दोन बहिणी
आयुष्यातील खाचखळगे संपले तरीही आठवणी मात्र कायम रहातात .. कारण त्या चटके देऊन गेलेल्या असतात.. अशीच दोन बहिणींची ही कथा जी आज शब्दात उतरवावी वाटली ..
रमा आणि हेमा ( नावे काल्पनिक ) दोघी सख्ख्या बहीणी बदलापूर सारख्या शहरात रहाणाऱ्या जन्मापासून लग्न होईपर्यंत ईथेच वाढलेल्या माहेरचा मोठा चौसोपी वाडा तोही ईमानात बक्षीस म्हणून मिळालेला खापर पणजोबाना .. घरात २५ ते ३० माणस आणि सतत पाहुण्यांचा राबता आणि पदरी अठरा विश्व दारिद्र्य दोघी बहिणी, भाऊ नाही उशीरा झालेल्या मुली त्यामुळे आई वडीलही लवकर थकलेले .. वडील पेंटिंग कामात वाकबगार, कंपनी लवकर बंद पडल्यामुळे ईकडची तिकडची हातावरची काम मिळतील ती करुन घर चालवत असत आणि आई लोकांकडे स्वैपाक कामे करुन वडिलांना हातभार लावत असे .. घरात सख्खे चुलत अनेक काका होते पण ते फक्त काका ह्या नात्यापुरतेच .. खरतर त्यांच्या पिढीतील त्या दोघीच मुली आधीच्या पिढीत मुलींचा सुकाळ होता म्हणून की काय कोण जाणे पण ह्या मुलींचा सतत द्वेष केला जात असे .. आजी अतिशय खाष्ट तीचे फक्त स्वत:च्या ६ मुलीच्या मुलांवर आणि धाकट्या मुलावर सुनेवर ओतप्रोत प्रेम आणि ह्या दोघींचे आई वडील आणि ह्या दोघी मात्र दुय्यम ..
त्यात सतत आत्या आत्तेभावंड ह्यांची ये जा आणि चंगळपण ईतकही कळत नसे की आपल्या भावाची परिस्थिती काय आपण आपल्या भावासाठी त्याच्या मुलींसाठी काही करतो का ? खाणं, पिणं मोठ्या भावाकडे आणि फिरायला सिनेमाला जाताना मात्र ह्याच भावाच्या मुलीसोबत नकोत .. त्याही दोघी आई वडीलांकडुन एक गुण शिकलेल्या कुणापुढेही हात पसरायचा नाही जो आजही अंगीकारुन आहेत .. एक दांडीवर आणि एक गांडीवर म्हणावे ईतकेच कपडे .. आणि एखादाच चांगला फ्रॉक कुठे बाहेर गेलच तर घालावा म्हणून .. आत्ते बहिणी येताना स्वत:चे कपडे कधी घेऊन आल्या नाहीत मग ह्यांचेच ठेवलेल्यातले वापरायचे अत्तेभाऊ तर २/२ महिने पडीक असायचे अगदी आत्याही पण ह्यांना हे सर्व आज जाणवतय जेंव्हा ते लोक हे सर्व विसरलेत आणि संबंध ठेवुन नाहीत अन्यथा त्यावेळी तर ह्या दोघी भावंडांची वाट बघत असायच्या आणि आपल्या घासातला घास देत होत्या .. पण हे त्यावेळी ईतकी मोठी वय झालेल्या आत्यांनाही कळु नये हे दुर्दैव .. की आपली लग्ने झालेली आहेत भावाकडे किती याव किती लुडबुड करावी भावाच्या संसारात भावजयीला किती त्रास द्यावा आईचे कान किती भरावेत .. फार वाईट पण आठवणीत राहीलेले दिवस आहेत ते ..
आज त्या दोघी खूप सुखात आहेत आनंदात आहेत आलेल्या प्रत्येक दुखा:ला सामोरे जाऊन खंबीरपणे उभ्या आहेत .. आणि शरीरानेही सुदृढ .. आपले एक नाव करुन आहेत, मुलंही हुशार आहेत .. अजुन तरी आई वडीलांचे नाव राखुन आहेत कुठे घालवलेले नाही .. आणि त्यावेळी त्यांना ज्यांनी ज्यांनी म्हणून त्रास दिला त्या प्रत्येकाचे मात्र काही ना काही प्रोब्लेम चालु आहेत .. म्हणतात ना करावे तसे भरावे मगच मरावे .. पण आजही त्या दोघींना मात्र वाटत आहे की त्या सगळ्यांचे चांगलेच व्हावे ..
