Thursday, 15 February 2018

बालपणीचे संस्कार भाग 06

*यशस्वी जीवनात वेळेचे नियोजन*

भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून वेळेचे महत्त्व सांगितलेले आहे. शालेय जीवनात आपण वेळेचे महत्त्व जाणून न घेता त्याचा अपव्यय म्हणजे वाया घालवित राहलो, तर भविष्यात यशस्वी जीवन कधीच जगु शकत नाही. जगात कुणी श्रीमंत असतील वा गरीब असतील सगळ्याजवळ वेळ मात्र समसमान आहे. जे कुणी वेळेचा सदुपयोग करतील तेच जीवनात प्रगती करू शकतील. जगात तीन गोष्टी प्रसिध्द आहेत ज्या की एकदा गेल्या नंतर परत मिळविता येत नाहीत. त्या म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण, तोंडातून बाहेर पडलेला शब्द आणि सर्वात महत्वाची म्हणजे गेलेली वेळ. आजची गेलेली वेळ कितीही पैसा खर्च केला आणि कितीही धडपड केली तरी परत मिळविता येत नाही. त्यामुळे आपणाजवळ उपलब्ध असलेल्या वेळेचे योग्य नियोजन करता येणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपी जाईपर्यंत उपलब्ध वेळाचे वेळापत्रक तयार करावे. ज्याप्रकारे शाळेतील वेळापत्रकाप्रमाणे तासिका आणि अभ्यासक्रम यांचे नियोजन केले जाते. त्यामुळेच शाळेतील सर्व प्रक्रिया योग्य पध्दतीने घडत असतात. आपल्या जीवनातील सकाळी झोपेतुन उठणे, खाणे, खेळणे, शाळा, शिकवणी, टी. व्ही. पाहणे आणि अभ्यास करणे या सर्व क्रियांच्या वेळा वेळापत्रकात नमूद करून त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केल्यास वर्षभरात ठरविलेली सारेच ध्येय साध्य होताना दिसून येतात. फक्त दहावी आणि बारावी हे अति महत्वाचे वर्ष आहे म्हणून बाकीच्या वर्षात अभ्यास न करता याच वर्षात खुप अभ्यास केल्याने यश मिळत नाही. अभ्यासात सातत्य आणि नियमितपणा ठेवल्यास महत्वाच्या वर्षी कोणत्याही विषयाची भीती वाटत नाही आणि अभ्यास डोईजड वाटत नाही. मित्राशी गप्पा मारत बसणे, जास्त वेळ टी व्ही पाहणे आणि खेळणे इत्यादी प्रकारात वेळेचे नियोजन केल्यास त्याचा नक्कीच उपयोग होतो. आपल्या मेंदुला आणि मनाला वेळापत्रकाची सवय लागली की, "हे काम पूर्ण करा " अशी म्हणण्याची वेळ कोणावरसुद्धा येणार नाही.

- नागोराव सा. येवतीकर 
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...