Monday, 10 April 2017

पत्रास कारण की

रविवार - पत्रलेखन स्पर्धा
पत्रास कारण की,
                           ९।४।२०१७

             "श्री"
प्रिय मैत्रिण, सौ. स्वर्गिय आईस, सा. न. वि.वि.
माझे पत्र बघुन तुला खुप आनंद झाला असेल.मी ३ वर्षांची झाल्यापासुन तुच माझी जिवलग मैत्रिण आहेस.
माझ बालपण, तारुण्य, लग्न, नंतर माझा नवरा, मुलं सगळ्या गप्पा मी तुझ्याबरोबर मारल्या.तु सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी आचरणांत आणते. त्यामुळे मी सर्वांची लाडकी झाले.
मी परगांवहुन आले कि, माझ्या घरांतल्या , काम करणारया बायका, धुणभांडीकरणारी, पोळ्या करणारी, कचरा ऊचलणारी, ह्यांच्यासाठी खाऊ, वस्तु आणते.तु सांगितल्याप्रमाणे माणसांना सुखापेक्षा, दु:खांत मदत करायला धावते.सासुबाईंना आईसारखी माया दिली.
तुझी दोन्ही नातवंडे , खुप शिकली,मोठी झाली.सुनांनवर लेकीसारखी माया करते. मदतीची गरज लागली तर मदत करते.त्या देखिल मदत करतात. मतभेद झालेच तर मोकळेपणाने बोलुन दूर करतो.
तुझे जावई माझी खुप काळजी घेतात. थोडे शीघ्रकोपी आहेत पणमनाने दिलदार वचांगले आहेत. तसे माझ्यांतही काही दुर्गुण आहेतच नां?
तुझी छोटी नात स्लोलर्नर जन्मली पणजिद्दीने आज ती योगा टिचर आहे.आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणुन आॅटिस्टीक मुलांना योग शिकवायला जातो.तुझी पतवंडे पण हुषार, गुणी आहेत.
आपला प्रकाश, माझा लहान भाऊ, वहिनी, नातू, नातसून , दुसरी सून मेधा, मुले, नातवंडे मजेत आहेत. आपला कै. अवीनाश माझा मोठा भाऊ कसा आहे? कै. दादा माझे वडिल नेहमी सारखे आनंदी असतीलच.
       आता देव तुझ्याजवळ आहे , तर त्याला माझे धन्यवाद दे आणि सर्व जगांत सुख, शांती, समाधान सर्वांना लाभु दे. ही प्रार्थना सांग.
      मला नेहमीच तुझी कमतरता जाणवते .तसं स्वप्नांत मी बोलतेच .पुढच्या जन्मी तुझ्याच पोटी जन्म घेईन. स्वत:ची काळजी घे .

सदैव तुझीच जीवलग मैत्रिण,
सौ. निलाक्षी ,

सौ. निलाक्षी विद्वांस २९
मोबाईल-9969071390
*************************************

      अहों ना पत्र   

प्रिय प्रकाश
   स.न.वि,वि.
    तुम्हाला अशा त-हेने पत्र लिहावे लागेल असे वाटलेच नव्हते आजपर्यंत खरं तर तुम्हाला पत्र लिहिण्याची वेळच आली नाही. लग्न झाल्यापासून तुम्ही आणि मी एकमेकांशिवाय कधी कुठेच गेलो नाही.सतत आपण दोघे नी मुले झाल्यावर आपण चौघे माहेरि सासरी सहलीला ,मग आताच का बरं आमचा विचार न करता एवढ्या दूर गेलात,परत कधीही न येण्यासाठी.
तुम्ही कष्टातून जीवन फुलवलंत ,शून्यातून विश्व,निर्मातण केलंत कधीही कुणाला दुखावले नाहीत सर्वांचे तन मन धनाने करत आलात माझ्या माहेरी तुम्ही सर्वांना मार्गी लावलत.सर्व मतलब सरताच दूर झाले तरी त्या कुणालाही नी मलाही बोल लावला नाही .तुमचा मनाचा मोठेपणा लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला.
   आपली दोन्ही मुले सुसंस्कारी मायाळू प्रज्ञा शिकली अमेरिकेत गेली .आपण तिघांचाही व्हिसा काढला तुमचे आणि तिचेही स्वप्न होते अमेरिकेत जायचे.निवृत्त झाल्यावर आयुष्य मजेत जगायचे.तीर्थयात्रा करायच्या पण हे तुमचे स्वप्न अधुरेच राहिले.आमची साथ सोडून तुम्ही खूप दूर निघून गेलात सर्व  जबाबदारी माझ्यावर टाकून.
  कसे आहात तुम्ही .जिथे असाल तिथून तुमचे आमच्यावर लक्ष आहे हे आम्हाला माहित आहे प्रज्ञाच्या लग्नात असाल तिथून अक्षता टाकाल  तिला आशिर्वाद द्याल हे निश्चित माहित आहे मला.प्रणवाही आता नोकरीला लागला पण हे सारे पहायला तुम्ही नाही
माझ्या कवितेचे प्रथम वाचक तुम्ही होतात आता मी तुम्हाला श्रोता बनवलेय .आज पत्ररुपाने तुम्हाला सारे लिहितेय.
कळावे
    तुमचीच प्राची
*************************************
पत्र लेखन स्पर्धा.......                  प्रिय माणुसकी...                      बरेच दिवस झाले तुझे दर्शन घडत नाही . दिवस च काय बरीच वर्ष झाली असतील.        हल्ली तुझा पत्ताच लागत नाही. परवाचीच गोष्ट . कामा निमीत्त मंगल कार्यालयासमोरच्या पोष्ट ऑफीस मधे बसलो होतो. लग्न लागुन गेलेले , लोक जेवण? करीत होते.पदार्थांची रेलचेल दिसली . गेट च्या बाहेर एक म्हातारा भिकारी आशाळभुत नजरेन आत बघत होता. मला वाटल माणुसकी येईल त्यालाही वाढेल. पण तु आलीच नाहीस. शेवटी तो म्हातारा निराश होऊन तेथुन जायला निघाला. तरी देखील मला अजुनही वाटत होते की आता तरी तु येशीलच..... पण.. नाहीच आलीस तु..... त्या दिवशी तर एकुलत्या एका मुलाचे आईवडील मुलाची विनवणी करत होते . ] आम्ही एका कोपऱ्यात राहु. गच्चीत राहू, पण तु आम्हाला वृद्धाश्रमात सोडु नको. ती थहो मी तुझी खुप वाट पाहीली . पण तु आलीच नाहीस.....    तुला माझी हात जोडुन विनंती आहे. एकदा तरी दर्शन दे            ' तुझाच शब्द भ्रमर
************************************* *ईश्वराचे पत्र*

माझा  प्रिय भक्त,

सकाळी जेंव्हा तू उठलास तेंव्हा मी तुझ्या अंथरुणापाशी उभा होतो. वाटलं होतं की तू माझ्याशी काहीतरी बोलशील...काल झालेल्या घटनांविषयी, ज्या तुझ्या जीवनात चांगल्या झाल्या होत्या. पण तू उठलास, तुझं सर्व आवरलंस, कसा तरी चहा प्यायलास, पेपर वाचलास, कशी तरी अंघोळ केलीस व कपडे घालून, डबा घेऊन ऑफिसला निघालास. माझ्याकडे नुसतं पाहिलंसुद्धा नाहीस. मला वाटलं होतं की अंघोळ केल्यावर तरी पाहशील माझ्याकडे,पण असं नाही झालं.

ऑफिसला जाताना ट्रेन पकडलीस. वाटलं, आता तरी बोलशील. पण पेपर वाचून मोबाईलवर गेम खेळत बसलास. मी मात्र उभा होतो तुझ्याजवळ.
मी तुला सांगणार होतो की, "दिवसभरात काही वेळ तरी माझ्यासोबत घालवून बघ..तुझी कामं अजून चांगली कशी होतील याची मी काळजी घेईन".  पण तू माझ्याशी बोलला नाहीस.