पण काहीवेळा त्यांच्याही डोळ्यात पाणी येत आज त्यांना माहेर नाही ईतक मोठ घर होत त्याचा पुर्वी सगळ्यांनी उपभोग घेतला त्यांच्या तोंडातला घासही वेळेला काढुन घेतला पण आज ते सर्व विसरले आहेत .. आज त्यांना वाटत नाही की त्या मुलींना आपण माहेर द्याव .. जास्त अपेक्षा काहीही नाहीये त्यांची पण कधीतरी वाटत ना दोन दिवसाच माघारपण मिळाव .. पण त्याच दोघी एकमेकींच माघारपण करतात बर का आणि आनंदाने आयुष्य एन्जोय करतात .. कदाचित ही कथा अजूनही कुणाशी मिळती जुळती असेल किंवा अशी भावंडेही असतील जी पुर्वीच्या गोष्टी विसरले असतील पण त्यांना न्याय द्यायला परमेश्वर आहे .. आणि तो नक्कीच योग्य न्याय देत आहे देत राहील .. आपण मात्र आपले आयुष्य छान जगुयात नाही का ..
मोहिनी लिमये
बदलापूर ...
वृद्ध आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतांय..?
प्रत्येक आई वडील सतत मुलांबद्दल एक विचार करत असतात कि आपण आयुष्यात जेवढी मेहनत केली, जेवढा त्रास आपण भोगला हे सर्व आपल्या मुलांच्या वाटेला येऊ नये. आपले मुलं खूप शिकावीत व त्यांना चांगली नोकरी लागावी म्हणून ते बिचारे वेडी आशा घेऊन शहरात असेल तर कापड गिरणी किंवा इतर कुठल्याही ठिकाणी ग्रामीण भागात असतील तर शेतात राब राब राबतात व त्यांच्या जोडीला आई पण तेवडीच महत्वाची भूमिका बजावते तिला वाटते की खरंच माझा मुलगा खूप शिकावा असं म्हणून ती पण चार पाच घराची धुनी भांडी किंवा शेतात दिवस भर काम करते. जो तो रात्रदिवस काम करून आपल्या मुलांना लहानांच मोठं करतांना दिसतात. ते आपल्या मुलाला शाळेत घालतात, त्याला चांगले शिक्षण मिळावे त्याला चांगले कपडे मिळावे यासाठी आपले जीवाचं रान करतात अश्यातच त्यांचं आयुष्य जात. मुलं शिकतात कॉलेजला जातात व आपल्या आई वडिलांच्या मेहनतीच्या पैशावर तो मुलगा बूट, नवं नवीन कपडे अशी ऐश पेश जीवन जगतो व बिचारे आई वडील पण तेच स्वप्न पाहतात कि आपल्याला कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल पण आपल्या मुलांचं जीवन चांगले जायला पाहिजे. मुलं चांगली शिकली पाहिजे व नोकरीला लागली पाहिजे व मुलं पण चांगली शिकतात व नोकरीला पण लागतात तेंव्हा आई वडिलांच्या मनाला कुठे तरी शांतता मिळते आपल्या मेहनतीला फळ आले अस त्यांच्या मनाला वाटतं. आता आपला मुलगा शिकला नोकरीला लागला आता त्यांना उत्सुकता असते त्याच्या लग्नाची मग त्याच्या शिक्षणा योग्य मुलगी पाहून आपल्या मुलाचे ते लग्न करतात मग आता आई वडिलांना जग जिंकल्यागत वाटत. थोडे दिवस सर्वकाही नीट व्यवस्थित चालत राहतं,
परंतु इथून तर खरं आयुष्याशी संघर्ष करायची वेळ आता ते म्हातारे झालेल्या आई वडिलांवर येते कारण घरात सुनबाई आल्यावर मग नवीन नऊ दिवस चांगले जातात मग सुरवात होते लहान लहान गोष्टीवरून सासू सुना मध्ये भांडण होतात. सुनेला मग ते म्हातारे बिचारे घरात सहन होत नसतात मग, मुलगा आई वडिलांनी एवढी मेहनत करून आपल्याला इथपर्यंत पोचवले व आपल्याला कधी दुसऱ्याच्या शेतात कामाला पाठवलं नाही हे सर्व बायकोच्या प्रेमापोटी हे सर्व क्षणात विसरून आई वडिलांना वृद्धआश्रमात पाठवण्याच्या निर्णय घेऊन टाकतो, मुलाची बायकोला तर खूप आनंद होतो की म्हातारे म्हातारी वृद्धआश्रमात जाणार म्हणून, एखादा किल्ला सर केला असे तिला वाटतं.
