नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण मेजर सोमनाथ शर्मा यांच्या विषयी माहिती पाहू या. लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
Video पाहण्यासाठी मेजर सोमनाथ शर्मा येथे क्लिक करावे.
🇮🇳 परमवीर चक्र विजेते वीर मेजर सोमनाथ शर्मा 🇮🇳
मेजर सोमनाथ शर्मा हे भारतीय सैन्याचे पहिले परमवीर चक्र सन्मानित अधिकारी असून त्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या अद्वितीय शौर्यामुळे ते भारतीय सैन्याच्या इतिहासातील अजरामर नायक ठरले आहेत.
मेजर सोमनाथ शर्मा यांचा जन्म ३१ जानेवारी १९२३ रोजी हिमाचल प्रदेश मध्ये झाला. ते एका देशभक्त आणि सैनिकी परंपरेच्या कुटुंबात वाढले. त्यांचे वडील अमरनाथ शर्मा हे भारतीय सैन्यात ब्रिगेडियर पदावर कार्यरत होते. लहानपणापासूनच देशसेवेची प्रेरणा त्यांना घरातूनच मिळाली. त्याचे मित्र आणि कुटुंबीय त्यांना सोम असे म्हणत असत.
त्यांनी शिक्षणानंतर प्रिन्स ऑफ वेल्स रॉयल इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडून येथे प्रशिक्षण घेतले आणि पुढे इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) मधून अधिकारी म्हणून नियुक्त झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी सैन्यसेवेला प्रारंभ केला आणि लवकरच ते कुशल अधिकारी म्हणून ओळखले जाऊ लागले.
सन १९४७–४८ च्या काश्मीर युद्धात, पाकिस्तान समर्थित घुसखोरांनी श्रीनगरकडे आक्रमण केले होते. त्या वेळी मेजर सोमनाथ शर्मा हे ४ कुमाऊ रेजिमेंट मध्ये कंपनी कमांडर होते. त्यांना जखम झालेली असतानाही त्यांनी रणांगण सोडले नाही. २७ ऑक्टोबर १९४७ रोजी बदगाम (काश्मीर) येथे त्यांनी आपल्या कंपनीचे नेतृत्व करत शत्रूचा जोरदार मुकाबला केला.
शत्रू संख्या आणि शस्त्रसामग्रीत जास्त असूनही त्यांनी अत्यंत धैर्याने लढा दिला. त्यांनी आपल्या सैनिकांना प्रेरणा देत संदेश पाठवला —
"शत्रू संख्येने खूप मोठा आहे, मी एक इंचही मागे हटणार नाही पण आमच्या शेवटच्या माणसापर्यंत आणि आमच्या शेवटच्या फेरीपर्यंत लढेन."
अंततः शत्रूच्या गोळीबारात आणि स्फोटात ते वीरगतीला प्राप्त झाले, पण त्यांच्या नेतृत्वामुळे श्रीनगर शहराचे विमानतळ सुरक्षित राहिले आणि काश्मीरचे संरक्षण शक्य झाले.
त्यांच्या अद्वितीय शौर्याबद्दल भारत सरकारने त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान केले. ते या सर्वोच्च लष्करी सन्मानाचे पहिले मानकरी ठरले.
मेजर सोमनाथ शर्मा यांचे जीवन धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रप्रेमाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. त्यांचे बलिदान भारतीय युवकांसाठी सदैव प्रेरणादायी राहील. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या या महान वीराला संपूर्ण भारत कृतज्ञतेने स्मरण करतो.
आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - मेजर सोमनाथ शर्मा यांचा जन्म केव्हा झाला ?
बरोबर उत्तर आहे, मेजर सोमनाथ शर्मा यांचा जन्म ३१ जानेवारी १९२३ रोजी झाला.
दुसरा प्रश्न - मेजर सोमनाथ शर्मा यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, मेजर सोमनाथ शर्मा यांचा जन्म हिमाचल प्रदेश मध्ये झाला.
तिसरा प्रश्न - मेजर सोमनाथ शर्मा यांच्या नेतृत्वामुळे कोणत्या शहराचे विमानतळ सुरक्षित राहिले ?
बरोबर उत्तर आहे, मेजर सोमनाथ शर्मा यांच्या नेतृत्वामुळे श्रीनगर विमानतळ सुरक्षित राहिले
चौथा प्रश्न - अद्वितीय शोर्य बद्दल मेजर सोमनाथ शर्मा यांना कोणता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
बरोबर उत्तर आहे, परमवीर चक्र या पुरस्काराने मेजर सोमनाथ शर्मा यांना सन्मानित करण्यात आले.
आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - त्याचे मित्र आणि कुटुंबीय त्यांना कोणत्या नावाने हाक मारत असत ?
बरोबर उत्तर आहे - त्याचे मित्र आणि कुटुंबीय त्यांना सोम असे म्हणत असत.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
No comments:
Post a Comment