Saturday, 14 May 2016



शिक्षण अधिकार कायदा 2009 नुसार

25 % प्रवेश मिळेल . . . . पण विद्यार्थी टिकेल काय ?


शिक्षणाने मानवी जीवनाचा विकास होतो, असे यापूर्वी अनेकांनी सांगितले आहे.  महात्‍मा फुले यांनी शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे म्‍हटले आहे तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला वाघिणीचे दूध असे संबोधले आहे.  शिक्षणामुळे माणसाच्‍या शारिरीक, अध्‍यात्मिक, मानसिक अंगातील उत्‍कृष्‍टतेचा विकास होतो, असे महात्‍मा गांधीजी यांनी म्‍हटले आहे.  माणसातील पूर्णत्‍वाचा अविष्‍कार म्‍हणजे शिक्षण असे स्‍वामी विवेकानंद यांनी म्‍हटले आहे.  शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे असे म्‍हटले जाते.  माणसांना परमेश्‍वराने दोन डोळे दिले आहेत, ज्‍याच्‍या आधारे संपूर्ण सृष्‍टी पाहू शकतो; मात्र या दृष्‍टीला ज्ञानाचा आधार मिळाला तर पाहत असलेल्‍या दृष्‍टीमध्‍ये चांगली सृष्‍टी बघायला मिळेल.  ज्ञान मिळविण्‍यासाठी मग शिक्षणाची अत्‍यंत आवश्‍यकता असते.  शिक्षणाशिवाय कोणत्‍याही विषयाचे सखोल ज्ञान मिळत नाही.  आपणास एखाद्या विषयात खूप माहिती मिळवायची असेल तर त्‍यासाठी त्‍याचे शिक्षण ध्‍यासपूर्वक घेणे अत्‍यंत गरजेचे आहे.  आज एकविसाव्‍या संगणकाच्‍या युगात वावरत असताना एखाद्याला शिक्षणाचे महत्‍त्‍व पटवून सांगणे एकतर मूर्खपणाचे किंवा अतिशयोक्‍तीचे ठरणार असे वाटते.  तरी पण देशात आजही असा समाज किंवा जमात दृष्‍टीस पडते की, ज्‍यांना शिक्षणाचे महत्‍त्‍व समजावून सांगावे लागते.  दारिद्रयाच्‍या खाईत असलेले, अत्‍यंत गरीब परिस्थितीमधील आणि मजूरदार असलेल्‍या लोकांना शिक्षणाचे महत्‍त्‍व पटवून देणे गरजेचे वाटते.
सध्‍या सर्वत्र जागरूक पालक दिसून येतात आणि आपल्‍या मुलांना उत्‍तमातील उत्‍तम शिक्षण कसे मिळेल? या दृष्टिकोनातून विचार करणारे पालकसुद्धा आढळून येतात.  तशी ही आनंदाची बाब आहे.  प्रत्‍येक पालक आपल्‍या मुलांना चांगल्‍यात चांगल्‍या शाळेत प्रवेश मिळवून देण्‍यासाठी धडपड करतात.  त्‍यासाठी लाखो रूपये खर्च करण्‍याची सुद्धा तयारी दाखवितात.  पालकांच्‍या याच मानसिकतेतून राज्‍यात गेल्‍या १०-१५ वर्षांत Convent किंवा English माध्‍यमाच्‍या शाळांचा पूर आला आहे असे वाटते.  पूर्वी महानगर किंवा शहरापुरते मर्यादित असलेल्‍या या विनाअनुदानित शाळा शहरांच्‍या गल्‍लोगल्‍लीत आणि ग्रामीण भागात गावोगावी झाल्‍या आहेत.  शाळेच्‍या आत-बाहेर आकर्षक रंगरंगोटी, सजावट, उच्‍च प्रतीचे गणवेश, टाय,बेल्‍ट आणि शूज अर्थात टापटीपपणा यात लोकांना नेहमीच आकर्षून घेतो अशा बाह्य अंगाचा विचार करून पालक मंडळी या विनाअनुदानित शाळेकडे वेधले जातात अन् आपले मूल याच शाळेत प्रवेश घेऊन शिकावे, असे त्‍यांना वाटायला लागते.  