परंतु त्या आई वडिलांनी रात्रंदिवस जीवाचं रान करून मुलाला शिकवलेलं असतं इथं पर्यन्त पोचवलेलं असतं आणि तोच मुलगा आता त्यांना वृद्धआश्रमात पाठवण्याच्या गोष्टी करतोय याचा विचार करून त्या म्हाताऱ्या आई वडिलांचं मन काय म्हणत असेल, किती दुःख होत असेल त्यांच्या हृदयाला. तरी ते बिचारे आई वडील वृद्ध आश्रमात जायला तयार होतात खूप जड अंतकरणाने वृद्ध आश्रमाची वाट धरतात. त्यांना आश्रमात जातांना खूप दुःख होत परंतु आपण वृद्ध आश्रमात राहून जर आपला मुलगा सुखी राहत असेल तर ते पण त्यांना मान्य असतं किती त्याग करतात ते आपल्या मनाचा फक्त आपल्या मुलांसाठी, मुलाच्या सुखासाठी आई वडील काहीपण करायला तयार होतात. परंतु मुलांना अस करतांना जरा पण दुःख होत नसेल का ? बायकोच्या प्रेमापोटी तो खूप आंधळा झालेला असतो. मी तर म्हणेन आपली संस्कृती काय आणि आपण आज आई वडिलांसोबत कसं वागतोय याचा विचार करायला हवा. पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती असायची लहान मोठे करून वीस पंचवीस माणसं घरात राहायची, दिवसभर घरातली काम पुरायची आता ती संस्कृती कुठेतरी लोप पावतांना दिसत आहे. प्रत्येक जण आता आई वडिलांना वेगळं ठेऊन नवरा बायको राजा राणीचा संसार करू पाहत आहे, परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे आपलं काही अस्तित्व नाही जे काही आहे ते सर्व आपल्या आई वडिलांच्या कर्तृत्वा मुळे आहे आणि आपण ज्यांच्यामूळे आज इथपर्यंत आहोत त्यांनाच वृद्धा आश्रमात पाठवुन राजा राणीचा संसार कसा करू शकतो याचा विचार केला पाहिजे. आई वडिलांच्या उतार वयात आपण आधार बनलं पाहिजे. परंतु दिवसेंदिवस वृद्धा आश्रमाची संख्या वाढत चालली आहे. कारण कि आजच्या परिस्थितीत आई वडिलांना सोबत ठेवण्याची कुणाचीच ईच्छा दिसत नाही. मी अस अजिबात नाही म्हणत कि सर्व मुल सारखी असतात परंतु आई वडिलांना वृद्धा आश्रमात पाठवणाऱ्याची संख्या पण कमी दिसत नाहीय. वृद्धा आश्रमात जर आपण गेलात तर त्या म्हाताऱ्या आजी बाबांचा तो निरागस चेहरा पाहून आपल्याला रडायला येईल. त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी केल्यावर कळतं की एका बाबांचा मुलगा डॉक्टर कुणाचा इंजिनिअर तर काहींची मुलं परदेशी नोकरी करतात. येतात वर्षातून एकदा भेटायला, बाकीचे महाशय तर त्यांना वृद्धा आश्रमात जसे टाकून परदेशात गेले तसे परत भेटायलाच येत नाही. काय म्हणत असेल हो त्या म्हाताऱ्या आई वडिलांचं मन, लहानपणी हेच आई वडील आपलं पोरगं शाळेतून उशिरा घरी आल नाही म्हणून सर्व गाव पालथं घालायची मुलाला शोधण्यासाठी, एक तास जरी उशिरा झाला तर मुलाला घरी येण्यासाठी तरी त्या आई वडिलांचं मन लागत नव्हतं आणि आज पोरगं मोठं झाल्यावर आई वडिलांना ढुकुन सुद्धा पाहायला येत नाही. खूप वाईट वाटतं हे सर्व पाहून, काही मुलं ठेवतात आई वडिलांना घरात पण त्यांना म्हातारपणात त्यांना नीट दिसत नसल्याने रात्री