Friday, 20 May 2016

Comman sense

कॉमन सेन्स . . . . ?

मित्राचे वडील आजारी असल्यामुळे दवाखान्यात जाण्याचा योग आला. तसे दवाखान्यात जायचे म्हटले की अंगावर काटा उभा राहतो. आजच्या  वैद्यकीय बाबींवर होणारा खर्च बघून डोळे गरागरा फिरण्याची वेळ येते तर आजारातुन सावरलेला व्यक्ती दवाखान्याचे बिल पाहून पून्हा त्याच दवाखान्यात भरती होतो की काय अशी भीती वाटते. असो दवाखान्यात आम्ही मित्रांच्या वडिलांची भेट घेतली. त्यांच्याशी गप्पा मारल्या ते ही फारच हळू आवाजात कारण तिथे हळू बोला अशी पाटी दिसत होती आणि आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो. ज्याठिकाणी आजारी लोकांची नोंदणी होते त्याठिकाणी बसलेला मुलगा आणि त्याचे वागणे पाहून खूपच राग आला. कारण त्याच्या डोक्यावर भिंती ला मोबाईलवर बोलु नका असा संदेश असणारी पाटी झळकत होती आणि हा आपल्या मोबाईलवर मोठमोठ्याने हसत, हातवारे करीत कुणाशी तरी बोलत होता. दवाखान्यात संपूर्ण शांतता होती आणि त्याच्या आवाजाने शांततेचा भंग होत होता. पण सांगावे कोणाला. त्याच ठिकाणी रुग्णाला भेटण्यासाठी येणारे व्यक्ती असे बोलले असते तर ही मंडळी लगेचच हटकले असते. असा विचार करीतच दवाखान्याच्या बाहेर पडलो. असे का घडले असेल ? तर त्या मुलाला कॉमन सेन्स नावाची वस्तू त्याच्याजवळ नव्हती म्हणून तसा तो विक्षिप्त वागत होता. असे मनाची समजूत घातली.
कॉमन सेन्स म्हणजे काय ? जी व्यक्ती वेळ, काळ, परिस्थिती नुसार स्वतःचे वर्तन ठेवते तिला कॉमनसेन्स आहे असे म्हणतात तर जे याविरूध्द राहतात किंवा वागतात त्यांना नॉनसेन्स म्हणतात. तारक मेहता का उल्टा चष्मा या विनोदी मालिकेत जेठालाल गडा त्याची पत्नी दया हिला वारंवार नॉनसेन्स म्हणत असतो कारण बहुतांश वेळा तिचे वागणे जेठालाल गडा यांस आवडत नसते त्यामुळे तो तिला तसे म्हणतो. पण ती खरोखरंच नॉनसेन्स नसते उलट तिच्याजवळ कॉमन सेन्स भरपूर असते. असो
जीवनामध्ये सहसा असे घडत राहते, समोरून येणारी व्यक्ती आपणांस आवडत नाही त्यामूळे आपण त्याला टाळण्याचा प्रयत्न करतो. कारण त्यांच्यात काही तरी कॉमन सेन्सच्या गोष्टीची उणीव असते आणि त्याचा त्रास अर्थातच आपणाला होतो. उदाहरण पहायचे असेल तर एखाद्या व्यक्तीला विनाकारण बोलायची खूपच सवय असते. बोलतांना इतरांचे काही ऐकायचे नाही आणि स्वतःचे बोलणेच सत्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न करायचे
समोरचा व्यक्ती ऐकण्याच्या मूड मध्ये नसेल तरी आपले रडगाणे चालूच ठेवायचे मग अश्या लोकांना कॉमन सेन्स कमी असणारच आणि या लोकाना जाणूनबुझुन लोकं टाळणार नाही तार काय करणार ?
आपण कॉमन सेन्स ठेवून काम करावे म्हणजे नेमकं काय करावे आणि कोणत्या ठिकाणी कसे वागावे याचे भान ठेवले की कोणी आपणांस नॉनसेन्स ( मूर्ख ) म्हणणार नाही.
सहसा खालील बाबतीत आपण कॉमन सेन्स ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
आपण पाहूण्याच्या घरी गेल्यावर अगदी आपल्या घरी वावरल्यासारखे वागू नये. पाहूणचार अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण होतोच नक्की फक्त प्रतीक्षा करावी लागते त्यामूळे थोडं धीर धरावा त्यातच तर शहाणपणा असतो.
आपल्याकडे कार्यक्रम करण्याची सूत्र दिल्यानंतर त्याठिकाणी मनाला वाटेल तसे बडबड करू नये. आपणच जास्त हुशार आहोत या व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तींपेक्षा असा विचार आपल्या मनात कधीच येऊ देऊ नये. आपल्या सूत्रसंचलनाने कार्यक्रम उठून दिसावा असे बोलावे. पण सहसा असे ज्याठिकाणी घडत नाही तेथे सरळ ऐकायला मिळते सूत्रधारने सगळा कार्यक्रम पाण्यात टाकला.