ऑफिसमध्ये एक क्षण असा आला होता की तू खुर्चीवर एकटा बसला होतास. पूर्ण पंधरा मिनिटे गेली. पण त्या वेळीसुद्धा माझी आठवण नाही आली तुला!

दुपारी जेवणाच्या वेळेला तू इकडे तिकडे पहात होतास. वाटलं होतं एक क्षणभर माझ्याबद्धल विचार करशील. पण तेव्हाही असं नाही झालं.

दिवसामध्ये खूप वेळ वाचला होता. या वेळेतही आपलं बोलणं होईल असं वाटलं होतं. तू घरी आलास, जेवण झालं.....म्हंटल आता मोकळा झालास. पण नाही.  तू टी व्ही लावून बसलास. 

मग तू आपल्या बायको मुलांना "शुभ रात्री" म्हणालास. मी उभाच होतो तुझ्याजवळ.  तू दमलास व झोपी गेलास.

मला वाटलं होतं - तुझ्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडं बोलावं तुझ्याशी. काही तुझं ऐकावं...काही माझ्याकडून सांगावं. काही मार्गदर्शन करावं तुला की 'या भूमीवर तू कशासाठी आला आहेस व आता कोणत्या कामात व्यस्त झाला आहेस.'

पण तुला वेळच नाही मिळाला.
मी मात्र मनातल्या मनात विचार करत होतो की कधी वेळ होईल तुला!

मी खूप प्रेम करतो तुझ्यावर.
रोज वाटतं मला की कधीतरी तू माझ्याशी बोलशील. तुझ्या जीवनात ज्या काही चांगल्या घटना घडल्या आहेत, त्याबद्धलं धन्यवाद म्हणशील. पण तू तेंव्हाच येतोस माझ्याकडे जेंव्हा तुला काही हवे असते. ते तुला मिळाले की रीतसर नेहमीप्रमाणे सर्व विसरून जातोस. तुझे लक्ष दुसऱ्या गोष्टींकडे असते व मला विसरतोस.

ठीक आहे काही हरकत नाही. उद्या बोलशील तू माझ्याशी. मला विश्वास आहे. आज नाही तर उद्या तरी नक्कीच आठवण काढशील माझी!!

