Wednesday, 29 March 2017

ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण

ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण

ग्रामीण भागात शिक्षणाची अवस्था खुप वाईट स्थितीमध्ये असल्याचे प्रत्येकांच्या बोलण्यातून स्पष्ट होते. आज राज्यात गाव तेथे शाळा आहे म्हणजे प्रत्येक गावात कमीत कमी चौथ्या वर्गापर्यंतची शाळा अस्तित्वात आहे. जिसका कोई नहीं उसका सरकारी स्कूल ही आधार है, अशी सध्या तरी स्थिती आहे. इंग्रजी माध्यमाच्या किती ही शाळा रोज नव्याने जरी निर्माण झाले तरी सरकारी शाळेचे महत्त्व काही कमी होत नाही. याच सरकारी शाळेत शिकलेले अनेक अधिकारी आज मोठ्या पदावर काम करीत आहेत. माणसाच्या संपूर्ण जीवनात प्राथमिक शिक्षण जेथे पूर्ण झाली ती शाळा कधीही विसरु शकत नाही. योग्य संस्कार करण्याचे एक संस्कारी केंद्र म्हणजे प्राथमिक शाळा. जेथे जीवनातील अनेक लहान सहान बाबी शिकविल्या जाते. अभ्यासात हुशार असो वा नसो पण व्यक्ती सुसंस्कारी असेल तर यशस्वी जीवन जगु शकतो. माणसाचे चारित्र्य शुध्द असेल तर त्यास कुठे ही सन्मान आणि गौरव मिळू शकते. चारित्र्य मिळविण्याचे काम शिक्षणातून मिळते. पण आज मुलांना प्राथमिक शिक्षण योग्य प्रकारे मिळत नाही अशी ओरड समाजातून होत आहे. त्यात तथ्य असू शकते आणि ते खरे असेल तर त्यास कारणेदेखील असू शकतात. ग्रामीण भागातील शाळेत त्या सुविधा मिळत नाहीत जे शहरी भागातील शाळेत मिळतात. तिथे विद्यार्थी संख्या भरपूर असून देखील तेथील मुले सर्व बाबतीत सर्वगुणसंपन्न असतात. इथे मात्र विद्यार्थी संख्या 10 च्या घरात असून देखील त्यांची स्थिती तेवढी चांगली नसते. कारण अपुरी शिक्षक संख्या असल्यामुळे एकाच शिक्षकांवर सर्व गोष्टीचे भार पडते. मुलांचे पालक जागरूक नसतात. खाजगी शाळेत मुलांना पाठवित असताना त्याची पूर्ण काळजी घेणारे पालक सरकारी शाळेत पाठविताना बेफिकिर राहतात. असे का ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी संशोधन करणे आवश्यक आहे असे वाटते. समाजात आज असे ही पालक भेटतात मुलगा इंग्रजी शाळेत पाठवितात आणि मुलगी सरकारी शाळेत असे का ? असे जर विचारले तर फारच गमतीशीर उत्तर देतात. मुलीने किती शिकून काय फायदा आहे सर शेवटी ती लग्न झाल्यावर दुसऱ्यांच्या घरी जाणार ना. मुलगा शिकला, त्याला नोकरी लागली तर आपल्या घराची प्रगती होणार नाही काय ? अशी विचारधारा ठेवणाऱ्या पालकामुळे शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आज कित्येक मुलीं शिकून मोठ्या पदावर काम करीत आहेत. त्यांचे पालक असे विचार केले असते तर समाजातील आजचे चित्र बघायला मिळाले असते काय ? सध्याच्या सरकारी शाळेत एक नजर फिरविली तर आठव्या वर्गापर्यंत मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. अभ्यासात सुद्धा मुलीं हुशार दिसून येतात. दहावी आणि बारावीच्या निकालावर एक नजर फिरविली तर लक्षात येईल की मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी देखील मुलांपेक्षा जास्त आहे. म्हणजे मुलाकडे विशेष लक्ष देऊन सुद्धा त्याची प्रगती लक्षणीय नाही आणि मुलगी दुर्लक्षित असून देखील गुणवत्तेत ती पुढे आहे. म्हणून पालक वर्गानी या मुलामुलींत भेद