अपरात्री बाथरूमला जाण्यासाठी मुलाला उठवतात आणि आणि मुलाला या गोष्टीचा खूप राग येतो. रात्री उठायची कट कट नको म्हणून ते मुलं त्या म्हाताऱ्या आई वडिलांना रात्री पोटभर जेवण सुद्धा देत नाही कारण त्यांना रात्री त्रास नको म्हणून. खरंच खूप दुःख होत हे सर्व पाहिल्यावर. चार पाच दिवसांपूर्वी एका वर्तमान पत्राला बातमी वाचली होती की एका सोसायटी मध्ये आजी वारली होती व तिचा मुलगा व मुलगी परदेशात नोकरी करतात, त्यांना जेव्हा आजी राहत होत्या त्या ठिकाणच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्या मुलांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की आमच्या कडे वेळ नाही तुम्हीच त्यांचं अंतिम संस्कार करून टाका असं, काय म्हणावं या अश्या लोकांना आपली संस्कृती काय आणि आज आपण कसे वागत आहोत याच आत्मचिंतन करायला हवं. आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी किती वाईट दिवस काढले असतील ते आपण विसरू नये. आई वडिलांना वृद्धा आश्रमात पाठवण्या अगोदर दहा मिनिटं शांत डोक्याने विचार करून आपले लहानपणी त्यांनी आपल्यासाठी काय काय त्रास सहन केलाय तो आठवून बघा. नक्कीच आपलं मन परिवर्तन होईल बायकोला पण समजावून सांगा कि आपण आई वडिलांसोबत जे करतोय किंवा करायला जातोय हे योग्य नाही. नक्कीच असं केल्याने यांच्यातून मार्ग निघेल व आपले आई वडिलांना देवा सामान वागणूक दया त्याच्या उतार वयात त्यांना तुमची खूप गरज आहे. आई वडिलांची सेवा केल्याने पुढचे येणारे दिवस तुमचे नक्कीच चांगले येतील. नाही तर आई वडिलांना वृद्धा आश्रमात टाकून जर कुणी आनंदात राहण्याचं प्रयत्न करत असेल तर ते खूप चुकीच आहे असं करून तुम्ही आयुष्यात कधीच सुखात राहणार नाही एवढं मात्र नक्की आहे..
रामकृष्ण पांडुरंग पाटील
विखरण,ता.जि.नंदुरबार
मो.क्र.9408885775
व्यसनमुक्त कसे बनवाल ?
माणूस जन्माला येतो आणि सुंदर आयुष्य जगत असतो. बालपणातील जीवन तसे अविस्मरणीय अनुभवच. पण जसेजसे आपण मोठे होतो तसतसे आपल्या मनावर, जीवनावर, एकंदरीत व्यक्तीच्या जीवनावर घरातील वातावरणाचा, शेजार, शाळा, समाजातील मित्रपरिवार इ. सर्व घटकांचा परिणाम होत असतो. साधारणपणे 1990 च्या पुर्वी संयुक्त कुटुंबपध्दती होती. घरात कुटुंब प्रमुखाच्या हाती एकसत्ता कारभार असायचा. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक लहानथोरांना त्याचा धाक असायचा. पंरतू 1990 पासून आजतागायतचा काळ पाहिला तर आपल्याला विभक्त कुटुंबाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. याचा सर्व परिणाम म्हणजे संस्काराचा र्हास, नैतिक मूल्ये, संयम लोप पावताना दिसत आहे. या सर्वांचे परिणाम मनुष्य जीवनावर होतोय. घरातील मोठ्याचा धाक माणसावर नसल्यामुळे मनुष्य व्याभिचारी, व्यसनी होतोय. आपल्या सुंदर, सुखी जीवनाला मुकतोय. समाजात दारूचे व्यसन हे आयुष्य उध्वस्त करण्यास कारणीभूत ठरत आहे.
