Saturday, 15 April 2017

लिहिते व्हा......!

लिहिण्याला पर्याय नाही

कोणत्याही भाषा विकासातील सर्वात शेवटचे आणि अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे लेखन क्रिया. भाषा विकासात श्रवण, भाषण आणि वाचन या तीन मूलभूत क्रियेनंतर येणाऱ्या लेखन क्रियेकडे सर्वाचेच लक्ष असते. कारण लेखन प्रक्रियेतून आपली माहिती दीर्घकाळ जतन करू शकतो. अभ्यासासाठी देखील त्या लेखी साहित्याचा वापर करता येतो. म्हणून त्यास खुप महत्त्व दिल्या जाते. ज्यावेळी कागदाचा शोध लागला नव्हता त्यावेळी लोक काय करत असत ? झाडांच्या साली किंवा पानावर काठीद्वारे रेघोटया मारुन लिहिले जायचे. त्याही पूर्वी एका व्यक्ती कडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती मुखोद्गत पध्दतीने दिल्या जायची. गुरुकुल पध्दतीमध्ये गुरुच्या मुखातून निघालेली प्रत्येक माहिती, ज्ञान लक्ष देऊन ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. वनस्पतीच्या अर्कापासून रंग तयार करणे आणि टाकद्वारे लिहिण्याची पद्धत पूर्वीच्या काळी दिसून येत होत्या. जसे जसे काळ बदलत गेले तसे तसे लेखन कला देखील विकसित होत गेली. छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळातील आज्ञापत्र जर पाहिले तर आपणास लक्षात येईल की लेखनास किती महत्त्व आहे ते. संत रामदास स्वामी यांनी तर लिहिण्याच्या बाबतीत म्हटले आहे की दिसामाजी काही तरी लिहावे. कारण सौ बका एक लिखा सारखेच असते. काही ठिकाणी वारंवार बोलून फायदा होत नसतो किंवा समस्या सूटत नाही त्या ठिकाणी एखादे कागद लिहून पाठवले की चुटकीसरशी काम पूर्ण होते. ज्यास लेखणीची किंमत माहित आहे तो लेखणीला कधीच दूर करत नाही.
वर्षभर कलेेल्या अभ्यासाची लेखी परिक्षेच्या माध्यमातून परिक्षण होते. त्यासाठी लिहिणे आवश्यक आहे. वाचन आणि लेखन ह्या एकमेकाच्या संगतीने राहत असतात. जो चांगल्या प्रकारे वाचन करू शकतो तो उत्तम प्रकारे लेखन करू शकतो. वाचन केल्यामुळे आपल्या जवळ त्या भाषेची शब्दसंपत्ती वाढू लगाते शब्दाची साथ असल्याशिवाय आपल्याला काय व्यक्त करायचे आहे ते व्यक्त करुच शकत नाही. संगणकच्या युगात लिहिणे कमी होत आहे असे जरी वाटत असले तरी लिहिण्याला अजुन तरी पर्याय उपलब्ध नाही. शासन किती ही पेपरलेस कारभार करण्याची संकल्पना केली तरी कागद आणि लिहिणे क्रमप्राप्त आहे. वास्तविक पाहता ज्याचे सुंदर अक्षरात लेखन करण्याची कला आहे त्यास साहित्य क्षेत्रात मानाचे स्थान आहे. अक्षरांच्या नियमानुसार जे लेखन करतात त्यास वळणदार अक्षर संबोधिले जाते. प्राथमिक वर्गापासून मुलांच्या लेखानाकडे लक्ष दिल्यास लेखन सुधारणा होऊ शकते. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले जाते मात्र लेखनाकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले जात नाही. लेखनाचे प्रामुख्याने दोन प्रकार दिसून येतात. पहिला प्रकार म्हणजे अनुलेखन, ज्यास पाहून लिहिणे असे म्हटले जाते. प्राथमिक वर्गात सहसा अनुलेखनाकडे लक्ष द्यायला हवे. अनुलेखन करताना मुले प्रत्येक अक्षर कश्या पद्धतीने लिहितो याकडे लक्ष देऊन आवश्यक त्या ठिकाणी मुलांना सूचना दिल्यास अक्षर लेखनात नक्की सुधारणा होऊ शकते. मात्र नेमके याच ठिकाणी पालक आणि शिक्षकांच्या हातून चूका होतात. प्रत्येक मुलांचे अक्षर वेगवेगळे असते, पण थोडी मेहनत घेतली तर प्रत्येक मुलांचे अक्षर सुंदर आणि वळणदार होऊ शकते, हा विश्वास असले पाहिजे. अनुलेखनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर श्रुतलेखनाकडे वळावे लागते. ज्याची श्रवण प्रक्रिया अगदी पूर्ण झाली असेल तेच मूल श्रुतलेखन करू शकते. ऐकून लिहिणे ही प्रक्रिया वाटते तेवढी सोपे नाही. कारण कोणाला काय ऐकू येते