यात आश्‍चर्यसुद्धा असे काही नाही.  कारण प्रत्‍येक पालक आपले स्‍वत:चे प्रतिबिं‍ब आपल्‍या पाल्‍यामध्‍ये पाहतात, यात त्‍यांची चूक कदापिच नाही; मात्र त्‍या स्‍वप्‍नपूर्तीसाठी आपल्‍या चिमुकल्‍या लेकरांच्‍या कलचा अजिबात विचार करीत नाही असे दिसून येते.  सध्‍या संपूर्ण राज्‍यात RTE नुसार 25 टक्‍के प्रवेश SC-ST आणि दारिद्रय रेषेखालील पालकांच्‍या मुलांना 25 टक्‍के कोट्यातून प्रवेश देण्‍याची Online प्रक्रिया चालू झाली आहे; परंतु खरोखरच या प्रक्रियेतून प्रवेश देण्‍यात आलेली मुले शाळेतल्‍या शेवटच्‍या वर्गापर्यंत टिकतील काय?  असा एक प्रश्‍न निर्माण होणे साहजिक आहे.  विनाअनुदानित शाळा या मोठ्या प्रमाणात English माध्‍यमाच्‍या शाळा आहेत, असे गृहित धरण्‍यास काही एक हरकत नाही.  तेव्‍हा या माध्‍यमातील विनाअनुदानित शाळेत प्रवेश घेणारा विद्यार्थी व त्‍याचे अपडेट कसे असते, हे आपणा सर्वांना माहीतच आहे.  शाळेत जाण्‍यासाठी उच्‍च दर्जाचा गणवेश त्‍यासोबत टाय, बेल्‍ट, सॉक्‍स आणि शूज आवश्‍यक असतात.  शालेय दप्‍तर, त्‍यातील वह्या, पेना, कंपास, वाटर बॉटल, टिफिन बॉक्‍स सर्व वस्‍तू शासनाकडून मोफत मिळत नाहीत.  त्‍याचा खर्च अर्थातच पालकांना करावा लागणार आहे.  त्‍यामुळे मोफत शिक्षणाचा कायदा असून सुद्धा पालकांच्‍या खिशाला यामुळे आर्थिक झळ सहन करावी लागणार आहे.  25 टक्‍क्‍यांच्‍या कोट्यातून प्रवेश मिळणारी पालके  आपल्‍या मुलांसाठी एवढा खर्च करतील काय?  हाही एक प्रश्‍न नक्‍कीच लक्षात घेण्‍यासारखा आहे.  या शाळांमध्‍ये शालेय पोषण आहार योजनेअंतर्गातील मध्‍यान्‍ह भोजन मिळणार नाही.  मग स्‍वत:चा जेवणाचा डबा घेऊन शाळेत जावे लागेल.  त्‍या मुलाच्‍या वर्गातील इतर मुलांच्‍या डब्‍याची तुलना मुले करू लागली तर या मुलांमध्‍ये न्‍यूनगंड तयार होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.  त्‍या मुलांमध्‍ये समानता किंवा समता न राहता दरी वाढत जाऊ शकते.  प्रत्‍येक बाबतीत त्‍या मुलाचे खच्‍चीकरण होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.  त्‍यापुढील अत्‍यंत महत्‍त्‍वाचे आणि लक्षात घेण्‍यासारखी एक बाब म्‍हणजे या पालकांच्‍या घरातील शैक्षणिक परिस्थिती.  इंग्रजी माध्‍यमाच्‍या शाळेत शिकणार्या मुलांच्‍या घरातील शैक्षणिक वातावरण विद्यार्थ्‍यास अनुकूल असेल तरच त्‍या प्रवाहात टिकून राहतील अन्‍यथा शिक्षण क्षेत्राच्‍या बाहेर फेकले जाण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.  विविध प्रकारचे कार्ये करणे अत्‍यावश्‍यक असते आणि ते पालकांच्‍या नियंत्रणाखालीच मुले करू शकतात तेव्‍हा पालक आपल्‍या मुलांकडे खरोखरच लक्ष देतील काय?  कौटूंबिक आणि सामाजिक परिस्थिती योग्‍य नसल्‍यामुळे शिक्षण पूर्ण होईपर्यंत मूल टिकून राहील काय?  हेही लक्षात घेणे आवश्‍यक आहे.