आईवडील आपल्या मुलीसाठी नेहमी निर्व्यसनी, कर्तृत्ववान जोडीदार शोधतो. परंतू कधी कधी त्यांची फसवणूक केली जाते. कर्तृत्ववान मुलगा कधी व्यसनीही निघतो किंवा नंतर काही कारणास्तव व्यसनी होतो. अशा वेळेस मात्र दोन्ही कुटुंबातील आईवडिलांना व मुलीला भयानक त्रास सहन करावा लागतो. आईवडील सधन असेल तर मुलगी नक्कीच आपल्या जोडीदाराला सोडण्याचा विचार करू शकते. पंरतू व्यसनी माणसाला असं वाऱ्यावर सोडून दिल्यास तो सुंदर आयुष्याला तर मुकतोच आणि काही दिवसांनी आयुष्यातून या जगाचा कायमचा निरोप घेतो. 'मनुष्य हा चुकीचा पुतळा असतो.' ज्याप्रमाणे चूका होतात त्याप्रमाणे त्या दुरुस्ती ही केल्या जातात. व्यसनी माणसाला अर्धवट सोडून जाणे हे निव्वळ पळपुटेपणा आहे. व्यसनी माणुस हा चांगला होऊ शकतो. व्यसनी माणसाचा स्वभाव स्वच्छ, निस्वार्थ असतो. केवळ एका अवगुणामुळे तो बदनाम होतो. कृपया आपला जोडीदार व्यसनी झाला असेल तर त्याला सोडू नका. कारण लग्नासारख्या पवित्र बंधनात सुखदु:खात, सातजन्माचे फेरे मारताना एकमेकांना साथ देण्याचे वचन घेतो. प्रत्येक स्त्री पुरूषाने हे निभावलेच पाहिजे. व्यसन का लागले ? त्यामागचे कारणे काय ? त्यावर उपाय शोधून योग्य उपचार केले तर तो आपले जीवन सुखी, सुंदरपणे जीवन जगू शकतो. व्यसनमुक्ती केंद्रे, शिबिरे, ध्यान, योगशिबिरे केले तर कायमचे व्यसन सुटते. व्यसनी व्यक्ती सोबत कसे राहावे ? प्रथम त्याला आई, पत्नीने समजून घ्यायला पाहिजे. त्या व्यक्तीला भरपूर प्रेम द्यावे. चारचौघात त्यांच्या चांगल्या गुणांचे कौतुक करावेत. दररोज सकाळी आणि रात्री पोटभर जेवण द्यावे. व्यसनामागचे कारणे व त्या मागचा इतिहास जाणून घेतला पाहिजे.
मनावर संयम ठेवले पाहिजे. घरातील वातावरण आनंदी व भयमुक्त ठेवले पाहिजे.
नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वागले पाहिजे. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केले पाहिजे. आवडीनिवडी समजून घेवून तसे वागले पाहिजे. ही दशसुत्रीचे जर आयुष्यात तंतोतंत पालन केले तर नक्कीच व्यसनी मनुष्य हा निर्व्यसनी होतोच. पुन्हा राजाराणीचा सुखी संसार सुरू होऊ शकतो. संसारात सुख-दु:खे, चढउतार असतातच. संयमाने सामना केल्यास, धैर्याने तोंड दिल्यास आयुष्य सुंदर होते. प्रत्येकाने जीवन जगताना ही सुत्रे पाळलीच पाहिजे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुटुंबातल्या सर्वच व्यक्तींना वर्षातून एकदा तरी योगाशिबिरात, ध्यानकेंद्रात जाणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आपण स्वतःला ओळखतो. मनावरील ताणतणाव दूर होतो. मन मजबूत बनते. आत्मविश्वास वाढून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. व्यसनी माणसाचे जीवन निरोगी बनते. मनोबल वाढते. त्यांच्यामधील विकार दूर करण्यासाठी तज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घेवून उपचारासाठी तयार होतो. एकमेकांना समजून जीवन जगण्यासाठी सक्षम होतो. म्हणुनच जीवन जगताना हे लक्षात ठेवले पाहिजे की, "हीच आमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे,
माणसाने माणसाशी माणसासम वागणे."
माणसाला माणसानेच समजून घेवून आपले जीवन सुखी समाधानाने जगणे हे माणसाच्याच हाती आहे. व्यसनी माणसात नक्कीच सुधारणा होऊ शकते, केवळ त्याला आपल्या जीवनसाथीने साथ दिली पाहिजे. रागाने, संयम न बाळगल्याने संसार उद्ध्वस्त होतो. मनोबल खचते, नैराश्य निर्माण झाले की, मनुष्य आपल्या आयुष्यातून उठतो. त्यामुळे लग्न झालेल्या प्रत्येकाने आपले जीवन सुखी होण्याचे बघावे. प्रेमाने जगही जिंकता येते. भारतरत्न पुरस्कार प्राप्त मदर टेरेसाने ही सांगितले की, 'प्रेमाची सुरूवात ही घरापासून होते. मग हळूहळू ती पसरत संपूर्ण जगापर्यंत पोहचते', म्हणुनच म्हटले आहे की,
"जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाणा पडेगा ! जिंदगी गम का सागर भी है,
हसके उस पार जाना पडेगा !"