आणि कोण काय समजून घेतो यावर ही लेखन प्रक्रिया अवलंबून आहे. वर्गात सर मुलांना ऐकून लिहिण्यास सांगतात दैवत आणि मुले लिहितात दईवत असे कश्यामुळे होते याचा शोध लावणे अत्यावश्यक आहे. मुलांचे या दोषाचे निदान झाले नाही तर पुढे त्याचा भाषा विकास होणे शक्य नाही. आपले विचार डोक्यात आल्यानंतर त्यास शब्दबध्द करून त्याची मांडणी करणे सर्वाना जमेलच असे ही नाही. कित्येक मंडळी एका शब्दावरुन खुप काही लिहितात त्यास राईचा पर्वत करणे म्हणू शकतो. तर काही मंडळी आपले विचार लिहूच शकत नाहीत. त्यांची नेहमी तक्रार असते की मला साध्या दहा ओळी लिहिता येत नाही. आमच्या गुरुजींनी आम्हाला कधी शिकविले नाही. अन्यथा आम्ही सुध्दा आज शिक्षक म्हणून राहिलो असतो, असे ऐकायला मिळते.
समाजात वेगवेगळ्या प्रकारची लोक राहतात परंतु सर्वच लोक लिहू शकतात अशी बाब नाही. ज्याला दृष्टी आहे आणि विचार करण्याची शक्ती आहे तोच आपल्या लेखणीद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य करू शकतो. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लेखणीच्या माध्यमातून जनजागृती केली आणि इंग्रजाना भारतातून हाकालुन दिले. एवढी प्रचंड ताकद या लिहिण्यात आहे. ही ताकद पूर्वी ही होती आणि आजही आहे, यात शंका नाही. आज संगणक च्या युगात डिजिटल शाळा आणि ई लर्निंग मुळे मुले हळूहळू कागदवार लिहिण्यापासून दूर होत आहेत. अक्षरांच्या बटन वर दाब देऊन लेखन करण्याच्या युगात लेखन  कला लोप पावते की काय अशी अनामिक भीती राहून राहून मनात येत राहते. समाजातील प्रत्येक लोकांचा मनामानात आणि घराघरात पोहोचलेला व्यक्ती म्हणणे शिक्षक. लोकांच्या मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक प्रश्नापर्यंत शिक्षकांशिवाय कोणी पोहोचु शकत नाही. त्यामुळे शिक्षक मंडळीनी खास करून लिहिण्यावर भर द्यावा. समाजातील विविध समस्या, प्रश्न आणि शंकेचे निराकरण आपल्या लेखणीच्या मार्गदर्शनातून शिक्षकांने करणे आवश्यक आहे. परमपूज्य साने गुरुजी यांच्या जीवन चरित्राकडे बारकाईने लक्ष दिल्यास एक गोष्ट कळून चूकते की, शिक्षकांच्या लेखणीत समाज परिवर्तन करण्याची ताकद किती मोठ्या प्रमाणात आहे. लिहिणाऱ्या व्यक्तीला अनेक गोष्टीचा विचार करावा लागतो त्यामुळे तो प्रगल्भ व्यक्ती असतो. शिक्षणाची जागतिक प्रेरणा स्थान ठरलेली मलाला युसूफजाई म्हणते की, माझ्या हातात पुस्तक आणि पेन द्या मी जगात क्रांती करून दाखवेन. ही प्रेरणा लक्षात घेऊन शिक्षकांमध्ये सुधारणा हवी असेल तर ते फक्त लेखनातून विकसित होऊ शकते. रोज एक तरी पान आपल्या मनातील विचार लिहिण्याची पध्दत एका वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवेल, यात शंका नाही. शिक्षकच मुलांना लिहिते करू शकतात. पण त्यासाठी शिक्षक साहित्याचा रसिक असणे आवश्यक आहे. त्याला स्वतःला लिहिण्याची आवड असेल तरच तो मुलांना याबाबतीत  काही सांगू शकतील. जो शिक्षक लेखक आहे त्यांच्या शाळेतील मुले काही ना काही नवसाहित्य निर्माण करू शकतात. म्हणून शिक्षकांनी कविता, गजल आणि लेख लिहित राहाणे आवश्यक आहे.त्यामुळे शिक्षक मित्रांनो चला उचला लेखणी आणि लागा लिहायला. पहिल्यांदा चुकाल तरच शिकाल ना. जो चुकत नाही सहसा तो शिकत नाही किंवा जो काही करतच नाही तोच चुकत नाही असे म्हणण्यास हरकत नाही. चूका आणि शिका या तत्वानुसार शिक्षकांस समाधानी जीवन जगण्यासाठी लिहिण्याशिवाय पर्याय नाही, असे वाटते.

नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

2 comments:

  1. तलवारी पेक्षा लेखणी श्रेष्ठच..
    सां.रा.वाठारकर.चिंचवड.

    ReplyDelete
  2. खूपच छान वाचनीय

    ReplyDelete

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...