Thursday, 15 February 2018

बालपणीचे संस्कार भाग 08

सत्यं वद: खरे बोला

लहानपणापासून आपणाला एक धडा वारंवार शिकविला जातो ते म्हणजे नेहमी खरे बोलावे, खोटे कधी बोलू नये. शाळेत जाण्यापूर्वी घरात आई-वडील, भाऊ-बहिण यांच्याकडून नेहमीच खरे बोला याची शिकवण घेऊन आपण जसे ही शाळेत जातो तेथे शिक्षक ही आपणाला तेच धडा शिकवितात. खरोखरच खरे बोलणे एवढे महत्वाचे आहे काय ? निश्चितच त्याचे उत्तर होय आहे. एक खोटे (असत्य) लपविण्यासाठी हजारदा खोटे बोलावे लागते. तेंव्हा सत्य बोलण्याची सवय ठेवा म्हणजे कसलीही चिंता करावी लागणार नाही आणि आपण काय बोललो हे लक्षात ही ठेवावे लागणार नाही, असे आर्य चाणक्यानी आपणाला फार पूर्वी उपदेश दिलेला आहे. शाळेत असताना आपणाला याचा वारंवार अनुभव आलेला असेलच. शाळेला यायला उशीर का झाला ? गृहपाठाची वही का आणली नाही ? यासारख्या प्रश्नांची खरी उत्तरे दिल्यास आपणाला कशाची ही भीती वाटत नाही मात्र त्याची खोटी उत्तरे दिली तर आपल्याला नेहमी काळजी लागून राहते की, माझा खोटेपणा उघडे तर पडणार नाही ना ! अशी शंका नेहमी मनात राहत होती. खोटे बोलणाऱ्याची स्थिती चोरांच्या मनात चांदणे या म्हणीप्रमाणे असते. कधी कधी आपली खोटे बोलणे पकडल्या गेली की, खुप वाईट वाटते. खोटे बोललेले दीर्घकाळ टिकून राहत नाही हे त्रिकालबाधित सत्य आहे. एक दोन वेळेस खोटे बोलून चालून जाईल मात्र यामुळे खोटे बोलण्याची सवय लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. खोट्याचा जरी विजय झाला, तरी तो क्षणभंगुर असतो असे प्रसिद्ध विचारवंत लियोनार्ड यांनी म्हटले आहे. याचा अनुभव जीवन जगताना आपणास अनेक वेळा येतो. खोटे बोलल्यामुळे क्षणभर आनंद ही मिळतो पण त्याचे परिणाम आयुष्यभर सोबत राहतात. वारंवार खोटे बोलू लागलो तर त्याचा परिणाम असा होतो की, एखादे वेळी जरी आपण खरे बोलत असू तरी ते पुढच्याना खोटेच वाटत राहते. म्हणजे ही " लांडगा आला रे आला " गोष्टीतील मेंढपाळासारखी अवस्था होते. शेख सादी यांनी म्हटल्याप्रमाणे खोटे बोलणे हे तलवारीने केलेल्या जखमेप्रमाणे असते. जखम तर भरून येते मात्र त्याची खूण कायम राहते.
खरे बोलण्याची सवय ही घरातून होत असते. घरातील प्रत्येक व्यक्ती खरे बोलण्याविषयी जागरूक असणे अत्यंत महत्वाचे आहे. लहान मुलांवर खरे बोलण्याचे सा संस्कार घरातूनच दिले जातात. घरातील प्रत्येक सदस्याच्या बोलण्याचे आणि वागण्याचे सूक्ष्म निरीक्षण करतात आणि त्याच पध्दतीने वागण्याचा प्रयत्न करतात. विशेष करून माता भगिनी यांनी खरे बोलण्याचा कटाक्ष पाळावा. मुले जास्तीत जास्त वेळ आई च्या सोबत असतात त्यामुळे त्यांनी मुलांवर खोटे बोलण्याचे संस्कार होणार नाहीत याची काळजी घेतली तर मुले खरी बोलणारी निघतात. आजकाल ची मुलं आई-वडिलांना बनवाबनवी करण्यात पटाईत आहेत. या बाबीचा कुठे तरी आत्मपरीक्षण होणे अत्यावश्यक आहे. तसे राजकारणी लोकांना खोटे बोलण्या चे सांगावे लागत नाही म्हणून लहानपणी कोणी खोटे बोलले की, हा भविष्यात नेता बनेल असे हसण्यावरी नेऊन बोलत असे. राजकारणात खरे बोलणाऱ्या नेत्यांची काहीच किंमत नसते असे आजवरच्या अनुभवावरुन लक्षात येते. मात्र जो जनतेला विसरतो किंवा खोटी आश्वासने देतो जनता अश्या नेत्यांना त्यांची खरी जागा दाखवितात हे ही सत्य आहे. काही मंडळी आपल्या व्यवसायाशी निगडित खोटे बोलतात. ते त्यांचा व्यवसाय असतो, त्याशिवाय त्याची भरभराटी होत नाही. मात्र तेथे देखील त्याचा अतिपणा वाढला की एक ना एक दिवस माती होणार हे ठरलेले आहे. म्हणून जे सत्यमेव जयते चा अर्थ समजून घेतात तेच जीवनात यशस्वी होतात. तुमच्या जवळ पैसा, संपत्ती, मोठे घर, जमीन, जुमला, दागदागिने किती मोठ्या प्रमाणात आहे याला काहीच किंमत नाही. तर तुमचे बोलण्यावर किती जण विश्वास ठेवतात हे महत्वाचे आहे. लोकांचा आपल्या वरील विश्वास पैश्याला बघून नसतोच तो असतो आपल्या सत्य बोलण्यावर. राजा हरिश्चंद्र यांना आपण सर्वजण सत्यवान राजा म्हणून ओळखतो कारण त्यांनी जीवनात नेहमी सत्यच बोलत राहिले, खोटे कधीच बोलले नाहीत. आपण सुध्दा खरे बोलण्याची सवय लावून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. गौतम बुध्दांनी सर्वाना सत्यं वद: म्हणजे खरे बोला याचे आचरण करायला सांगितले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी इंग्रजा विरुद्ध लढा देताना नेहमी सत्याचा आग्रह केला. माझे सत्याचे प्रयोग हे त्यांचे पुस्तक वाचल्यानंतर त्यांच्या जीवनात सत्य किती महत्त्वाचे आहे हे कळून येईल. काही वेळा नकळत चूका होऊ शकतात मात्र वारंवार तीच चूक करणे म्हणजे ते घोडचूक होते. म्हणून फ्राउड यांचा उपदेश म्हणतो की, जो मनुष्य खोटे बोलायला घाबरतो, तो कशालाच घाबरत नाही हे  ध्यानात घेऊन आपण यापुढे खरे बोलू या आणि आपले जीवन निर्भय बनवू या.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...