लोकसहभागातून शाळेची प्रगती
गावातील शाळा ही सर्वासाठी एक आधार असते. प्रत्येक शाळेला ही गावाचा आधार खुप महत्वाचा असतो. जेथे हे दोन एकमेकाच्या हातात हात घालून चालतात तेथे शाळेची आणि गावाची प्रगती लक्षणीय असते, यात शंका नाही. गाव तेथे सरकारी शाळा ह्या धोरणा नुसार आज राज्यातील प्रत्येक गावात कमीत कमी चौथ्या वर्गा पर्यंत चे शिक्षण मिळण्याची सुविधा शासनाने निर्माण केले आहे. शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये राज्यातील सहा ते चौदा वयोगटा तील प्रत्येक बालकांस मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे बंधनकारक करण्यात आले आहे त्यामुळे प्रत्येक गावात निदान दोन खोलीचे दोन शिक्षकी सरकारी शाळा अस्तित्वात आहे. ह्या शाळेला शासना कडून वेगवेगळे अनुदान मिळतात मात्र ते फारच तूटपूंजी ठरतात आणि त्यासाठी गावातील लोकांचा लोकसहभाग असणे आवश्यक आहे असे वाटते. लोकसहभाग का असावा हे ही महत्वाचे आहे. एखाद्या वस्तुचा भागीदार मी असेन तर त्याची काळजी योग्य प्रकारे घेतली जाते. तसे पाहिले तर शाळा ही गांववाल्या साठी सरकारी मालमत्ता आहे. त्याचा ते हवा तसा वापर करू शकतात. कोणी शाळेत लग्न लावतात तर कोणी लहान सहान जेवण्याचे कार्यक्रम शाळेत उरकुन घेतात. गावातील मुलांसाठी खेळण्याचे खुले मैदान म्हणजे शाळा. सायंकाळी निसर्ग रम्य आणि शांत वातावरण आहे म्हणून मद्यपी मंडळी सुद्धा याचाच आधार घेतात. काही लोक आपला कार्यक्रम शांतपणे करून तेथे कसलाही गोंधळ न करता निघुन जातात तर काही महाभाग बाटली तेथे च फोडून काचेचा सडा टाकतात. अर्थात त्याचा त्रास गुरुजींना जेवढा होतो तेवढाच शाळेत शिकणारी मुले म्हणजे गावकऱ्याचीच मुले त्यांना त्रास होतो. काही मंडळी शाळेच्या स्वछतागृहात घाण करतात. त्याची नासधुस करतात. गुटखा आणि तंबाखू थुंकुन शाळेच्या भिंती रंगवून टाकतात. शाळेच्या बाहेरील भिंतीवर काही चित्र किंवा नकाशे काढलेले असतील तर त्यावर चित्रविचित्र रेषा ओढतात, शब्दाचे खाडाखोड करून अनर्थ करतात. हे सर्व कश्यामुळे घडते तर या शाळेत माझा एक ही टक्का सहभाग नाही त्यातल्या त्यात आर्थिक सहभाग नाही. तेच जर गावकरी यात थोडा जरी सहभागी झाला तर त्याला काळजी वाटते. म्हणून लोकसहभाग आवश्यक आहे.
राज्यात सर्वत्र डिजिटल शाळेचे वारे वाहत आहेत. खाजगी शाळेला ही लाजवेल अश्या पध्दतीने सरकारी शाळा आपले रूप बदलत आहे. आज कित्येक शाळा रंगरंगोटीने सजून मुलांना आकर्षित करीत आहेत. बऱ्याच शाळेत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचले असुन डिजिटल च्या माध्यमातून मुलांना नवनवीन माहिती दिली जात आहे. शाळेचे हे रूप बदलण्यासाठी सर्वांची मोलाची मदत मिळत आहे, हे विशेष. शाळेच्या या बदलत्या स्वरूपात मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी, सरपंच आणि ग्रामपंचायत तसेच त्या शाळेत शिक्षण घेतलेले नागरिक व गावकरी या सर्वाच्या आर्थिक सहकार्य लाखमोलाचे आहे. चौदाव्या वित्त आयोगतील ग्रामपंचायती कडून शाळेला 20 टक्के रक्कम मिळत असल्यामुळे शाळेला अजून चांगला हातभार झाला आहे. या लोकसहभागामुळे गावातील प्रत्येक लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला आहे. त्यामुळे आज गावातील शाळा म्हणजे सरकारी मालमत्ता वाटत नसून स्वतःची शाळा वाटते. आपल्या मनात शाळेविषयी प्रेम आणि आपुलकी निर्माण व्हावे या उद्देश्याने लोकसहभागा ची खरी गरज आहे. गावातील एखादा श्रीमंत व्यक्ती भरपूर पैसा देऊन शाळेचा कायापालट करू शकतो मात्र तसे न करता लोकवर्गणी गोळा करून हे कार्य करायचे आहे. ज्या गावातील शाळा अजुन डिजिटल झाले नाहीत किंवा शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या नाहीत त्या गावातील सर्व यंत्रणा एकदा एकत्र येऊन यावर विचार करणे आवश्यक आहे. शाळा चालविणे