तुझाच
ईश्वर.....
************************************* प्रिय ति.श्री स्वामी समर्थांस,
             साष्टांग नमस्कार
भक्तांनी मनापासून हाक मारली, आणि तुम्ही आला नाहीत हे केवळ अशक्य !तसे तुम्ही कायम सोबत आहात म्हणून तर ईथवरची आयुष्याचीपरिक्रमा झेपली.गेल्या महिन्याततुमच्या प्रकट स्थानाची परिक्रमा करायची ईच्छा केली आणि तुम्ही सुंदर योग जुळवून आणलात.तसं पहाता प्रकटस्थाना वरुन तपश्चर्या करुन तुम्ही तेव्हांच निघालात ते रयतेसोबतच वास्तव्य करुन राहिलात.तुम्ही आम्हाला घराघरात आई-बाबांच्या रुपात,शाळेत शिक्षकांच्या रुपात,हाॅस्पीटल मध्ये डाॅक्टरच्या रुपात असे वेगवेगळ्या रुपात दर्शन देत असता.
    तर पत्रास कारण की,आमच्या कर्दळीवन यात्रेच्या सुरुवाती पासून शेवटपर्यंत तुम्ही अशीचसाथ दिलीत.६डोंगर पार करताना त्या निर्जन जंगलात तुमचे दोन श्वान सतत प्रत्येकाची सोबत करत होते हे सर्व ४५ जणांना जाणवले.रणरणत्या ऊन्हात एक डोंगर चढताना आमची दमछाक होत असताना प्रत्येक थकल्या भागल्यासोबत त्यांच्या अगण्य फेर्र्या झाल्या.
      यात्रा संपवूनआम्हाला तुम्हीश्री क्षेत्र अक्कलकोट व तुळजापूर दर्शन ही घडवलेत व सोलापूर स्टेशनवर तर साक्षात्कार घडवलात.दुपारच्या ४-५च्या दर्म्यान सर्व रात्रीच्या गाड्या"फुल" असल्याचे सांगण्यात आले.ते स्वाभविकच होते.आम्ही तिघी मैत्रीणि होतो व रात्रीचा बस प्रवास नको होता.नाईलास्तव रांगेत ऊभे राहिलो व बसून तर बसून ट्रेनने जायचे ठरले.अचानक एक उंच पूरा गृहस्थबाहेरुन आला व मला काऊंटरवर फाॅर्म देण्यास सांगू लागला.सर्व ट्रेन "फुल" असल्याचे मीत्याला सांगितले.तरनिक्षून म्हणाला,"तुम्हाला रिझरवेशन मिळेल".मी"thanku"म्हटले व माझा नंबर आला.चक्क समोरुन  रिझरवेशनची ३ तिकिट.ंमिळाली. लगेच लक्षात आलं की तो सामान्य वाटणारा माणूस म्हणजे स्वामी साक्षात तुम्हीच होतात."अशक्य ही शक्य करतील स्वामी"ह्याची प्रचिति आली..आम्हाला सुखरुप तुम्ही घरी पोहोचवलत,अशीच कृपाद्ृष्टी सर्वांवर कायम राहो.सर्वांना सबुद्धी द्या ही तुमच्या चरणी प्रार्थना
           तुमची निस्सिम भक्त..नयना
*************************************
हाय प्रशांत,🙋🏻
कसा आहेस? टकाटक नं ! वाटलचं. हो, कारण लहानपणापासुन लाडोबा आईजवळ वाढलाय व अजुनही आईसोबत रहातोस त्यामुळे मस्तच असणार. 'मम्माज बॉय', बनायलाही नशिब लागतं बाबा.
     तुला वाटेल एरव्ही सतत व्हाटस्अपवर असणारया  मैत्रिणीने एकदम पत्र कसंकाय पाठवलयं. तर डॉक्टरसाहेब आपलं कौतूक करण्यासाठीच हा पत्रप्रपंच📝 बरं का.
     समाजात आज असं चित्र दिसतयं की एखाद्या डॉक्टरकडून काही चूक झाली तर लोक त्यांना दंडीत करतात मग जे डॉक्टर अखंड व विधायक सेवा देतात त्यांच कौतूकही  व्हायलाच  हवं,त्यासाठी अल्प खटाटोप.
एकीकडे मुंढे-खिद्रापुरे सारखे डॉक्टर समाजात असतांना तुझ्यासारखे प्रामाणिक व सचोटीने वागणारे डॉक्टरही👨🏻‍⚕ आहेत हे समाजाला सांगावसं वाटलं.🎯 तुझ्या कार्यासाठी तुझे तोंडभरून कौतूक👏🏻.डॉक्टरीपेशा केवळ अर्थार्जन न मानता सेवा समजून तू करतोस हे अभिमानास्पदच आहे. 🙏🏻 एकदा शाळेतील 🏦 परीचयसत्रात तू  ' I WANT TO BECOME A  GOOD DOCTOR'⛑ .असं म्हटला होतास अन ते तू सिद्ध केलसं.व्वा मित्रा, अभिमान वाटतो तुझा.
     'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात !', या उक्तीनुसार तू भविष्यात यशवंत -किर्तीवंत होणार हे तेव्हाच सर्वांनी हेरलं असावं. अकरावी-बारावीला तर तुझ्या बायोलॉजीच्या डायग्रामकडे शर्मासरांचे तेल घालून लक्ष असायचे.(जरी तू लास्टबेंचवर बसायचास तरी).त्याची फलश्रृती तुझ्या गोल्डमेडलमधे🥇दिसली.
     तुझी बहिणच आपल्या वर्गात सोबत असल्यानं तुझी खडानखडा माहीती आम्हाला असायची.तुला एखाद्या मुलीनं अपुर्ण राहीलेला अभ्यास पुर्ण करण्यासाठी जरी  वही📔 मागितली तरी ताईसाहेब डोळे मोठ्ठे👀 करायच्या. काही म्हण पण, मुली बहाणे शोधायच्या तुला बोलण्याचे.😉..हाहाहा. माझं विचारशील तर मला सदैव तुझे आदरवजा कौतूक वाटायचे.तुझ्या नावामागिल इतिहासही भारीच नाही का?😊. 'हरे रामा हरे कृष्णा' या सिनेमातील 🎬देव आनंदच्या नावावरून तुझे बारसे झालेले. काय बाबा,बडे लोग-बडी बाते.
मी असं एेकून होते की नावाच्या शेवटी'अंत' अशूभ ठरतो.पण तू तर हा समज धादांत खोटा ठरविलास की.
नावाप्रमाणे तू शांतच वाटतो तो स्वकौतूकात. इथे लोक टीचभर करतात व ढीगभर सांगतात.सुर्याचं 🌞कर्तृत्व जसं त्याच्या तेजाने झळकते तो सांगत फिरत नाही तसे काहीसे तुझंही आहे. कधीही कुठल्या गोष्टीचा गाजावाजा नसतो. शिवाय पारीवारीक कर्तव्यातही कसर ठेवत नाहीस. आईचं आजारपण आनंदाने झेलून तिची सेवासुश्रृषा करीत आहेस. येणारया स्नेहमेळाव्यात तुझा व काही मित्र-मैत्रिणींचा👭👬 विशेष सत्कार व्हावा अशी माझी मनोमन ईच्छा आहे.
बरं डॉक्टरसाहेब आपलं मोत्यासारखं अक्षर आता पार बिघडलं असेल,  हो नं?. डॉक्टरचं अक्षर मेडीकल स्टोअरवाल्यालाच कळतं म्हणून आपला अंदाज बांधला 😀.
     आणखी एक, एकदा आपल्या एका वर्गमैत्रिणीने तुला 'गर्भचाचणी 'करून दे म्हणून गळ घातली होती. कारण तिच्या वहिनीला पुन्हा मुलगी नको होती.पण तू 'नाही' या उत्तरावर ठाम राहीलास.तेव्हा आम्हा सर्व मित्रमैत्रिणींना तुझा गर्व वाटला होता. तुला स्वतःला मुलगी नसली तरी तू समाजातील कित्येक गर्भकळ्या वाचविल्या आहेत. आज आपण महासत्ताक बनत असू अगर चंद्रावर महाल उभारत असू तरीही कुलदिपक म्हणून मुलगाच हवा असतो.केवढा हा विरोधाभास? पण आपापला खारीचा वाटा प्रत्येकाने उचलला तर ही मानसिकता बदलू शकते. आणि त्यात एक 'सोनोलॉजिस्ट' म्हणून तू तुझ्यावाटेची जबाबदारी चोख बजावतोय.खरतर तुझी एक बहिण भरल्या संसारातून देवाघरी गेलेली, तरीही तुम्ही संपुर्ण परीवारजन घरातील सुनांना यथोचीत मानसन्मान देता हे ही स्तुत्यच. त्यातल्या त्यात तू सर्वात भाग्यवान. सुशिल पत्नी व अत्यंत बुद्धिमान अपत्ये तुला लाभलेत.(म्हणूनच बालमैत्रिणींना विसरलास हो! ). एकंदर सांगायचे तर बुद्धी,संपत्ती व संस्कार हा दुर्लभ त्रिवेणी संगम तुझ्याघरी पाणी भरतोय.असे भाग्य लाखात एखाद्यासच लाभते. बरं,बरं उडू नकोस जास्त ,पार्टी🍹 बाकीय तुझ्याकडे ते विसरू नको. कशाची म्हणजे काय? , प्रत्येक परीक्षेत तुझे 'दो अनमोल रतन' 👬सतत प्रथम क्रमांक घेतात, म्हटलं चला नेहमी काय त्रास द्यायचा एकदाच घेवूया की पार्टी 'ताज' 🏨मधे. तू फक्त तारीख कळव आम्ही सगळे हजर होवू.खानेवालोंको खानेका बहाणा चाहिए!🍴🥄🍽 हाहाहा.
     अजून नविन विशेष काय सुरूय तुझं? एवढ्यात कुठला सिनेमा 🎞बघितलास? मी नुकताच 'फिल्लौरी'पाहीला.एैतिहासीक टच भावला त्यातील. आपण हायस्कूलला असतांना पेपरच्या शेवटच्या दिवशी झाडून सगळे सिनेमा थिएटरला असायचो. आम्हा मुलींना एकतर लवकर परवानगी मिळत नसे व मिळाली तर सोबतीसाठी घरच्यांना मस्का लावावा लागायचा.पण खरचं I deadly miss shalimar theature. एं तुला यात्रेतले तंबूवाले थिएटर आठवतात का?  यात्रा म्हणजे अजबच होतं नाही का? मौत का कुवा, जिलेबी, रहाटपाळणे ....व्वा व्वा..! रम्य ते बालपण. नुसतं आठवलं तरी मन आनंदविभोर होतं.
      बाकी आई,काकू,काका कश्या आहेत. तुमच्या एकत्र कुटूंबपद्धतिला सलाम! !! रविवारची तुमच्या निसर्गरम्य शेतातील☘🌴 आम्हा मैत्रिणींची डबापार्टी धमाल असायची.रानमेवा🥜🍈 खायला मिळायचा. घरातील जेष्ठांनी कसं जमवलं असेल न हे  तुमचं 'गोकूळ'?. आज फार कमी ठिकाणी असं चित्र दिसतं. मीच नव्हे माझं अख्ख घर तुमच्या कुटूंबाचं कौतूक करत असतं किंबहूणा हेवाच वाटतो. असेच रहा.
      तुझ्या ताईसाहेब काय म्हणताय? शाळेत तिचा भारी पहारा असायचा हो आमच्यावर. आपल्या हुश्शार भावाची ती  सतत पाठराखण करायची. खरचं बहिणींना भारी कौतूक असतं भावांचं.मी माझ्या मुलांनाही कधीकधी सांगते तुम्हा भावंडांविषयी. माझे यजमानही तुम्हा परीवाराचं कौतूक एेकून थक्क होतात.मी गमतिने त्यांना म्हणते,"अहो गजाननबाबांचे खास आशिर्वाद आहेत त्याला".
       परवाच पेपरला बातमी वाचली.तू 'आय एम ए.'चा सन्माननीय पदाधिकारी बनलास ते.त्यासाठीही अभिनंदन. 👏🏻अशीच  तुझ्याहातून अखंड सेवा घडो. आणि हो, एक राहिलचं की, सलग चार मॅरेथॉन🏃🏻 यशस्वीपणे धावण्यासाठीही कौतूक. शाळेत खो-खो खेळायचो, तू कधी आऊट होत नसे.तेव्हापासून धावतोय,किती धावणार अजून? पण एक नक्की तू स्वतःला किताही मेंटेन ठेवत असलास तरी तुझ्या गोड बायकोपुढे फिकाच पडशील...हाहाहा.तुमच्या येणारया विवाहवाढदिवसाच्याही अॅडव्हान्स शुभेच्छा.💐
कुठल्या चक्कीचं पीठ खातोस रे? जरा आम्हालाही सांग की. बरं बाबा, पुरे करते खेचणं.
     या सुटीत टूर ✈कुठेय तुमचा? आमच्यासाठीही काही शिल्लक ठेव रे.पण एक बरीक खरं की आपलं फिरण्याचं वेड सारखचं. नाही का?
     असो,पत्रोत्तर पाठव असे म्हणणार नाही कारण तुझी व्यस्तता.
⛳  " *झडो* *दुदूंभी* *तुझ्या** *यशाच्या* *उंच-उंच*  *अंबरात* *तुझी* *पोवाडे* *गातील* *पुढती* *शाहीर* *अन्*  *भाट*" !!!⛳
      सर्व जेष्ठांना नमस्कार🙏🏻 व छोट्यांना आशिर्वाद सांग.

