Sunday, 15 May 2016

जागतिक कुटुंब दिवस निमित्ताने लेख 

" वसुदेव कुटुंबकम "

कुटुंब म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते एक असे चित्रं ज्यात आजी आजोबा आई वडील भाऊ बहीण काका काकू आणि इतर मंडळी असा जवळपास दहा ते पंधरा लोकांचा समूह. या कुटुंबात वावरत असताना मिळतो अनेक गोष्टीचे संस्कार जसे की वडिलांनी एखादी वस्तू घरात आणली असेल तर ती सर्वांनी मिळून मिसळून खावी. यामूळे मुलांवर समानता या मूल्यांची नकळत रुजवण होते. घरात वाडवडिलांचा वावर असल्यामुळे घरातील सर्वच जण दबक्या आवाजात संवाद करतात. म्हणजे नवरा बायको, भाऊ बहीण यांच्यात होणारे भांडण किंवा धुसफुस ला आळा बसतो. कोणी मोठ्या आवाजात बोलत नाही. घरातील सर्व कामे विभागली जातात. ज्यांना जे काम जमते ते काम कुणी सांगण्याच्या अगोदर केली जातात. काही जण तर वडील मंडळीकडून शाबासकी मिळविण्यासाठी पुढे पुढे येऊन काम करतात. जणू त्यांचामध्ये स्पर्धा लागली असेल. घरातल्या प्रत्येक बाबींवर नियंत्रण असते. ते मग खरेदी करण्याचे असेल वा कुठे गावाला जायचे असेल. प्रत्येक गोष्ट वडील मंडळींना विचारूनच करावे लागते त्यामूळे घरातील प्रत्येक व्यक्तीच्या चैन किंवा ऐश आरामच्या बाबीला एकप्रकारे लगाम घातल्या जाते. एकत्रित कुटुंब पध्दतीमुळे बऱ्याच गोष्टी चांगल्या घडतात. लहान मुलांना घरातील आजी अन् आजोबा व्यवस्थितरित्या सांभाळ करतात. त्यांना रामायण महाभारत इसापनीती किंवा इतर गोष्टी सांगतात. आजी गाणे ऐकवते त्यामूळे मुले भविष्यात चांगले व्यक्ती बनू शकतात. परंतु सध्याच्या नवीन पध्दतीमधील जोडप्याना असे एकत्र कुटुंब पध्दत म्हणजे डोक्याला ताप वाटत असते. वधूपिता आपल्या मुलीसाठी स्थळ शोधत असताना प्रत्येक गोष्टीची चौकशी करतो त्यात हे पण विचारपूस करतो की लग्नानंतर मुलगा कोठे राहणार आहे ? मुलगा स्वतंत्र राहणार असेल तरच वधूपिता लग्नासाठी होकार देतो अन्यथा नाही. यांत त्या वधूपित्याची काय चूक असते. आपल्या मुलीला सासरी जास्त कष्ट पडू नये, तिने सुखात रहावे याच विचारात प्रत्येक वधूपिता असतो. ज्यावेळी आपल्या मुलांच्या लग्नाची वेळ येते तेंव्हा मात्र हाच वधू पिता सासरी आलेल्या मुलीला नावे ठेवतो. माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केली. सासू सासऱ्या सोबत राहिले तर हिला जास्त काम करावे लागते म्हणून तिच्या घरांच्या लोकांनी आमचं नातं तोडून काढलं असा आव आणतात. परंतु प्रत्यक्षात त्यांची सु्रुवात माझ्याकडून झाली याचा मात्र विचार केला जात नाही. याच विचार शैलीतून आज एकत्रित असलेली कुटुंब पध्दती विभक्त झाली आहेत. हम दो हमारे दो किंवा आम्ही दोघे राजा - राणी, नको आमच्यात कोणी या ही भावना दिवसेंदिवस बळावत चालली आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. कदाचित या गोष्टीची चिंता कोणी करीत नाहीत किंवा त्यांची जाणिव त्यांना अजून झाली नाही. आपल्या आई वडिलांपासून विभक्त राहून खरेच आपल्या कुटुंबाची प्रगती होते काय ? या गोष्टीचा गंभीरतापूर्वक विचार केल्यास नाही हेच उत्तर येते. मात्र तरी सुध्दा वेगळी चूल मांडण्याचा अट्टाहास कधी बायकोकडून तर कधी नवऱ्याकडून होते. यांत कोणाचा दोष आहे ? यांपेक्षा याची झळ आपल्या लेकरांना लागते हे आपण कधीच विचार करीत नाहीत.