या सुंदर जीवनासाठी एकमेंकाची साथ देणे, विश्वास ठेवणे, नियमित योगसाधना करणे ही पथ्ये सातत्याने जीवनात पाळल्यास नक्कीच व्यसनी मनुष्य निरोगी व सुंदर आयुष्य जगू शकतो. चला तर मग आपल्या घरातील, समाजातील आणि देशातील व्यसन दूर करण्यासाठीआपण सारे एकत्रित येऊन प्रयत्न करू या. व्यसनमुक्त भारत निर्माण करण्यासाठी आपले दोन्ही हातसदैव पुढे असणे अत्यंत आवश्यक आहे. जगात अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही. म्हणून लोकंम्हणतात की, याचे व्यसन सुटणे आता फार कठीण गोष्ट आहे. मात्र तसे काही नाही सकारात्मक दृष्टीने पाऊलपुढे केल्यास नक्कीच एक दिवस त्यांच्या जीवनात सोनेरी पहाटनक्की उगवेल.
सौ.सारिका राजेशजी सब्बनवार /मद्दलवार. कुंडलवाडी,नांदेड
मो.9518314224.
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारे 'बिग बी'
---------------------------------------------------------
एकीकडे राज्यातील बारा वर्षांतील स्थिती ; आत्महत्या सव्वीस हजार ; पात्र तेरा हजार, तर काही चौकशीच्या फेऱ्यात अशी बातमी वाचनात आली. दुसरीकडे 'बिग बी' नी फेडले युपीतील 1398 शेतकऱ्यांचे कर्ज... अमिताभ बच्चनने फेडले चौदाशे शेतकऱ्यांचे कर्ज, अशा मथळ्यातील बातमी नुकतीच परवा वाचनात आली.
ही बातमी वाचून कुणाला आनंद किंवा कुणाची समाधानी झाली की, नाही. माहिती नाही. परंतु या बातमीने नक्कीच मला एक सुखद धक्का दिला. दररोज किंवा एक - दोन दिवसाआड कुठे ना कुठे शेतकरी गळफास घेऊन आत्महत्या केली... कुठे विहिरीत उडी घेऊन शेतकरी आत्महत्या केली... तर कुठे विषारी औषध प्राशन करून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली... एवढेच नाही तर नापिकी, दुष्काळ, अतिवृष्टी, कर्जबाजारीपणाला कंटाळून तर कुठे शेतकऱ्यांनी स्वत:चा ऊस पेटवून त्यात उडी घेऊन आत्महत्या केली. अशा एक ना अनेक बातम्या वाचायला आणि पाहायला मिळतात. यापेक्षाही अधिक सांगायचे झाले तर नुकतीच एक घटना परवा नांदेड जिल्ह्य़ात घडली. ती ऐकून मन सुन्न झाले. काय बोलावे काही कळत नव्हते. थोड्याशा कर्जापाई शेतकऱ्यांनी स्वत:चेच सरण रचून त्यात उडी घेवून आत्महत्या केली. बातमी अनेकांनी वाचली. काहींनी त्या कुटुंबातील लोकांना आर्थिक मदतही केली. पण त्या पलीकडे जाऊन मला विचार आला आज पहाता जगाचा पोशिंदा म्हणून त्यांना ओळखल्या जाते. आज दिवसागणिक आत्महत्या होते. याचे कोण किती गांभीर्य घेते. हे मला कळण्यापलीकडचे आहे. एक आत्महत्या झाली... दोन झाल्या... तीन झाल्या... असे वाढत शंभरावर गेल्या. आज पाहाता त्या हजारावर पोहचल्या आहेत. आपण जर असेच गप्प राहिलो तर त्या लाखांवर जातील आणि एक दिवस असा येईल शेती भरपूर दिसेल. पण त्यात घाम गाळून त्या घामाचा मोती पिकविणारा शेतकरी मात्र दिसणार नाही. याचे खापर कोणावर फोडावे कळत नाही. पण कोणीही असो माझा शेतकरी, माझा कष्टकरी सन्मानाने जगला पाहिजे. त्यांना कुणीही खोटे आश्वासन देऊन त्यांचा कुणी फायदा घेवू नये, आणि दिखाव्यासाठी कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती करू नये, जे काही करायचे आहे. ते सरळ - सरळ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचेल असे करा. मराठवाडा असो की, विदर्भ आज संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
असा एकही दिवस जात नाही. की, त्या दिवशी आत्महत्या केली नाही. कुठे एक... कुठे दोन... कुठे तीन अशा बातम्या रोजच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून असो की, इलेक्ट्रॉनिक न्युज चॅनेलच्या माध्यमातून असो. रोजच वाचायला, पाहायला मिळतात. हे आता थांबायला हवे. शेतकरी आत्महत्या करून पक्षी उडाल्यासारखा उडून जातो. तो जरासाही विचार करत नाही. पण त्यांच्या कुटुंबांची त्यांच्या घरची काय परिस्थिती असेल त्यांच्या गुराढोरांना मुक्या जनावरांना चारा कोण टाकणार त्यांना पाणी कोण पाजणार, त्या शेतकऱ्यांच्या पत्नीचे काय हाल असतील तिला कोण आधार देईल. मुलीचे लग्न कोण करेल, मुलाच्या शिक्षणाचे काय होईल. तांन्हूल्या बाळाचे भविष्य कसे असेल. हे त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी गेल्यावर त्या हंबरडा फोडणाऱ्यां त्यांच्या पत्नीकडे पहिल्यावर आणि त्यांच्या सोडून गेलेल्या चिमुकल्या लेकराकडे पाहिल्यावर कुणाचेही मन सुन्न पडेल. काही जण त्या कुटुंबातील मुला - मुलींच्या शिक्षणाची, लग्नाची जिम्मेदारी उचलतात. तर काही तुटपुंजी मदत देवून कळवळा दाखवतात. पण त्यातील अनेक जण असतात, जे की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी प्रयत्न करतात. आणि काही सुपरस्टार अमिताभ बच्चन सारखे देवरुपी माणसे असतात.