ता.क. - *उचकी* लागली की मैत्रिणींनी आठवण केली असं समजायला  हरकत नाही.😀

          तुझी खोडकर मैत्रिण
                जयश्री✍🏻
*************************************
*पत्रास कारण की ....*

आदरणीय शेतकरी दादास,
     सा. न. वि. वि.
पत्रास कारण की,एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये  तुमच्याशी येऊन बोलण्याचे धाडस माझ्यात नाही. परंतु तुमच्याशी हितगुज साधण्याची खूप दिवसापासूनची इच्छा असल्याने आज मी हे पत्राद्वारे माझे मनोगत फक्त आणि फक्त शेतात राबणाऱ्या माझ्या शेतकरी दादा,तुमच्यासाठीच आहे.तुमच्यासाठी तरी सध्या रात्र वैऱ्याची आहे. जगाचा पोशिंदा म्हणून जरी तुमची ओळख असली तरी तुमच्यावरच उपासमारीची आणि पर्यायाने आत्महत्येची वेळ आलेली आहे. शेतात चांगले पिकवून भाव चांगला मिळावा म्हणून चांगले तेवढे विक्रीला देऊन उरलेला गाळ,सरवा स्वतःसाठी वापरणारे तुम्ही!  हे सारं जग आज  भ्रष्टाचाराने बरबटलेले असताना तुम्ही मात्र "जे उगवले ते माझे अन् सापडले ते दुसऱ्याचे" या नीतीने वागणारे! हा प्रामाणिकपणा जगाला झेपावणारा नाही. म्हणून जे झेपत नाही ते सतत दुर्लक्षितच असते. तुमची अन् तुमच्या कुटुंबाची दिवसरात्र शेतात चाललेले कष्ट,तुमचा प्रामाणिकपणा पहायला इथल्या संवेदनाहीन लोकांना,लोकप्रतिनिधींना  वेळच नाही. म्हणूनच जेव्हा जेव्हा तुमच्या पिकाला भाव द्यायचा असतो,तेव्हा तेव्हा सर्वसामान्यांपासून तर शासनापर्यंत सर्वाना महागाई आणि सामान्य जनता दिसते. बाकी सर्वत्र सामान्य जनतेची चाललेली लूट ना शासनाला कळते ना सामान्य जनतेला! शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव वाढला की,मोर्चे काढणारे आम्ही पांढरपेशे लोकं! मॉलमध्ये जाऊन किमतीवरून वस्तूची गुणवत्ता ठरविणारे आम्ही!नाहीच समजू शकणार तुमच्या घामाच्या थेंबाथेंबाचे मोल! तुमची काळ्या आईवरची निष्ठा!
            पण दादा,तुला बदलावं लागेल. या कोडग्या जगासाठी नाही,तर ते तुझ्या कुटुंबासाठी!तू जगाचा पोशिंदा असलास तरी त्याआधी तू कुटुंबाचे आभाळ आहेस. या आभाळाच्या पंखाखाली तुझी लेकरं सुरक्षित आहेत. हे आभाळ फाटू देऊ नकोस!  त्यांना उघडे करू नकोस. खूप भीती वाटते,रोजचे वर्तमानपत्र वाचताना. जीव मुठीत ठेवून वर्तमानपत्र वाचते. ज्या दिवशी तुझ्या आत्महत्येची बातमी नाही,तो दिवस सोन्याचा वाटतो. कारण माझ्या राज्यातच नाही,दर आठवड्याला माझ्या अगदी जवळ,माझ्याच परिसरात एकतरी आत्महत्या घडत आहे. लाखाचा पोशिंदा,आपला लाखमोलाचा जीव काही लाखाच्या कर्जासाठी गमावतो आहे! हे पाहून,वाचून मती गुंग होते.
       माहीत आहे मला,हे कर्ज आमच्यासारख्या लोकांना मामुली वाटत असले तरी आज ते तुझा  जीव घेण्याएवढे महत्वाचे ठरत आहे. काय वाटतं तुला,तुझ्या जाण्याने तुझ्या कुटुंबाच्या सगळ्या समस्या संपतील? काहीच संपणार नाही,फक्त संपेल ते तुझे आयुष्य! तू गेल्यावर शासकीय अधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,राजकीय नेते येतील,तुझ्या कुटुंबाला दिलासा देतील,काही रुपयांची मदत देऊन निघून जातील. पण तुझ्या माघारी उघडे पडलेल्या तुझ्या कुटुंबाचे काय? जिच्या लग्नासाठी तू चिंतेत होता,तू गेल्यानंतर त्या मुलीचे लग्न थांबणार नाही,पण तिच्या पाठीवर हात ठेवून,अश्रूभरल्या डोळ्याने आशीर्वाद देऊन "मी तुझ्या पाठीशी आहे" म्हणून तिला पाठवणारा तिचा बाप तिला त्या गर्दीत  दिसेल का? तिच्या लग्नासाठी आनंदानें धडपडणारे अनेक पावले मिरवतील पण डोळ्याच्या पापण्यात पाणी लवपवणारा,भिंतीआड जाऊन डोळ्यातल्या पाण्याला वाट करून देणारा,तिचा आधारवड तिला दिसेल का? घरातला तो तुझा मुलगा, तुझे कष्ट संपावे म्हणून,दारिद्र्य संपावे म्हणून नोकरीसाठी वणवण हिंडणारा, तू असेपर्यंत स्वत:ला लहानच समजणारा! त्याच्या कोवळ्या खांद्याला  झेपेल का दादा,तुझ्या घराचे उदासलेपण,तू गेल्यावरचे रितेपण....! त्याला झाकता येईल का तुझ्या कुटुंबाला त्याच्या कोवळ्या हाताने? ते बळ तर अजून तू त्याला दिलेच नाहीस! त्याचे पाय मजबूत करण्यापूर्वीच तू सोडणार आहेस त्याला? यासाठीच मुलगा हवा होता का,दादा तुला? जिला आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिलेस तिच्या पांढऱ्या कपाळभर विरहाचे वाळवंट पसरवून जाणार आहेस का? कसं पेलावं तिने हे वाळवंट? सहन होतील  का तिला या वाळवंटातील चटके? तुझ्या असण्याने जिचे जग पूर्ण होते,तिला पेलतील का या रिकाम्या जगातील मुलीच्या,मुलाच्या जबाबदाऱ्या? आतून तुटून जाईल ती तुझ्याशिवाय! पण तिला सोडता येणार नाही या पिलांना वाऱ्यावर! तू आहेस तोवर , खाईल ती तुझ्या अर्ध्या भाकरीतली अर्धी भाकर,ठिगळ जोडेल संसारात कपड्यासह दारिद्र्याला. ज्या म्हाताऱ्या आईबापाने याच दारिद्र्यात दिवस काढले त्याच दारिद्र्याने त्यांच्या मुलाचा घेतलेला बळी सहन होईल का त्यांना? ज्या वडिलांना तू खांदा द्यावास,त्यांच्या म्हातारपणी हा त्यांचा खांदा निखळताना पहावेल का?खूप गरज आहे तुझी या तुझ्या कुटुंबाला!
बघ दादा,काय वाताहत होईल तुझ्या जाण्याने! तुझ्या मृत्यूनंतर कोणाच्याही मदतीने,सहानुभूतीने ही पोकळी भरून निघणार नाही.
         म्हणून दादा,सततच्या नापिकीने,कर्जाच्या ओझ्याने,कोणाच्या बोलण्याने खचून जाऊ नकोस. तुझ्या जाण्याने कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत. कोणाचीही मदत तुझ्या कुटुंबाला आयुष्यभर पुरणार नाही. आहे त्या परिस्थितीला कुटुंबासह तोंड दे. मला माहीत आहे,हे सांगणे खूप सोप्पे आहे मला,पण हे जगणं तुझं खूप अवघड आहे. पण एकच वाटते,तू संपल्यानंतर तुझ्या कुटुंबाच्या कोरड्या शब्दांनी सांत्वनाला येण्यापेक्षा,असे वाईट विचार तुझ्या डोक्यातच येऊ नये,यासाठी हा पत्रप्रपंच!
       दादा,जीवन खूप सुंदर नसेल पण  तुझ्या कुटुंबासाठी तुझे जीवन नक्कीच सुंदर आहे. प्रश्नांपासून पळू नकोस,प्रश्नांना जाऊन भीड. तुझ्यात रेड्याचं बळ आहे. मरणानंतर कोणाच्या मदतीची अपेक्षा करण्यापेक्षा जीवंतपणी मदत मागून बघ! जगात वाईट लोकं आहेत,तशी चांगलीही आहेत. ती नक्कीच तुला मदत करतील.
      खूप लांबले पत्र,पण तुला बोलायचं ठरवूनही हिमत करू शकत नव्हते. जे आज केलं. त्याचा विचार कर,एवढीच कळकळीची विनंती!
     मोठ्याना सा. न.
     लहानाना शु. आ.
  कळावे लोभ असावा.
                    तुझीच किसान बहीण
                    *संगीता देशमुख,@५९*
*************************************
        