घराजवळच्‍या शाळेत आपल्‍या मुलांना प्रवेश देणे मुलांच्‍या दृष्‍टीने आणि पालकांच्‍या दृष्टिकोनातून हिताचे आहे.  घरापासून दूर असलेल्‍या शाळेत आपल्‍या मुलांना प्रवेश दिला तर त्‍याला शाळेत ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागतो.  त्‍यांना ये-जा करण्‍यासाठी पालकांना वेळ द्यावा लागेल किंवा खाजगी वाहतुकीची व्‍यवस्‍था करावी लागते.  त्‍यासाठी पुन्‍हा आर्थिक झळ सहन करावी लागते.  दूरवरच्‍या शाळेत ये-जा करताना मुलांची सुरक्षितता याची काळजी राहते.  मुलांना सुद्धा मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागतो.  तो नेहमी दबावाखाली वावरत राहतो.  शाळेतून रोजच तो थकून-भागून येतात त्‍यामुळे त्‍याच्‍या चेहर्यावर उदासिनतेचा भाव दिसून येतो.  ते अभ्‍यास न करता झोपी जातीलच शिवाय पालकांशी संवाद करण्‍यास सुद्धा वेळ राहणार नाही अर्थातच यात मुलांचा विकास नक्‍कीच नाही.  याउलट जर आपल्‍या घराजवळील शाळेत (मग ती शाळा कोणतीही असेल) आपल्‍या मुलांना प्रवेश दिला तर वरील सर्व प्रकारातून आणि त्रासातून आपली सुटका होईल आणि मुलांचा सर्वांगीण दृष्टिकोनातून विकास होईल असे वाटते.
सरकारी शाळा आपल्‍यासाठी एक योग्‍य पर्याय आहे.  आज सरकारी शाळा डिजीटल व ज्ञानरचनावादीवर आधारित निर्माण होत आहेत.  या शाळांचा दर्जा सुद्धा वाढीस लागला आहे.  या ठिकाणी सुद्धा चांगल्‍या प्रतीचे शिक्षण मिळत आहे.  आजपर्यंत जे वर्ग 1 व 2 चे अधिकारी झाले आहेत त्‍या सर्वांचे शिक्षण जिल्‍हा पहरषदेच्‍या सरकारी शाळेत झाले आहे असा इतिहास आहे.  मग या शाळेपासून दूर न जाता शक्‍य असेल तर पालकांनी या बाबींचा विचार करून नियम किंवा कायद्याचा विचार बाजूला सोडून खरोखरच आपले मूल या विनाअनुदानित शाळेत टिकेल काय?  याचा किमान एक वेळ तरी विचार करावा.  मुलांच्‍या मायबोलीतून दिलेले शिक्षण त्‍यांना लवकर कळते.  एकदा त्‍यांना मूलभूत ज्ञान मिळाले तर ते ज्ञानाच्‍या बळावर कोणत्‍याही भाषेत व्‍यक्‍त करू शकतात.  आपल्‍या अभ्‍यासावरून या ठिकाणी आपण आपल्‍या मुलांना प्रवेश कशासाठी घेत आहोत?  याबाबत पालकांचे प्रबोधन अधिकारी, शिक्षक आणि जागरूक नागरिकांकडून होणे अपेक्षित आहे.  गेलेली वेळ आणि काळ आपल्‍या आणि मुलांच्‍या आयुष्‍यात कधीच परतणार नाही.  त्‍यामुळे प्रत्‍येक पालकांनी आपल्‍या मुलांना प्रवेश देताना जागरूकपणे विचार करावा.  एवढेच या निमित्‍ताने सुचवावेसे वाटते………!


नागोराव सा.येवतीकर
     9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...