जे की, महाराष्ट्रातीलच नाही तर उत्तर प्रदेशासह देशातील विविध राज्यातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी करून माणुसकीचे दर्शन घडवत असतात. असे महान कार्य एवढ्यावरच न थांबता ती एक चळवळ झाली पाहिजे. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, नेते मंडळी, उद्योगपतीसह कर्जबाजारी व गरीब शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करून त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी करून या जगाच्या पोशिंद्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून त्यांना धीर देण्यासाठी आता पुढे आले पाहिजे.
आपण एखाद्या माॅल मधून भाव न करता तेथील भाजीपाला फळ आदी खरेदी करतोत. पण बाजारात गेलो की, आपण भाव करत असतोत. शक्यतो शेतकऱ्यांच्या मालाचा भाव करू नका. कारण आपल्या दोन पैशाने त्यांचे घर चालत असते. तो त्यातच कुटुंबाचा गाडा हाकतो. येत्या काळात एकही आत्महत्या होणार नाही. यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. शेतकऱ्यांनी खचून न जाता प्रयत्न करावे. 'लहरोंसे डरकर नौका पार नहीं होती. और कोशिश करने वालो की, कभी हार नहीं होती', याप्रमाणे शेतकऱ्यांनी छोट्याशा कर्जाला कंटाळून किंवा नापिकी, दुष्काळ, आणि अतिवृष्टीला, संकटांना घाबरून खचून न जाता... पुन्हा नव्याने... नव्या जोमाने शेतात विविध प्रयोग करून भरघोस उत्पन्न घ्यावे. 'जय जवान. जय किसान' बळीराजा येणारे दिवस तुमचेच आहेत. आता 'रडायचे नाही. तर लढायचे' पुन्हा नव्या जोमाने कामाला लागायचे. आणि आपल्या भारतदेशाचा जगाला हेवा वाटेल असे कार्य करायचे. बस्स येवढेच यानिमित्त...
-राजेश जेटेवाड बरबडेकर
रा. मांजरम
ता.नायगांव खै. जि. नांदेड
गजल - हाक
भावार्त साद मेघा समजून आज जा रे
व्याकूळ शेत माझे बरसून आज जा रे
श्वासास सोडणारे मातीतले बियाणे
ओसाड या धरेला सजवून आज जा रे
पाशात सावकारी जखडून जीव जातो
फासाच घट्ट बसला उघडून आज जा रे
गर्भारली धरा ही सोन्यास जन्म देते
घामास दाम माझ्या ठरवून आज जा रे
दुष्काळ जीवघेणा आता किती सहू मी
भाग्यास फक्त थोडे उजळून आज जा रे
दुष्काळ वाढणारा ,जीवास जाळणारा
मेघा जरा दया कर झिरपून आज जा रे
जयराम मोरे सोनगीर ता.जि धुळे
७७०९५६५९५७
विषय :- बळी पिकवितो मोती
बैल जोड नांगराला
धारा घामाच्या सोबती
हात मातीत राबती
बळी पिकवितो मोती
उन्हा पावसाची नसे
त्याला कधी च रे भीती
चिंता ती काळ्या आईची
बळी पिकवितो मोती
काळ्या मातीतून कशी
डोले हिरवी ही शेती
साऱ्या जगाचा पोशिंदा
बळी पिकवितो मोती
दाने कणसाला येता
रान खुशीत डोलती
हर्ष मनी साठवुनी
बळी पिकवितो मोती
होता कष्टाचे रे चीज
भरे धान्याची ही पोती
सुख आले दारी आज
बळी पिकवितो मोती
डॉ .शुभांगी धारमळकर ,पुणे.