                             दि.९.४.२०१७
      सौ.ताईस
             सा.न.वि.वि.
       आज कोण जाणे काय झाले सकाळी सकाळी एक लिहलेली कविता वाचली अन् वाचता क्षणी डोळ्यात पाणी साचलं .अचानक भूतकाळातल्या ब-याचशा आठवणी माझ्या मनात स्थान मांडून बसल्या.
    ताई खरचं तुझी आठवण आली की मला हे असचं होत आणि फक्त रडण्यावाचुन काही सुचत नाही आजही तुला पत्र लिहतांना नकळत डोळे पुसावे लागत आहे कधी कधी खुप हुंदका काढावा आणि मनसोक्त रडावस वाटत पण हक्काचा अन् मायेचा ऊब देणारा पदर आपण हरवुन बसलो याची आठवण होते माझ्यावर जिवापाड प्रेम करणारी ताई.......
खरचं काही रिकाम्या जागा कधीच भरल्या जात नाही चांगल केल  तर स्तुती करणारी ताई,सगळ्या भावडांची काळजी वाहणारी ताई ,माझी दारात उभी राहून वाट पहाणारी ताई ,वेळ पडली तर मदतीला धावणारी ताई, सगळ्यांना स्वामी सेवा मार्ग दाखविणारी ताई सगळ सगळ आठवायला लागल मला .तुझ्या सहवासात घालवलेले क्षण आठवतात आज तुला पत्र लिहतांना जुन्या आठवणीत घेवुन जातात .मला तुझे विचार एकावे हेच हवं होत ग!आज तु आमच्या सोबत नाहीस पण तुझ्या आठवणी आहेत
आठवणीनी का होईना पण तु माझ्याबरोबर असतेस
श्री स्वामी समर्थ सेवेकरी म्हणुन इहलोकात निघुन गेलीस जातांना तुझ्या आठवणींना मोकळ सोडून गेलीस
   बाकी तुझ्याशी खुप बोलावेसे वाटते परंतु पत्रातुन सगळचं लिहणे शक्य नाही म्हणुन इथेच थांबते.
  
                       तुझीच बहीण
                          सौ. सरिता
*************************************

प्रिय  बापूस...,

अनेक आशीर्वाद ,

हल्ली लिहिताना बोटं थरथरतात डोळ्यांना दिसायलाही कमी आलयं म्हातारपणामुळे असेल कदाचित ..पण इथं अनेक  माणसं असून सुद्धा मला  एकाकी  वाटतं रे... तुम्ही  तिघे आपापल्या संसारात रमलात..तुमचं छान चाललयं
पण मी रोज  आज कुणीतरी भेटायला येईल म्हणून  वाटेकडे डोळे लावून बसते.
तुमची मनीआॅर्डर येते  पण मला ती परकी वाटते...
     परवां मला कोणाकडूनतरी समजलं.. आपल्या गुड्डीचं लग्न झालं म्हणें ...हो का  रे?
माझ्या नातीच्या लग्नाला मला कोणीच बोलवलं नाही .... मला माझी छोटुकली आठवली....माझ्या भोवती  आज्जी आज्जी... करुन फेर धरणारी मला  गोष्ट सांग म्हणणारी माझ्या गालावरुन हात फिरवणारी...परी ...कशी दिसली असेल लग्नात ...?
      मला  कळवत जारे अशा गोष्टी...मी आले  असते लग्नाला ....लांबून पाहिले असते तिला ....डोळ्यांच्या निरांजनातुन ओवाळलं असतं तिला ....

     नको  मनाला लावून घेऊस
मी बरी  आहे .. ..बरी  आहे

       तुमची सदैव  आठवण काढणारी  तुझी (दुर्दैवी)
                     आई

@@@@@@@@@@@@
सौ.अनघा संभाजी पतके.
खंडाळा .जि.सातारा.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
************************************* 🍀पत्र लेखन स्पर्धा🍀
🙏🙏
प्रिय ती . जिजींना 
शि . सा . नमस्कार
तुम्हाला पत्र लिहिण्याची संधी मिळेल असे वाटले नव्हते. पण आज ती मिळाली आहे. मला आठवतय 30 वर्षापूर्वी मी लग्न होऊन घरी आले होते. घर, परिसर शहर सगळेच नवीन होते. पण यात मी रूळले ती तुमच्यामुळे
तुम्ही कधीही दडपण येऊ न देता सगळे सणवार शिकवले . अनेक प्रसंगात खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या त .
लग्नानंतर मला पुढे शिकायची इच्छा होती ती तुम्ही पूर्ण केलीत . 2/3 वर्षे माझी शिकण्यात गेली. तेव्हां घरी मुलींना तुम्ही उत्तम सांभाळले आणि त्यामुळेच आज मी माझ्या पायावर खंबीखंपणे उभी आहे . याचे श्रेय तुम्हालाच आहे.
सासू असण्यापेक्षा एक मैत्रीण च तुमच्या रूपाने मला मिळाली होती. माझ्या शाळेतील गंमतशीर गोष्टी , मैत्री णी त्यांचे स्वभाव मला येणार्‍या अडचणी सगळे तुम्हाला माहित असायचे कारण शाळेतून घरी आल्यावर रोज तो परिपाठ असायचा .पण तुम्ही नसल्यामुळे ती उणीव मला जाणवते.
पण एक मात्र खरं हं जिजी असे काही प्रसंग आहेत की त्यावेळी तुमची आठवण येतेच .
विशेषतः उन्हाळ्यात जेव्हा मोगरा फुलतो तेव्हा तुम्ही रोज मला गजरा करून द्यायच्या त्याची आठवण मला गजरा करतांना होते.
एक ना अनेक असे प्रसंग आहेत की तिथे तुमची आठवण येते.
फार काय लिहू ?
जिथे तुम्ही असाल तिथून प्रेमळ आशीर्वादाचा हात आमच्या वर असू द्या
हि प्रार्थना 🙏🙏
              तुमचीच
             सौ . अनुजा

🌹🍀🌹🍀🌹🍀🌹
सौ . अनुजा देशमुख
************************************* स्पर्धेसाठी

पत्र

              ||श्री||            बालेवाडी
                             ०९/०४/२०१७

प्राणप्रिय चि सौ स्वाती व चि.सुधीर,
अऩेकोत्तम आशिर्वाद !

        काल रात्री तुमचा उभयतांचा फोन येऊन गेला आणि तुमच्याकडून अत्यानंदाची बातमी समजली. आणि तुम्ही फार दूर असल्याने प्रत्यक्ष येऊन भेटू शकत नसल्याची खंत क्षणभर आनंद झाकोळून गेली.आणि खरोखर त्या क्षणी “ पंख होते तो , उड आती रे “ असं वाटून गेलं.

