Monday, 29 December 2025

नवीन वर्ष समृद्धीचे जावो ( Happy New Year 2026 )

         नवीन वर्ष समृद्धीचे जावो 

जुना वर्ष संपून नवीन वर्ष येतो तेव्हा वेळेच्या दारावर अलगद टिकटिक आवाज होते. “मी आलो आहे” असे जणू ते हळूच कानात सांगते. जुन्या वर्षाच्या पायऱ्या ओलांडून ते आपल्या जीवनात प्रवेश करते आणि मनात नकळत नवे विचार, नवी उमेद जागवते. कॅलेंडरवरची तारीख बदलते, पण त्या बदलासोबत मनाच्या कोपऱ्यात काहीतरी नव्याने उमलू लागते.
जुन्या वर्षाच्या आठवणीत मन रमून जाते. सुख-दुःखाच्या कडू-गोड प्रसंग पुन्हा एकदा डोळ्यासमोर तरळू लागतात. त्या सर्व आठवणी म्हणजे रंगीबेरंगी चित्रांसारख्या असतात. काही आनंदाच्या, काही दुःखाच्या, तर काही शिकवण देणाऱ्या. त्या आठवणी मनाच्या कप्प्यात नीट जपून ठेवून पुढे जाण्याचे धैर्य नवीन वर्ष देते. ते आपल्याला सांगते की भूतकाळ विसरायचा नाही, पण त्यात अडकून देखील राहायचे नाही.
तशी तर रोजच्या सारखी पहाट होते पण आज नवीन वर्षाची पहाट ही खास असते. वातावरणात एक वेगळाच ताजेपणा जाणवतो. हिवाळाच्या थंड वाऱ्यासोबत आशेची चाहूल लागते. मनात नकळत विचार येतात की, या वर्षी काहीतरी वेगळं करूया, काहीतरी चांगलं घडवूया. मग संकल्प जन्माला येतात, काही ठाम असतात तर काही हळवे असतात. ते संकल्प कधी पूर्ण होतात, कधी वाटेत हरवतात, पण प्रयत्न करण्याची प्रेरणा मात्र कायम देऊन जातात.
नवीन वर्ष आपल्याला एक नवी दिशा देतो, नव्या दृष्टीने पाहायला शिकवतो. रोजची तीच घाई, मनावर असलेला  ताणतणाव, अपूर्ण राहिलेल्या इच्छा यांमधून थोडावेळ थांबून स्वतःकडे पाहण्याची एक संधी देते. आपण खरंच आनंदी आहोत का ? समाधानी आहोत काय ? आपल्याला नेमकं काय हवं आहे ? या सर्व बाबीचा विचार करण्यासाठी हा क्षण जणू खासच असतो.
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मिळालेले शुभेच्छांचे संदेश आणि हास्याने भरलेले चेहरे पाहण्यात नवीन वर्ष साजरे होते. एकीकडे खूप घोंगाट, युवा वर्गात नवीन वर्ष साजरा करण्याची क्रेज वेगळीच असते. पण त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे असते मनातले शांत समाधान. कदाचित हे कळायला खूप वेळ लागतो. त्यापेक्षा गरजू व्यक्तीला दिलेली मदत, कुणाच्या रडवेल्या चेहऱ्यावर फुलवलेले हसू, किंवा स्वतःशी केलेला एक प्रामाणिक संवाद यातच नवीन वर्षाचा खरा आनंद दडलेला असतो.
शेवटी नवीन वर्ष आपल्याला एवढेच सांगतो की, मी फक्त एक सुरुवात आहे. पुढची वाट तुम्हालाच चालायची आहे. प्रेम, मेहनत आणि आशेचा हात धरून जर आपण पुढे चाललो, तर हे नवीन वर्ष नक्कीच आपल्या आयुष्यात उजेड घेऊन येईल. आपण ठरवलेल्या इच्छा, आकांक्षा आणि संकल्प पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांच्या इच्छा आणि संकल्प पूर्ण होवो, नवीन वर्ष सुख समृद्धीचे, आनंदाचे जावो हीच या नवीन वर्षाच्या आगमन निमित्ताने शुभेच्छा ...... ¡

- नासा येवतीकर, स्तंभलेखक 

No comments:

Post a Comment

मकरसंक्रांत ( makarsankrant )

मकरसंक्रांती निमित्त लेख गोड गोड बोलण्याचा सण नविन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत.  मकरसंक्रांत म्हणजे सूर्य धनू राशीतून मकर ...