नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, आपल्यासाठी घेऊन आलोय दिनविशेष माहिती. आजच्या कार्यक्रमात आपण समर्थ रामदास स्वामी यांच्या विषयी माहिती पाहू या. लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका...... Video पाहण्यासाठी खालील निळ्या नावावर क्लिक करावे.
समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील एक थोर संत, कवी, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांचे संपूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर असे होते. त्यांचा जन्म इ.स. १६०८ साली जालना जिल्ह्यातील जांब येथे रामनवमी च्या दिवशी झाला. समर्थ रामदासांनी अध्यात्माबरोबरच राष्ट्रभक्ती, संघटनशक्ती आणि चारित्र्यनिर्मिती यांचा प्रभावी संदेश समाजाला दिला.
रामदास स्वामींचे बालपण धार्मिक वातावरणात गेले. लहान वयातच त्यांना वैराग्याची ओढ लागली. विवाहाच्या वेळीच त्यांनी संसाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला, अशी प्रसिद्ध आख्यायिका आहे. नाशिकजवळच्या टाकळी येथे त्यांनी १२ वर्षे गोदावरी नदीत उभे राहून कठोर तपश्चर्या केली आणि 'रामदास' हे नाव धारण केले. त्यांनी 12 वर्षात 13 कोटी रामनामांचा जप केला. त्यानंतर त्यांनी भारतभर भ्रमण केले. या भ्रमंतीतून त्यांना समाजाची दुर्दशा, लोकांमधील भीती, दुबळेपणा आणि गुलामगिरीची जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी लोकांमध्ये आत्मविश्वास, भक्ती आणि शक्ती जागृत करण्याचा संकल्प केला.
समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेला त्यांनी वैचारिक व नैतिक बळ दिले. “आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ साधावा” हा त्यांचा विचार लोकांना कर्मशील आणि जबाबदार बनवणारा होता. त्यांनी समाजात हनुमान उपासनेचा प्रसार केला, कारण हनुमान हे शक्ती, भक्ती आणि सेवा यांचे प्रतीक मानले जाते. महाराष्ट्रात त्यांनी अनेक हनुमान मंदिरे स्थापन केली.
रामदास स्वामी हे उत्तम साहित्यिकही होते. त्यांचे प्रमुख ग्रंथ म्हणजे ‘दासबोध’ आणि ‘मनाचे श्लोक’. दासबोध या ग्रंथात त्यांनी अध्यात्म, नीती, समाजजीवन, राजकारण आणि व्यवहारज्ञान यांचे सखोल मार्गदर्शन केले आहे. मनाचे श्लोक या रचनेतून त्यांनी मनावर नियंत्रण, सदाचार आणि आत्मशुद्धी यांचा उपदेश केला आहे. सुखकर्ता दुःखहर्ता: ही गणपतीची लोकप्रिय आरती त्यांनी लिहिली. त्यांची भाषा साधी, प्रभावी आणि जनसामान्यांना समजणारी होती.
समर्थ रामदास स्वामींचे विचार आजही तितकेच मार्गदर्शक आहेत. त्यांनी केवळ भक्तीचा नव्हे तर कर्तृत्वाचा, आत्मसन्मानाचा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. जय जय रघुवीर समर्थ' हा त्यांचा नारा आहे आणि 'श्री राम जय राम जय जय राम' हा त्यांचा मंत्र आहे.
इ.स. १६८१ साली सज्जनगड येथे त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी समाधी घेतली.
समर्थ रामदास स्वामी हे केवळ संत नव्हते, तर समाजजागृती करणारे महान विचारवंत होते. त्यांच्या विचारांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय जीवनावर खोल प्रभाव टाकला. आजही त्यांचे साहित्य आणि शिकवण माणसाला सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा देते.
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - रामदास स्वामी यांचे पूर्ण नाव काय ?
बरोबर उत्तर आहे, नारायण सूर्याजी ठोसर हे समर्थ रामदास स्वामी यांचे पूर्ण नाव होते.
दुसरा प्रश्न - समर्थ रामदास स्वामी यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?
बरोबर उत्तर आहे, दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिला.
तिसरा प्रश्न - समर्थ रामदास स्वामी यांचा नारा काय होता ?
बरोबर उत्तर आहे, जय जय रघुवीर समर्थ हा समर्थ रामदास स्वामी यांचा नारा होता.
चौथा प्रश्न - समर्थ रामदास स्वामी हे कोणाचे गुरु होते ?
बरोबर उत्तर आहे, समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते.
शेवटचा पाचवा प्रश्न - समर्थ रामदास स्वामी यांची समाधी कोठे आहे ?
बरोबर उत्तर आहे - सज्जनगड येथे समर्थ रामदास स्वामी यांची समाधी आहे.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
No comments:
Post a Comment