Thursday, 15 February 2018

बालपणीचे संस्कार भाग 03


कागदाची बचत ; पर्यावरणाला मदत

मुलांनो, कागदाचा आणि आपला संबंध फार जुना आहे. ज्यावेळी घर सोडून तुम्ही आईं-बाबांचे बोट धरून शाळेत प्रवेश घेतलात तेंव्हापासून जो कागदाचा संबंध आला तो आयुष्यभरासाठी. काही लिहावयाचे असेल की, आपण कागद शोधण्यास सुरुवात करतो. कागदाचा वापर करण्यापूर्वी, तो कागद कश्यापासून तयार करतात ?याविषयी आपण कधी ही जाणून घेतले नाही किंवा तसा प्रयत्न देखील केला नाही. पुरातन काळातील लोक लिहिण्यासाठी झाडांची पाने, साली आणि वल्कले आदिचा वापर करीत असत. त्यानंतरच्या काळात म्हणजे इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात कागदाचा शोध लागला आणि आपली लिहिण्याची प्रक्रिया सहज, सोपी आणि सुलभ झाली. कागदाची निर्मिती करण्यासाठी पर्यावरणाची मदत घ्यावी लागते. कागद तयार करण्यासाठी लाकूड,  बांबू,  चिंध्या,आणि  गवत इत्यादीचे लगदा तयार केला जातो म्हणजे यासाठी वृक्ष तोड करावी लागते. त्यास्तव त्या पर्यावरणावर याचा भार पडून पर्यावरण नष्ट होऊ शकते. आपण मागे-पुढे कसलाही विचार न करता वहीतले कागद टराटरा फाडून फेकतो. परंतु कागदाचा पुरेपुर वापर करायला शिकणे आणि तशी सवय लावून घेणे फारच महत्वाचे आहे. एका अर्थाने आपली ही क्रिया पर्यावरणाला पूरक राहणार असून ते मदतच ठरणार आहे. मग कशी करता येईल आपणाला कागदाची बचत ? याचा थोडा विचार करू या. एखाद्या कागदावर थोडीशी रेष पडली म्हणून आपण पूर्ण कागद न लिहिता सोडून देतो किंवा फाडून टाकतो. असे न करता त्याचा पूर्ण वापर करावा. गेल्यावर्षीच्या वहीतील शिल्लक कोरे कागद वेगळे करून त्याची एक स्वतंत्र वही तयार केल्यास वर्षाकाठी एक-दोन वह्या तरी नक्की वाचवू शकतो. गणिताचा सराव कागदावर न करता पाटी-कलम द्वारे केल्यास चांगले. त्यामुळे सुध्दा कागदाची बचत होईल. पाठमोरी कोरे असलेले कागद रफ कामासाठी वापरण्याची सवय लावून घ्यावी. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घरी जमा झालेल्या सर्व लग्नपत्रिकेच्या पाठमोरी बाजु कोरीच असते, त्याचा वापर आपण कधी केलाय का ? शाळेत खेळले जाणारे राजा, राणी, चोर आणि पोलिस या खेळासाठी आपण किती कागद खराब करतो ? याचा कधी विचार केलाय का ? आपल्या हातून कळत-नकळत असे अनेकदा कागद खराब करण्याचे प्रकार घडतात. आपण वर्षभरातून एखादे-दोन वह्याच्या कागदाची बचत केली तर आपल्या हातून पर्यावरण बचतीचे महान कार्य झाल्या सारखे होईल. चला तर मग आजपासून आपण कागदाचा पूर्ण वापर करूया आणि पर्यावरण वाचवू या.

- नागोराव सा. येवतीकर,
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...