजिक शास्त्र, गणित व भाषा वाचन विकास, अध्यापनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, पाठ्यपुस्तकाची बदलती भूमिका, मूल्यवर्धन, कला व कार्यानुभव, क्रीडा, किशोरवयीन आरोग्य शिक्षण, दिव्यांग मुलांसाठीचे शिक्षण, कृतियुक्त विज्ञान, तसेच विद्यार्थी व शाळेच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी शाळा व्यवस्थापन समिती व शाळा व्यवस्थापन विकास समिती मार्फत राबविण्यात आलेले विविध उपक्रम या वारीत पाहता येणार आहेत.
शैक्षणिक प्रयोगांची सर्वांना अनुभूती घेता यावी तसेच या प्रयोगांचा अंगीकार स्वतःला कसा करता येईल हे शिक्षकांना व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना अनुभवता यावे यासाठी या वर्षी मुंबई पाठोपाठ कोल्हापूर, वर्धा, नांदेड व जळगाव या ठिकाणी शिक्षणाची वारी आयोजित केली आहे. यापूर्वीच्या शिक्षणाच्या वारीस लाखों शिक्षकांनी भेट दिलेली आहे. शिक्षकांचा उत्साह पाहता मागील तीन वारीमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून येते. यावर्षी मुंबई विभागातील शाळा व्यवस्थापन समिती व शाळा व्यवस्थापन विकास समितीच्या सदस्याकरिता दिनांक 28 नोवेंबर ते 30 नोवेंबर 2018 या कालावधीत जीटी एक्सटी प्लॉट नंबर 13 एमएमआरडीए मैदान एशियन हार्ट हॉस्पिटल जवळ बीकेसी वांद्रे पूर्व मुंबई येथे शिक्षणाची वारी संपन्न होत आहे आपण या वारीतील वैविध्यपूर्ण स्टॉलला आवर्जून भेट देऊन ज्ञानार्जनाच्या महाकुंभात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे अंतर्गत संचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई, विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग आणि शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई मनपा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्राद्वारे केली आहे. शिक्षण क्षेत्रात चालू असलेल्या अनेक उपक्रमाची आणि प्रयोगाची माहिती या शिक्षणाची वारीमधून मिळणार आहे. शिक्षणाची वारी म्हणजे आता पंढरीची वारी ठरत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
संकलन : नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
9423625769
No comments:
Post a Comment