Monday, 26 November 2018

महात्मा ज्योतिबा फुले

शिक्षणाचा महामेरू : महात्मा फुले

भारतीय समाजसुधारणेत व स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते ती व्यक्ती म्हणजे जोतीराव गोविंदराव फुले. जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने सर्वत्र ओळखले जाऊ लागले. महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. गोर्‍हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, व्यवसायाने फुलांचा व्यवसाय करणारे त्यांचे कुटुंब म्हणून पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले. महात्मा फुले केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाई यांचेशी झाला. अगदी साध्या कुटुंबात जन्माला आलेले ज्योतिबा त्यांच्या कार्यामुळे आज प्रत्येकाच्या मनात आणि घरात पोहोचले आहेत. यासाठी त्यांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागले. तरीही न डगमगता प्रत्येक संकटाला यशस्वीपणे तोंड दिले. भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत जखडलेला होता. भारतात सर्वत्र अस्पृश्यता, जातिभेद, अंधश्रद्धा यांच्या समस्यानी कळस गाठला होता. या सर्व बाबीचा त्यांनी सखोल अभ्यास करून त्यावरील उपाय सुध्दा शोधून काढले. इंग्रज लोक आणि सावकार मंडळी शेतकऱ्यांना लुबाडत होते. पती मेलेल्या पत्नीला समाजात जगण्याचा अधिकार नव्हता. खेड्यापाड्यातील लोकांना अंधश्रद्धेचे बळी करण्यात येत होते आणि महिलांना घराबाहेर पडून शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. या सर्व समस्यांची सोडवणूक करण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे त्यांनी सांगितले. शिक्षणाविषयी बोलताना महात्मा फुले आपल्या गुलामगिरी पुस्तकात म्हणतात की, 

विद्येविना मती गेली

मतिविना नीती गेली

नीतिविना गती गेली

गतिविना वित्त गेले

वित्तविना शूद्र ही खचले

एवढे अनर्थ एका अविद्येने केले.

इंग्रजांनी पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी भारतात मिशनरी शाळा सुरू केल्या. त्या शाळेत मातृभाषेच्या ऐवजी इंग्रजीतुन शिक्षण दिल्या जात असे. महात्मा फुले मातृभाषेतून शिक्षण देण्याचाआग्रह करीत असत. उच्चवर्णीय वर्गातील मुले या मिशनरीमध्ये शिक्षण घेत असले तरी त्या शाळेत शिकणाऱ्या मुलींची संख्या नगण्यच होती. देशातील मुलींना शिक्षण मिळावे यासाठी महात्मा फुले यांनी जानेवारी महिन्याच्या पहिल्या तारखेला 1848 या वर्षी पुण्यातील भिडेच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्या शाळेत शिकवायला कोणीही तयार होत नव्हते. अश्या कठीण प्रसंगात त्यांनी सर्वप्रथम आपल्या अक्षरशत्रू पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकविले. भारतातील पहिली महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून उभे केले. सावित्रीबाई फुले या शाळेत शिकविण्यासाठी जातांना सनातनी व कर्मठ लोकांनी नाना प्रकारचे त्रास व यातना दिल्या होत्या. तरी कोणत्याही संकटाला न डगमगता, भरपूर कष्ट सोसत त्यांनी या शाळेत शिकवायला जाऊ लागल्या. तसेच समाजातील अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळपेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. भारतातील लोकांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे मिळावे, हंटर आयोगापुढे महात्मा फुले यांनी साक्ष देताना म्हणाले, " तळागाळातल्या सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळायला हवे आणि ते ही त्यांच्या मातृभाषेतून, तरच त्यांचा विकास होऊ शकतो."

समाजातील अंधश्रध्दा आणि जातीभेद पूर्णपणे नष्ट व्हावा यासाठी त्यांनी आपल्या जीवांचे रान केले. गोरगरीबांसाठी अहोरात्र झटले. निराश्रित आणि अनाथ लोकांना त्यांनी खरा आधार दिला. विधवा विवाहाला चालना देऊन त्यांनी समाजात स्थान मिळवून दिले. यशवंत नावाच्या मुलास दत्तक घेऊन त्यास डॉक्टर केले. म्हणजे ज्योतिबा नुसते बोलत नव्हते तर त्याप्रमाणे चालत देखील होते. बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले या म्हणीप्रमाणे. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवावे म्हणून त्यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. प्रसिध्द विचारवंत थॉमस पेन यांच्या विचाराचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला होता. साहित्य क्षेत्रात सुद्धा महात्मा फुले यांचे कार्य खूप मोलाचे आहे. 1873 मध्ये त्यांचे गुलामगिरी हे पुस्तक प्रसिद्ध झाले. शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 1883 मध्ये शेतकऱ्यांचे आसूड हा ग्रंथ त्यांनी लिहिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता त्यात विशद केली आहे. ब्राम्हणाचे कसब हे पुस्तक 1869 मध्ये लिहिले. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. सन 1889 मध्ये सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिताना त्यांचे शरीर त्यांना साथ देत नव्हते. अर्धांगवायूने उजवा भाग निकामी झाला असला तरी सदरील ग्रंथ डाव्या हाताने लिहून त्यांनी पूर्ण केले. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत महात्मा फुले यांनी भारतातील तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी झटत राहिले. प्रत्येक व्यक्ती शिकलाच पाहिजे त्याशिवाय त्यांची आणि पर्यायाने देशाची प्रगती अशक्य आहे असे त्यांचे म्हणणे होते. अश्या या महात्माचे अविरत कष्टाने २८ नोहेंबर १८९० मध्ये त्यांचे निधन झाले. आज त्यांची पुण्यतिथी त्यानिमित्त त्यांना आणि त्यांच्या कार्यास भावपूर्ण आदरांजली.

- नागोराव सा. येवतीकर

प्राथमिक शिक्षक

मु. येवती ता. धर्माबाद

9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...