*शाळा सिध्दी मध्ये नियोजनाचा अभाव*
*A श्रेणीत असलेल्या शाळेची बाह्य मूल्यमापन राज्य निर्धारकामार्फत करण्याचे कार्यक्रम नुकतेच थांबविण्यात आल्याची सूचना मिळाली असल्याची सर्व राज्य निर्धारकाना आश्चर्याचा धक्का बसला. सध्याचे नियोजन स्थगित करण्यामागे काही वेगळेच गौडबंगाल दिसतेय, अशी सर्वच निर्धारकांना शंका येतेय. याबाबत प्रशासनाकडुन खरे कारण समजावे ही एक अपेक्षा आहे.*
शाळा सिध्दी हा केंद्र शासनाचा उपक्रम आहे जे की आपल्या राज्यात फार मोठा गाजावाजा करून राबविण्यात आले. वास्तविक पाहता प्रत्येक शाळेने यात सहभाग घेऊन माहिती भरणे का अत्यावश्यक करण्यात आले ? हे कळायाला मार्ग नाही मात्र या निर्णयामुळे तळागाळातील आणि डोंगर दऱ्यातील मुख्याध्यापक लोकांना खुप त्रास सहन करावे लागले. अगदी सुरुवातीला तर हे उपक्रम कळायाला मार्ग नव्हता. जे निर्धारक तयार करण्यात आले होते ते सुध्दा स्वतः संभ्रम अवस्थेत उत्तर देत होते. याची माहिती देखील एक तर इंग्रजी किंवा हिंदीत उपलब्ध होती त्यामुळे मराठी प्रेमी शिक्षकांना त्याच्या त्रास सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता.
मुख्य सात मुद्याच्या अधारावर संपूर्ण शाळेचे चित्र निर्माण होणार होते आणि 999 गुणापैकी 800 च्या वर गुण मिळविणाऱ्या शाळा A श्रेणी मध्ये गणना झाली होती. त्याच शाळाचे बाह्य मूल्यमापन करण्यासाठी प्रत्येक विभागात दोन टप्यात राज्य बाह्य निर्धारक तयार करण्यात आले होते जे की A श्रेणी मध्ये असलेल्यां शाळाचे बाह्य मूल्यमापन करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करणार होते. त्यासाठी संपूर्ण वेळापत्रक तयार करण्यात आले होते. तसे काम ही सुरु झाले होते. निर्धारकांच्या अहवालानंतर ही ती शाळा A श्रेणीत येत असेल तर त्या शाळेला तसे प्रमाणपत्र मिळणार असे नियोजन करण्यात आले होते. मात्र या सर्व नियोजनाचे तुर्त्त तरी तीन तेरा वाजले आहे. वास्तविक पाहता या कार्यक्रमात नियोजनाचे अभाव ठळकपणे दिसून येते. त्याच सोबत अधिकारी मंडळीनी या कार्यक्रमाला म्हणावे तसे सहकार्य दिले नाही. कदाचित त्यांचा ईगो दुखावला गेला असेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. कारण शाळा तपासणीसाठी एक सामान्य शिक्षक राज्य निर्धारक म्हणून जाऊ लागले होते. त्यामुळे त्यांनी स्वतःहुन या कार्यक्रमापासून दूर केल होते, असे चित्र काही तालुक्यात दिसून आले. काय करायचे ते करून घ्या पण आम्हाला विचारू नका अशी भूमिका घेतल्यामुळे पहिल्या दोन दिवशी निर्धारकाना अनेक संकटाला तोंड द्यावे लागले.