प्रिया आज माझी कळली
प्रिया आज माझी कळली,
आठवण जुनी गं उजळली... !!धृ!!
दुरदेशीच्या पाखरा ये जवळी
जशी उमलते नाजुक कळी
वाटेकडे प्रित भोळी वळली
प्रिया आज माझी कळली... !!१!!
नयनांत उभी काजळ गुणी
आठवांत जातो मी भिजूनी
आसवांत बघ सांज ढळली
प्रिया आज माझी कळली... !!२!!
दुराव्याचा नको आता श्वास
अंतरातला व्याकूळ,रोज प्रवास
अबोल प्रीत धार खवळली
प्रिया आज माझी कळली.. !!३!!
गुंफुनी नाते, द्वंद्व मनाचे
साजन सजनी व्यक्त क्षणांचे
ओठांवर होकार दिशा जुळली
प्रिया आज माझी कळली... !!४!!
रोहिदास होले
गोपाळवाडी, दौंड, पुणे
मो..९०२८३४१५३६
shrinathhole2014@gnail.com
झाली कविता...
रुप तुझे सावळे
नाक नकशा भारी
चाले जशी अप्सरा
नार तू गं कोवळी
हस्य तुझे फुलता
जणू बहार बोले
मिठी ताण कोयली
जशी मंजूळ बोले..
तिक्ष्ण नयन भारी
करी जादूची सरी
कधी चाहूल अशी
मन होई गं भारी
कानी बाळी तुझी गं
साद शुंगार वाढे
ओठा काळी तुझी गं
रुप चेहरी चढे..
केस काळे तरंगी
लाबं लचक तिचे
रुप करे घायळ
छाप ह्दयी हो तिचे
राहे सिधी ती साधी
नाही केला देखावा
मनी सैदव धारे
तेजरुपी तो ठेवा..
पायी पैंजण वाजे
माळ गळ्यात शोभे
हाती चुडा बागड्या
देव तारुण्य बघे .
आज गुंफले तुला
काव्य बंध रचिले
झाली पुर्ण कविता
शब्द आज जगले
उमाकांत काळे,अकोला
९९२२८५५५३९
http://umakantk.blogspot.com
लावणी
राया चला शेतात पेरणी करू
वाफस्यावरती आलंय सगळं रान
नाही आता उरलं कशाचं भान
राया चला शेतात पेरणी करू
तापली किती होती जमीन औंदा
प्रेमाचा ऋतूही बरसला हो भारी
नेसलिया मी बघा ईरकल न्यारी
प्रीतीची बियाणं एका ओळीत पेरू
राया चला शेतात पेरणी करू
येईल पीक बघा हिरवं जोमानं
मेहनत करावी लागंल आता नेटानं
वाफ्यामध्ये पाणी सोडा हळूहळू
सावकाश होऊ द्या गडबड नका करू
राया चला शेतात पेरणी करू
भरात येता पीक सारं तंग होईल पोटरी
राखण करण्या हाती असू द्या गोफणी
मंजुळ गाणं गातया झाडावर हे पाखरू
भरल्या खळ्यात चांदणरात्री फेर धरू
राया चला शेतात पेरणी करू
संतोष बोंगाळे
पिंपळखुंटे जि. सोलापूर
मो. ९९२३९००८४०
जुल्मी हे तक्त.........
धमन्यातील रक्त अाज उसळू द्या गड्यानो
जुल्मी हे तक्त अाज कोसळू द्या गड्यानो
दाबला जातो अावाज सामान्य माणसाचा
घोटला जातो गळा इथल्या लोकशाहीचा
दडपशाहीच्या दर्पाने श्वास गुदमरु लागले
स्वतंत्र्य या भारतात पारतंत्र्य भासू लागले
न्यायासाठी भटकंती अन्यायाचे स्तोम माजले
हक्काने फिरवली पाठ कर्तव्यास नाही जागले
जातपात धर्म द्वेषाचे बीज पेरले जाते
उच्च निच्चतेचे भेद मेंदुवर कोरले जाते
समतेला नाही थारा बंधुत्व नाही उरले
सहिष्णुता झाली नष्ट अत्याचारांनी घेरले
मारुती खुडे,माहुर
9823922702
No comments:
Post a Comment