महिलांनी नव्या वर्षाचे स्वागत कसे करावे ?
प्रत्येकजण नवीन वर्षाचे हर्षउल्लासने स्वागत करत असतो. नवीन वर्ष हे प्रत्येकासाठी एक नवी सुरुवात असते. महिलांच्या आयुष्यातही नवीन वर्ष म्हणजे नवी आशा, नवी संधी आणि आत्मविकासाचा नवा टप्पा असतो. महिलांनी नव्या वर्षाचे स्वागत केवळ उत्सव म्हणून न करता स्वाभिमान, आत्मविश्वास आणि सकारात्मक बदलांच्या निर्धाराने करणे अधिक उचित ठरेल.
नवीन वर्षाचे स्वागत करताना महिलांनी सर्वप्रथम आत्मपरीक्षण करावे, असे वाटते. सरलेल्या वर्षात आपण आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि स्वतःसाठी काय केले याचा विचार करणे आवश्यक आहे. स्वतःच्या गरजा, आवडी-निवडी आणि स्वप्ने यांना वेळ न देणे ही अनेक महिलांची समस्या असते. त्यामुळे या नवीन वर्षात स्वतःसाठी वेळ काढण्याचा, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याचा संकल्प केल्यास स्वचा विकास होईल.
महिलांनी स्वतःच्या आरोग्याला विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कारण घरातील महिला निरोगी आणि सक्षम असेल तर त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य देखील निरोगी राहू शकते. त्यामुळे नवीन वर्षात शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचा आपण निर्धार करावा. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती आणि तणावमुक्त जीवनशैली यामुळे आपले जीवन अधिक सशक्त बनते. स्वतः निरोगी असणे म्हणजे संपूर्ण कुटुंब निरोगी असणे होय. त्याचसोबत नव्या वर्षाचे स्वागत करताना महिलांनी शिक्षण, करिअर आणि कौशल्य विकासाकडेही लक्ष द्यावे. नवीन काही शिकणे, आपली आवड जोपासणे, आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपला वेळ मोबाईल मधील रिल किंवा इतर काही बघण्यात घालविण्यापेक्षा एखादे पुस्तक वाचनात घालावावे. त्याचे अनुकूल परिणाम कुटुंबात पाहायला मिळतात. शाळेत जाणारी आपली मुलं आपले अनुकरण करत असतात. त्यामुळे लहान मुलावर योग्य संस्कार होतील असे आपले वर्तन, राहणे, वागणे आणि बोलणे असायला हवे. छत्रपती शिवाजी महाराज असे सहज घडले नाहीत तर त्यांना त्यांची आई राजामाता जिजाऊ यांनी घडविले. आपल्या कुटुंबाला घडविण्यात महिलांचा सिंहाचा वाटा असतो. आधुनिक युगात महिलांनी आर्थिक स्वावलंबन आणि आत्मसन्मान यांचा विचार करून पुढे जाणे आवश्यक आहे. आपणाला कोणासमोर हात पसरण्याची वेळ येऊ नये म्हणून स्वावलंबी होण्याचा मार्ग निवडावे.
महिलांनी नव्या वर्षाचे स्वागत कौटुंबिक व सामाजिक जाणीव ठेवून करावे. इतर महिलांना प्रोत्साहन देणे, गरजू स्त्रियांना मदत करणे, मुलींच्या शिक्षणाला पाठिंबा देणे आणि स्त्रीसन्मान जपणे हे संकल्प समाजाला योग्य दिशा देतात. महिलांनी एकमेकींचा आधार बनल्यास समाज अधिक मजबूत होतो.
घर आणि कुटुंब सांभाळताना स्वतःच्या ओळखीला विसरू नये, हा संकल्प नव्या वर्षात करणे गरजेचे आहे. आपले विचार मोकळेपणाने मांडणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि आत्मविश्वासाने निर्णय घेणे ही महिलांची खरी ताकद आहे.
जाता जाता असे म्हणता येईल की, महिलांनी नव्या वर्षाचे स्वागत आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोनाने करावे. स्वतःचा विकास, कुटुंबाचे कल्याण आणि समाजाची प्रगती या तिन्ही गोष्टींचा समतोल साधल्यास नवीन वर्ष महिलांसाठी यश, समाधान आणि आनंद घेऊन येईल, यात शंकाच नाही. सर्वाना नवीन वर्ष 2026 च्या खूप खूप शुभेच्छा ...!
- नासा येवतीकर, स्तंभलेखक
No comments:
Post a Comment