वास्तविक पाहता प्रत्येक तालुक्यात A श्रेणीच्या शाळा कोणत्या हे पाहण्याचे काम तालुका अधिकारी म्हणून गटशिक्षणाधिकारी यांची होती. त्यानुसार त्यांनी जी शाळा A श्रेणीत आली आहे ती खरोखर त्या दर्जाची आहे काय ? याची एक वेळा खातरजमा करण्यास हरकत नव्हती. ती शाळा चुकून A श्रेणीत आली असेल तर तसे जर विद्या प्राधिकरणला कळविणे आवश्यक होते. पण तशी तसदी घेतल्या गेली नाही त्यामुळे निर्धारकांना शाळेवर गेल्यावर हिरमोड झाला. शाळेवर अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाले नाही कारण त्यांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांना तसे अवगत केले नाही म्हणजे क्षेत्रीय अधिकाऱ्यांची उदासीनता स्पष्ट दिसून येते. निर्धारकाना शाळेवर जाण्या-येण्याची तसेच मुक्काम करण्याच्या गैरसोईमुळे जो त्रास झाला तो अधिकाऱ्यांनी मनावर घेतले असते तर कदाचित झाला नसता, असे वाटते. तालुक्याच्या अधिकाऱ्यांना आवश्यक दिवसासाठी चार चाकी वाहन आणि चार लोकांची व्यवस्था करण्यासाठी दिवसाकाठी काही रक्कम खर्च करण्याचे आदेश दिले असते तर प्रत्येक तालुका अधिकारी तालुक्यातील A श्रेणीतील संख्येनुसार नियोजन नक्की केले असते. परंतु बाह्य निर्धारकामध्ये शिक्षक मंडळी असल्यामुळे कुणीही तेवढे मनावर घेतले नाही असे दिसते. तरी ही पहिल्या दोन दिवसासाठी शिक्षकांनी आपल्या पदरचे पैसे खर्च करून दोन दिवस तळपत्या उन्हात, कोसो किमी ची पाय पीट करून खुप त्रास सहन करून मूल्यमापनाचे काम केले. काही निर्धारकानी आवश्यक स्टेशनरी साहित्य खरेदी करून ठेवली होती. म्हणजे निर्धारकांची खुप तयारी होती हे यावरून दिसून येत नाही काय ? हे काम या महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण ही झाले असते मात्र काही मुख्याध्यापकांचे निवेदन आणि उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन शाळा तपासणी चा गाशा सध्या तरी जून - जुलै पर्यंत गुंडाळला गेला. जून मध्ये पावसाळा सुरु होतो त्याचा ही त्रास होणार आहेच. आपल्या राज्यात सर्व ऋतुत त्रास होतो. त्यामुळे बाह्य मूल्यमापनाची प्रक्रिया आत्ताच एप्रिल महिन्यात पूर्ण व्ह्ययला पाहिजे अशी प्रत्येक निर्धारकांची ईच्छा असताना बाह्य मूल्यमापन प्रक्रिया रद्द करण्यात आली. असो काही एक हरकत नाही पुढील महिन्याच्या जून - जुलै महिन्यातील नियोजनावेळी काही गोष्टी लक्षात घेऊन योग्य नियोजन करण्यात येईल अशी अपेक्षा ठेवण्यास काही हरकत नाही.
शेवटी एक नमूद करावेसे वाटते की , जुन-जूलै मध्ये ज्यावेळी बाह्य मूल्यमापन करण्याचे नियोजन होईल त्यावेळी आज जे शिक्षक राज्य निर्धारक म्हणून आहेत त्यांनाच काम देण्यात यावे. तालुक्यातील A श्रेणीतील शाळा खरोखर त्याच श्रेणीत येतात काय याची खातरजमा गटशिक्षणाधिकारी यांनी करावे तसेच बाह्य मूल्यमापन करण्यासाठी येत असलेल्या राज्य निर्धारकाची शाळेवर येण्या-जाण्याची, राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था विद्या प्राधिकरणाने तालुका प्रमुख असलेल्या गटशिक्षणाधिकारी यांचेवर टाकली तरच हे कार्य सफल होईल. अन्यथा निर्धारकाना त्रास होऊन त्याचा आउटपुट बरोबर येणार नाही, असे वाटते.
*नासा येवतीकर, स्तंभलेखक*
No comments:
Post a Comment