Saturday, 17 January 2026

21 जानेवारी दिनविशेष माहिती ( 21 january )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 
मी नासा येवतीकर, आपल्यासाठी घेऊन आलोय दिनविशेष माहिती. आजच्या कार्यक्रमात आपण कवी माधव ज्यूलियन
यांच्या विषयी माहिती पाहू या. लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग पाहू या ......

Video पाहण्यासाठी खालील नावावर क्लिक करावे. 


मराठी साहित्यात विनोद, उपरोध, प्रणय आणि तत्त्वज्ञान यांचा सुंदर संगम साधणारे कवी म्हणून माधव ज्यूलियन यांचे नाव अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यांच्या कवितांमध्ये कल्पकता, भाषेवरील प्रभुत्व आणि आधुनिक विचारांची छटा दिसून येते. मराठी काव्यपरंपरेत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
माधव ज्यूलियन यांचे मूळ नाव माधव त्रिंबक पटवर्धन असे होते. त्यांचा जन्म २१ जानेवारी १८९४ रोजी बडोदा येथे झाला. ते संस्कृत, इंग्रजी आणि मराठी या भाषांचे अभ्यासक होते. माधव ज्यूलियन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी.लिट. पदवीचे मानकरी आहेत. आपल्या साहित्यिक लेखनासाठी “ज्यूलियन” हे टोपणनाव त्यांनी स्वीकारले. शिक्षणामुळे आणि वाचनामुळे त्यांची साहित्यदृष्टी समृद्ध झाली होती. गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय त्यांनाच देण्यात येते.
मुलांनो तुम्हाला माहित आहे काय 
प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई, बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी ही आईची आठवण नावाची कविता कोणी लिहिली असेल, तर माधव ज्यूलियन यांनी ही कविता लिहिली आहे. 
माधव ज्यूलियन हे मुख्यतः कवी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या कवितांमध्ये प्रणय, विनोद, उपहास, तत्त्वचिंतन आणि जीवनदर्शन हे विषय आढळतात. त्यांच्या लेखनशैलीत चपखल शब्दयोजना, नर्म विनोद आणि सूचक भाषेचा वापर दिसतो. त्यांनी समाजातील रूढी, मानवी स्वभावातील विसंगती आणि प्रेमातील नाजूक भावना यांचे प्रभावी चित्रण केले.
त्यांची कविता केवळ भावनिक नसून बौद्धिक आणि विचारप्रवर्तक स्वरूपाची आहे. कधी हलक्या-फुलक्या शैलीत, तर कधी गंभीर आशय मांडत त्यांनी वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त केले. त्यांच्या कवितांवर पाश्चात्त्य साहित्याचा प्रभाव दिसून येतो, तरीही त्यांची मुळे मराठी संस्कृतीतच घट्ट रोवलेली आहेत. वर्ष १९३६ मध्ये जळगाव येथे झालेल्या बाविसावे मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
माधव ज्यूलियन यांनी मराठी कवितेला नवीन वळण दिले. पारंपरिक काव्यरचनेपेक्षा वेगळी वाट चोखाळत त्यांनी आधुनिकतेची बीजे पेरली. त्यामुळेच ते आधुनिक मराठी काव्याच्या जडणघडणीत महत्त्वाचे स्थान मिळवतात. त्यांच्या साहित्याने मराठी कवितेचा आवाका अधिक व्यापक केला. २९ नोव्हेंबर १९३९ मध्ये माधव ज्युलियन यांचे निधन झाले.
माधव ज्यूलियन हे मराठी साहित्यातील एक प्रतिभावंत कवी होते. त्यांनी दिलेले साहित्यिक योगदान मराठी साहित्याच्या इतिहासात कायम स्मरणात राहील. त्यांच्या लेखनातून जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी, सूक्ष्म आणि विचारशील दृष्टी आपल्याला मिळते.

मुलांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा हं 

चला आता या माहितीच्या आधारे काही प्रश्न व उत्तर पाहू या 
पहिला प्रश्न - माधव ज्यूलियन यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे - बडोदा येथे माधव ज्यूलियन यांचा जन्म झाला.

दुसरा प्रश्न - माधव ज्यूलियन यांचे मूळ नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, माधव ज्यूलियन यांचे मूळ नाव माधव त्रिंबक पटवर्धन असे होते. 

तिसरा प्रश्न - वर्ष १९३६ मध्ये बाविसावे मराठी साहित्य संमेलन कोठे संपन्न झाले ?
बरोबर उत्तर आहे, जळगाव येथे वर्ष १९३६ मध्ये बाविसावे मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले.

चौथा प्रश्न - कोणत्या विद्यापीठाने माधव ज्यूलियन यांना मराठी साहित्यातील पहिली डी.लिट. पदवी दिली ?
बरोबर उत्तर आहे, मुंबई विद्यापीठाने माधव ज्यूलियन यांना मराठी साहित्यातील पहिली डी.लिट. पदवी दिली.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - आईची आठवण ही कविता कोणी लिहिली ? 
बरोबर उत्तर आहे, माधव ज्यूलियन यांनी आईची आठवण ही कविता लिहिली.

चला उद्या भेटू या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार 🙏
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

No comments:

Post a Comment

देविदास वाडेकर - 5 मार्च ( Devidas Wadekar )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,  कसे आहात ? मजेत ना !   मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.  आजच्या कार्यक्रमात आपण...