        आणि एक गंमत सांगते हं ! तुमचं पत्र देतानाच पोस्टमननं दिवाळी पोस्त मागितली आणि मी पोस्त दिल्यावर त्यांनी ही सुखद बातमी देणारं पत्र दिलं.आहे ना खरंच योगायोग !

         आधी अत्यानंदानं मला झोप येत नव्हती , त्यात बातम्यात “ चंदिगडला मायनस तापमान! 
नळातही पाणी गोठलं “ ही बातमी ! त्यातून तुुम्हा दोघांचा फोनवरचा सर्दी झालेली सांगणारा आवाज. टी. व्ही. पहाताना डोळ्याची धार थांबत नव्हती, तुझ्या बाबांचीही अवस्था फारशी वेगळी नव्हती.  

         अंथरुणावर पडले , पण निद्रादेवी जणू रुष्ट झाली होती. तूला पत्रही आज लिहू, उद्या लिहू
म्हणत राहून गेलं होतं . अॉफिसला जाईपर्यंत घरातली गडबड, दिवसभर ऑफीसमध्ये धावपळ, रात्री परत तेच. वेळ कुठे आणि कसा जातो कळत नाही. आज मात्र फक्त डोळ्यासमोर तू आणि
माझी येऊ घातलेलं नातवंडं

         आत्ता रात्रीचे तीन वाजलेत, पण एखादी गोष्ट ठरवली की तिची पूर्तता होईपर्यंत माझ्या जीवाला चैन नसते हे तूला ठाऊकच  आहे. अंथरुणावर पडल्यापडल्या मनात उचंबळून आलेल्या भावना कवितून साकारल्या.

          
“ तुझ्या भेटीसाठी बाळे “

तुझ्या भेटीसाठी बाळे
जीव माझा व्याकुळला
आठवांनी ग तुझिया
जीव खुळावेडा झाला ...१../

                      काळीजतुकडा माझा
                      दूरदेशी गं धाडिला
                      कधी बघेनसे झाले
                      माझ्या लाडक्या रे फुला...२...

भेटीसाठी सैरभैर
मन अनावर झाले
नेत्रांचाही बंध सुटे
लड अश्रूंची ओघळे ...३...

                     कोणी भेटवा रे माझ्या
                     परदशी पाडसाला
                     भेटीसाठी त्याच्या माझा
                     जीवजीव आसुसला ...४...

वेड्या मनासी मी आता
किती लाख मनविले
पाणी पुढेच वाहणार
कधी का मागे वळले ? ...५...

                      माता कन्येची होण्याचे
                      दु:ख आजला जाणिले
                      नेत्रातूनी असहाय
                      अविरत पाझरले      ...६..

शब्दांचा प्रपंच ग हा 
गमती  हे बुडबुडे
व्यथा माझ्या अंतरीची
काय तुला  उलगडे ? ...७…

           स्वाती, इतक्या लांब आहेस तू  की तूही मनात आलं तरी येऊ नाही शकत आणि मीही ! तरी स्वाती  तशीच गरज असली तर सांग , मी येईन कसंही करुन.

            असे काही प्रसंग घडले की तूला एवढ्या लांब पाठवायला मी तयार तरी कशी झाले,असे वाटते , पण क्षणभरच !  सुधीरसारखा समंजस,मनमिळावू, निर्व्यसनी जावई मिळाला या समाधानात बाकीची खंत विरुन जाते.

            सुधीर, पत्नीबद्दल “ गृहिणी, सचिव: सखि “ … अशा अर्थाचं सुभाषित आहे, त्याप्रमाणे
या अवस्थेत तिथे मी नसताना तिची  आई, मैत्रिण सारं काही तुम्हालाच व्हावं लागेल . अर्थातच तुम्ही तिची माझ्याइतकी, किंबहुना त्याहीपेक्षा काळजी घ्याल याबद्दल मला किंचितही शंका नाही. तरीहि रहावत नाही म्हणून सांगते , कारण मुळात ती खूप लांब गेलीय  पंजाबसारख्या
परमुलुखात! , तेही अशा नाजूक परिस्थितीत ! तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त तिच्या सहवासात रहा, अर्थात हे सांगणे न लगे. कदाचित तुम्हाला राग येणेही अशक्य नाही, पण कृपया मला समजून घ्या.

           स्वाती , मी तिकडे नाही आले तरी उपदेशामृत तर तूला पाजूच शकते. या परिस्थितीत तू घ्यायला हवी असणारी काळजी …..

            १) जास्त उष्ण उदा. पपई, खरवस इ. खाऊ नकोस.

            २) थंडीपासून अतिशय जपून रहा.

            ३) एकदम हिसका बसेल ,अशा त-हेने वजन उचलू नको

             ४) उलटी होत असेल तर सकाळच्या वेळी ब्रेड भाजून टोस्ट किंवा पोळीचा 
                 लाडू वगैरे  कोरडे पदार्थ खायचे. भात वगैरे अगदि कमी.

             ५) सर्वात महत्वाचं म्हणजे रोज सकाळसंध्याकाळ कमीतकमी फिरण्याचा तरी परिपाठ
                  ठेवायला हवा ,म्हणजे पुढे त्रास होणार नाही

             स्वाती, खरं म्हणजे  आम्हाला सगळ्यांनाच तिकडं यावस वाटतंय, पण दिपूचे सी.ए. फाऊंडेशनचे क्लास ,किरणची शाळा ! नाही जमणार ग एवढ्यात. त्यापेक्षा तुम्हालाच जमतंय का पहा.

        आता थांबते.  वेळेवर फोन व पत्र पाठवत जा.  पुन्हा  एकदा खूप  खूप आशिर्वाद उभयतांना!

                         तुमचीत आई
.
************************************* स्पधॅसाठी पत्रलेखन

           ||श्री||

आदरणीय ईश्वरास
     शिरसाष्टांग नमस्कार वि. वि.
प्रत्रास कारण की बरेच दिवस तुझ्याशी संवाद साधावा असे वाटत होते पण संधीच मिळाली नाही.पण अचानक साहित्यमंथनने संधी दिली पत्र लिहीण्याची.
     अरे आमचे घराणे तुझ्या आशेवरच काम करत होते पुजापाठ करणारे आईबाबा  घरही विठ्रठल मंदीराच्यावर
वडील पांडूरंगाचे वारकरी  व आई ज्ञानेश्वरांची भक्त आजीचा स्वर्गवास आषाढीलाच झाला बाबा हनुमान जयंतीला वारले मोठा भाऊ आषाढीला तर बहीण अंगारीका चतुथीॅला स्वर्गवासी झाले. असो !
      आम्ही सारे गजानन महारांजांचे भक्त दरवर्षी शेगावला जाऊन दर्शन घेतो.
असो!
असे असूनही तुझे मात्र आभार मानू की तुझ्यावर रागावू हेच मला समजत नाही. अरे संकट म्हणू की तुझे आमच्यावरचे प्रेम हेच मला समजत नाही .
       घरात सतत आजारपण मी हाॅस्पीटलमध्ये पायासाठी. जवळजवळ दोन महीने काढले हे कमी होते म्हणून यजमानांना आजारपण 5दिवस तो ही हाॅस्पीटलमध्ये होता. खरच हतबल झाले मती गुंग झाली होती काय समजत नव्हते.
     काय करावे शेवटी तुझ्याशी संवाद सांधण्याचा प्रयत्न करावा असे ठरवले अरे ईश्वरा तुला सवॅ कळते दिसते ना?मग माझ्याकडे  लक्ष कसे जात नाही .
    मी माझ्यापरीने तुझी सेवा करते .त्यात पण माझा स्वार्थ आहेना रे !हेच तुला आवडले नसावे. म्हणूनच तुला मी एवढेच सांगते की द्यायची तेवढी संकटे तू दे पण त्या बरोबर त्यातून मार्ग काढण्याची शक्तीपण दे .!मी माझा मार्ग सोडणार नाही तुझी प्रार्थना करतच राहीन तुला आवडो अथवा नाही.
    अरे खरच मी खूप  भांबावून गेले आहे . तूच मला मार्ग दाखवशील यावर विश्वास आहे.
माझा सर्व देवांना नमस्कार कृपा लोभ असू द्या .
पत्राच्या उ-तराची अपेक्षा नाही.पण मी माझी भावना पोहोचवण्येचा मी एक प्रयत्न केला आहे. कृपया मला समजून घे!
           तुझी एक भक्त
            त्रासलेली.
सुलभा कुलकणीॅ.मुंबई
******************
स्पर्धेसाठी