रस्त्यांचे जे काही नियम आहेत त्याचे पालन करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या विक्षिप्त वागण्यामुळे इतरांना त्रास होतो आणि योग्य वागल्यास सर्व काही सुलभ आणि योग्य चालते.
प्रवास करताना मी एक भारतीय या नात्याने वागावे.  गाडीत कचरा न करणे, गोंधळ न करणे, आपल्या वागण्याचा इतरांना त्रास होऊ न देणे, सर्वांशी प्रेमाने वागणे या लहान सहान गोष्टी लक्षात ठेवुन वागणे म्हणजेच कॉमन सेन्स होय.
आपणाला साजेल आणि शोभेल असे कपड़े वापरणे. आपण कोणत्या कार्यक्रमात जात आहोत यावरून कपड़े वापरणे महत्वाचे असते
आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले आणि आपले घर अस्वच्छ दिसले तर आलेल्या पाहूण्याना कसे तरी वाटते आणि आपणाला सेन्स नसल्याची जाणिव होते. त्यामूळे घरातील प्रत्येक विभागात साफसफाई आणि स्वच्छता स्पष्ट दिसून आली पाहिजे
आपल्या घरातील tv किंवा इतर संगीत साधनांचा आवाज किती मोठा असावा याबद्दल ही आपणाला जाण असणे आवश्यक आहे असे वाटते. आपल्या घरी एखादा कार्यक्रम असला की आपण रात्रभर मोठ्या आवाजात संगीत, गाणे लावावे का याचा विचार करून वागणाऱ्या लोकांची समाजात मान राहते.
लग्नप्रसंगी खास करून तरुण मंडळी नवरदेवाचे मित्र एवढा वेळ नाचतात की लग्नाची वेळ सारूनी तासभराचा काळ उलटतो तरी ही मुले सैराट होऊन झिंगाट नाचत असतात. त्यास काय म्हणावे ?
विशिष्ट गाणे ऐकण्याचा काही वेळ असतो. सकाळच्या प्रहरी dj चे गाणे लावले तर सर्वच जण आपणाला मुर्खात गिनती करतात. तेच जर भावगीत, भक्तीगीत, श्लोक असे गाणे लावल्यास कोणी काही म्हणणार नाही. त्याचमुळे गाणे निवडताना सुध्दा सेन्सची गरज भासते.
बिरबल हा हजरजबाबी होता, त्याच्याकडे विनोदबुध्दी होती म्हणून तो प्रत्येक संकटावर हसत हसत तोंड देत असे आणि त्याचे उत्तर सुध्दा शोधून काढत असे. संकटाला न घाबरता आपले संतुलन बिघडू न देता जे उत्तरे शोधतात त्यांचे जीवन सफल होते. त्यामूळे नेहमी हसतमुख राहण्याची सवय लागते. असे व्यक्ती प्रत्येकाला हवेहवेसे वाटतात आणि सतत दुःखी राहाणाऱ्या माणसाचा सहवास कोणालाही नको वाटते
कोणाच्या अंत्ययात्रेसाठी गेल्यावर अगदी गंभीरपणे रहावे लागते. बहुतेक जण अंत्ययात्रेत लग्नाच्या कार्यक्रमात गप्पा मारल्यासारखे गप्पा मारतात, मोबाईलची रिंग टोन जोरात वाजले जाते, मोबाईलवर जोरजोरात बोलतात अश्या वागण्यामुळे आपले सेन्स इतरांना लगेचच कळते.
शाळेत विद्यार्थ्याना शिकविताना शिक्षकांनी आपले मोबाईलवरचे बोलणे शक्यतो टाळायाला पाहिजे. आपले मोबाईल सायलंट मोडवर ठेवून आपले अध्यापन कार्य संपल्यावर बोलावे हे आहे कॉमन सेन्स. पण सहसा असे चित्र फार कमी बघायला मिळते. आत्तातर स्मार्ट फोन डिजिटल मोबाईल मिशन स्कूल संकल्पनेमुळे शासनाने सरळ वर्गात मोबाईल वापरण्याची परवानगी दिली आहे. त्याचा फायदा मुलांना कितपत होतो तो एक संशोधनाचा भाग राहील. परंतु वर्ग अध्यापनात आपल्या मोबाईलचा त्रास मुलांना होऊ न देणे यांत सेन्स आहे हे लक्षात घ्यावे.
कार्यालयीन वेळेचा वापर कार्यालयासाठी वापरणे
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नये अश्या सूचना असतात त्याचे पालन करणे आपले सर्वाचे कर्तव्य असते आणि ते पालन करावे पण त्याच ठिकाणी आपण वारंवार चुका करतो
वरील गुण नसणाऱ्या व्यक्तीमध्ये समयसूचकता नसते त्यामुळे ते गोंधळून जातात मन एकाग्र करू शकत नाहीत, त्यांच्यात आत्मविश्वास कमी जाणवतो, शिस्तीचा सुध्दा अभाव दिसून येतो.
- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...