हे सरकारचे काम आहे. त्यासाठी मी का खर्च करावा ही मानसिकता दूर करून आपणास जेवढे जमेल तेवढे आर्थिक सहकार्य केल्यास प्रत्येक गावातील शाळेचा बाह्यांग आणि अंतरंग बदलण्यास वेळ लागणार नाही. सरकारी शाळेची स्थिती आज खुप वाईट आहे आणि त्या शाळेला गत वैभव मिळवून देण्याची सर्वस्वी जबाबदारी एक नागरिक म्हणून आपली आहे. गावात एखादे मंदीर असेल तर त्यांच्या सुंदरतेसाठी आणि विकासासाठी दरवर्षी काही ना काही रक्कम वर्गणीच्या स्वरुपात गोळा केली जाते. मग शाळा हे तर विद्येचे मंदीर आहे. येथे जिवंत माणसे घडविले जातात. येथून एक सुसंस्कारित पिढी बाहेर पडली तर गावाचा चांगला विकास होऊ शकतो. आजची मुले ही उद्याची आधारस्तंभ आहेत याची सर्व प्रथम जाणीव व्ह्ययला हवे. मुख्याध्यापक आणि शिक्षक मंडळीनी शाळेसाठी प्रयत्न करायचेच आहे आणि ते करणारच. त्या शाळेत शिकून मोठ्या पदावर काम करणाऱ्या गावकऱ्यानी एकत्र येऊन शाळेला काही आर्थिक किंवा वस्तुच्या स्वरुपात मदत करू शकतात. अनेक ठिकाणी याचे उदाहरण वाचण्यात येत आहेत ती चांगली बाब आहे. असेच प्रयत्न प्रत्येक गावागावात व्ह्ययला पाहिजे. त्याचसोबत गावातील प्रत्येक व्यक्ती जर प्रयत्न केले आणि धडपड केली तर सरकारी शाळेची प्रगती नक्कीच लक्षणीय होईल यात तिळमात्र शंका नाही. काही लोक विचार करतात की मी शाळेला काय मदत करू शकतो. आपल्या जवळ असलेली कला मुलांना बरीच काही माहिती देऊ शकते. गावात तबला व पेटी वाजविणारे भजनी मंडळ मधील अनेक लोक असतात. त्यांनी ती कला विद्यार्थ्याना फावल्या वेळात शिकविण्याचा प्रयत्न केल्यास आपलीच मुले त्यात निपुण होतील. मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी देखील आपली कल्पकता वापरून गावातील कामगार मंडळीचा कार्यक्रम घेऊन मुलांना त्याची माहिती करून द्यावी. गावात रिकामटेकडे होऊन गावभर फिरणारे तरुण-तरुणी यांनी महिन्यातील एक दिवस शाळेला समर्पित केल्यास शाळेला नक्कीच आधार होईल. गावातील चिमुकल्या मुलासोबत कधी गप्पा मारल्या आहेत काय ? जर आपले उत्तर नाही असेल तर एकदा त्यांच्या सोबत गप्पा मारुन बघा. खुप आनंद मिळेल जे की कुठे ही मिळणार नाही. मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा, प्रशासन किंवा इतरांना दोष देताना एकदा फक्त मदतीचा हात पुढे करा आणि बघा शाळेची प्रगती कशी वेगाने होते. शाळेतील प्रत्येक घटकाची मग आपणास अभिमान वाटू लागेल. तेंव्हा चला तर आपल्या गावातील शाळेला भरपूर लोकसहभाग मिळवून देऊ आणि शाळेची सर्व बाजूनी प्रगती करण्याचा प्रयत्न करू. उदाहरण म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी केंद्रातंर्गत येणाऱ्या कोठारी मुले, कोठारी मुलीं, काटवली, बामनी, कवडजई, मानोरा, किन्ही, पळसगाव, आमडी या दहा जिल्हा परिषदेच्या शाळेत सुविधाचे विकसन करण्याच्या हेतुने शाळांना शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य, ग्रंथालय, स्वच्छतागृह दुरुस्ती, आधुनिक तंत्रज्ञान डिजिटल स्कूल इत्यादी बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्याच्या दृष्टीने साद माणुसकीची सामाजिकता अभियानचे संस्थापक श्री हरीश बुटले यांच्या माध्यमातून विद्यालंकार ज्ञानपीठ ट्रस्ट यांच्या सहयोगाने 20 लाख रूपयाचा निधी प्राप्त झाला. त्यातून निर्देशित सुविधा पूर्ण करण्यात आल्या आणि संपूर्ण केंद्रात मिळालेल्या सुविधाचे वितरण आणि हस्तातंरण सोहळा दिनांक 30 मार्च रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोठारी ता. बल्लारपुर जि. चंद्रपूर येथे संपन्न होत आहे. समाजतील विविध मान्यवर मंडळी, सेवाभावी संस्था, ट्रस्ट यांनी समोर येऊन असे कार्य करणे गरजेचे आहे असे वाटते
नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक, धर्माबाद
nagorao26@gmail.com
No comments:
Post a Comment