✍ पत्रलेखन ✍

प्रिय मित्र मंगेश
       स न वि वि
पत्र लिहिण्याचे प्रयोजन की मागच्याच आठवड्यात आपली भेट झाली पण त्यावेळेस आपण खुप काही बोलू शकलो नाही तुला घाई होती हे तुझ्या बोलण्यावरून मला कळून चुकलं होतं पण त्याच बरोबर तुझा चेहरा देखील निस्तेज अन् चिंताग्रस्त वाटला पुन्हा भेटू म्हणून तू निघुन गेलास तेव्हा तुझ्या मनातल्या आंतंरिक चिंतेचे कारण तुला विचारायचे राहुनचं गेले घरी आलो तेव्हा मन अस्वस्थ झाले होते कित्येक दिवसात तुला असे चिंतेत आणि निस्तेज असलेले कधीच बघितले नव्हते लहानपनापासून तुझ्या प्रत्येक सुख दुःखात मी सहभागी होतो हे तुला चांगलचं आठवत असेल काल अचानक तुझ्या शेजारी राहणारा राजेश भेटला तेव्हा त्याच्याकडून  मला सर्व काही कळलं दोन वर्षापासून शेतात होत असलेली नापिकी आणि वडिलांच आजारपण आर्थिक कुचंबना त्यातून होत असलेली तुझी ससेहोलपट त्यातच मध्यांतरी तू केलेला आत्महत्येचा प्रयत्न हे सर्व ऐकून मन विषण्ण झालं एक मित्र म्हणून तू साधा फोन देखील करू शकला नाहीस एवढे आपण परके झालो का रे .....? माझ्या प्रत्येक सुख दुःखात तू  मला साथ दिलीस मग तुझ्या दुःखात मी सहभागी नाहीं का रे होऊ शकत एवढे सारे घडून गेले पण याबाबत  तू माझ्याशी जराही बोलला नाहीस.........!
                  असो पत्र मिळताचं मला जरूर फोन कर भेटू आणि सविस्तर बोलू काळजी करू नकोस तुझ्या समस्येवर तोडगा नक्कीच निघेल पूर्वीचे दिवस परत येईल विश्वास ठेव तुझा मित्र तुझ्या सोबत असेल प्रत्येक क्षणी ..........!!

                     तुझाचं जीवलग
                       विशाल

@विशाल कन्हेरकर
निंभा जि अमरावती
मो 9637437412

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

*।। श्री ।।*  दि. 09/04/2017

प्रिय अरविंद काका,
सप्रेम नमस्कार.

विनंती विशेष, पत्रास कारण की, आज तब्बल एका वर्षानंतर तुमची आठवण आली. 25 डिसेंबरचा तो नवरंग सोहळा आज ही डोळ्यासमोर जशास तसा तरळत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सकाळ पासून रात्री पर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराने केलेली धडपड याची डोळा याची देही पाहिल्यामुळे अजुन ही स्मरणात आहे. साहित्य मंथन परिवार मधील काही निवडक साहित्यिकाचा हा सोहळा. त्यानिमित्ताने झालेल्या भेटी गाठी मन सुखावुन गेले. कार्यक्रमाच्या नंतर काही दिवस तर नुसत्या आठवणीमध्ये जगत राहिलो. रामराव काका ची भेट जीवनात खुप काही धडे शिकवून गेली. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे याची प्रचिती त्यांना भेटून आली. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना करतो. आमच्यात कुठली तरी शक्ती काम करीत होती ज्यामुळे 200 ते 250 किमी अंतर कडाक्याच्या थंडी असुनदेखील आम्ही सकाळी कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचलो. काका, आज प्रत्येक गोष्ट जशास तसे आठवत आहे कारण त्या घटनाच होत्या अविस्मरणीय. समुहात ज्यांची फक्त नावे परिचयाची होती ती मंडळी प्रत्यक्ष भेटताना काय आनंद झाला ? ते नक्कीच शब्दात मांडता येणार नाही. मुंबईहून आलेली सर्व टीम खुप छान सहकार्य मिळाले एकमेकाचे. इथे सर्वांचे नामोल्लेख करणे अवघड आहे तरी देखील जयश्री पाटील, शिल्पा जोशी, जागृती निखारे, संदीप पाटील, गजानन वाकणकर, नागेश काळे, अनिल हिस्सल, सुनील पवार, योगेश, दिलीप धामने, सुलभा कुलकर्णी, संगीता भालसिंग, प्रतिलिपी डॉट कॉम च्या वृषाली शिंदे, अशी काही आठवणीमध्ये राहनारी नावे आहेत जे की कधी ही विसरु शकत नाही.
काही दिवस आनंदात गेले आणि काही कारणामुळे मी समूहापासून दूर गेलो. खरे सांगतो काका मला आज ही कोठे ही मन लागत नाही. जी मजा किंवा नाते या समुहात मिळाली ते मला कुठे ही मिळाली नसती. माझी लेखन कला विकसित झाली किंवा मोठी झाली ती या समुहातून हे मला अभिमानाने सांगावे वाटते. मला माझी ओळख मिळाली या समुहात. म्हणून काका तुम्ही माझ्या लेखक शैली चे बाप आहात. बाकी सर्वजण मला नेहमी प्रोत्साहन देत होते त्यामुळे मी लिहित गेलो. एक वर्षापूर्वी याच कालावधीत मी समुहाच्या बाहेर गेलो होतो. योगायोगाने परत याच कलावधीत आपणा सोबत सुसंवाद साधण्याची संधी मिळाली.
माझ्या लेखनात काही चूक झाल्यास मला माफ करावे. आपल्या समुहात मला 7 समाविष्ट केल्याबद्दल मी आपला आभारी आहे.
पत्र मिळाल्याबरोबर पत्राचे उत्तर द्यावे. आपल्या पत्राची मी आतुरतेने वाट पाहत आहे.
मावशी च्या चरणी सा.दं.

आपलाच स्नेही
नासा
*************************************

साहित्यमंथन आयोजित पत्रलेखन स्पर्धा

विषय - पत्रास कारण की,    
                   ॥श्री ॥
                           अरविंद कुलकर्णी
                                अहमदनगर
                                दि 9/4/17
प्रिय साहित्यमंथन ,
स. न . वि . वि. पत्रास कारण की ,
खुप दिवसांनी मी तुला पत्र लिहायला घेतलय . नाही रे ! मी अजीबात विसरलो नाही तुला ! कसा विसरेन ?'मी आणि तू दोन नाहीतच मुळी , मीच अवघा 'साहित्यमंथन' मय झालोय
प्रिय साहित्यमंथन !  तूच कामधेनू, तूच चिंतामणी , तूच माझा कल्पवृक्ष आहेस ! तूझी भेट झाली अन माझ रितेपण कुठल्याकुठे पळून गेलं. मला आई मिळाली,बहिणी मिळाल्या,लेकी मिळाल्या."वडीलधारी माणसे मिळाली. भाऊ मिळाले.'सर्वकाही भरभरून दिलेस. मला हार्टअटॅक आल्यानंतर मी "डिप्रेशन"मधे गेलो होतो .सतत भिती वाटत होती की मला पुन्हा अटॅक येईल ! माझ्या जवळ सारखे कोणी तरी बसावे. बाहेर गेलो तरी कधी घरी जाईल असे वाटायचे ! मला माझ्या आवडीच्या साहित्यक्षेत्रात आणून तू माझे डिप्रेशन नाहीसे केलेस. समाजाची सेवा करणार्या थोर मंडळींची संगत घडउन आणलीस. माझी सुप्त प्रतिभा जागृत केलीस ! 
येवढे तू माझ्यासाठी केलेस मग कसा रे विसरेन तुला ?
प्रिय साहित्यमंथन खुप लिहावे वाटतेय. भावनांचा सागर उचंबळून आला आहे व डोळ्यावाटे वाहू लागला आहे. !
तूर्त थांबतो.
तुझ्या पत्राची अतूरतेने वाट पाहाणारा
सदैव तुझाच !
                        अरविंद कुलकर्णी
                         अहमदनगर
                                दि 9/4/17
फक्त सहभाग (स्पर्धेसाठी नाही)

*************************************
☘ स्पर्धेसाठी ☘
🍁 पत्रलेखन 🍁
( शाळेतील बाईंना )

         ॥ श्री ॥
                   मुंबई, दादर
                   सप्टेंबर ९५

आदरणीय
ती. साबणे बाईंना..
          शि. सा. नमस्कार.