न करता शिक्षण द्यायला पाहिजे ते ग्रामीण भागात दिसत नाही. गावात ज्या वर्गापर्यंत शाळा आहे तेथ पर्यंत मुलींचे शिक्षण पूर्ण होते. पुढील शिक्षणासाठी दुसऱ्यां गावी मुलींना पाठविले जात नाही. येथे सुद्धा विविध कारणे आहेत त्यावर आपणास बोलायचे नाही. तो एक स्वतंत्र विषय होऊ शकते. याचाच अर्थ त्या प्राथमिक शिक्षणावर ज्यांची गाडी थांबते त्यांची जीवनात काय प्रगती होणार ?. ते साक्षर असुन देखील निरक्षरा प्रमाणेच वागतात. मुलांना शिक्षणाच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते मात्र त्याचे वैयक्तिक अभ्यासावर मुळी लक्षच नसते. त्यामुळे देखील प्राथमिक वर्गात गुणवत्ता दिसून येत नाही. ग्रामीण भागात मुळात शैक्षणिक वातावरण नसल्यामुळे मुले रोजच्या अभ्यासापासून दूर राहतात. आई-बाबा शेतात काम करून सायंकाळी दिवे लावणीच्या वेळी घरी येतात. घरातले काम उरकुन जेवण केल्यावर शारीरिक थकव्यामुळे आपल्या मुलांना आज शाळेत काय झाले हे न विचारता झोपी जातात. ही एका दिवसाची कथा नसून रोजचीच कथा आहे. मुलांच्या शिक्षणाविषयी हे पालक खुपच बिनधास्त असतात. त्यांना काहीच काळजी वाटत नाही. वेळ निघुन गेल्यावर मात्र पश्चाताप करतात. तेंव्हा काहीच करता येत नाही. इथे शाळेत जेवढे शिकायला मिळाले तेच त्यांच्यासाठी अंतिम असते. 
शहरातल्या प्रत्येक प्राथमिक शाळेला बालवाडी किंवा अंगणवाडी जोडलेली असते जेथे तीन वर्षा पासून ते सहा वर्ष पूर्ण होईपर्यंत प्राथमिक वर्गास अनुकूल असे शिक्षण दिल्या जाते. त्यामुळे पहिल्या वर्गात प्रवेश घेणारे येथील विद्यार्थी प्रगत असतात. त्या उलट ग्रामीण भागात बघायला मिळते. ग्रामीण भागात देखील अंगणवाडी आहेत. तेथे सुध्दा तीन ते सहा वर्षातील मुले दररोज येत असतात. मात्र येथे मुलांना कुठलाही अभ्यासक्रम नसल्यामुळे अंगणवाडी उरल्या खाऊपुरते असेच म्हणण्याची वेळ आली आहे. वास्तविक पाहता अंगणवाडीमध्ये प्राथमिक माहिती मुलांना करून दिल्यास पहिल्या वर्गात काही कठिन जात नाही. पण अंगणवाडी आणि शिक्षण विभाग यांचे काहीही संबंध नसल्यामुळे पहिल्या वर्गात प्रवेश घेणारी मुले प्राथमिक माहिती देखील नसलेले मिळत आहेत. रोज शाळेत जाण्याची सवय लावणे हे काम देखील अंगणवाडीनीट करू शकत नाहीत हे अचानक केलेल्या अंगणवाडीतपासणी च्या वेळी अधिकारी लोकांना निदर्शनास आलेले आहेत. जोपर्यंत ग्रामीण भागातील अंगणवाडीमध्ये सुधारणा होणार नाही तोपर्यंत प्राथमिक शाळा पूर्णपणे प्रगत होईल याबाबत शंकाच आहे. शाळेच्या नियंत्रणाखाली अंगणवाडीचे कार्यक्षेत्र आल्या शिवाय त्यांच्यात काही सुधारणा होईल असे देखील वाटत नाही. सगळ्या गावात शाळेच्या आवारात अंगणवाडी भरविले जाते. मात्र शाळेचा आणि अंगणवाडीचा काही एक संबंध नाही. काही गावात अंगणवाडीशिक्षिका खुप मेहनत घेऊन मुलांना प्राथमिक शिक्षणाचे धडे देतात. तेथील मुलांची प्रगती शासनाने जसे ठरविले आहे अगदी तसेच तंतोतंत होत असते. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगती मध्ये अंगणवाडीमधील शिक्षण खुप महत्वाचे आहे, असे वाटते.
- नागोराव सा. येवतीकर,
मु. येवती ता. धर्माबाद

1 comment:

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...