विभक्त कुटुंबात राहणारी मुले सहसा एकलकोंडी होतात. प्रत्येक गोष्ट मागितली की मिळते त्यामुळे हट्टी होतात. घरात आणलेली वस्तू आपलीच, त्याच्यावर आपलाच जास्त अधिकार आहे या सवयीमुळे  त्याच्यात स्वार्थी भावना खोलपर्यंत रुजते. त्यांच्यावर आजीच्या गाणी आणि आजोबांच्या गोष्टी ऐवजी टीव्ही वरील अश्लील व बिभत्स गोष्टीचे संस्कार होतात. समाजात काही अनैतिक बाब घडली की आपणंच बोलून मोकळे होतो काय ही आजकालची पोरं. काहीच मॅनर नाहीत. सर्वाना समान हक्क या कायद्याने आज स्त्रिया पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत, रोजगार करीत आहेत आणि मिळेल ती नौकरी ही करीत आहेत. घरातील नवरा बायको दोघे पण आज आपल्या कुटुंबासाठी पैसे कमवीत आहेत. ही आनंदाची बाब आहे, यांत शंकाच नाही. मात्र नौकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडल्यावर चिमुकली लेकरे दुसऱ्याच्या हाती सोपवली जाते. तेंव्हा त्यांच्याकडून कोणत्या संस्काराची आपण अपेक्षा करणार ? अश्या वेळी नक्कीच आपणास आजी आजोबांची क्षणभर का होईना आठवण आल्याशिवाय राहणार नाही. घराघरात नवरा - बायको यांच्या वादविवाद विकोपाला जाऊन त्याचे पर्यवसान घटस्फोटमध्ये होण्याचे प्रमाण वाढण्यामागे सुध्दा ही विभक्त कुटुंब पध्दत कारणीभूत आहे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. घरातील नवरा बायकोच्या भांडणाचे प्रतिकूल परिणाम मुलांच्या भविष्यावर होतो. रात्री भांडण झाले की दिवस उगवला की बाई माहेरी जाते, जाताना सोबत लेकरांना घेऊन जाते. पण लेकरांची शाळा बुडेल, त्याचा अभ्यास राहून जाईल या गोष्टीचा विचार ते कदापिच करणार नाहीत. शहरांत अश्या घटना फार कमी घडत असतील मात्र ग्रामिण भागात असे प्रकार सर्रास घडतात.बायको म्हणेल तसा नवरा ऐकावेच लागते किंवा नवरा म्हणेल तसे बायकोला ऐकावेच लागते असे चित्रं या राजा राणी च्या कुटुंबात दिसून येते. अश्या कुटुंबात एकमेकास विरोध झाला की भांडण होणार हे ठरलेलं आहे. परंतु जर राजा व राणी दोघेही सामंजस्यपणाने एकमेकाला समजून घेऊन संसार केल्यास त्यांच्या एवढा सुखी जगात शोधूनही सापडणार नाहीत.
आजची कुटुंब व्यवस्था कशी ही असेल आणि आपण एकत्रित असो वा विभक्त कुटुब पध्दती मध्ये राहत असो आपल्या लेकरांसाठी वर्षातून किमान एक दोन वेळा तरी काही ना काही कारणांनी एकत्र आले पाहिजे
मौजमस्ती केली पाहिजे
यामुळे मुलांवर योग्य संस्कार होतात जे की किती ही पैसा खर्च केला तरी विकत मिळणारी वस्तू नव्हे त्यासाठी आपण आपल्या वागणूकीत बदल केला पाहिजे. सुखी कुटुंबात सर्व लोकं एकमेकाना समजून घेऊन राहतात म्हणूनच ते दूर दूर राहून सुध्दा सुखी राहतात. त्यांच्याजवळ काही जादूटोणा नाही की मंत्र तंत्र नाही. चला आपण ही सर्वच जण या गोष्टीचा अंगीकार करू आणि संपूर्ण देश वसुदेव कुटुंबकम म्हणजेच सुखी कुटुंब करू या

- नागोराव सा. येवतीकर,
  शिक्षक व स्तंभलेखक, धर्माबाद

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...