       शाळा सोडून इतकी वर्षं झाली,
     पण शाळेबद्दलची..
            तुमच्याबद्दलची.. उत्कट जिव्हाळ्याची भावना आमच्या ध्याना मनातून पुसली गेली नाही कधीच !
     
       तीस वर्षात इकडचं जग तिकडे होतं
  .. पण मनातल्या सा-या आठवणी जशाच्या तशा ताज्या टवटवीत आहेत.

       आमचं मन अजूनही त्या काळातील ...
             मधु स्मृतींभोवती रुंजी घालतंय.

अनेक रंगांनी फुललेलं, गंध सुगंधांनी उमललेलं.. असं ते भावविश्व !
           
             आमचे ते गहिरे दिवस तुम्मच्यासारख्या शिक्षकांमुळेच साजिरे गोजिरे झाले.
      
      विद्यार्थीदशेत आम्ही सर्वजणींनी शाळेत जे सुखाचे क्षण टिपले.. निर्व्याज मनानं अनुभवले                
              त्याची कृतज्ञता कागदावर आणल्याविना चैन नाही पडणार.
             
               .. प्रत्येकीची गुणवैशिष्ठ्ये जाणून ती जोपासण्यासाठी
   तुम्ही घेतलेले परिश्रम, व्यक्तिगत लक्ष देणारे शिक्षक - शिक्षिका ..
     
      ..हे सारं जसंच्या तसं आठवतंय !
  आजच्या काळात दुर्मिळ असलेलं
    पण आम्हाला भरभरून मिळालेलं..
वात्सल्य, माया, स्नेहभाव याची तुलना तर ..

कशाशीही होऊ शकणार नाही.
    गेले ते दिवस म्हणून मन व्याकुळ होतंय.

जीव शाळेभोवती आणि काळीज शिक्षकांभोवती सोडून आल्येय ..
असंच सारखं वाटतंय.
...
     लहानपणीचा काळ पंख लावून उडून गेला
पण बरोबर
आमचे पंखही घेऊन गेला असं वाटतं.

              कारण आदर्श संस्कारांचं मोल शाळेत जरी असलं

     तरी व्यवहारी जगात ती किती फोल ठरतात..      

              याचेच अनुभव दिवसागणिक येत गेले.

शाळा घरातून अंगणात
आणि
अंगणातून विशाल जगात आणून सोडण्याचं काम करते,
           पण त्याचबरोबर त्या विश्वात ठामपणे उभं रहायचं सामर्थ्यही
        शालेय शिक्षणातच मिळावं असं वाटतं.
    
       शिक्षण संपल्यावरच खरा संघर्षाचा काळ सुरू होतो...
   तेव्हा अशा अटीतटीच्या प्रसंगी वागण्याचं
  
   शिक्षण आणि वळण
            जीवनातल्या या वळणावरच मिळालं तर -

स्त्री जीवनाच्या अवघड पाय-या चढणं
तिला तितकसं जड जायचं नाही..
      असं मनापासूनवाटतं.
           
जीवन म्हणजे
व्याप, ताप, मनस्ताप व सुखदु:खांची संमिश्र पोतडी असते ...
  
          ...हे जर मुलींपर्यंत वेळीच पोचवता आलं ...
   तर तिचं व्यक्तिमत्त्व ..

एकांगी, एकारलेलं
न राहता ते परिपूर्ण होण्याच्या द्दष्टीनं मदतच होईल असं वाटतं.

  ..           ती परिपक्वता वयानुसार येणार हे खरं असलं तरी परन्तु असं वाटतं की..
      
      स्त्री जीवनाचे वास्तव  - पुरुषप्रधान संस्कृतीची कल्पना .. अस्पष्ट रूपानं का होईना ..

शालेय शिक्षणाबरोबरच देता येणार नाही का ?
  
स्वत:चे विचार स्वच्छपणे, स्पष्टपणे मांडण्यासाठी लागणारा ठामपणा..   
      
या वयातच निर्माण करता येणार नाही का ?
    
वेळीच मन खंबीर केलं बनवलं तर पुढील आयुष्यात भावनांना तडे जाण्याचे जे प्रसंग येतात ते टाळता येतील.
       
न्यूनगंडाची भावना काढून निर्भयपणे प्रतिकूल प्रसंगानाही सामोरं जावं कसं ?
    
प्रसंग निभावून न्यावा कसा ?
            आपल्या इच्छा आकांक्षांना
बांध न घालता व्यवस्थित जगावं कसं ?
   
तसंच अन्याय सहन न करता योग्य मार्ग काढावा कसा ? ..
  
या ज्ञानाची
   या अनमोल शिक्षणाची शिदोरी मुलीला शाळेतच मिळाली तर ..
    
आयुष्यातली १५ / २० वर्षं..
स्वत:शी झगडण्यात,

मानसिक पातळीवर स्वत:ला स्थिर करण्यात,

स्वत:ला उभं करण्यात, व्यर्थ ठेचकाळण्यात जातात ..
             ती निश्चितपणे वाचतील .. असं वाटतं.

जीवन म्हणजे मानसिक आंदोलनाची..
                   ताणलेल्या नात्याची कहाणीच असते...
             
    पण प्रत्येक अन्यायाचा प्रतिकार करणं,
    स्वत:चं स्वत्त्व जपणं,

हक्काच्या गोष्टीसाठी लढणं...
             हे अजिबात गैर नाही..
          हे मुलीच्या मनावर बिंबवण्यासाठी ..     

आठवड्यातील काही तास  शालेय वेळापत्रकात असायला हवेतच हवेत..
    
     असे मनापासून वाटते.

नशीब, नियती, दैव,
         पुरुष प्रधानता या गोष्टींची थोडीबहुत जरी ओळख ..
            चर्चा, परिसंवाद, भाषण अथवा

पेपरमधील कुणाच्या उदाहरणातून करून दिली गेली तर ..

जीवनात तिला भोगाव्या लागणा-या
पुरुषप्रधान संस्कृतीचे चटके, त्याचा स्वैराचार आणि यातून येणारी अगतिकतेची,
              .. अपयशाची धार तिला तितकीशी बोचणार नाही.
               
                 अवहेलनेच्या
निखा-यावरून जातानाही तिचं मन खचणार नाही.

उलट अशा प्रसंगातही स्वत:ला शांत ठेवावं कसं ?

     संतुलित मनानं जगावं कसं ? ..
व अशा कठीण प्रसंगातूनही आपलं जीवन समृध्द बनवावं कसं ?
  
     याचं बाळकडूच तिला शाळेतून मिळेल.

व संसारात मानसिक पातळीवर जो संघर्ष करावा लागतो तो कमी करता आला नाही तरी ..

झगडण्याचं सामर्थ्य तरी नक्कीच तिच्या अंगी येईल.
      कळावे
              आपली नम्र
                  शरयू मेहता.
              डाॅ. शरयू शहा.
*************************************

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...