Thursday, 15 February 2018

A01 वाचन

वाचा आणि विचार करा

*वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने.......!*

वाचनाने माणूस समृद्ध होतो. त्यातल्या त्यात नियमित वाचन केल्यामुळे ज्ञानात देखील वाढ होते. पण ही वाचन करण्याची आवड कशी निर्माण करावी आणि वाचन कौशल्य कसे विकसित करावे याबाबत कोणी बोलताना दिसत नाहीत किंवा मार्गदर्शन देखील करताना आढळून येत नाहीत. त्यामुळे या विषयी थोडी चर्चा करण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखातून केला आहे.
प्राथमिक वर्गातील मुलांची वाचन क्षमता वाढली तर त्यांची प्रगती निश्चितपणे होऊ शकते त्यामुळे मुलांची वाचन गती कशी वाढविता येईल यावर थोडा विचार होणे आवश्यक आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड आणि योग्य गती मिळविण्यासाठी खालील प्रकारच्या उपाय योजना करण्यात आले तर त्याचे निश्चित असे परिणाम पाहायला मिळतात.
मुलांना रोज पाच वाक्ये वाचन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यापासून सुरुवात करावी. वाचनासाठी तसे वातावरण तयार करणे आवश्यक आहे. अगदी सुरुवातीला लहान लहान गोष्टीची पुस्तके त्यांना वाचण्यास द्यावी. सुरुवात सोप्या वाक्याने केली तर मुलांमध्ये वाचनाची गोडी लागते. त्यानंतर हळूहळू जोडाक्षर किंवा मोठे शब्द असलेले वाक्य वाचण्याचा सराव करून घ्यावे. सध्याच्या काळात मुलांचे वाचनाकडील लक्ष फार कमी झाले आहे. ही वाचन संस्कृती वाढविण्यासाठी शाळेतून विशेष प्रयत्न व्ह्ययला पाहिजे. आज मुले भरपूर लिहितात मात्र वाचन करा असे म्हटले की कंटाळा करतात. लहानपणी वाचनाची सवय लागली तर मोठेपणी ही सवय त्यांच्या कामी येऊ शकते. म्हणून शाळाशाळामधून रोज एक तास वाचनासाठी राखीव ठेवून मुलांना त्यांच्या आवडीचे पुस्तक वाचण्याची संधी दिली जावी. जेथे लहान वर्ग आहेत तेथे वाचलेल्या पुस्तकांची नोंद शाळानी ठेवायची आणि उच्च प्राथमिक वर्गात मात्र मुले वाचलेल्या पुस्तकांची नोंद ठेवल्यास योग्य परिणाम भविष्यात पाहायला मिळतो.
मुलांचे वाचन करून घेताना काही गोष्टी आवर्जून लक्षात घ्यावे म्हणजे वाचन योग्य दिशेने होईल. अगदी सुरुवातीला वाचन करताना प्रत्येक शब्दावरुन पहिले बोट फिरवावे त्यामुळे आपले लक्ष त्या शब्दावर राहते आणि मन एकाग्र राहण्यास मदत मिळते. सुरुवातीला मोठ्याने प्रकट वाचन करावे त्यामुळे त्या शब्दाचे ध्वनी मुलांच्या लक्षात राहील. त्यानंतर मूक वाचनाचा सराव केल्यास वाचन चांगल्या पध्दतीने करता येते. असे वाचन करण्याचा भरपूर सराव झाल्यावर पुढे चालून मौन वाचन करताना जसे शब्दावरुन बोट फिरवत होतो तसे बोट न फिरवता फक्त डोळे फिरवावे. त्यामुळे आपली वाचनाची गती वाढत राहते. एका मिनीटात आपण किती शब्द वाचतो यावर आपली वाचनाची गती ठरविली जाते. अशा क्रियेचा सर्वात जास्त फायदा म्हणजे आजुबाजुला किती ही गोंधळ असला तरी आपले लक्ष विचलित होत नाही, मन एकाग्र राहते. प्राथमिक वर्गात मुलांचे वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी समान आवाज असलेले शब्द, शेवटचे अक्षर समान असलेले शब्द, जोडशब्द, गमतीदार शब्द अशा शब्दांचे वाचन केल्यास त्याचा नियमित वाचन करताना फायदा होतो जसे की, अक्कल शब्दाचे वाचन झाल्यावर त्याच्या सारखेच आवाज असलेले नक्कल, शक्कल, टक्कल अश्या शब्दाचे वाचन केल्यास मुलांची वाचनाची गती नक्की वाढेल. तसेच त्यांची शब्दसंपत्ती देखील वाढ होईल. जेवढे जास्त शब्द मुलांना ओळखीचे होतील तेवढे त्याची वाचनाची गती चांगली होते. त्याचसोबत वाचनात नियमितपणा असणे आवश्यक आहे. डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्त वाचन प्रेरणा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. त्यानिमित्ताने एक-दोन दिवस वाचायचे आणि बाकी इतर दिवशी विसरून जायचे असे झाले तर वाचनात योग्य गती मिळत नाही. खरी वाचन प्रेरणा घ्यायची असेल तर महात्मा गांधी,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्यासारखे नियमित वाचन करीत रहावे लागते. तीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. म्हणून रोज किमान एक तास वाचन करण्याची दिवसातील एक वेळ ठरवावी आणि त्याच वेळी वाचन करीत रहावे.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
जि प प्रा शा चिरली
ता बिलोली जि नांदेड 
94236

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...